घोस्टने मिला दी जोडी भाग 3

घोस्टने मिला दी जोडी भाग 3
मागील भागात,

तो तिकडे स्वपैपाक घरात आणि ही इकडे ओसरीत. आधीच बिचारा आत्महत्या करताना बेशुद्ध पडलेला आहे जर आता पल्लवीने ह्याला पाहिलं तर ती नक्की चोर म्हणून पोलिसात त्याची तक्रार करेल.

बिचारा आधीच आयुष्यात कंटाळलेला आहे, अजून त्याला त्रास हा नको. त्यापेक्षा त्याला आत बेडरूममध्ये कपाटात लपवावं. असा विचार करून पल्लवी मुख्य दरवाज्याच कुलुप काढेपर्यंत रमाने पटकन त्या बेशुद्ध माणसाला हवेत उचललं आणि  हवेत तरंगतच त्याला बेडरूममध्ये आणलं. मग बेडरूममध्ये असलेल्या  एकमेव जुन्या मोठ्या रिकामी लाकडी कपाटात एका मोठ्या फळीवर त्याला बाळा सारखं अलगद झोपवलं आणि मग कपाटाच दार  किलकिल बंद करून पल्लवी कशासाठी आली आहे हे पहायला रमा भुतिण हॉलमध्ये गेली.

आता पुढे..

रमाने पाहिलं पल्लवीने नेहमीपेक्षा जास्त खास मेकअप केला होता. बेबी पिंक प्लेन अनारकली वन पिस आणि त्यावर एक गोंडस किरीमीजी रिबन ह्या ड्रेसमध्ये तर पल्लवी एकदम उठून दिसत होती. पल्लवीने घराची लाईट पेटवली आणि इकडे अचानक उजेडाची भगभग डोळ्यावर आल्याने रमा भुतिणीचे डोळेच दिपले.

पल्लवीने आपल्या बरोबर आणलेल्या जड बॅगेतून  व्हिडिओ रिकॉर्डींगचा लाईट सँन्ड  काढला. तो चालू केला आणि त्यावर मोबाईलवर विडोओ रिकॉर्डिंग चालू केलं. हे पाहून तर रमा भुतिणीच्या अंगाचा तिळपापड झाला.

" ही काय वेळ आहे मोबाईल रिकॉर्डिंग करण्याची .स्वतःच्या घरी जाऊन हिला हे उद्योग करायला काय जात..? मेली डुचकी " एक सणसणीत शिवी घातल्यावर रमा भुतिणीला बरं वाटलं.

पल्लवीने कॅमेरात लेफ्ट प्रोफाइल आणि मग राईट प्रोफाइल चेक केला आणि आपण सुंदर दिसतोय का पाहिलं. मग कॅमेरा बंद केला आणि पर्स मधून मेकअप किट काढून टचअप केलं. मग पुन्हा विडिओ चालू करून कॅमेऱ्यात पाहत दु:खी स्वरात म्हणाली,

"मित्रहो.. मी जात आहे..कुठे ?"

एवढं बोलून पल्लवीने मग तिने नाटकी विराम घेतला आणि मग परत म्हणाली,

"निजधामाला..! "

मग हात कपाळावर ठेवून एक डान्स पोझ घेतली. मग कॅमेरा पुन्हा बंद केला. ती काय बोलली हेच रमाला दोन क्षण समजलंच नाही. ती उडत पल्लवीच्या अगदी जवळ आली आणि ती पल्लवीच्या चेहऱ्याकडे पाहू लागली. पल्लवीचं पुर्ण लक्ष कॅमेरातच होतं. पल्लवीने असे भाव दाखवले जणू लोकांना तिचं वाक्य ऐकून धक्का लागला आहे.

पल्लवीची अशी अक्टिंग पाहून तर रमाला पल्लवीला जोरात मारावसं वाटलं. इकडे  अनोळखी तो बेशुद्ध पडल्याच टेंशन इकडे पल्लवीच कोडी घालणं ह्याने रमा जाम कावली. ती पल्लवीला मारणार इतक्यात पल्लवी कॅमेरात पाहत पुन्हा बोलायला सुरवात केली.

