घे भरारी...

About Success


घे भरारी..

" हे देवा, यावेळी तरी माझ्या सूनेला मुलगा होऊ दे, आमच्या वंशाला कुलदिपक दे..मी तुझ्यापुढे पदर पसरते...यावेळी तरी माझे ऐक देवा .."
सुमनताई आपल्याला नातूच व्हावा यासाठी देवाला काकुळतीने विनवणी करत होत्या, प्रार्थना करत होत्या.

पण देवाने यावेळीही त्यांची हाक ऐकली नाही. तीन मुलीनंतर मुलाच्या प्रतिक्षेत असलेल्या सुमनताईंच्या सूनेला चौथी मुलगीच झाली. मुलगी झाल्याचे ऐकताच,सुमनताई राग,द्वेष,दुःख अशा सर्व भावनांनी उद्विग्न झाल्या होत्या व त्यामुळे इतरांवर त्याचा परिणाम होत होता.सूनेवर व तिच्या मुलींवर सर्व राग निघत होता. आता त्यात बिचाऱ्या मुली व त्यांच्या आईचा तरी काय दोष ?

एकतरी मुलगा पाहिजे, असे घरातील सर्वांनाच वाटत होते आणि त्यामुळे मुलाच्या आशेने चौथ्या वेळीही मुलगीच झाली. सर्वांची आशा निष्फळ ठरली व घरात निराशा, नाराजी,दुःख यांचे सूर घुमू लागले.
चारीही मुलीच आणि त्यात दुःखाची गोष्ट म्हणजे मोठी मुलगी स्वप्ना ही जन्मतःच एका पायाने अधू होती. अनेक उपचार केले पण काहीही उपयोग झाला नाही. घरातील सर्वांना तिची विशेष काळजीही वाटायची आणि टेंशनही यायचे.

स्वप्ना व तिच्या बहिणी जशा मोठ्या होत होत्या तसे स्वप्नाला आपल्या अपंगत्वाबद्दल जास्त चीड यायला लागली होती.
स्वप्ना इतरांप्रमाणे व्यवस्थित चालू शकत नव्हती, खेळ खेळू शकत नव्हती. आपल्या बहिणींना,मैत्रीणींना पळताना, खेळताना पाहून तिला आपल्या अपंगत्वाचे वाईट वाटायचे. देवाने आपल्याला हे अपंगत्व देवून आपल्यावर खूप मोठा अन्यायच केला आहे, असे तिला नेहमी वाटायचे.
घरात,शाळेत किंवा कुठेही गेले तरी, तिला इतरांची मदत घ्यावी लागत असे. इतरांकडून तिला कधी सहानुभूती मिळायची तर कधी तिच्या अपंगत्वावर टिकाही व्हायची.
तेव्हा तिला रागही यायचा आणि वाईटही वाटायचे.

"आई, मला कंटाळा येतो गं.. या अशा परावलंबी जगण्याचा.माझ्या पायांवर मी व्यवस्थित उभी राहू शकत नाही तर...पुढे आयुष्यात काय करू ? प्रत्येक वेळी कोण येईल माझ्या मदतीला? मलाही पळावसं वाटतं, इतरांप्रमाणे खेळावसं वाटतं, मनाला खूप काही करावसं वाटतं, पण शारिरीक दृष्टीने मी कमजोर पडते.मलाही आयुष्यात काहीतरी करावेसे वाटते गं..पण काय करू तेचं समजत नाही गं.."
स्वप्ना निराश होऊन आपल्या आईला म्हणायची.

" बेटा, देवाने तुझ्याबाबतीत हे असे केले..ते पाहून खरचं आम्हांला सर्वांना खूप वाईट वाटते. तुझी व्यथा पाहून आमच्या मनाला तुझ्या इतकाच त्रास होतो गं..पण आता जसे आहे तसे स्विकारणे हेचं आपल्या हातात असते. जगात तुला अशा अनेक व्यक्ती दिसतील,ज्या कोणत्या ना कोणत्या गोष्टीने दुःखी असतात, हतबल असतात. हे सुंदर जग पाहण्यासाठी काहींना डोळे नसतात,आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी काहींना बोलताही येत नाही, काहींना बहिरेपणामुळे छान,सुरेल अशा संगीताचा,गाण्यांचा आनंद घेता येत नाही, काहींची बौद्धिक पातळी मंद असल्याने जीवनातील छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा त्यांना करता येत नाही,तर काही वेगवेगळ्या आजारांनी ग्रस्त असतात.अशा अनेक प्रकारची लोक असतात. ज्यांना प्रत्येकाला काहीतरी दुःख असते, तरीही ते त्या दुःखाला स्विकारून ...प्रसंगी त्यावर मात करून जीवन जगत असतातच ना!
आणि नुसते जगत नाही तर आपल्या कमकुवतपणावर मात करून, आपल्यातील क्षमतेचा,चांगल्या गुणांचा,कलांचा विकास करतात. स्वतः ही चांगले जीवन जगण्याचा प्रयत्न करतात व इतरांनाही जगण्याची प्रेरणा देतात."

स्वप्नाच्या दुःखी मनाला समजावून सांगता सांगता आईही आपल्या दुःखी मनाची समजूत काढत असे.

स्वप्नाचे कुटुंब मध्यमवर्गीय होते. खाऊन-पिऊन सुखी होते. घरची थोडी शेती होती आणि वडील एका खाजगी कंपनीत नोकरीला होते. चारी मुलींचे शिक्षण व इतर घरखर्च पूर्ण करण्याचा ते प्रयत्न करीत होते.

स्वप्नाच्या अपंगत्वामुळे त्यांना टेंशन आणि काळजीही होती. तिच्या या प्रॉब्लेममुळे तिचे लग्न नाही झाले तर... या विचाराने त्यांनी तिला स्वावलंबी बनवण्याचे ठरविले.

देव आपल्याला काहीतरी प्रॉब्लेम देऊन आपल्यावर अन्याय करीत असतो, असे प्रत्येकाला वाटत असते.पण जेव्हा देव आपल्याला एखादी गोष्ट कुठे कमी देतो तेव्हा दुसरीकडे एक तरी गोष्ट चांगली देत असतो.फक्त ती आपल्याला नीट ओळखता आली पाहिजे व तिचा योग्य उपयोग करता आला पाहिजे.

स्वप्नाच्या बाबतीत ही तसेच होते. तिला जरी पायाने अपंगत्व दिले होते पण देवाने तिला बुद्धिमत्ता भरभरून दिली होती. त्या बुद्धिमत्तेचा स्वप्ना छान उपयोग करत होती. अभ्यास करून परिक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत होती. शाळेतही तिचे कौतुक होत होते.
अभ्यासाबरोबरच अवांतर वाचन करायला तिला आवडायचे ,त्यामुळे अनेक विषयांचे तिला ज्ञान होते.
आपल्या जीवनात ती या सर्व ज्ञानाचा योग्य वापरही करायची.
तिच्या या गुणांमुळे आईवडिलांना, शाळेतील शिक्षकांना तिचा अभिमान वाटायचा.

आपल्या अपंगत्वामुळे जरी ती नाराज असली तरी, आपली काळजी घेणारे,आपल्याला जगण्याचे बळ देणारे व आपल्याला स्वावलंबी बनण्याचे स्वप्न दाखविणारे आईवडील आपल्याला लाभले आहेत यामुळे ती स्वतः ला भाग्यवान ही समजायची. तिला त्यांच्या कडून जगण्याची प्रेरणा मिळायची.आणि त्यामुळेच ती एखाद्या स्वच्छंद पक्ष्याप्रमाणे आकाशात भरारी मारण्याचे स्वप्न पाहयची.
कारण तिला माहित होते,

\" स्वप्न नसलेले आयुष्य हे पंख नसलेल्या पक्ष्यासारखे असते.\"

जसे पक्ष्याला उडण्याचे बळ पंखातून मिळते,तसेच आपल्या आयुष्यात जर काही स्वप्न नसतील, ध्येय नसतील तर जगण्याला काही अर्थच उरत नाही.
त्यामुळे जीवन जगत असताना, आत्मविश्वासाचे व प्रयत्नांचे पंख लावून जीवनरुपी आकाशात झेप घेऊन यशाची उंची गाठावी लागते.

