घे भरारी...भाग 10 अंतिम

Gunvanni tyach jivan sansthela arpan kel

घे भरारी भाग 10 अंतिम


आधीच्या भागात आपण पाहिले की,


 गुणवानचा एक्सीडेंट झाला आणि डॉक्टरांनी त्याला सहा महिने पूर्ण आराम करायला सांगितला होता पण गुणवान स्वस्थ बसणाऱ्यातला नव्हता, त्यानी एक महिना झाल्यानंतर पेंटिंग करायला सुरूवात केले आणि सहा महिने झाल्यानंतर क्रिकेटही शिकवायला सुरू केलं.. एवढेच नाही तर आता त्याच्या मनाला कुठेतरी काहीतरी खटकत होतं म्हणून तो संस्थेत गेला आणि तिथल्या मुलांसाठी आपण काहीतरी करायला हवं हे भावना त्याच्या मनामध्ये जागृत झाली आणि तो तिथेही काम करायला तयार झाला..

घरचे, शेजारचे सगळे काही काही बोलायचे पण तरी स्मिता आणि केशवने त्याच्या निर्णयसोबत त्याला साथ दिली...


 आता पुढे,

 गुणवाननी त्याचं जीवन संस्थेला अर्पण केलं, तो तिथेच राहून त्या मुलांना क्रिकेट आणि विविध खेळ शिकवायचा, पेंटिंग शिकवायचा....

अभ्यासात जरी मुले हुशार नसली तरी बाकीच्या गोष्टीत मुले हुशार होताना दिसत होती, त्यांच्यामध्ये कला जागृत होत होती आणि गुणवानलाही हेच दाखवून द्यायचं होतं की फक्त कागदोपत्री शिक्षणच सगळं नसतं..

आपण आपल्या कलेतूनही चांगलं करिअर घडवू शकतो.. आपले भविष्य घडवू शकतो.. त्याच्या या कार्याची दखल घेत त्याचा सन्मान करण्यात आला, त्याला पदवीही बहाल करण्यात आली... जेव्हा माणूस काहीतरी चांगलं काम करायला जातो तेव्हा त्याच्या जीवनात अडचणी येतातच,  गुणवानच्या जीवनातही खूप अडचणी आल्या पण त्यावर मात करून गुणवान समोर समोर चालत गेला...आणि आज त्यानी स्वतःची संस्था उघडली आणि त्या संस्थेचे नाव त्यानी “घे भरारी ” असं ठेवलं...

पक्ष्याला जेव्हा आपण पिंजऱ्यातून सोडतो... आणि तो उंच उंच उडतो, जेव्हा आपण त्या पक्षाला सांगतो ना तेव्हा तो पक्षी भुर्रकन उडून निघून जातो तसेच गुणवानला त्या मुलांच जीवन घडवायचं होतं, कोणत्याही कलेत शिक्षण घ्या आणि उंच उंच भरारी घ्या, स्वतःचे भविष्य उज्वल करा हा संदेश गुणवानला “घे भरारी” या शब्दातून द्यायचा होता आणि म्हणून त्याने त्याच्या संस्थेच नाव “घे भरारी” असं ठेवलं....

 गुणवानच्या संस्थेला चांगला प्रतिसाद मिळाला... अपंग, मतिमंद मुलांसोबत त्यानी आता गरीब आणि अनाथ मुलांना शिकवायचं ठरवलं.. शैक्षणिक कार्यापासून आता त्याचे समाज कार्याकडे कार्य वळले...

 शैक्षणिक कार्य ते समाज कार्य हा प्रवास गुणवान साठी सोपा नव्हता पण तरी त्याने ते करून दाखवलं स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या कर्तुत्वावर.....

 आज गुणवानकडे लाखो रुपये नसतील, तो मध्यमवर्गीय असेल तरी तो जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस होता असे मी म्हणेन कारण त्याच्याकडे माणसांची श्रीमंती आहे, जोडलेली नाती आहेत ती त्याच्यासाठी एका शब्दावर धाव घेतील... 

