घोस्ट ने मिला दि जोडी. भाग 1

घोस्ट ने मिला दि जोडी
अमावास्येची काळी रात्र एखाद्या सुस्त अजगरासारखी पुर्ण आसमंत आणि परिसराला गिळून बसली होती. रानफुलांचा गोड पण उग्र गंध वातावरणात एक वेगळाच उत्साह निर्माण करत होता. पक्षी, झाडे सगळी निवांत झोपली होती. निवांत अशी हवीहवीशी रात्र आज ती अनुभवत होती.शिशीर ऋतुच्या अश्या रात्री तिला भरपुर आवडायच्या. किमान वीस वर्षे ती अशीच राहत होती.

तिचं घर निसर्गरम्य ठिकाणी आणि शहराच्या अगदी जवळ असल्यामुळे, गेल्या काही वर्षापासून घराजवळ दारुडे ,गर्दुल्ले जाम फिरकायचे.

त्यांची बडबड ,आराडाओरडा, बाईकचे येणारे आवाज तिचं डोके उठून जायचं, हल्ली मात्र ती पहिल्यासारखी शांत बिलकुल राहत नसे. ज्याचा त्रास होईल त्याला आपलं हडळरूपात दर्शन देऊन पळवून लावे. त्यामुळे आता तिच्या कॉटेजजवळ लोकांनी फिरकणं बंद केल होतं. ही तिची आवडती जागा होती, म्हणूनच तर ही जागा तिने मृत्युनंतरही सोडली नव्हती. कधी ह्या एकांताचा तिलाही कंटाळाही येत असे, तेव्हा मात्र ती उगाच इकडे फिरकणाऱ्या लोकांची कधी अतरंगी वागून मजाही घेई.

तिचा एक नियम होता जर कोणी गडबड ,बडबड असा त्रास देत नसेल तर ती त्याला कॉटेजमध्ये रात्रभर राहायला द्यायची. त्यांना नुसतं पाहण्यातही तिच मनोरंजन व्हायचं.

कधी ती लोक स्वत:शी बोलायचे तर कधी वेगवेगळ्या सुरात घोरायचे. त्यांच्या वावरण्याने रमाला घर भरल्या सारखं वाटायचं, पण कोणी जास्त दिवस ठाण मांडायचा प्रयत्न केला तर त्याला रमा आपल्या हडळ अवताराचं दर्शन देत असे आणि एकदा भुतिण पाहिली की समोरचा भितीने अर्धमेला होत असे आणि मग ढुंगणाला पाय लावून पळ काढे. तर अशी ह्या कॉटेजची भूत मालकिण, रमा देशमाने .

आज मात्र रमाला खात्री होती की तिला कोणीच त्रास देणार नाही, कारण एवढ्या थंडीत कोण जंगलाच्या अगदी जवळ कॉटेजमध्ये मरायला येणार आहे.सगळे जण मस्त शालीत नाहीतर जाड पांघरुणात पडून राहिले असणार. त्यात आज सुट्टीचाही दिवस नव्हताच.त्यामुळे कोणी रात्रीचं जंगलात टाईमपास नाही करणार.

ती उडत आता कॉटेजच्या बाहेर आली आणि तिने जिवंतपणी लावलेलं, तिचं आवडतं ताड माड झालेल्या नारळाच्या झाडाला पहिला हात लावला. ती राखत असलेल्या निगेमुळे काही शहाळी अजूनही त्याला लटकत होती.

आता नारळाच्या झाडाभवती काही छोटी छोटी नवीन नारळाची झाडे उगवत होती, त्यांना तिने खतपाणी दिलं. तिने एकदा परत आपल्या आवडत्या असलेले पेरू ,कडूनिंब ,बोगऩवेल,गुलमोहर झाडांनाही खतपाणी दिलं.अनावश्यक वाढणाऱ्या फांद्या छाटल्या, मग आवारात फुंकर मारून सगळा पाला पाचोळा बाहेर टाकला आणि मग कॉटेजच्या बाहेरच्या पोर्चमध्ये जाऊन सफेद बोगनवेलच्या फांद्यावर झोपाळा खेळू लागली.

