घे भरारी : भाग तीन
आरोही अजूनही पलंगावर बसली होती. ग्रंथालयात घेऊन जायला जी कादंबरी तिने काढली होती तीच कादंबरी आरोही चाळत होती. तिने मान वळवून दरवाजाकडे बघितलं. दारात विनय उभा होता.
"वहिनी काय करते आहेस?" दारात उभं राहात विनयने विचारलं.
"काही नाही रे. ही कादंबरी चाळत बसले आहे. खरं तर मला ती बदलायला जायचं होतं. पण आईने जाऊ दिलं नाही." अगदी सहज आवाजात आरोही म्हणाली.
"वहिनी , मी आत येऊ?" विनयने विचारलं.
"कमाल करतोस विनय. त्यात विचारण्यासारखं काय आहे. ये की आत." आरोही हसत पलंगावरून उठत म्हणाली. विनय आत आला. त्याचा चेहेरा एकदम गंभीर होता. तो आरोही जवळ जाणार इतक्यात आरोहीची आई खोलीत आली. तिथे विनयला बघून ती मनात चरकली. आदल्या दिवशी विनय ज्या पद्धतीने आरोहीकडे बघत होता ते तिला आठवलं. अचानक खाकरत ती पुढे आली आणि म्हणाली; "विनयजी काही हवं होतं का? आरोही अजून धक्क्यातून सवरलेली नाही. मला सांगा न तुम्हाला काय हवं आहे. मी देते." विनयने मागे वळून बघितलं आणि आरोहीच्या आईकडे बघून कपाळाला आठ्या घातल्या.
"मला काही नको आहे. बोलायला आलो आहे मी वहिनीशी." तो म्हणाला.
"मग नंतर बोलता का? ती आत्ता थोडा आराम करते आहे." आरोहीच्या आईने देखील चिवटपणे उत्तर दिलं. आरोहीच्या आईचा अपमान होऊ नये म्हणून विनय खोलीतून बाहेर निघून गेला. पण जाताना त्याने आरोहीकडे एकदा वळून पाहिलं. अर्थात ते देखील आरोहीच्या आईला आवडलं नाही. पण ती काहीच बोलली नाही.
"आरु तू असं उगाच कोणालाही खोलीत येऊ देऊ नकोस ह. चांगलं नाही दिसत ते." तीची आई तिला म्हणाली.
आईच्या बोलण्याने आरोहीला धक्काच बसला. "अग, कोणालाही म्हणजे काय? विनय कोणीही नाही माझा दिर आहे." आरोही शांतपणे म्हणाली.
"ते मला देखील कळतं आरु पण लोक काय म्हणतील? अजूनही विशालच्या घरातली सगळी पाहुणे मंडळी आहेत या घरात. जर त्यांनी बघितलं की तुझा दीर तुझ्या खोलीत येतो आणि बराच वेळ थांबतो तर उगाच तुझ्याबद्दल वाईट साईट चर्चा सुरू होईल. कसं कळत नाही ग तुला?" आई पोटतिडकीने म्हणाली.
"काय चाललं आहे आई तुझं? मी कुठेही जायचं नाही; कोणी माझ्याशी बोलायचं नाही. मग मी आयुष्यात काय करायचं नक्की? अग, माझा नवरा गेला यात माझी काय चूक? तू तर असं वागते आहेस की मी काहीतरी घोड चूक केली आहे; किंवा मीच त्याला मारलं आहे आणि आता त्याची शिक्षा मी भोगली पाहिजेच." आरोही चिडून म्हणाली.
तिचं बोलणं ऐकून आई प्रचंड चिडली आणि तरातरा तिच्या जवळ येत तिने आरोहीला जोरात फटका मारला. "तुझ्या जिभेला काही हाड आरु ? काय बोलावं; कधी बोलावं याला काही काळ वेळ असतो की नाही? अग, वयाने लहान असलीस तरी आता लग्न होऊन विधवा सुद्धा झाली आहेस. आयुष्यातल्या अनुभवांनी काहीच कसं शिकवलं नाही तुला? इतकी पुस्तकं वाचतेस पण कसं वागावं ते मात्र नाही कळत तुला." आई म्हणाली.
"आई, तू संपूर्ण विरोधाभासी विषय लागोपाठच्या वाक्यात कसे बोलू शकतेस ग?" आरोही आईला चिडवल्या सारख्या आवाजात म्हणाली.
न कळून तिच्या आईने विचारलं; "म्हणजे?"
"आई, मुळात आपल्या जिभेला हाडच नसतं. बरं, जर हे भाषिक हाड आहे असं आपण म्हंटलं... म्हणजे मी कुठे, कधी आणि योग्य अयोग्य बोलणं.... या अर्थाने! तर तुझ्या पहिल्या प्रश्नातच हे समजतं की मला बोलण्याचं भान नाही. मग तू प्रश्न का विचारतेस? तुला हे मान्य आहे की मी वयाने लहान आहे; मग आई लग्न झालेली किंवा विधवा असले तरी त्या वयात मुली जसं वागतात तशीच तर वागते आहे मी. आई, तुला मी कालच सांगितलं आहे; माझं लग्न झालं होतं तरीही माझ्यात आणि विशालमध्ये असं काही प्रेम नव्हतं की मी त्याच्या आठवणींमध्ये बुडून जाईन. मी जे आजवर वाचलं आहे न त्यातून जे शिकले तशी वागते आहे. आयुष्य म्हणजे पुढे जाणं आई; अडकून राहाणं नाही." आरोही म्हणाली.
"मला अक्कल नको शिकवू आरु. एक लक्षात ठेव; निदान मी इथे असे पर्यंत मी तुला चुकीचं वागू देणार नाही. कळलं?"
आईच्या त्या बोलण्याने आरोही दुखावली गेली. पण तिला आईशी अजून वाद घालायचा नव्हता. त्यामुळे तिने आईकडे पाठ केली आणि ती पलंगावर आडवी झाली.
आरोहीची आई खोली बाहेर यायच्या आत बाहेर उभं राहून आरोही आणि तिच्या आईच्या मधलं बोलणं ऐकणारा विनय पटकन निघून गेला.
दिवस उगवत होता आणि मावळत होता. दोन दिवस गेले आणि सगळेच नातेवाईक परतीचा विचार करायला लागले. संध्याकाळी सगळे हॉलमध्ये बसले होते त्यावेळी विनय lच्या आत्याने विषय काढला.
"उद्या तिसरा दिवस होतो आहे विशाल गेला त्याला." आत्या म्हणाली.
तिच्या त्या एका वाक्याने विशालच्या आईच्या डोळ्यात परत पाणी उभं राहिलं. तिच्या जवळ जाऊन बसत आत्या म्हणाली; "वहिनी, इतका त्रास करून घेऊ नकोस ग. आपल्या हातात असतात का या गोष्टी? नको रडूस."
"माझा सोन्यासारखा मुलगा गेला वन्स. रडू नको तर काय करू? आता सगळी जवाबदारी विनयवर." रडू आवरत विशालची आई म्हणाली.
"विनयवर तुमची जवाबदारी तर राहणारच न वहिनी." बाजूला बसलेले काका म्हणाले.
"फक्त मीच नाही भावजी. आरोही देखील आहेच की." विशालची आई म्हणाली.
"अहो, वर्ष देखील झालेलं नाही लग्नाला. पाठवून द्या तिला माहेरी. तुमची जवाबदारी नाही होऊ शकत ती." काका एकदम म्हणाले आणि सगळेच काकांकडे बघायला लागले.
क्रमश :
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा