घुसमट

व्यथा एका सुनेची

"आमच्या घरी अगदी मोकळं वातावरण आहे. तुला नोकरी करायची तर कर, घर सांभाळलेस तरी आमची काही हरकत नाही". सासूबाईंनी ऋचाला लग्नाआधीच सांगितलं होत. त्यामुळे ऋचा ने लग्नानंतर तिची नोकरी आहे तशीच सुरू ठेवली. घरातील जवळ- जवळ सारी कामे अजूनही सासूबाईच करत असल्याने ऋचा घरकामाच्या बाबतीत तशी निवांत होती. जो तो तिच्या सासुबाईंचे कौतुक करत होता. अशी सासू मिळायला भाग्य लागतं ग. त्यामुळे ऋचा ही खुश होती.
लग्नाचा 'दुसरा वाढदिवस' साजरा करायला ऋचा आणि निखिल परगावी गेले. घरी परतल्या नंतर सासूबाईंचे ऋचा सोबतचे वागणे अचानकच बदलले होते. त्या कधी तिच्याशी अबोला धरू लागल्या, तर कधी तिच्यावर जास्त चीड चीड करू लागल्या . तिने खूप वेळेला सासूबाईंना विचारण्याचा प्रयत्न केला, पण त्या काही सांगायलाच तयार होईनात. आता मुद्दाम ऑफीस ला जाताना ऋचाला त्या घरातील कामे सांगू लागल्या, तर कधी मला आता 'होत नाही' तरीही मी करते सगळं घरातलं, असं ही म्हणू लागल्या. ऋचाच्या हातून काही चुका झाल्याच तर त्या  तिखट -मीठ लावून शेजारी -पाजारी सांगायला कमी करत नव्हत्या. हे सारं ऋचासाठी नवीनच होतं.

एक दिवस ऑफीस मधून घरी येताना ऋचा ची मावशी तिला रस्त्यात भेटली. बराच वेळ गप्पा झाल्या नंतर मावशी तिला हळूच म्हणाली," अगं तुझी सासू माझ्याकडे 'तक्रार' करत होती तुझ्याबद्दल. "अजुनही मीच घरातली सारी कामे करते. ऋचा काही कामच करत नाही. बरं आम्ही तिला कसलीही जबरदस्ती करत नाही, हेच काम कर, तेच काम कर म्हणून. पण सून म्हणून ती इकडची काडी तिकडे ही करत नाही घरी". ऋचा ला आश्चर्य वाटलं, आधी आपल्याशी इतकी छान वागणारी सासू खरचं माझी तक्रार घेऊन गेली असेल का मावशीकडे? तिने घरी आल्यावर वेळ पाहून मावशी जे काही म्हणत होती त्या बद्दल आपल्या सासूबाईंना विचारायचा प्रयत्न केला. पण त्यांनी स्पष्ट नकार दिला. "मी कशाला काय सांगू? आम्ही सहजच गप्पा मारत होतो, इकडच्या तिकडच्या. अगं तुला किती पावसाळे पाहायचे आहेत अजून. कोणी ना कोणी बोलत असतंच आपल्यामागे". एवढ्या गोष्टी मनावर घेत बसलीस तर जगणं अवघड होईल. मग ऋचा ने ही या गोष्टी कडे दुर्लक्ष केले. 

मध्यंतरी सोसायटीच्या 'हळदी- कुंकू' समारंभात ऋचा ला यायला थोडा उशीर झाला ,तर तिथे तिच्या सासुबाई फोनवर बोलत असताना तिने ऐकलं, "अग किती करायचं मी घरासाठी! सून आली तरी अजुनही मीच राबते. काही उपयोग नाही त्या ऋचा चा. ना कसलं वळण, ना काही रीतभात".
तिला धक्काच बसला. म्हणजे मावशी सांगत होती ते सारं खरं होत तर.
कशी- बशी हळदी कुंकू घेऊन ती घरी आली. घरी आल्यावर तिने सारा स्वयंपाक करायला घेतला इतक्यात सासुबाई आल्या आणि म्हणाल्या "अगं विचारून तरी करायचा स्वयंपाक.. का मनाला येईल तेच करशील? आम्हा दोघांना काही भूक नाही, तुमच्या पुरत करा, काय करायचंय ते.
रात्री सासूबाईंच बोलणं तिने निखिलच्या कानावर घातलं. "अगं सगळ्या घरात हेच असतं. तू नको लक्ष देऊ आईकडे. मला या असल्या गोष्टीत काही इंटरेस्ट नाही. सो, तू मला या नको सांगत जाऊ". निखिल आपल्या मोबाईल मध्ये डोकं घालत म्हणाला.
ऋचा मात्र रात्रभर याचा विचार करत राहिली, सासूबाईंच नक्की काय बिनसलं आहे!
कदाचित वयानुसार त्यांना फार कामे होत नसतील. आता आपणच पुढे व्हायला हवं म्हणून दुसऱ्या दिवशी ऋचा सासूबाईंना म्हणाली. "आई आता तुम्ही विश्रांती घ्या. मी सगळा स्वयंपाक करेन रोज आणि शक्य तितकी कामे ही करेन घरातली. तुम्हाला ही दिवसभर कामाचा ताण पडत असेल ना." तशा सासूबाई उसळून म्हणाल्या," इतकी वर्षे सारं करत आले. आता काय धाड भरली आहे मला? काही नको मी करते सगळा स्वयंपाक. हो बाजूला". तसाही ह्यांना आणि निखिल ला माझ्या हातचाच स्वयंपाक लागतो.
हे ऐकून ऋचा रडवेल्या चेहेऱ्याने निखिलकडे पाहू लागली. पण निखिल मात्र तो खांदे उडवत 'मी काय करू'? अशा आविर्भावात ऑफिस ला निघून गेला. ऋचा आपल्या खोलीत आवरायला गेली तसे सासरेबुवा आपल्या बायकोला समजावू लागले. "अग तूच आपणहून ऋचाच्या हाती का देत नाहीस सारं? तिने काही केलेलं तुला आवडत नाही आणि काही नाही केलं तरीही तुला चालत नाही. पोर बिचारी अवघडते. मग सरळ सांग तिला माझ्या तुझ्याकडून या साऱ्या 'अपेक्षा 'आहेत म्हणून आणि आता नातेवाईकांना आपल्याच सूनेबद्दल नाही- नाही ते सांगणं बंद कर. ऋचा खरचं समजूतदार आहे ग. इतके दिवस मी काही बोललो नाही, पण आता तुम्हा दोघींचे बोलणे ऐकून राहवलं नाही म्हणून बोलतोय". तशा सासूबाई आपल्या नवऱ्याला म्हणाल्या, तुम्ही असल्या गोष्टीत लक्ष कशाला घालताय? निखिल काही बोलतो का? नाही ना? मग तुम्ही ही शांत बसा". ऋचा आतून हे सारे ऐकत होती.
पुन्हा एकदा निखिलशी 'या विषयावर' नीट बोलता येईल व यातून काहीतरी मार्ग निघेल म्हणून लागलीच तिने निखिल ला मेसेज केला. "प्लीज आपण संध्याकाळी आपल्या नेहमीच्या ठिकाणी भेटूया का? ठीक सात वाजता"?
काही मिनिटांतच निखिल चा 'येस ' म्हणून रिप्लाय आला आणि ती डबा न घेताच घरातून बाहेर पडली.
बऱ्याच वेळाने तिने सासऱ्यांना फोन लावला. ते म्हणाले, "तुमचे तुम्ही बघा आता. आधी तिचा स्वभाव होता काहीसा असा. पण आता जास्तच हट्टी झालाय. तू लक्ष देऊ नको फार". सासरेबुवांचे हे म्हणणे ऐकून ऋचा नाराज झाली.

"तू असल्या गोष्टींकडे दुर्लक्ष कर ऋचा. किती वेळा सांगितलं आहे मी तुला? आणि मला या असल्या सासू -सुनेच्या वादात अजिबात घेत जाऊ नका. मला ही त्रास होतो याचा. मग हा ही प्रश्न पडतोच बाजू कोणाची घ्यायची? तुझी की आईची"? निखिल कॉफी चा सिप घेता- घेता ऋचाशी बोलू लागला.
"निखिल बाजू घेण्याचा प्रश्नच कुठे येतो? फक्त मला काय म्हणायचं आहे ते ऐकून घे बस्.
इतकीच अपेक्षा आहे रे मला तुझ्याकडून. मी काही आईंसोबत भांडायला नाही रे सांगत आहे तुला. पण अचानक आई कशा काय बदलल्या हेच कळत नाही मला. इतकं सोपं नसतं रे, या अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करणं. ऋचा रडवेली होत म्हणाली. 
"सारखं रडू बाई सारखं रडतेस काय गं? आपण जाऊ दोन दिवस फिरायला. तेवढंच तुला रिलॅक्स होईल", असे म्हणून निखिलने आपल्या सोबतच ऋचा ला ही ऑफीस मध्ये सुट्टी साठी मेल करायला सांगितला.
घरी येताच त्याने आईला सांगून ही टाकले की, "आम्ही दोघे दोन दिवस कुठेतरी बाहेर जाऊन येतोय". हे ऐकताच सासूबाई ऋचा ला ऐकू जाईल एवढ्या हळू आवाजात म्हणाल्या, "या फिरून या, पण आई बापाला कुठे ही नेऊ नका".  ऋचा ने मात्र या कडे साफ दुर्लक्ष केले.
सकाळी सामानाची पॅकिंग करताना ऋचा निखिल ला म्हणाली "आई - बाबांना नेऊया का सोबत"?  "नको. तुला बदल हवा म्हणून जातोय ना आपण? त्यांना घेऊन जाऊ की परत कधी तरी".निखिल बॅगा गाडीत ठेवत म्हणाला.

ऋचा आणि निखिल दोन दिवसानंतर घरी आले. तसा दुसऱ्या दिवशी ऑफिस मध्ये ऋचा ला तिच्या आईचा फोन आला. "अगं सासूबाईंना काहीतरी मदत करू लाग. नुसते बाहेर नका  फिरत जाऊ. झाली ना आता लग्नाला दोन वर्ष! थोडी जबाबदारी घे घरची. आधीच नोकरी निमित्त दिवसभर घराबाहेर असता तुम्ही. त्यांनाच करावं लागतं सगळं घरातलं". हे ऐकताच ऋचा ला कळून चुकलं, की आपण गेल्यानंतर सासूबाईंनी आपल्या आईचे ही कान ही भरलेत.

तिने घरी येताच सासूबाईंना याबद्दल विचारलं. नेहमी प्रमाणे त्यांनी मी त्या गावची नाहीच, असा सुर लावल्याने ऋचा चा राग अनावर झाला. सासूबाईंना तिने चांगलच धारेवर धरलं. हे असंच चालू राहणार असेल तर मला इथे राहायचं नाही म्हणून ऋचा निखिल ला म्हणू लागली. हे ऐकताच  'मी इतकी वाईट आहे का रे"? म्हणून निखिल कडे पाहत सासूबाई रडू लागल्या. हे पाहताच निखिल ने उलट ऋचालाच समज दिली. तुला काय करायचं ते कर. रहा वेगळी. पण मी आईला सोडून कुठेही येणार नाही.

आता घरचं वातावरण थोड शांत होईपर्यंत ऋचा आपल्या माहेरी निघून गेली, चार- आठ दिवसांसाठी. खूप विचार करून तिने स्वतः च्याच वागण्यात थोडा बदल करायचे ठरवले. पण ही न व्यक्त करता येणारी ' घुसमट ' आयुष्यभर का सहन करायची, याचं उत्तर मात्र तिला अजूनही नाही मिळालेलं!