घुंगरू (अंतिम भाग ५)

लघुकथा
आशेचा किरण (भाग ५)

मोना आणि अनुरागच्या तक्रारी नंतर पोलिसांनी त्या दोघांच्या घरी कळवले. दोघांच्याही घरचे पोहोचेपर्यंत पोलिसांनी सगळीकडे शोध घेतला. पण, ती माणसे आणि मेघना कुठेही सापडली नाही.
मनोहररावांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घातले‌. पोलिसांना सुध्दा लक्ष द्यायला सांगितले. पण, सगळीकडे शोध घेऊनही मेघनाचा थांगपत्ता लागत नव्हता.‌
पोलिसांनी सगळ्यांना समजावून परत पाठवले. "आम्ही शोध घेत आहोच. काही कळले तर आम्ही तुम्हांला सांगतोच आणि हो तुम्हांला काही कळले तर आम्हांला सांगा."

मोना आणि अनुराग खूप रडत होते. मेघनाच्या आई वडीलांची तर तब्येत खराब झाली. पण, काय करणार? मनोहररावांनी त्यांची समजूत काढली.
येणारा एक एक दिवस जगणं असह्य झाले होते. पण, आयुष्य काही थांबत नाही ना. प्रत्येकाला सावरावे तर लागणारच होते. एक ना एक दिवस मेघना परत येईल. या आशेवर सगळेचजण जगत होते. पोलिस त्यांच्या परीने प्रयत्न करत होते. तरीही दिवस , महिने वर्षे उलटून गेली. तरीही मेघनाचा काही पत्ताच नव्हता. त्यामुळे पोलिसांनी ही केस बंद केली.
हळूहळू का होईना मेघनाचे आई वडील ,मोना आणि अनुराग यांनी मेघना आता परत येणार नाही. ही गोष्ट मनाशी ठरवून टाकली.
पण, अनुरागतर तिच्या प्रेमात आकंठ बुडाला होता. मेघनाचा विसर पडावा यासाठी त्याच्या वडीलांनी त्याचे लग्न करून त्याच्यावर बरीच जबाबदारी टाकली. त्यामुळे त्याच्या वडीलांवर कधीही, कोणीही संशय घेतला नाही. सगळं कसं सुरळीत चालू होते.
अनुरागही आता संसारात गुंतला होता. हळुहळु सगळ्यांनाच मेघनाचा विसर पडत गेला. या गोष्टीला दहा वर्षं होत आली. एके दिवशी अनुराग त्याच्या मित्रांसोबत मुंबई फिरण्यासाठी गेला आणि काही मित्र मजा मारण्यासाठी फुस लावून त्याला गंगुबाईच्या कोठ्यावर घेऊन गेले. योगायोगाने म्हणा किंवा नशीबाने त्यांची पुन्हा एकदा भेट घडली. पण, अतिशय सालस आणि शांत असणारी मेघना आज मोहिनी म्हणून वावरत होती.
तिचे ते रुप बघून अनुराग बाहेर पडला. पण, खूप हळवा झाला होता. तो त्याच्या हाॅटेलवर पोहोचला. रडून मोकळं व्हावं. तर अश्रू कोरडे झाले होते. विचार करून त्याच्या डोक्याचा भुगा झाला होता. लहानपणापासून सोबत असलेल्या मेघनाचे रूप आणि आजचे रूप. त्याच्या डोळ्यासमोरून मोहिनी हलतच नव्हती.
त्याने निश्चय केला की मेघनाची त्या कोठ्यावरून सुटका करायची. त्याने त्याच्या वडीलांना फोन लावून पैसे मागितले. त्याने जवळपास दहा लाखांची सोय केली आणि परत गंगुबाईच्या कोठ्यावर गेला. त्याने गंगुबाईला सांगून परत मोहिनीलाच समोर बोलवायला सांगितले.
मोहिनी समोर येताच तिचे ते रुप बघून अनुरागने परत खाली मान घातली. अगदी शाॅट्स कपडे घालून ती वावरत होती. त्याला बघताच ती आत निघुन गेली.

" गंगुबाई मला मोहिनीला येथून सोडवून न्यायचे आहे."

अनुराग एका दमात बोलला.

"अरे, काय बावळट झालास का? इथे आलेली कोणतीही छोकरी परत जात नाय."