\"फांदीवर बसलेल्या पक्ष्याला फांदी तुटण्याची भीती नसते. कारण त्याला त्या फांदीवर विश्वास नसून आपल्या पंखावर विश्वास असतो.\"

आपल्या बाबतीतही असेच असते.आयुष्यात अनेक समस्या, संकटे नाही म्हटले तरी येतच असतात. आपण ते टाळू शकत नाही तेव्हा आपण फक्त आपल्या प्रयत्नांवर विश्वास ठेवून योग्य दिशेने कार्य करीत राहिले पाहिजे ,तेव्हाच आपल्याला यशाच्या आनंदात स्वच्छंद विहार करण्यास मिळते.

स्वप्नाने आपल्या बुद्धिमत्तेमुळे शिक्षणात चांगले प्राविण्य मिळवले. तिला शारिरीकदृष्टीने खूप त्रास होत होता पण आपल्या मनोबलाने तिने सर्व समस्यांवर मात करत आपले ध्येय पूर्ण केले.

ओळखीतील लोकांनी, नातेवाईकांनी तिच्या आईवडिलांना अनेक प्रकारचे सल्ले दिले. तिच्या अपंगत्वाला तिचा कमकुवतपणा समजून लग्नासाठी अशी स्थळे दाखवली,ज्यात मुले ही वयस्कर,पहिली पत्नी सोडून गेलेली किंवा मेलेली, व्यसनी व आजारी अशी होती.

पण तिच्या आईवडिलांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता पूर्णपणे स्वप्नाच्या सुखाचा विचार करता तिला पाठिंबा देत राहिले.तिचे भविष्य घडवित गेले.
त्याचाच चांगला परिणाम म्हणजे, स्वप्नाला एका मोठ्या बॅंकेत मोठ्या पदाची नोकरी मिळाली. तिने लग्नाचा कधी विचार ही केला नव्हता. बहिणींचे लग्न करून आपण आईवडिलांजवळच राहू. ते आपल्यासाठी व आपण त्यांच्यासाठी जगावे.असेच तिने ठरवले होते.

तिच्या अपंगत्वापेक्षा तिच्या गुणांकडे पाहणारा, तिच्या शरीरापेक्षा तिच्या मनाचा विचार करणारा आणि तिच्यावर मनापासून प्रेम करणारा ...जीवनसाथी तिला तिच्या बँकेतच भेटला. त्यालाही आईशिवाय जवळचे असे कोणी नव्हतेच. स्वप्नाला पहिल्यांदा पाहताच त्याच्या आईने नाराजी व्यक्त केली ,पण आपल्या मुलाच्या सुखाचा विचार करता व स्वप्नाच्या गुणांमुळे लग्नाला त्यांनी परवानगी दिली.
स्वप्नाच्या आईवडिलांना जावईच्या रूपात मुलगाच मिळाल्याचा आनंद होत होता.
स्वप्ना व तिचा नवरा हे दोघेही एकमेकांच्या आयुष्यात आनंदी होतेच पण आपल्या घरातील सर्वांना ही आनंद देत होते.

स्वप्नासारखे अपंगत्व असणारे असे कितीतरी व्यक्ती असतात, त्यातील काही आपल्या या समस्येवर आयुष्यभर रडत असतात तर काही जे सत्य आहे ते स्विकारून , प्रयत्नांच्या जोरावर आपल्या दुर्बलतेवर मात करून अशक्य ते शक्य करून दाखवितात.
सुधा चंद्रन,दीपा मलिक, अरुणिमा सिन्हा अशी अनेक उदाहरणे आहेत ,ज्यांनी आपल्या शारीरिक समस्येवर मात करून यशाची शिखरे गाठली आहेत.
पॅरा ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारे व देशाला मेडल मिळवून देणारे खेळाडू हे देखील स्वप्नासारख्या कितीतरी लोकांना प्रेरणा देत असतात.
या सर्वांचे मनोबल पाहून आपल्यासारख्या सर्व सामान्य लोकांनाही काही तरी चांगले शिकण्यास मिळत असते.

जणू हे सर्व आपल्या सर्वांना सांगत असतात...

निराश होऊ नको तू जीवनात
विश्वास व प्रयत्नांचे पंख लावून
घे उंच भरारी तू आकाशात
स्वच्छंद पक्षाप्रमाणे घे जगून