Feb 29, 2024
ऐतिहासिक

घोंगडी

Read Later
घोंगडी
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रयतेच्या मनात असलेल्या भावना व्यक्त करणारी काल्पनिक कथा.

"कौशे,अग ये कौशे! ध्यान कुठं हाय तुझ? मेंढर इकड तिकड पळत्यात बघ की जरा."
खंडोजी धनगर आपल्या लेकीला जोरात आवाज देत होता.

तशी कौसा भानावर आली.
"बा,एक इचारू का? रागावणार न्हाईस नव्हं?"
कौसा हळूच म्हणाली.

"आता न्हाय म्हणल तर तू थांबणार हायेस व्हय? इचार काय ते?"
खंडू वैतागला.

"बा, तकड रायगडाव लई मोठा उत्सव हूनार हाय. महाराज गादीवर बसणार हायेत."
कौसाचे डोळे उत्साहाने चमकत होते.

"कौशे त्याला आजुन सा मैन हायेत. आन आपल्याला कशाला ग पंचाईत."
खंडू चिडून बोलला.

"बा, आर राजाचं स्वराज्य आल आन तरास कमी झाला आस तूच म्हणतोस नव्हं?"
नऊ वर्षांची कौसा त्याला विचारत होती.

"व्हय पोरी,आता कुणी मेंढर पळवत न्हाय,लेकी बाळी पळवत न्हाय. राजं आल आन दोन घास सुखान खायला मिळालं बग."
खंडू हात जोडत म्हणाला.

"बा,पाटलांची रंगी सांगत व्हती,तीच आबा राजासनी भेट पाठवनार हायेत."
कौसा डोळे मोठे करून सांगत होती.

"पोरी ती मोठी माणसं. आपून राजासनी काय देणार?"
खंडू खिन्न हसला.

दोघे बापलेक मेंढर घेऊन पालावर आले. संध्याकाळी गावात कीर्तन होते.
"बा,म्या बी येते." कौसा मागे लागली.कीर्तन सुरू झाले. आज बुवा शबरीची गोष्ट सांगत होते. श्रीरामाने शबरीची बोरे उष्टी असूनही खाल्ली. गरीब,बिचाऱ्या शबरीला कुठेही न दुखावता प्रभू श्रीराम शबरीला भेटले. गोष्ट ऐकताना छोटी कौसा अगदी रंगून गेली होती. कीर्तन संपले. झोपी गेलेल्या छोट्या कौसाला खांद्यावर घेऊन खंडोजी घरी आला.

दुसऱ्या दिवशी सकाळी कौसा आईला रात्री ऐकेलेली गोष्ट सांगत होती.

"कौशे,राम होतच तस समद्यासनी न्याव करणार."
आईने तिला समजावले.

"म्हंजी शिवबा राजानंवानी नव्हं?"
कौसा आनंदाने विचारत होती.

"व्हय,शिवबा राजबी तसच न्याव करणार आन दिला शब्द पाळणार हायेत."
खंडोजी अभिमानाने बोलला.

"बा,आपून राजासनी घोंगडी भेट द्याची."
कौसा कौतुकाने म्हणाली.

"पोरी, आग तिकड राजासनी भेट म्हणून सोन, नाण,दूध दुभत आन काय बाय यील. घोंगडी कशी द्याची."
खंडोजी समजावू लागला.

"बा,शबरीची बोर रामान खाल्ली नव्हं? मग आपून राजासनी घोंगडी द्याची."
कौसा हट्ट करू लागली.

तिच्या हट्टासाठी घोंगडी तर बनवू. असे ठरवून खंडोजीने होकार दिला.


सनगर गाठून खंडोजीने घोंगड्या बनवायला दिल्या.
"ह्यातली एक राजगडाव द्याची हाय."
खंडोजी म्हणाला.

"खंडू,आर येडा का खुळा तू? गडावर तुझी घोंगडी घेत्याल का?"
सनगर हसला.

"नग घिऊ दे. तकड पायरीव ठीवील."
खंडोजी म्हणाला.

घोंगड्या बनवून तयार झाल्या. आता खंडोजी मेंढर घेऊन कोकणची वाट चालू लागला. जाताना घोंगड्या विकायची ठरलेली गावे असायची. कौसा राजांना द्यायची घोंगडी कोणाला दाखवत नसे.

एक दिवस खंडोजी आणि त्याची बायको बाजाराला गेले. जाताना कौसाला बजावले.
"कौशे,आजूबाजूच्या माणसा संग रहा.लांब जाऊ नग."

कौसा मेंढर राखत होती तेवढ्यात लांबूनच घोड्यांचे आवाज येऊ लागले. हिरवी निशाणे पाहून सगळे घाबरले. पण मेंढपाळ मेंढ्या सोडून पळू शकत नव्हते. चारही बाजूंनी त्यांना घेरले. वीस पंचवीस यवनी स्वार होते.

"सब कूछ लूट लो| औरते उठा लो|"
कौसा घोंगडी घट्ट धरून होती.

"ये लडकी,हात मे क्या है? छिन लो|"
एकजण ओरडला.
"न्हाय देणार! राजांना द्यायची हाय घोंगडी."
कौसा जोरात ओरडली.