झोपाळ्यावर खेळताना तिला लांबून एक माणूस लटपटत चालत येताना दिसला. त्याच्या खांद्यावर एक वेताचा जाडा दोरखंड होता.  

तिला आता दिसलेला तरूण तर अगदीच बिचारा वाटत होता. काळजीने सुरकुतलेला उदास चेहरा, कित्येक दिवसाची न केलेली मोठी दाढी आणि मळका काळा टीशर्ट व चुरगळलेली काळी जीन्स. तरी चालीत डौलपणा आणि चेहऱ्यावर बुद्धीचा तजेला. रमाला त्याला पाहून शहनशहा मधला अभिताभ आठवला.  त्यानेही तर अमिताभ सारखा दोरखंड खांद्यावर टाकलेला होता. 

रमाला त्याला पाहून शहेनशहा पिक्चरच गाणं आठवलं.

अँधेरी रातों में
सुनसान राहों पर
हर ज़ुल्म मिटाने को
एक मसीहा निकलता हैं
जिसे लोग शहनशाह कहते हैं

रमाने मग उडत जाऊन त्याचं नीट निरीक्षण केलं तिला तो गर्दुल्या किंवा भिकारी नाही वाटला. का कोण जाणे आज रमाला त्याची गंमत करावीशी वाटली. त्याने बाहेरून पुर्ण कॉटेजला फेरी मारली. कंपाउंड वॉलला लागलेल्या काचा पाहून तो हताश झाला आणि परत जायला लागला. ते पाहून रमा हिरमुसली. तिला आता उत्सुकत्ता वाटू लागली होती की हा दोरखंड घेऊन ते नक्की करणार तरी काय होता.

म्हणून त्याला थांबवण्यासाठी रमाने गेटचा दरवाजा कर्र आवाज करत उघडला आणि काही वेळ गेट तसाच वाजवत राहिली.

काचा असलेली भिंती ओलांडण्यापेक्षा दुसरीकडे जायचं ह्याचा विचाराने तिकडून लांब जाणाऱ्या त्याच्या कानात करऽऽऽर्र असा आवाज आला. अनपेक्षित आणि सामसूम शांततेत येणारा आवाज ऐकून तो आधी दचकला.

क्षण, दोन क्षण तो एवढा घाबरला की कॉटेजच्या गेटपासून दोन पावलं पाठी सरकला. मग त्याच्या लक्षात आलं की लोखंडाचा हा जुना गेट हवेने उघडबंद होत आहे, पण मग त्याच्या मनात विचार आला.

"हा गेट असा का आवाज करतोय. काही वेळापुर्वी तर हा आतून बंद होता आणि आता हवा नसतानाही उघडला कसा ? काही वेळापुर्वी भेटलेल्या त्या माणसाने तर सांगितलं होतं की ह्या कॉटेजमध्ये कोणीच राहत नाही.  त्यामुळे मी बिनधास्त माझं काम करू शकतो. मग आत जाऊ का ? का नको जाऊ ?"

मग त्याने हातातील दोरखंडाकडे पाहिले, मन घट्ट केलं आणि पटकन गेटच्या आत आला.आता तो कॉटेजचे निरीक्षण करू लागला. कॉटेज तसे खुपच जुने वाटत होते. पण आजुबाजुला असलेली झाडे मात्र अगदी निगुतीने वाढवलेली होती. कॉटेजमध्ये एकही लाईट नव्हती, ना कोणत्या माणसाचा वावर असल्याचं लक्षण दिसत होतं तरी  त्याला टॉर्चच्या उजेडात जागा खुपच स्वच्छ दिसली.

राम भुतिणीने ह्या आधी लोकांना मटण, चिकन ,दारू ,सिगरेट ,मुली घेऊन येताना पाहिलं होतं..पण दोरखंड घेऊन रात्री बारा वाजता येणारा पहिलाच माणूस तिने पाहिला होता. त्याने थरथरत गेट उघडलं आता कॉटेजचा  दरवाजा कसा उघडायचा ह्या विवंचनेत तो होता आणि त्याला असं बुचकळ्यात पडलेलं पाहून रमा भुतिणीला मात्र हसू आलं.

आता तो  घराचा दरवाजा उघडून आत कसा जाणार हे तिला पाहायचं होतं कारण दरवाज्याला तर कुलुप होतं. मग तो सराईतपणे पाठच्या बाजूला गेला , तिकडे त्याला एक बंद खिडकी दिसली. ज्याच्या काही काचा फुटलेल्या दिसत होत्या. पण त्या खिडकीवर बाहेरून एक प्लास्टीकचा पडदा लावलेला होता. ज्यामुळे कुणाला तुटलेली खिडकी पटकन कळत नसे. त्याने मात्र अलगद तो पडदा बाजूला करून ती खिडकी उघडली आणि सरळ आत गेला.

ती खिडकी रमाची फेवरेट रूमची खिडकी होती.  जिवंतपणी तिने हट्टाने त्या खिडकीला गज लावून घ्यायला नकार दिला होता कारण तिला अभ्यास करताना सृष्टी सौंदर्य पाहायला आवडत असे, पण नेमकी हीच खिडकी उघडी कशी दिसली ह्याने आता रमा भुतिणीला त्याच्यावर संशय यायला लागला. हा नक्की कोण आहे..मांत्रिक  आहे का , मला घाबरवायला आला आहे का असेही विचार तिच्या मनात येऊन गेले. मग तर रमा भुतिणीने त्याचा पिच्छा पुरवायचं ठरवलं आणि तिही त्याच्या पाठी कॉटेजच्या आत आली.

तो आत आला आणि त्याने कानोसा घेतला. तसं इकडे भीतीदायक काहीच नव्हतं. कॉटेजच्या भिंतींचा रंग उडाला असला तरी घर साफ होतं..हॉलमध्ये जुना लाकडाचा सोफा होता आणि छताला टांगलेलं एक छोटंसं झुंबर व गोल लाकडाचं  सागवानी डायनिंग टेबल , भिंतीवरती लटकवलेले जुन्या काळचे काही फोटो होते. तो काही क्षण रमा भुतिणच्या फोटोकडे पाहत रेंगाळला.

नंतर त्याने कॉटेजची बेडरूम पाहिली. त्यात मोठा सागवानी पलंग आणि छताला असलेला जुना मोडका पंखा.

मग तो स्वयंपाक घरात गेला. जुना पद्धतीचा दगडी ओटा आणि जुनी मांडणीवर स्वच्छ असलेली भांडी. त्याने छताकडे पाहिलं आणि त्याला हवं ते मिळालं असल्याच्या समाधानाने तो हसला.

त्याला प्रत्येक रूममध्ये छताकडे मोबाइलची लाईट मारताना पाहून रमा भुतिणीला आता त्याच्यात इन्टरेस्ट वाटू लागला होता. तो का छताकडे पाहत आहे आणि तो का हसला ह्याची उत्सुकत्ता तिला अस्वस्थ करत होती.

तो मग ओट्यावर चढला आणि त्याने पंखा अडकवायच्या रिकाम्या हुकवर दोरखंड सोडला.मग दोरखंडाची फाशीची असते तशी गोल गाठ मारू लागला.ते पाहून रमा भुतिण घाबरली. ती मनातल्या मनात विचार करत म्हणाली ,

'अरे बापरे! हा नक्की आत्महत्या करणार की काय ?ते ही अगदी माझ्यासारखीच आणि त्याने इकडे आत्महत्या केली तर माझ्याबरोबर हा ही इकडेच राहणार. हा आताच स्वच्छ दिसत नाही आहे. मेल्यावर तर हा माझं सोन्यासारखं स्वच्छ घर घाण करणार. नाही ! मी हे होऊ देणार नाही. मी एका अनोळखी पुरूषाबरोबर माझं घरी नाही शेअर करणार..ह्याची तर!  '


काय करेल रमा भुतिण ?
कोण आहे तो ?
का करत आहे तो आत्महत्या ?
हे जाणून घेण्यासाठी कथेचा पुढचा भाग नक्की वाचा. जो तीन दिवसात येईल.

क्रमश:

🎭 Series Post

View all