घे भरारी भाग दोन

घे तू भरारी
घे भरारी : भाग दोन


"वहिनी, दादा मित्राची बाईक घेऊन जात होता. त्याने हेल्मेट देखील घातलं होतं. पण एका ट्रकने मागून धडक दिली आणि तो जागीच गेला. दादाच्या मित्राचा आताच मला फोन आला होता. मी लगेच निघतो आहे मुंबईला जायला. तू आईला सांभाळ." विनय म्हणाला आणि तसाच उठून निघून गेला.

का कोण जाणे पण रडणाऱ्या सासूबाईंकडे बघून देखील आरोहीला रडू येत नव्हतं. तिने सासूबाईंना हाताने उठवून सोफ्यावर बसवलं; त्यांना पाणी दिलं आणि त्या थोड्या शांत झाल्यानंतर स्वतःचा मोबाईल बाहेर काढून सर्वात पहिला फोन तिने तिच्या भावाला केला. भावाला देखील विशाल गेला आहे हे सांगताना तिचं मन खूपच शांत होतं तिचं तिलाच तिच्या शांतपणे आश्चर्य वाटत होतं. बातमी ऐकून तिच्या भावाला खूप मोठा धक्का बसला. आईला घेऊन लगेच निघतो एवढं म्हणून त्याने फोन ठेवला.

आरोहीचा भाऊ आणि आई त्यांच्या तिच्या घरी पोहोचेपर्यंत विनय विशालच पार्थिव घेऊन मुंबईहून परत आला होता. आपल्या तरुण ताठ्या मुलाचं पार्थिव बघून आरोहीच्या सासुने मोठा हंबरडा फोडला. घरात एकूणच रडारड सुरू झाली. मात्र त्या परिस्थितीत देखील आरोही शांतच होती. तिचं तिलाच आश्चर्य वाटत होतं की तिला रडू का येत नाही. शेवटी ती रडत नाही हे लोकांच्या लक्षात येऊ नये म्हणून ती तिच्या खोलीत गेली आणि दरवाजा बंद करून घेतला.

थोड्यावेळाने आरोहीची आई चहा आणि दोन बिस्किट घेऊन तिच्या खोलीत आली.

" बाळा चहा घेतेस?" आरोहीच्या आईने तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला विचारलं.

" हो ग! कधीपासून इच्छा होती. पण काय करू बाहेर इतकी रडारड चालू आहे; की मी इच्छा असूनही स्वयंपाक घरात जाऊ शकले नाही." अगदी सहज आवाजात आरोही म्हणाली आणि आईच्या हातातून चहाचा कप आणि बिस्किट खाऊन चहा घ्यायला सुरुवात केली.

आरोहीच्या आईला थोडं विचित्र वाटलं. पण कदाचित बसलेल्या मोठ्या धक्क्यामुळे आरोही अशी वागते आहे असं त्यांना वाटलं. आरोहीच्या डोक्यावर थोपटून आरोहीची आई खोली बाहेर गेली आणि जाताना दरवाजा ओढून घेतला.

विशालच पार्थिव मिळण्याची वेळ आली त्यावेळेला 'आरोहीला बाहेर बोलवा;' असं आलेल्या गुरुजींनी म्हटलं. म्हणून आरोहीची आई तिच्या खोलीत दार उघडून आत गेली. आरोही खिडकीत उभी होती आणि काहीतरी गुणगुणत होती.

" आरोही? बरी आहेस ना? चल बाहेर! गुरुजींनी तुला बाहेर बोलावलं आहे." आरोहीला तिची आई म्हणाली. मात्र आरोहीचा शांत चेहरा आणि तिचा गुणगुणणारा आवाज ऐकून आरोहीच्या आईला धक्का बसला.