"छिन लो| और इसे बंदी बना लो| बेच देंगे|"

सैनिक पुढे झाला.

कौसाच्या हातातील घोंगडी हिसकावून घेणार एवढ्यात चारही बाजूंनी गोफणीतील दगड येऊ लागले. वीस पंचवीस डोकी फुटायला फार वेळ लागला नाही.


कौसा तशीच उभी होती. तेवढ्यात बाजूने राजांचे शिलेदार बाहेर पडले.

"घाबरु नगा! आमी राजांची माणसं हावोत."
त्यांनी मेंढपाळ लोकांना सुरक्षित केले आणि निघाले.

"दादा,रायगड किती दूर हाय हितून?"
लहानगी कौसा विचारत होती.

"लई लांब हाय,तुला याचं हाय व्हय गडावर?"
त्याने हसुन विचारले.

"लेकरू लहान हाय मालक."
एक म्हातारी पुढे झाली.

"दादा, राज गादीवर बसणार. त्यासनी भेट द्यायला म्या गडाव येणार."
कौसा परत म्हणाली. मावळे आल्या वाटेने निघून गेले.


खंडोजी आणि हिरा परत आले. सगळेजण घाबरले होते. त्यांनी तिथले ठिकाण सोडले. राजांचा राज्याभिषेक पंधरा दिवसांवर आला होता. लवकरच राजे गादीवर बसणार होते. बारा मावळ खोऱ्यातील रयत रायगडाची वाट चालू लागली होती. कौसा ते सगळे पहात होती.

"हिरा,त्याल मीठ आन मिरची घ्यायला जवळ काय बी नाय." खंडोजी हताश झाला होता.
"धनी एखाद मेंढरू इका बाजारात." हिराने सुचवले.

"पर त्याला रोख पैक मिळायच न्हाई. धान्य मिळलं."
खंडोजी आणि हिरा बोलत असताना लांबून दोन घोडे येताना दिसले.
हिरा आणि खंडोजी घाबरले. तेवढ्यात एक घोडेस्वार उतरला.
"बाबा,घोंगड्या हायती का?"
त्याने दमदार आवाजात विचारले.

"हायेत की मालक. किती पायजेत?"
खंडोजीला आनंद झाला होता.
"समद्या पायजे.किती हायेत?" त्याने विचारले.

"धा हायेत सरकार." खंडोजी दाखवू लागला.
"धा? आर तिकड एक आणखी हाय की?"
दुसऱ्याने विचारले.
"न्हाय,ती इकायला न्हाय." हिरा म्हणाली.

"आमचा इरोबाला नवस हाय आकरा घोंगड्या वहायचा." पहिल्याने सांगितले.
"पर मालक ती घोंगडी न्हाय द्याची. म्या दुसऱ्याकडून एक घिऊन देतो की."
खंडोजी विनंती करू लागला.

"नग,ह्या आकरा दे. सोन्याच्या आकरा मोहरा घे."
दुसऱ्याने थैली काढली.

"धनी,ती घोंगडी माझ्या लेकीन राजाला द्यायची म्हणून जपली हाय. उपाशी मरल न्हाय इकणार."
खंडोजी धाडस करून बोलला.


"शाबास खंडोजी, आर तुमच्यासारखी रयत आसल तर राजाचं आउक्ष वाढल."
त्या दोघांनी दाढी मिशा काढून ठेवल्या.

"म्या पिराजी आन म्या सटवाजी. आमीच तुमच्या माणसांना वाचीवल व्हत. तुमची लेक तवा बी घोंगडी द्यायला तयार नव्हती. आमी बहिर्जींचा सांगावा घिऊन आलोय. तुमाला आन तुमच्या लेकीला रायगडी बलावन हाय."


कौसा आणि तिचे आई बाप रायगडाची वाट चालू लागले. घोंगडी हृदयाशी घट्ट धरून. दुरून सजलेला रायगड दिसला आणि तिथूनच तिघांनी मुजरा केला आणि राजांना गादीवर बसल्याचा सोहळा पहायला रायगडाची वाट धरली.

कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे. आजही साडे तीनशे वर्षानंतर रयत स्वतः हा सोहळा साजरा करायला रायगडावर जमते. शिवबा आजही त्याच सिहांसानावर आरूढ आहे. तमाम मावळ मुलुखतील रयतेच्या काळजात.

बारामावळ खोऱ्या मधुनी रयत चालली पुढे
पाय चालती वाट वनाची, नजर रायगडाकडे.

भाकर तुकडा दारी ओवाळून, कुळंबीन म्हातारी बोलते
शिवबा राजा धन्य लेकरा,नजर इथून काढिते.

कुलीन सगळ्या लेकीसुनांनी तबक सजविले हाती
शिवबा आमुचा राजा जाहला,नाही कुणाची भीती.

रायगडाच्या भूमीवर तो,जनसागर उसळला
सिंहासनावर पाहून शिवबा,धन्य मावळा झाला.
©®प्रशांत कुंजीर.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Kunjir Prashant Vishwanath

Primary Teacher

Primary Teacher In Z P Pune A Writer,A Poet An Anchor

//