"देवाकडे जाते आहे मी. हो ! मी सुसाईड करत आहे .."

मग पल्लवीने दिर्घ श्वास घेतला. तिचे डोळे पाण्याने डबडबले आणि ती कातर स्वरात बोलू लागली.

"आणि माझ्या सुसाईडचा जबाबदार एक आणि एकच माणूस आहे..मिस्टर तरूण सेन..तो साला...#***# माझ्याबरोबर प्रेमाचे चाळे करून आता कोणत्यातरी बंगाली मुलीबरोबर लग्न करणार आहे. मी त्याला धडा शिकवणार. तो बंगाली माणसाला धडा शिकवणार आहे."

असं बोलतानाही पल्लवीचा आवाज चढायला लागला होता. त्यावरून रमा भुतिणला जाणवलं ही मुलगी नाटक करत नाही आहे. आता रमा नक्की पल्लवी आत्महत्या करून काय धडा शिकवणार ह्याची तिला उत्सुकत्ता वाटू लागली म्हणून तिही कान देऊन ऐकू लागली.

पल्लवी म्हणाली, "मीही त्या गुरूदेव टागोर यांच्या कंकाल ह्या शॉर्ट स्टोरीतील अनामिकेसारखी मरणार..म्हणजे मेल्यावरही तुम्हाला मी छानच दिसेन."

मग पल्लवीला बोलताना काहीतरी लक्षात आल्यासारखं ती थांबली. पल्लवीचं हे निग्रहाचं बोलणं ऐकुन रमा भुतिणीने कपाळावर हात मारला आणि तिला अजून  म्हण आठवली, 'एकादशीच्या दिवशी महाशिवरात्र '
ती वैतागत मनात म्हणाली,

"का ?  का देवा का ? आजच सर्वांना माझ्याच घरी मरायला पाठवतोय. नॅशनल पार्कच जंगल बाजूसा आहे. एवढे ट्रेनचे ट्रॅक आहेत. रस्त्यावर धावणाऱ्या  गाड्या आहेत..गेलाबाजार मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत. एवढी आत्महत्या करायला सोयी असताना तो मिस्टर अननोनला
इकडेच लटकायाला यायचं होतं."

"आणि ही हटमटवळी हिलाही आपल्या घरी व्हिडिओ बनवायला काय झालं ? तसही हिच्या पुण्याच्या घरात आहे तरी कोण ? एक हिची रूम पार्टनर. बाकी दादा तर गोव्याला सेटल झालाय. मग हिला आमचचं घर मिळावं " 

"तो तिकडे बेशुद्ध पडलाय...आता ही गुलछबूही मरणार..मग काय झालंच..माझं लाडकं स्वच्छ सुंदर घर हे  घर राहणार नाही. दिवसा उंदीर, घुशी ह्यांच हॉस्टेल होणार आणि रात्री ह्या टवळीच्या भुत मित्रांचा अड्डा." 

घराची होणारी वाताहात आणि नष्ट होणारी शांती ह्यांच्या भीतीनेच रमा प्रचंड घाबरली. ती स्वत:ला प्रोत्साहित करत परत म्हणाली,

'नाही !मी हे होऊ देणार नाही.'

' रमा तुला काही करायलाच हवं..ह्या दोघांनाही आत्महत्या करण्यापासून परावृत्त करायला हवं. तुझा भूत अवतार दाखवला तर  त्या अननोन सारखी पल्लवी घाबरून नक्कीच मरेल. एक नंबरची घाबरूट आहे ही.सोच !  रमा कुछ सोच. "

इकडे रमा पल्लवीला वाचवायचा कट शिजवत होती  आणि  ह्यापासून अभिज्ञ पल्लवी कॅमेरासमोर दु:खी  चेहऱ्याने बडबड करतच सुटली होती.

