घुंगरू भाग अंतिम

premachi aduri kahani

"ताईजी, तळ कधी हलवायचा?" फुलवा विचारत आत आली तशी कस्तुरीची तंद्री भंगली.

"का गं ? काही गडबड आहे का?" कस्तुरी आपल्याच नादात म्हणाली.

"नाही जी. ते तुम्ही काल म्हणत होता..म्हणून विचारलं. पण आता काही इथून आपला तळ हलत लवकर नाही. ते नाईकजी आले की, मग ठरेल? हो ना?" फुलवा आपल्या ताईजीला चिडवत म्हणाली.

"अगं काहीतरीच काय तुझं? जा बघू तू तुझ्या कामाला." कस्तुरी लटक्या रागाने म्हणाली.

"आता आम्ही असलो काय अन् नसलो काय..तुम्ही आमच्या राहिला नाहीत हे मात्र खरं." फुलवा गालातल्या गालात हसत म्हणाली.

"आता जातेस की, त्यांना नाव सांगू तुझं?" कस्तुरीने फुलवाला आपल्या दालनातून जवळ जवळ बाहेर हाकलून दिलं.

'आता नाईकजी आले की, आई अन् बापाला बोलावणं धाडू. ते काही नाही म्हणायचे नाहीत. तरीही त्यांच्या संमतींनं लगीन होऊ दे.' कस्तुरी खरंच खूप आनंदात होती, प्रेमात होती. त्यामुळे सारं जग तिला सुंदर वाटत होतं.

पुढचे दोन -तीन दिवस असेच गेले.

"ताईजी, आज लढाई सुरू झाली. मैदान कोणी मारलं? शत्रुची किती माणसे पडली? आपले किती मावळे कामी आले? याची माहिती फुलवाकडून कस्तुरीला रोज समजत होती.
तशीच नाईकांची काळजी तिचे मन खात होती. 'नाईक असतील तिथे सुखरूप असू देत,' म्हणून ती देवाकडे रोज मागणे मागत होती.

एक दिवस अचानक आभाळ गच्च भरून आले आणि पाऊस सुरू झाला.

"हे तर पावसाचे दिवस नाहीत. आत्ता कुठे अवकाळी पाऊस आला?" पावसाचा जोर कमी होण्याऐवजी वाढतच राहिला. "नाईक..ठीक असतील ना?" कस्तुरीला अस्वस्थ वाटू लागले.
हा अस्वस्थपणा दूर करण्यासाठी ती पायात घुंगरू बांधून बराच वेळ नाचत राहिली. बऱ्याच वेळाने कस्तुरी घामाघूम होऊन, दमून पलंगावर बसली. तरीही तिचा अस्वस्थपणा कमी होत नव्हता. नाईकांची आठवण आता तिचे मन व्याकूळ करू लागली.

"सारं काही ठीक असु दे." असे म्हणत तिने देवापुढे हात जोडले.

इतक्यात फुलवा धावत आली.

"ताई जी, ते आपलं.." फुलवाला काय आणि कसं सांगू हे कळतच नव्हतं.
तिच्या चेहऱ्याकडे पाहून कस्तुरीच्या हृदयाचा ठोका चुकला.

"अगं, अशी थांबलीस का? बोल लवकर काय ते." कस्तुरी घाईघाईने म्हणाली.

"ताई जी, आपलं नाईक.."

"पुढं बोल. असा का अंत पाहतेस माझा?" कस्तुरी आपला आवाज चढवत म्हणाली.

"आपलं नाईक लढाईत कामी आलं जी." कशीबशी शब्दांची जुळवाजुळव करत फुलवा म्हणाली.

"काय? पुन्हा बोल.." कस्तुरी एकसारखी तेच तेच विचारत राहिली. तिचा विश्वासच बसत नव्हता आपण काय ऐकलं आहे यावर. ती धावतच बाहेर गेली. धो पाऊस कोसळत होता. तशीच ती नारू मामांच्या तळावर गेली.

"मामा जे ऐकलं ते खरं आहे? ते नाईक.." तिला पुढं बोलवेना. उभ्या जागी थरथर कापत होती कस्तुरी.

"होय पोरी." मामा डोळ्यातले पाणी पुसत म्हणाले.

"हे शक्य नाही. अगदी काल -परवाच मला वादा देऊन गेले परत येण्याचा. मामा, सांगा ही खबर खोटी आहे म्हणून."  कस्तुरी कसेबसे खाली बसत म्हणाली.
"समदं खरं आहे ताईजी. सावरा स्वतःला." मागून आलेली फुलवा कस्तुरीला सावरत म्हणाली.

"कसं सावरु मी स्वतःला? इतक्या वर्षांनी कोणाला तरी आपलं मानलं मी, ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं, त्यांच्या आठवणीत दिवस, रात्र झुरले, अगं किती आतुरतेने वाट पाहत होते मी त्यांची! अन् ते अचानक सोडून दूर निघून गेले कायमचे? आमची प्रेमकहाणी फुलण्याआधीच संपली. आता सारं काही संपलं." हे दुःख कस्तुरीला सोसवत ही नव्हतं आणि व्यक्तही करता येत नव्हतं.
बोलता बोलता तिची शुद्ध हरपली. हे पाहून साऱ्यांची तारांबळ उडाली. वैद्यांना बोलावण्यात आलं. त्यांनी औषध दिलं. मात्र रात्र सरली तरी कस्तुरी शुध्दीवर आली नव्हती. आता मात्र सगळे काळजीत पडले. फुलवा आपल्या ताईजींच्या उशाशी बसून तिची सेवा करत होती.

पहाट झाली तशी कस्तुरीला हळूहळू जाग आली. आपल्या आजूबाजूला साऱ्यांना पाहून तिला काल काय घडलं, याची जाणीव होण्यास थोडा अवधी गेला. मात्र नाईकांची आठवण आली तशी ती धाय मोकलून रडली..अगदी उर फुटेपर्यंत.
तिची ही अवस्था पाहून साऱ्यांच्याच काळजाचं पाणी झालं.

दिवस सरत होते. लढाईच्या खबरी येत राहिल्या. कस्तुरी थोडी सावरली. तसा भरल्या मनाने साऱ्यांनी तळ सोडला. या साऱ्या आठवणी उराशी बाळगून जड मनाने कस्तुरी निघाली..
मात्र नाईकांची आठवण सतत तिचा पाठलाग करत राहणार होती कदाचित आयुष्यभरासाठी!
नाईकांनी भेट म्हणून दिलेले आपल्या पायातले घुंगरू तिने तिथेच ठेवले..आपल्या न फुललेल्या प्रेमाची साक्ष म्हणून.

समाप्त.

🎭 Series Post

View all