शांत चेहऱ्याच्या आणि सहज हालचाल करणाऱ्या आरोहीने बाहेर जाणं आरोहीच्या आईला योग्य वाटलं नाही. आरोही रडली नाही तर तिच्याबद्दल गैरसमज निर्माण होतील असं त्यांच्या मनात आलं. त्यामुळे तिच्या दोन्ही खांद्यांना धरून गदागदा हलवत त्यांनी तिला विचारलं; "आरोही! अगं! तुझा नवरा गेला. विशाल .... तुझा नवरा मेला आरोही. तरीही अजून तुला रडू येत नाहीये? अगं, अशी का वागते आहेस? तुला बाहेर बोलावलं आहे. जर बाहेर जाऊन तुझा चेहरा असा स्थितप्रज्ञ सारखा दिसला तर काय म्हणतील लोक?"

आईकडे शांतपणे बघत आरोही म्हणाली; " पण आई मला रडायलाच येत नाहीये. मला कळतंय ग की मला वाईट वाटलं पाहिजे. विशाल, माझा नवरा होता हे काय मला माहित नाही? पण आई रडायला येतच नाहीये मला तर करू तरी काय?"

बोलताना आरोहीचा आवाज थोडा मोठा झाला. तिचा आवाज ऐकून तिची आई थोडी गडबडली. " अगं, हळू बोल! बाहेर ऐकू गेलं तर काय म्हणतील लोक?" तिची आई घाबरत घाबरत म्हणाली. इतक्यात खोलीच्या दाराशी आरोहीची सासू आली. " आरोहीला घेऊन बाहेर येताय ना?" त्यांनी अत्यंत मऊ भिजलेल्या आवाजात प्रश्न केला. " धक्का बसलाय हो तिला; काहीच बोलत नाहीये. थोडं समजावते आणि आणते." आरोहीची आई गडबडीने म्हणाली. " बरं!" म्हणून आरोहीची सासू परत गेली.

"आरोही, रडू येत नसेल तर नको रडूस; पण निदान चेहरा तरी दुःखी करू शकतेस ना?" आरोहीची आई तिला म्हणाली. थंड नजरेने आईकडे बघून आरोहीने मान हलवली आणि ती आई सोबत बाहेर जायला निघाली. आरोहीला आणि आरोहीच्या आईला दोघींनाही लक्षात आलं नाही की घरात आल्या आल्या सासूला जी लाल साडी आरोही दाखवत होती ती साडी अजूनही आरोहीच्या खांद्यावर होती. दोघी बाहेर आल्या आणि आरोहीला घेऊन तिची सासू पुढे झाली. इतक्यात शेजारच्या बाईने सासूला खूण केली की आरोहीच्या खांद्यावर एक रंगीत साडी आहे. आरोहीच्या सासुने ते बघितलं आणि खस्कन ती साडी काढून जमिनीवर फेकली. आरोहीला ते खूपच अनपेक्षित होतं. जमिनीवर अस्ताव्यस्त पडलेल्या साडीकडे तिने एकदा बघितलं; आणि मग वळून तिने सासूकडे बघितलं. सासूच्या डोळ्यात एक विचित्र राग होता. आरोहीला त्याचा अर्थच कळला नाही. ती तशीच शांतपणे पुढे झाली. होणारा प्रकार तिचा दिर विनय बघत होता. त्याची नजर आरोहीवर स्थिरावली होती.

आरोही पुढे झाली तशी गुरुजींनी विनयला सांगितलं; "तिच्या हातावर पाणी दे."


आरोहीची आई तिच्या खोलीमध्ये गेली. बघते तर आरोहीने कपडे बदलले होते. ती कुठेतरी बाहेर जायला निघाली होती.

"अग, कुठे जाते आहेस?" आरोहीच्या आईने आश्चर्याने विचारलं.

अगदी सहज आवाजात आरोही म्हणाली; "कुठे नाही ग. ग्रंथालयात जाऊन येते. तुझ्याकडे आले होते त्याआगोदरच ही कादंबरी वाचून पूर्ण झाली होती. तिची तारीख देखील होऊन गेली आहे. अजून उशीर केला तर उगाच जास्तीचे पैसे भरावे लागतील. तसंही मला घरात बसून कंटाळा आला आहे. एखादं पुस्तक आणीन म्हणते आहे; म्हणून निघाले आहे." तिचं ते सहज बोलणं ऐकून आरोहीच्या आईला धक्का बसला.