 त्याच्या आयुष्यात एक प्रसंग घडला... स्मिता, केशव आणि गुणवान देवदर्शनाला जात असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला, सुदैवाने कुणालाही काही लागलेले नाही जेव्हा ते घरी परत आले आणि घरी आल्यानंतर त्यांनी हा घडला प्रकार सगळ्यांना सांगितला आणि हळूहळू ही गोष्ट वाऱ्यासारखी  संस्थे पर्यंत पोहोचली, त्यांच्या कानावर गोष्ट पडली सगळे धावत येऊन त्याच्या घरी जमा झाले, छोट्या पासून ते मोठ्या पर्यंत सगळे जमा होऊन त्याची चौकशी करु लागले...


 सगळ्यांचे प्रश्नावर प्रश्न सुरू झाले आणि खरच हे सगळं बघून गुणवानचे डोळे पाणावले, आनंद व्यक्त करू दुःख हे ही त्याला कळत नव्हत,  सगळ्यांच्या मनात त्याच्याबद्दलच्या भावना बघून त्यांच्या डोळ्यात प्रेम बघून खरच गुणवान गदगद झाला...

 लहानपणी भिरभिरणारा , घाबरणारा गुणवान आज सगळे त्याच्यावर इतके प्रेम करत आहेत हे बघून तो खरच खूप भारावला..

आम्हा सगळ्यांना काहीही झालेलं नाहीये, मी बरा आहे असं सांगून सगळ्यांची समजूत घालून सगळ्यांना घरी पाठवलं...

 त्यानंतर केशव आणि स्मिता दोघेही रडायला लागले...

“आई बाबा.. तुम्ही का रडताय?..”
“ ह्या सर्वांचे प्रेम बघून आम्ही भारावून गेलोय,आम्हाला कळत नाहीये काय करावं,तुझी अशीच प्रगती होऊ दे..खुप खुप मोठा हो...”
असं म्हणत पुन्हा रडायला लागले..
“ आता तुम्ही काय करताय?.. मी तुम्हाला नाही समजवू शकत, त्या सगळ्यांना समजावता समजावता नाकी नऊ आले मला...”

“ नाही रे बाळा आम्ही रडत नाही आहोत, आम्ही खरंच भारावून गेलो होतो.. आज माझ्या मुलाकडे पैशाची श्रीमंती नसली तरी माणसांची श्रीमंती आहे याची प्रचीती झाली, आता खरंच आम्हाला खात्री पटली तुझ्या सोबत ही हजारो मुली आहेत. तुझी चिंता वाटत होती रे आम्ही गेल्यावर तुझं काय होईल पण आता ही चिंता नाही.. आम्ही गेल्यावर तुझ्याकडे एवढी मोठी माणस आहेत की तुझ्या एका शब्दावर धावत येतील आता खरंच आम्हाला काळजी नाही आम्ही आता डोळे मिटायला मोकळे..”

“ आई-बाबा असं नाही बोलायचं, इतक्या लवकर डोळे मिटणार तुम्ही अजून तुम्हाला खूप काही बघायचं आहे, मला तुमच्यासाठी अजून खूप काही करायचे आहे..”

“ ते तू करशील बाळा...आम्हाला खात्री आहे..”

 तिघेही एकमेकांना बिलगले..

 दुसऱ्या दिवशी सकाळी घरी पोस्टमन येऊन गेला आणि त्यानी एक लेटर दिलं... त्या लेटर मध्ये एका अनाथ आश्रमाच्या उद्घाटनाला गुणवानला आमंत्रण देण्यात आलेलं होतं... ठरलेल्या दिवशी ठरलेल्या वेळी गुणवान तिथे गेला, गुणवानचा सत्कार झाला..त्याच्याबद्दल छान माहिती देण्यात गेली, त्याचं कौतुक झालं आणि त्यानंतर गुणवानला दोन शब्द बोलण्याची विनंती केली आणि स्वतः बद्दल, त्याच्या लहानपणी बद्दल थोडी माहिती दिली आणि मग सगळ्यांना सांगितलं की 

