घुंगरू

Struggle of a dancer

घुंगरू (प्रेरणादायी कथालेखन स्पर्धा )
सिद्धी भुरके ©®
       
     चमचमणाऱ्या ताऱ्यांनी भरलेली ती रात्र होती.. सगळीकडे नुसते हसरे चेहरे दिसत होते.. सुंदर कपडे घालून प्रत्येक जण तिथे मिरवत होते.. जगाचे लक्ष आपल्यावरच आहे असच सगळे जण तिथे वावरत होते'.. आणि तो क्षण आला.. सुमित आतुरतेने वाट बघत असणारा हाच तो क्षण.. मंचावरून घोषणा झाली, "आणि या वर्षीचा मराठी फिल्म फेअर सर्वोत्तम नृत्य दिग्दर्शक आहे.... 'सुमित देशमुख '.... सुमित खूप खूष झाला.. मंचावर पळतच गेला.. आपल्या लाडक्या राधा ताई आणि घनिष्ठ मित्र राजुचे आभार मानून त्याने दोन शब्द संपवले.. तो थेट गाडीत जाऊन बसला.. सक्सेस पार्टीला न थांबता तो आपल्या घरी गेला होता... घरी गेल्यावर त्याने शांतपणे ती ट्रॉफी न्याहाळून पहिली. एकदा छातीशी कवटाळली आणि देवापुढे नेऊन ठेवली. देवाचे आभार मानताना त्याला आपल्या सगळ्यात प्रिय वस्तूची आठवण झाली आणि त्याने जाऊन कपाट उघडले. त्यातील लाकडी पेटी काढली आणि अगदी हळुवारपणे मखमली कापडात गुंडाळून ठेवलेले त्याचे 'घुंगरू ' काढले. त्याचे लाडके.. अतिप्रिय घुंगरू घेऊन तो बसला आणि भूतकाळाच्या आठवणीत रमून  गेला. 
          सुमित हा मूळचा मुंबईचा नव्हता. कोल्हापूर जवळील एका गावात त्याचा जन्म झाला होता. दादासाहेब आणि सुमित्रा देशमुख यांचा एकुलता एक मुलगा. भरपूर जमीन आणि शेती असणारं देशमुख प्रस्थ तसं मोठं होतं त्यामुळे दादासाहेबांना गावात खूप मान होता. आपल्या पोराला कलेक्टर बनवून लाल दिव्याच्या गाडीत बसवायचं दादासाहेबांचं स्वप्न होतं. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. सुमितला लहानपणापासून नाचायला फार आवडे. टीव्हीवर गाणं लागल कि सुमित इथे नाचायला लागे. सुरवातीला पोरकट खेळ म्हणून दादांनी दुर्लक्ष केलं पण जरा मोठा झाल्यावर सुमितने "डान्स शिकू का? "असं विचारल्यावर त्यांची तळपायांची आग मस्तकात गेली. "असली थेरं आमच्या खानदानात कोणी केली नाहीत..  बायकांची कामं ती.. शेण घालतील लोकं तोंडात "असं म्हणून सुमितला स्पष्ट नकार दिला. 
        काही दिवसांनी तालुक्याला नृत्याची स्पर्धा आयोजित केली होती. सुमितने दादांना न सांगता त्यात भाग घेतला. घुंगरू घालून 'मधुबन में राधिका..' या गाण्यावर सुमितने नाच केला आणि त्याला पहिलं बक्षीस मिळालं सुद्धा. बक्षीस बघून दादा खूष होतील आणि राग विसरतील असं सुमितला वाटलं. इथे तोपर्यंत "देशमुखांच पोरगं घुंगरू घालून नाचलं.. "ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. घरी गेल्यावर दादांनी सुमितला तर वेताच्या छडीने मारले. "आमच्या खानदानाचं नाव बदनाम केलंस.. असले चाळे करण्याआधी जरा विचार करायचा आमचा "असं म्हणून खोलीत सुमितला डांबून ठेवलं. गावात तर चर्चेला उधाण आलं आणि मग रोज दादासाहेब घरी येऊन सुमितला बेदम मारून आपला राग त्याच्यावर काढत असत. सुमित्राताईंना काही बोलायची सोय नव्हती. लेकराच्या काळजीने त्यांना तर काही सुचत नसे. एके दिवशी बापाच्या जाचाला कंटाळून सुमित आपले घुंगरू घेऊन घरातून पळून गेला. इथे वाड्यावर सुमित्राताईंनी टाहो फोडला पण दादासाहेबांवर काही परिणाम झाला नाही उलट त्यांनी दुसऱ्या दिवशी पोरगा मेला असं जाहीर करून त्याचं श्राद्ध घातल. सुमित्राताईंना हा धक्का सहन झाला नाही आणि काही दिवसात त्यांना देवाज्ञा झाली. 