"हे बघा ,मी काय म्हणतो? "

ए छोकरे, तुझे किसने भेजा रे इधरको। चलो पतली गली से निकलो। जैसे आयो हो वैसे चले जाओ।

"हे बघा मी तुमच्या साठी मोठ्ठी रक्कम आणली आहे. तेव्हा ती घ्या आणि मोहिनीला मला परत द्या प्लीज."

अनुराग खूप भावूक झाला होता. एवढी मोठी रक्कम बघताच गंगुबाईच्या मनात लालसा निर्माण झाली. आयुष्य पणाला लावले तरी एक रक्कम मिळणार नाही. म्हणून ती तयार झाली.

देख ले, अभी मैं तैयार हूं लेकिन मोहिनी की मर्जी भी जरूरी है। उसके मन के मुताबिक ही सब कुछ होगा।
मेरे कहने से कुछ नहीं होगा।

ठीक आहे. तुम्ही तिला बोलावा तर खरी.

मोहिनी, ए मोहनी तिने मोहिनीला बोलावले.

मोहिनी बाहेर आली.

मोहिनी हा मुलगा तुला येथून कायमचं न्यायला आला. तेव्हा तू जा आणि मोकळी हो.

अचानक केलेल्या या प्रश्नाने तिला आश्चर्य वाटले.

कौन है गंगुबाई ये। और मैं किसी के साथ नहीं जाना चाहतीं। मैं यहां खुष हूॅ।
असे म्हणत ती परत जायला निघाली.

"मेघना , थांब. मला तुझ्याशी बोलायचे आहे." असे म्हणत त्याने तिचा हात धरला.

"पण, मला तुझ्याशी बोलायचे नाही. तू जा येथून." तिने हात झिडकारून दिला.

अगं, किती वर्ष झाली. तुझी सगळ्यांना आठवण येते. काकू ,शामकाका,मोना.

"आणि तुला."

हो मलाही येते गं.

"मग तू लग्न वगैरे."

"हो झाले माझे लग्न. पाच वर्षांचा मुलगा आहे आणि सध्या ती प्रेग्नंट आहे."

"मग तरीही तू मला तुझ्यासोबत मला नेत आहे. तू तुझ्या घरी नेणार आहे का? तुझी बायको मला स्वीकारेल ? मला तुझ्या घरचे आणि माझ्या घरचे स्वीकारतील? माझ्या बहीणीचेही लग्न झाले असेल. तिच्या घरचे तिला ठेवतील का? तिचा संसार उद्धवस्त केल्याचं खापर माझ्या डोक्यावर फुटेल. हे बघ अनुराग, मी जशी आहे तशीच मला राहू दे. कारण मी त्या जगात परत आले तर आनंद होईल की नाही माहिती नाही. पण, प्रत्येकाच्याच आयुष्यात मोठं वावटळ येईल आणि सगळं नेस्तनाबूत होऊन जाईल. माझी ही सीमा आता आयुष्य संपेपर्यंत अशीच आहे. तेव्हा तू परत जा आणि पुन्हा कधीच इथे येऊ नकोस."
तिचा एक एक शब्द अश्रूंची किंमत करत अनुरागच्या हृदयाला भिडत होता. तो निःशब्द झाला होता. दोघेही एकमेकांच्या जवळ आले. अनुरागने तिला स्वतः च्या मिठीत घेतले. ती खूप भावूक झाली होती.
पण, दुसऱ्याच क्षणी ती त्याच्या पासून दूर झाली.

"अनुराग तू जा येथून. मला राहू दे जशी आहे तशी. मी खूप वाट पाहिली रे सगळ्यांची. मला येथून परत नेण्यासाठी. सुरवातीला मला एक आशेचा किरण दिसत होता. पण, हळुहळु तो धुसर होत गेला. माझे डोळे वाट पाहून शिणले रे आणि आता माझी इच्छा देखील नाही. येथून बाहेर पडण्याची."

असे बोलत ती तेथून दिसेनाशी झाली. तिच्या पायातील घुगरूंचा आवाज अनुरागच्या रोमारोमात घुमत होता. तो खाली मान घालून रित्या हाताने परत निघाला.

©® अश्विनी मिश्रीकोटकर



🎭 Series Post

View all