#एक दुर्गा अशीही (घटस्थापना....!!!)

आपल्या लेकीला वाचविण्यासाठी आईने दुर्गेचे रूप धारण केले


घटस्थापना....!!!

" आई आज मला जरा वेळ होईल यायला घरी .काम वाढले आहे.आणि मिटींग पण आहे . उगीच मला फोन करत बसू नकोस" म्हणत रिया बाहेर पडली.

" अरे हिचे काय एवढे काम वाढले आहे काही एक समजत नाही मला.रोज रोज संध्याकाळी यायला वेळच होतो. काही विचारले तर एकदम अंगावर येते.तुला काय माहित तू घरातच असतेस बाहेर ट्राॅफिक किती असते त्यात कामाचा व्याप वाढला आहे.एवढे बोलले कि झाले.मी घरात असले म्हणून काय बाहेर काय आणि कसे चालते याची थोडी फार कल्पना आहेच न मला" आई स्वता:शीच पुटपुटत दार लावून आत गेली.

रिया ही एका प्रायव्हेट कंपनीत नोकरीला होती.वडिलांच्या अचानक झालेल्या मृत्यूने घरची जवाबदारी रियाने स्वत:वर घेतली होती.तिला एक लहान भाऊ होता.तो ,आई आणि रिया हे तीन जणांचे कुटुंब.

आई ...!!!
वडिलांच्या जाण्याने आई जरा शांत शांत रहायची कोठे जाणे नाही.कोणाशी जास्त बोलणे नाही.आपले घर बरे कि आपण असेच.

" अरे बापरे अजून ही आली नाही.पाऊस पण सुरू झाला आहे.अंधार पडला आहे.इतका वेळ.अशी कशी मिटींग? " आई काळजीच्या स्वरात म्हणाली.

" फोन करून बघं आई" छोट्याने म्हटले.

" हो..हो..!!"
आईने फोन केला. रियाचा फोन स्वीच आॅफ...!!!

आता तर आईचे काळजीचे स्वरूप भीती मध्ये झाले.

गडबडीने आईने टेबलावर ठेवलेली डायरी घेऊन त्यामधील रियाच्या आॅफिसचा फोन नंबर घेऊन फोन केला. फोन खुप वेळ वाजत राहीला पण कोणीही उचलला नाही.इतक्यात रियाच्या आॅफिसमध्ये तिच्या बरोबर काम करणारी तिची मैत्रीणीचा फोन नंबर आहे आपल्या जवळ हे आठवले तसेच तिने तिला फोन केला.

" हा बोला आंटी.कशा आहात."

" मी...!!मी बरी आहे गं.
पण...!!!रिया अजून आली नाही घरी.तिचा फोन ही बंद येत आहे.तु तिला जरा देशील फोन.मी बोलते तिच्या बरोबर"

" अरे आंटी मी आज सुट्टी घेतली होती.आज घटस्थापना न मग मी नाही गेले .आणि हो ही अजून काय करते तिथे.आधीच तिच्या विरोधात पाॅलिटिक्स सुरू आहे.काही लाचखोर तिच्या विरोधात कट कारस्थान करत आहेत.आणि ही इमानदारीने काम करते तर हिच्यावरच लाल शेरा लावण्याचा प्रयत्न करत आहेत.
मी हिला बजावले होते कि त्यांच्या मागे लागू नकोस ते लोक खुप वाईट आहेत.तुझे करीयर खराब करतील.पण ही काकांवर गेलीय न.खोटं पटवून घेणं शक्य नाही हिला"

आता तर आईच्या काळजाचा ठोकाच चुकला.आईने फोन ठेवला तशीच ती घराबाहेर पडली.पावसात रिक्षा काही केल्या मिळेना .धावत धावत कशी बशी एक रिक्षा मिळाली.

" लवकर लवकर पळवा दादा रिक्षा\"
गडबडीने आई आॅफिस मध्ये गेली पहाते तर आॅफिसचे दार बंद होते.आता ही कोठे गेली असेल आईला तर पावसामध्ये घाम सुटला.इतक्यात तिची नजर बाहेर रियाच्या गाडीवर गेली.
\"अरे हिची गाडी तर इथेच आहे.मग ही कोठे...???
रिया...!!!!
ये रिया...!!!
बेटा...!!!
‌रिया...!!!कोठे आहेस बाळा???\"

आई एकसारखे ओरडत होती.पावसाचा जोर वाढला होता.पावसाच्या आवाजात दुसरे काही ऐकू येत नव्हते.
इतक्यात ,"सोडा...!!!सोडा मला..!!!"असा आवाज ऐकू आला.
\"अरे रियाचा आवाज....!!!\"
आवाजाच्या दिशेने आई सुसाट धावत सुटली.आवाज रियाचा आॅफिस मधुन येत होता.दार तर बंद होते.आई वेड्या सारखी "रिया मी आलेय गं.!!!"म्हणत कोठे दुसरी कडे दुसरे दार आहे का शोधु लागली.तोच एक मोठी खिडकी उघडी असलेली दिसली.आई त्या खिडकीतून आत गेली.

"सोडा मला ....!!!
सोडा...!!!!
मी तुमचा पर्दा फाश करणार आहे.तुम्ही कामाच्या नावाखाली काय उपद्व्याप करतात हे जग जाहीर करणार आहे मी" रिया जोरजोरात ओरडत होती.
" तू....!!!
जग जाहीर करणार...!!!हा..!!!हा..!!!हा...!!!
जगा समोर तोंड दाखवण्याच्या लायक राहणार नाही तू.बघ तुझा व्हिडिओ कसा वायरल करतो ते."

रियाला टेबलावर झोपवले होते . तिच्या समोर एक तरुण हातामध्ये मोबाईल घेऊन तिचे शुटिंग घेण्यास उभा होता . तोच दुसरा एक तरुण तिचे कपडे काढून टाकण्याचा प्रयत्न करत होता.हे दृश्य आईने पाहीले . तिच्या अंगात जणुकाही आई दुर्गाच अवतरली.तिने तिच्या आजूबाजूला पाहिले तिथे तिला एक मोठा लोखंडी रॉड दिसला तो तिने उचलला, "रिया घाबरु नकोस मुली मी आलीये", असे म्हणत जोरात तो लोखंडी रॉड त्या तरुणाच्या डोक्यात घातला.तो तरुण अचानक झालेल्या हल्ल्यामुळे खाली पडला.रियाही टेबलावरून उठून दुसऱ्या तरुणाला धरुन मारु लागली.दोघीं मायलेकी आई जगदंबेचे रुप धारण केल्याप्रमाणे दोघांना एकत्र मारत मारत बाहेर आणले.

तोच इकडे तिच्या छोट्या भावाने पोलीसांना कळवले होते ते देखील आले.या सगळ्यात रियाचे कपडे फाटले होते.आईचे एकदम तिच्या कडे लक्ष गेले.आईने आपल्या अंगावरील लाल रंगाच्या साडीचे दोन तुकडे केले.एक आपल्या आणि दुसरा रियाच्या अंगावर टाकले.

पोलीसांनी त्या दोन्ही तरुणांना अटक केली. त्यांनी अगदीच कौतुकाने आईकडे पाहत,"आज खऱ्या अर्थाने घटस्थापना झाली.आजच्या लाल रंगाचा मान खऱ्या अर्थाने सार्थक झाला.वाईट गोष्टीचा नाश करणे.असले तरुण समाजात वाळवी लागल्या सारखीच.अशा लोकांना समाजात राहण्याचा अधिकार नाही" म्हणत टाळ्या वाजवून आईला मानाचा मुजरा करून पोलिस गेले.

©® परवीन कौसर...
बेंगलोर