“जीवनात कधीही हरू नका कोणी तुम्हाला वाईट बोललं तुम्हाला जाणून बुजून त्रास दिला तरी त्या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत करत आपण आपल्या वाटचालीकडे सरळ चालायचं, ह्या सगळ्या गोष्टी कडे दुर्लक्ष करून समोर जायचं.. त्याच त्याच गोष्टी जर आपण घेऊन बसलो कुरवाळत बसलो तर आपल्याला आयुष्य जगता येणार नाही, गोष्टी सोडून द्यायचा आणि समोर चालायचं हेच ध्येय समोर ठेवून आज मी इथपर्यंत आलोय आणि समोरही माझं हेच ध्येय असेल..कोणी काहीही बोललं, काहीही केलं माझा ध्येय समोर आहे मी त्या ध्येयाने समोर जाईल...


 आजच्या नवीन पिढीसाठी मी एवढेच सांगेल की निगेटिव्ह गोष्टीकडे दुर्लक्ष करून पॉझिटिव्ह गोष्टी करा, चांगले विचार करा, चांगल्या गोष्टी करा, चांगल्या कृती करा, चांगल्या गोष्टींचे अनुकरण करा, कोणी काही बोलेल का? कोणी काही करेल का? समाज काय म्हणेल ? याचा विचार करू नका.. आपल्या मनाला काय पटतं, आपल्याला काय बरोबर वाटतं ते करा, ज्यातून आपल्याला आत्मिक समाधान मिळते त्याच गोष्टी करा, पैसा येतो आणि जातो... मनाची श्रीमंती आणि माणसांची श्रीमंती हीच माझ्यासाठी सगळ्यात मोठी श्रीमंती आहे.. शेवटी मी तुम्हाला चार ओळीची कविता सांगेल

अशी घ्यावी
उंच उंच भरारी...
प्रवाह थांबावा
अशी वेळ येऊ नये कधी...
बांधावी गाठ जिद्दीची
अण प्रयत्नांची
उजळून निघावी
कहाणी संघर्षाची....
हरू नको मिटू नको
लढ या जगाशी
उंच उंच आकाशी
घे भरारी..घे भरारी..


सगळीकडे टाळ्यांचा कडकडाट झाला कौतुकाचा वर्षाव झाला आणि कार्यक्रम संपल्यानंतर गुणवान त्याच्या घरी निघून गेला...

 आता गुणवानची लढाई हे गुणवानची नाही राहिली तर त्यानी त्याचे जीवन इतरांना समर्पित केलं....

 इतरांसाठी जगण्याच त्याचं ध्येय त्याला यशाच्या उंच शिखरावर पर्यंत नक्की नेईल आणि त्याचं कार्य सदैव कोणत्याही अडचणी न येता सुरू असेल हीच ईश्वरचरणी प्रार्थना..


समाप्त:


नमस्कार,
मी ऋतुजा वैरागडकर... “घे भरारी” या कथेमध्ये मी एक मतिमंद मुलगा आणि त्याची फॅमिली, त्यांच्या जीवनातला संघर्ष शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला... एका आईसाठी मतिमंद मुलाचं संगोपन करणं सोपं नसतं...तिचीही खुप शारीरिक आणि मानसिक ओढातान होते... घरच्यांची साथ जरी सोबत असली तरी समाज स्वस्थपणे जगू देत नाही... मग काही गोष्टी समाजाविरुद्ध कराव्या लागतात...स्मिता जर समाजाचा विचार करत राहिली असती तर आज गुणवान या उंचीवर नसता... समाजाचा विचार करावा पण स्वतःच्या सुखाला मुकू नये...


माझी कथामालिका तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा... तुमची प्रतिक्रिया मला लिहिण्यास प्रोत्साहन देतात.. 
धन्यवाद

🎭 Series Post

View all