घोस्टने मिला दी जोडी भाग 2

घोस्टने मिला दी जोडी भाग 2
मागील भागात,

तो मग ओट्यावर चढला आणि त्याने पंखा अडकवायच्या रिकाम्या हुकवर दोरखंड सोडला.मग दोरखंडाची फाशीची असते तशी गोल गाठ मारू लागला.
ते पाहून रमा भुतिण घाबरली.

ती मनातल्या मनात विचार करत म्हणाली ,

'अरे बापरे! हा नक्की आत्महत्या करणार की काय? ते ही अगदी माझ्यासारखीच आणि त्याने इकडे आत्महत्या केली तर माझ्याबरोबर हा ही इकडेच राहणार. हा आताच स्वच्छ दिसत नाही आहे. मेल्यावर तर हा माझं सोन्यासारखं स्वच्छ घर घाण करणार. नाही ! मी हे होऊ देणार नाही. मी एका अनोळखी पुरूषाबरोबर माझं घरी नाही शेअर करणार..ह्याची तर!  '

आता पुढे,

त्याने दोरखंडाचा फास बनवला, पण रमा भुतिणीने आपल्या शक्तीने तो सोडवला. त्याने परत दोरखंडा फास केला आणि तो फास गळ्यात घालणार इतक्यात पुन्हा फासाची गाठ रमाने सोडवली. असं पाच सहा वेळा झाल्यावर तो वैतागला आणि शेवटी दमून ओट्यावर बसला. रमाला वाटलं, हा काही आत्महत्या करत नाही, म्हणून तिनेही मनात हुश केलं कारण तिही तर सतत दोरखंड सोडवून कंटाळली होती.

शेवटी त्याने दोरीने फास लावायच्या कल्पनेवरच काट मारली. एक मिनिट भर तो ओट्यावर पाय सोडून बसून राहिला. मग त्याला काय सुचलं कुणास ठाऊक, त्याने खिशातून काहीतरी काढलं. ते काय होतं हे बघण्यासाठी रमा भुतीण, त्याच्या अगदी जवळ गेली.

तिने पाहिलं, त्याने पँन्टच्या खिशातून एक स्क्रू ड्रायव्हर काढलेला हेता. तो त्या चार इंची लांब स्क्रू ड्रायव्हरकडे  वेड्यासारखं पहात राहिला. ते पाहून रमाला अजूनच टेंशन आलं.तिच्या मनात आलं,

' काय माणूस आहे ? आता स्क्रू ड्रायव्हरने स्वतःला भोसकून करून मारणार आहे का ? बस झाला हा खेळ..'

असा वैतागून तिने म्हटलं आणि रमा भुतीण त्याच्या समोर प्रगट झाली आणि तिने त्याला चिडत विचारलं,

"काय करत आहेस तू ? हे माझं घर आहे. निघ इथून."

इतकावेळ अंधारलेल्या घरात तो एकटाच होता. आता अचानक त्याला सफेद रक्तहिन कातडी असलेला रागीट चेहरा आणि बुबळ नसलेले  पांढरे डोळे असलेली रमा भुतिणी एकदम भयानक अवतार पाहून त्याची भीतीने गाळण उडाली.

रमाचा अमानवी कर्कष आवाज ऐकून तर त्याची अजूनच तंतरली. तो ओट्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला, पण अचानक तो बेशुद्ध पडला. त्याच्या हातातील स्क्रू ड्रायव्हरही हातून निसटला आणि खाली पडलेला स्कू ड्राईव्हर निखळलेल्या लादीत अडकून ताट उभा राहिला. तो इतका घाबरला होती की बेशुद्ध होत असताना त्याचा तोलही गेला.

  त्याला पडताना ओट्यावरचा खडप्पा किंवा स्क्रु ड्रायव्हर लागू नये म्हणून रमाने त्याला दोन्ही हाताचा आधार देत अलगद स्वयंपाक घरातील लादीवर झोपवलं.

त्याला बेशुद्धावस्थेत पाहून रमा भुतीण घाबरून मनात वेताळ बाबाकडे प्रार्थना करू लागली ,

' वेताळ बाबा! प्लीज ह्याला मरून देऊ नकोस. हा इकडे मेला तर मला माझी जागा ह्याच्या बरोबर वाटून घ्यावी लागेल. तसंही हल्ली चांगले रिकामे बंगलेही नाही आहेत. मी बेघर होईन. प्लीज, प्लीज ! हा शुद्धीवर येऊ दे. प्रॉमिस करते, महिनाभर तरी कोणाला घाबरवणार नाही."

साधारण तासभर तरी तो शुद्धीवर आला नव्हता. आता मात्र रमा भुतिणीला खुपच ताण यायला लागला होता. तिचं टेशंन जे काहीक्ल्या संपतच नव्हतं, बरं त्याची आत्माही बाहेर आली नव्हती. ती आली असती तर तिने ठरवलं होतं की घरातील खेटराने पुजा करून घराबाहेर काढायचं. पण छे ! तो तर अजूनही श्वास घेत होता.

तिने मग त्याला डोक्यापासून पायापर्यंत चेक केलं.  त्याच्या शरीरावर काही जखमही नव्हती. तिला आता प्रश्न पडू लागला, हा उठत का नाही आहे ? कुठे बेशुद्ध न होता ढाराढुर पंढरपूर झाला की काय हा ?

मग ती त्याच्याभोवती गोल गेल फिरत त्याला उठवायचं कसं ह्याचा विचार करू लागली. तिला वाटलं, किमान कांदे तरी असायला हवे होते घरात. ह्याच्या नाकाला लावून जाग केलं असतं मग लाथ मारून फेकून दिलं असतं. मग तिला त्याच्या पायातील चप्पल दिसली, मग तिला अजून एक युक्ती सुचली

'आ! ह्याने चप्पल घातली आहे जर ह्याचीच चप्पल  काढून नाकाला लावली तर, चपलेच्या वासाने तरी नक्की जागा होईल. हा! असचं करूया 'असं मनाशी ठरवत तिने त्याच्या पायातली चप्पल काढली.