आरोहीला हाताला धरून पलंगावर बसवत ती म्हणाली; "तुला वेड लागलं आहे का आरोही? कशी वागते आहेस कालपासून? तुला काही कळत नाही आहे का? तुला धक्का बसला आहे म्हणावं तर नीट वागते, बोलते आहेस. खाते-पिते आहेस. अग, तुझा नवरा मेला काल आणि तू आज ग्रंथालयात जायला निघालीस? लोक काय म्हणतील याचा तरी विचार कर ग." आईकडे शांतपणे बघत आरोही म्हणाली; "आई वेड नाही लागलेलं मला. सगळ्यांना वाटतंय की मी मोठमोठ्याने रडावं... विशाल - विशाल ... करून सतत डोळ्यातून पाणी काढावं. पण आई मला असं काही करावंसं वाटतच नाही आहे." तिचं बोलणं ऐकून आरोहीची आई गोंधळून गेली.

आईला समोर बसवत आरोही म्हणाली; "आई, विशाल माझा नवरा होता हे खरं आहे. पण आई आमचा असा इतका सहवास झालाच नाही की माझी त्याच्याबद्दल खूप काही जवळीक निर्माण होईल. लग्नाला फक्त सात महिने झाले आहेत आई. त्यात आम्ही दोघे किती दिवस एकत्र होतो माहीत आहे का? लग्नाचे दोन दिवस धरून देखील जेमतेम दहा-बारा दिवस फक्त! तो त्याच्या कामाच्या बाबतीत खूप पॅशनेट होता. त्यात मला इथून लवकर घेऊन जायची त्याची इच्छा होती... हे सगळं मला माहित आहे. ते मला आवडायचं देखील. पण आई, अग, मुळात मला लग्न करायचं नव्हतं. त्यात बाबा गेले आणि तुम्ही मला सावरायला वेळही न देता लग्न करून दिलंत. इथे ज्याच्या जीवावर आले तोच नव्हता माझ्या सोबत. त्यामुळे तो गेल्यावर त्याच्यासाठी रडण्याइतका जिव्हाळाच निर्माण झाला नव्हता आमच्यात आई. अर्थात वाईट तर वाटतंच आहे; कारण आमच्यात छान दोस्ती झाली होती. कधीतरी अधून मधून गप्पा होत होत्या. पण आई..... नव्या नवलाईतलं प्रेमबिम नव्हतं आमच्या गप्पात." आरोहीचं ते शांतपणे समजावणं आईला अजूनच विचित्र वाटलं. पटकन तिच्या जवळून उठत ती म्हणाली; "मला तुझं हे बोलणं काहीही कळत नाही आरोही. पण मी तुला स्पष्ट सांगते; तू आत्ता कुठेही जायचं नाही आहे. गपचूप खोलीत बस." आरोहीला तिच्या आईच्या त्या बोलण्याचा अर्थच कळला नाही आणि तिच्या काही लक्षात यायच्या अगोदरच तिची आई खोलीबाहेर निघून गेली होती. जाताना तिने दरवाजा ओढून घेतला आणि बाहेरून कडी घातलेली आरोहीला ऐकू आली. आरोहीला आईच्या या अशा वागण्याचाच जास्त धक्का बसला.

थोडा वेळ गेला आणि अचानक तिला खोलीची कडी काढल्याचा आवाज आला. आरोही अजूनही पलंगावर बसली होती. ग्रंथालयात घेऊन जायला जी कादंबरी तिने काढली होती तीच कादंबरी आरोही चाळत होती. तिने मान वळवून दरवाजाकडे बघितलं. दारात विनय उभा होता.


क्रमश :

🎭 Series Post

View all