"फ्रेंडस ! तुम्ही म्हणाल, आता ही अनामिका कोण? तर मरताना तुमच्या डोक्यात प्रश्नचिन्ह नको म्हणून शॉर्ट मध्ये टांगोरांच्या कंकाल कथेची स्टोरी सांगते."

"त्या स्टोरीतील मुलगीही प्रियकराने फसवल्यावर आत्महत्या करते तेही अगदी नटून थटून..पण बदला म्हणून ती तिच्या प्रियकरालाही विष देते. आता मी मात्र एवढी कठोर आणि निर्दयी नाही आहे. पण मला मरणाला कवटाळून घेण्यासाठी भाग पाडणाऱ्या साईशला मी माफ करणार नाही."

जर तुम्हाला माझ्यासाठी एवढुशी सहानभुती असेल तर मला श्रद्धांजली म्हणून ...प्लीज त्या साईश सेनला सोडू नका..त्याला भरपुर हेट कमेंट द्या. त्याला आणि त्याच्या नवीन गर्लफ्रेंडला ब्लॉक करा. त्याचं सोशल मिडीया अकाउंट होईल असं काहीतरी करा. फ्रेंडस आता मी हे विष घेऊन पिऊन कायमची पैलतीरावर जाणार आहे . दुआमें याद रखना.. आयमिन माझी आठवण ठेवा हा ! अलविदा  माय बेस्टी स्वाती..जिने मला साईशचा खरा चेहरा दाखवला. माझी शेवटची इच्छा म्हणून तिला इन्स्टा वर लाईक करा फोलो करा.़बाय !बाय !"

एवढं बोलून पल्लवीने व्हिडिओ बंद केला आणि बॅगेतून विषाची बाटली काढली. हे पाहून रमाला कच्च झालं. तिने ठरवलं की पल्लवीला मरू नाही द्यायचं नाही..पण ती पल्लवीच्या हातून बाटली खेचणार इतक्यात पल्लवी व रमा दोन्ही दचकले.

त्यांनी पाहीलं की  हॉलच्या दरवाजून एक पुरुष जोरजेराने पल्लवी कडे बोट दाखवत हसत होता. रमा त्या पुरूषाला आ वासून पाहू लागली.  हा तोच मघाशी बेशुद्ध पडलेला मुलगा होता ,जो आता पल्लवीकडे पाहून टाळ्या वाजवून हसत होता.

रमाला समजेना, तो मुलगा जागा केव्हा झाला आणि कपाटात असणारा मुलगा इतक्या पटकन बाहेरून आत कसा आला ते, पण मग रमाने मनात विचार केला,

'ते सगळं नंतर पाहुया. हा इथे असेपर्यंत तर ही बया विष तर पिणार नाही. बघुया तरी ह्याला हसायला काय झालं. एवढी सुंदर गोरी गोमटी पोर माझी  ज्योकर वाटतेय मेल्याला. ह्याला तर नंतर बघतेच मी !'

पल्लवी मात्र त्या मुलाला हसताना पाहून जाम  चिडली, आणि त्याला बोट दाखवत ती म्हणाली,

"हे यू ! ..हसायला काय झाल? काही कॉमेडी चालली आहे का ?"

"हो !कॉमेडीच...तुझ्यासारख्या बिनडोक मुलीची  कॉमेडीच. कॉमेडी कशी ते ते ऐकायला वेळ आहे ? का मरायची घाई आहे ?"

"म्हणजे ?" पल्लवीने न कळून विचारलं.

क्रमश:

बेशुद्ध मुलगा कसा आणि केव्हा कपाटाच्या बाहेर आला ?
पल्लवी कॉमेडी करत आहे असं तो का म्हणाला हे जाणून घेण्यासाठी तसेच जुने प्रश्न आहेतच.
माधव भुताने का खोडी केली ?
बेशुद्ध माणसा बरोबर आता पल्लवीचही काय होणार हे जाणून घेण्यासाठी कथेसाबत रहा.

खरच कथा आवडत असेल तर कमेंट करा. पुढचा भाग तीन दिवसांनी येईल.

🎭 Series Post

View all