रमा त्या माणसाची चप्पल त्याच्या नाकाला लावणार इतक्यात तिला गज नसलेल्या खिडकी बाहेरून कोणीतरी त्या दोघांना बघत आहे असं वाटलं. ती त्याची काढेलेली  चप्पल हातात घेऊन हळूच किचनच्या बाहेर आली.

ती बाहेर जाताच एक काळी सावली त्याच्या अवतीभवती फिरायला लागली. तो जीवंत आहे की नाही हे पाहू लागला. रमा भुतिणीने आता दात ओठ खाल्ले, पण ती काहीच व्यक्त झाली नाही. जेव्हा काळी सावली परत बाहेर निघायला लागली, तेव्हा रमा अचानक त्या सावलीच्या समोर उभी राहीली.

रमा अशी पटकन समोर येईल, अशी अपेक्षा त्या सावलीला नव्हती. ती सावली एकदम दचकली आणि म्हणाली,

"रमे ! तू ?  घाबरवलं ना मला !"

"हो रमाच..! आणि माधव काय रे, काय फाजीलपणा चालवला आहेस ? "

"फाजीलपणा ?  मी काय फाजीलपणा केला बुवा !" 

माधव भुताने अगदी साळसूदपणे म्हटलं . त्याचा असा भोळेपणाचा आव पाहून रमाला रागाने तो बुट माधववर फेकून मारावासा वाटला, पण बुट उगारलेला हात खाली आणि ती थांबली. तिला लक्षात आलं माधवही भूत असल्यामुळे त्याला बिलकुल लागलं नसतंच.

  तसेच रमाला जाणवलं, दोन भुतांच्या भांडणात जर वेगाने मारलेला बुट चुकून जमिनीवर बेशुद्ध पडलेल्या माणसाला लागला आणि कुठे तो बुट त्याच्या डोक्याला नेमका त्याच्या वर्मी बसला तर मात्र तो माणूस नक्कीच मरेल आणि इकडेच भूत होऊन बसेल म्हणून ती आपल्या भावना आवरून माधवला म्हणाली,

" उचल हे धूड ! मला माहित आहे, तूच पाठवलं आहे ह्याला. कोणत्या खिडकीतून आत यायचं हे त्याला तू सांगितल्याशिवाय समजणारचं नव्हतं. पहिलं मला सांग  तू हे का केल आहेस ? हे बघ माधव !  मी शेवटच सांगते, माझ्या घरात अजून तुझी नाटक नको आहेत. ह्याला घेऊन निकल अभी के अभी.."

"आ ! मी का उचलू हे पोतं ? मला खुप काम आहे. तुझं तूच उचलं. " असं म्हणून माधव भूत तिकडून पळून गेला.

रमा त्याला अडवायला त्याच्यापाठोपाठ बाहेर गेली आणि
तिला कॉटेजच्या मुख्य दरवाजापाशी बाईकचा आवाज आला. ह्या बाईकचा आवाज रमा भुतिणीच्या ओळखीचा होता. तिच्या भावची सर्वात धाकटी मुलगी वरदाची बाईक होती ती.

तिचा भाऊच ह्या कॉटेजची जमेल तशी डागडुजी करायचा म्हणून रमा भुतिणीनेने कधीही पल्लवीला आपल्या मित्र मैत्रिणीबरोबर रात्रीची मजा करायला अडवलं नव्हतं, पण आज पल्लवीच्या बाईकचा आवाज सोडून कोणत्याही दुसऱ्या बाईकचा आवाज आला नव्हता. तसचं तीही बाईकवर एकटीच आली होती.

रमाने पाहिलं, वरदाला बाईक नेहमीप्रमाणे नीट पार्कही करता येत नव्हती. कशीतरी तिने बाईक कॉटेजच्या बाहेर पार्क केली आणि  गेट उघडून आत आली.  रमाला जाणवलं की पल्लवीच काही आलबेल नाही आहे.

रमाला आता त्या बेशुद्ध माणसाचं टेंशन आलं आणि दयाही आली. तो तिकडे स्वपैपाक घरात आणि ही इकडे ओसरीत. आधीच बिचारा आत्महत्या करताना बेशुद्ध पडलेला आहे जर आता पल्लवीने ह्याला पाहिलं तर ती नक्की चोर म्हणून पोलिसात त्याची तक्रार करेल.

बिचारा आधीच आयुष्यात कंटाळलेला आहे, अजून त्याला त्रास हा नको. त्यापेक्षा त्याला आत बेडरूममध्ये कपाटात लपवावं. असा विचार करून पल्लवी मुख्य दरवाज्याच कुलुप काढेपर्यंत रमाने पटकन त्या बेशुद्ध माणसाला हवेत उचललं आणि  हवेत तरंगतच त्याला बेडरूममध्ये आणलं. मग बेडरूममध्ये असलेल्या  एकमेव जुन्या मोठ्या रिकामी लाकडी कपाटात एका मोठ्या फळीवर त्याला बाळा सारखं अलगद झोपवलं आणि मग कपाटाच दार  किलकिल बंद करून पल्लवी कशासाठी आली आहे हे पहायला रमा भुतिण हॉलमध्ये गेली.

क्रमश:

काय झालं असेल पल्लवीला?
माधव भुताने का खोडी केली ?
बेशुद्ध माणसाचं काय होणार हे जाणून घेण्यासाठी कथेसाबत रहा.


🎭 Series Post

View all