Mar 02, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

घुसमट १.०

Read Later
घुसमट १.०


आपला संपूर्ण भारत लग्नकार्य मुंज अशा भव्यदिव्य कार्यक्रम साठी खूप प्रसिद्ध आहे. आणि लग्न म्हणलं की खूप सगळा पसारा, पै-पाहुणे , गप्पा मस्ती, गाणी आणि खूप सगळी मौजमजा... प्रेमाने उल्हासने अगदी ओतप्रेत भरलेला. पण तितकेच त्यात रितिरिवाज , परंपरा, ओघात येतातच. आणि लग्न झाल्यावर मजा असते खेळांची आणि दुसऱ्या दिवशी सत्यनारायण पूजेची. यजमान जोडपी तर अगदी सातव्या आसमंतात असतात.

विपुल आणि नेहा असेच एक प्रेमी युगुल.. ज्यांच अगदी धुमधडाक्यात लग्न झालं. आणि सासरी गृहप्रवेश होताच परंपरेनुसार खेळ सुरू झाले. आणि शेवटचा खेळ होता दुधाच्या वाडग्यात अंगठी शोधण्याचा...!

परंपरेप्रमाणे दुधाच्या वाटीतून अंगठी शोधण्याचा विधी होणार होता. खेळ बघण्यासाठी सगळेच उत्सुक होते. विपुलची बहीण सोनल ने अनौनसमेंट केली, "ज्याला वधू-वरापेक्षा जास्त वेळा अंगठी सापडेल, त्याचच \"राज्य\" घरात चालत. तसेच ती अंगठीही त्याचीच असेल. अंगठी खूप मोठी सोन्याची होती आणि त्यात लाल मोती होते. सगळे नेहा आणि विपुलच्या भोवती बसले होते. पहिल्या राऊंड मध्ये विपुलच्या हाती अंगठी आली पण नेहाचा शृंगारावर भाळून वाडग्यातच नेहाच्या बोटांत गोवली. आणि नेहाने अगदी ऑस्कर मिळल्यागत अगदी आनंदाने ती अंगठी काढून सगळ्यांना दाखविली, तेवढ्यात घरातली वयस्कर, अर्थात विपुलची लांबची आत्या नेहाच्या कानात कुजबुजली... "नेहा हे बघ, तुला अंगठी मिळाली तर तू पण गुपचूप ती विपुलला देऊन देत जा.. बरे वाटत नाही, सगळे बघत आहेत. घरावर सत्ता चालवणारा माणूसच आहे, जाऊ दे.”

मात्र, दुसऱ्यांदाही नेहानेच अंगठी काढली आणि तिसर्‍यांदाही नेहाच्या हातात अंगठी आली पण नेहाला जाणवलं की कदाचित विपुलच्या कुटुंबाला आनंद नाही झाला . तिने तिच्या हातातली अंगठी वाडग्यात बुडवून ठेवली. शिवाय, नेहाला ती अंगठी पाचपैकी तीनदा सापडली असल्याने ती अंगठी नेहाचीच असणार होती. पण पुढचे दोन वेळा मुद्दाम न सापडण्याची एकटिंग करून विपुल च्या हाताजवळ अंगठी दिली आणि कुणाला संशय नको म्हणून त्याने ती बाहेर काढली तसे सगळे खुश झाले, आणि त्यांच्या चेहऱ्यावरील लकाकी नेहाच्या नजरेतून सुटली नाही त्यामुळे शेवटी देखील विपुलनेच काढली.

पण काढल्यानंतर त्याने नेहाचा हात हाती घेतला नि तिच्या बोटात घालू लागला पण ती थोडी मोठी साईझ असल्याने तिच्या बोटांत ढिली होत होती तर विपुलने ती अंगठ्यात घातली.

"अरे व्वा, नेहा वहिनी! तुमच्या अंगठ्यातही खूप भारी दिसतेय."

"हो, आजकाल अंगठ्याला अंगठी घालण्याची फॅशन झाली आहे!"

पण खोचट आत्येचे लगेच नेहाच्या अंगठ्यातील अंगठी काढली.

"नेहा, तुला खूप मोठी झाल्यागत वाटतेय, तू ही विपुलला दे आणि तस ही तू अजून अल्लड आहेस, सांभाळू शकणार नाहीस आणि आमची वडिलोपार्जित अंगठी हरवशील."

बरं म्हणत नेहाने त्यावर काहीच हरकत घेतली नाही आणि अंगठी दिली. दुसऱ्या दिवशी सत्यनारायण पूजेनंतर नेहा आणि विपुल घरातील सदस्यांसोबत बसले होते.

"विपुल बेटा, तू ही अंगठी ठेव. नेहाला सांभाळता येणार नाही. ती तितकी हुशार नाही, आणि उगाच अंगठी हरवून जाईल."

"नाही आत्तु, तू अंगठी इथेच आईकडे ठेव आणि तसेही, आता ऑफिस सुरू होईल तर मला पुन्हा पुण्याला शिफ्ट झालो तर तिथे दागिने जेवढे कमी असतील तितके चांगले... कारण आम्ही एकटेच असू आणि दिवसभर ऑफिसमध्ये राहू. सोबतच तिथे खूप काम असेल तर कामाच्या रागाड्यात वस्तूंच भान राहत नाही मला. त्यात मला रूम पण शिफ्ट करायचीय. शिफ्टींग बरोबरच तिथे घरची बरीच कामे असतील."

"त्याची काळजी करू नकोस. नेहा घेईन तिच्या ऑफिस मधून आणखी काही दिवस सुट्टी.. घराची घडी नीट बसवून मग ती जॉईन करेल. तु फक्त तुझ्या कामावर लक्ष केंद्रित कर, बाकी सर्व ती करेल. ती खूप हुशार आहे, आम्हाला खात्री आहे नेहा तिथलं सगळं काही व्यवस्थित सांभाळेल.

नेहाला वाटले की कालपर्यंत ती अंगठी हाताळण्याइतकी हुशार नव्हती, पण आज अचानक तिला \"हुशार\" ही पदवी कशी मिळाली? मुर्ख लोकांच्या खोडसाळपणाने त्रस्त होण्यापेक्षा गप्प बसून मनःशांती राखण्यात अधिक समजूतदार पणा आहे हाच विचार केला आणि गप्प बसली.


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//