       इथे सुमित शहराच्या रेल्वे स्टेशनवर आला आणि समोर दिसेल त्या ट्रेन मधे चढला. सकाळी जाग आली तेव्हा ट्रेन थांबली होती... पूर्ण रिकामी झाली होती. तसाच तो एका कोपऱ्यात बसून राहिला. भुकेने पोटात कावळे ओरडत होते.. आईच्या आठवणीने रडू येत होतं आणि त्याचं मन सुन्न झालं होतं. आता काय करायचं हा मोठा प्रश्न होता त्याच्यापुढे. तेवढ्यात ट्रेन मधे कचरा गोळा करायला आलेल्या राजुने त्याला पाहिलं.. तो सुमितच्या जवळ गेला.. ट्रेनमधेच सापडलेला बिस्किटांचा पुडा त्याला दिला आणि सुमितला आपल्यासोबत घेऊन गेला. मग त्या दिवसानंतर सुमित राजूसोबतच स्टेशन बाहेरील फूटपाथवर राहू लागला. ट्रेन मधला कचरा गोळा करणे,  काही  उरलेले अन्न गोळा करणे अशी कामं तो राजूसोबत करू लागला.पण त्यांना स्टेशन बाहेरील त्यांचा म्होरक्या खूप त्रास देत असे म्हणून एक दिवस दोघे तिथून निघून शहरातल्या सिग्नलवर आले. 
       सुमितने एवढं मोठं शहर पहिल्यांदाच पाहिलं होतं.. मोठ्या इमारती, खूप सारी वर्दळ आणि सतत घाईत असणारी लोकं त्याच्यासाठी नवीन होते .. हेच ते जादुई स्वप्ननगरी मुंबई शहर होते. आता ते दोघे सिग्नल जवळील फूटपाथ वर राहू लागले. सुमित घुंगरू घालून नाचायचा आणि राजू लोकांकडून पैसे गोळा करायचा आणि रात्री मिळेल ते खायचं असा त्यांचा दिनक्रम होता. सुमितला तर आईची फार आठवण येत असे. एका झटक्यात त्याचे होत्याचे नव्हते झाले होते. आपल्याला नृत्य शिकायचे आहे यासाठी याची देव एवढी मोठी शिक्षा का देतोय हे त्याला कळत नसे. रात्री जेव्हा वाऱ्याची झुळूक अंगावर शहारा देऊन जात तेव्हा सुमितला वाटे आईच मायेने हात फिरवतीये. रोज रात्री सुमित रडे पण राजू नेहमी त्याच्या सोबतच असे. 
    असेच एक दिवशी सिग्नलवर नाचत असताना राधाचे सुमितकडे लक्ष गेलं.तिला त्याचा नाच.. हावभाव फारच आवडले. म्हणून तिने सुमितच्या जवळ जाऊन त्याची चौकशी केली तर तिला त्याची व्यथा आणि नाचाबद्दलची ओढ लक्षात आली.  राधाने लागलीच त्या दोघांना अनाथ आश्रमात भरती केले आणि सुमितला तिच्या नृत्य प्रशालेत यायला सांगितले. आणि मग काय सुमितचे कथक नृत्याचे प्रशिक्षण सुरु झाले. रोज घुंगरू घालून नाचायला त्याला फार आवडे म्हणून तो अगदी मन लावून नृत्य शिकत होता. बघता बघता सुमित मोठा झाला आणि त्याने कथकच्या सगळ्या परीक्षा पण दिल्या. 
      एके दिवशी राधाने त्याला एका डान्स रिऍलिटी शोची माहिती दिली. सुमितने त्यात भाग घ्यावा असं तिला वाटत होतं पण सुमितला "ते लोकं मला का घेतील? " असं वाटत होतं. पण राजू आणि राधाने समजावल्यावर तो तयार झाला आणि त्याने भाग घेतला. सुमितच्या कष्टाने आणि नृत्य कलेवरील प्रेमाने त्याने ही स्पर्धा जिंकली. त्याचे बरेच नाव झाले आणि त्या नंतर त्याला सिनेमात नृत्य दिग्दर्शकाच्या ऑफर पण आल्या. मग मात्र त्याने मागे वळून पाहिलं नाही. सिग्नलवर नाचणे ते आज मोठ्या पुरस्काराचे मानकरी होण्याची खडतर वाट त्याने पार केली होती. 
     अचानक फोन वाजल्यानं सुमित भूतकाळातून भानावर आला. अनोळखी नंबर होता तरी सुमितने फोन उचलला. 
"हॅलो.. कोण बोलतंय? "
"माफ कर रे पोरा.. चुकलो मी.. माफ कर मला... "समोरून त्याचे दादासाहेब बोलत होते. 
"अहो दादा तुम्ही रडू नका असं..  आणि माफी नका मागू.. "
"आज तुझा बक्षीस सोहळा पहिला टीव्ही वर.. आणि लई अभिमान वाटला तुझा.. "
"दादा पण तुम्हाला माझं नाचणं आवडत नाही ना.. "
"म्हणून तर माफी मागतोय.. नाही ओळखलं मी तुला..  तू आज खानदानाचं नाव गाजवलं रे.. मला अभिमान वाटतोय तुझा "
"दादा हे ऐकण्यासाठी मी किती कष्ट केलेत काय सांगू तुम्हाला...  थँक यू दादा... आई कुठंय?" सुमितने विचारले. 
"अरे तुझा घरातून जाण्याचा धक्का नाही सहन करू शकली ती.. त्या नंतर ती देवाघरी गेली. "
"काय?? "सुमितला धक्का बसला. 
"हो.. आणि मला पण मरायच्या आधी एकदा बघायचं आहे तुला..  भेट रे.. या दुर्दैवी बापाला.. "
"हो दादा.. मी नक्की येईन गावाला.. काळजी घ्या तुमची" असं म्हणून सुमितने फोन ठेऊन दिला. 
    सुमितला आयुष्याने वेगवेगळ्या छटा नेहमी दाखवल्या होत्या.. कधी दुःखाची.. कधी कष्टाची तर कधी तिरस्काराची. पण आज दादांचा फोन आला आणि त्याने अभिमानाची छटा अनुभवली होती. खूप छान वाटत होतं त्याला. 
      सुमित बाहेर हॉल मधे आला.. त्याने पायात घुंगरू बांधले आणि त्याच्या आवडीच्या गाण्यावर म्हणजे 'मधुबन में राधिका' गाण्यावर तो बेभान होऊन नाचायला लागला.... 
आज त्याला कष्टाचे फळ मिळाले होते म्हणून तो नाचत होता..   
नृत्यातून त्याच्या गिरक्या सगळ्या दुःखाना पुसून टाकत होत्या... 
नाचताना त्याचे हावभाव आज समाधान आणि आनंदाने भरलेले होते.. 
त्याचा पदन्यास  'पुरुषांनी घुंगरू घालू नये 'अशा बुरसट कल्पना मोडून काढत होता.. 
डोळ्यातून अश्रूरुपी पाऊस  अलगत त्याच्या दुःखांवर फुंकर घालत होता... 
आणि त्याच्या हस्तमुद्रा आयुष्यातील दुःखाचे मळभ दूर झाल्यावर अवतरलेल्या इंद्रधनुच्या  सप्तरंगांची उधळण करत होत्या... 
हो... आज एक पुरुष... नाही नाही... एक कलाकार घुंगरू घालून बेभान होऊन नाचत होता.. कारण त्याच्या आयुष्यात इंद्रधनु अवतरलं होतं.... 

कथा आवडल्यास like आणि कमेंट नक्की करा. 
सिद्धी भुरके ©®