घटस्फोटाच्या उंबरठ्यावर

तो आणि ती, आपल्या सगळ्यांमध्ये असतात. दुसऱ्याची चूक दाखवण्यापेक्षा आपली चूक ओळखून सुधारली तर न

घटस्फोटाच्या उंबरठ्यावर 

"घटस्फोट का हवा?" वकील. 

"छळ." ती.

"त्रास." तो.

"शारीरिक छळ? नवऱ्याने मारलंय?" वकील. 

"नाही." ती. 

"बायकोने मारलंय?" वकील. 

"नाही." तो.

"एक्स्ट्रा मॅरीटीअल अफेयर?" वकील. 

"नाही." ती.

"नाही." तो.

"फिजिकली अनफिट?"वकील.

"फिट आहे." ती. 

"फिट आहे." तो.

"मग घटस्फोट का हवा आहे?" वकील.

"मेंटल हऱ्यासमेंट." ती. 

"मेंटल अनबॅलन्स." तो. 

"मेंटल टॉर्चेर." ती.

"मानसिक त्रास."तो. 

"त्यामुळे तब्येत खराब होते, डिप्रेशन येते."ती. 

"मेंटल इलनेस." तो. 

"डॉक्टरकडे नाही दाखवले?" वकील.

"दाखवले." ती. 

"ट्रीटमेंट घेतली." तो.

"मग आराम नाही झाला?" वकील.

"नाही." ती.

"काय म्हणाले डॉक्टर?" वकील. 

"स्ट्रेस घेऊ नका, आराम करा."ती.

"डॉक्टरांनी सांगितलेले सगळं फॉलो केले, तरी काहीच फायदा नाही." तो.

"घरी हेल्थी वातावरण ठेवा म्हणाले डॉक्टर." ती. 

"हेल्थीच आहे." तो. 

"नाही." ती. 

"सगळ्यांच्या घरी असते, तसेच घरी असते." तो.

         फॅमिली कोर्टमध्ये त्या दोघांचे काउंसलिंग सेशन सुरू होते. गेल्या काही महिन्यांपासून त्या दोघांचे असेच वाद सुरू होते. वकिलाला एकाही प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळत नव्हते, पण दोघांचं अजिबात पटतांना दिसत नव्हते. त्यांना घटस्फोट का हवाय? याचे खास कारण मिळत नव्हते आणि त्या दोघांना प्रत्येकवेळी पुढली तारीख मिळत होती.  

           शेवटी तो दिवस आलाच, तिच्या आणि त्याच्या घटस्फोट केसची आज शेवटची हियरींग होती. आज एकदा पेपर साईन झाले की दोघंही लग्न या बंधनातून मुक्त होणार होते. दोघंही कोर्टाबाहेर उभे राहून त्यांच्या नावाचा पुकारा होईल याची वाट बघत होते, मात्र एकमेकांना खुन्नस देत बघत होते. लंच ब्रेकचा पुकारा झाला, तसे तो आणखी निवांत बसला. 

"काय साहेब, आज काही कशाची घाई नाही वाटतं? निवांत दिसत आहेत? नाही म्हणजे नेहमी थोडासाही वेळ पुढे सरकला की तुमची खूप कुरकुर सुरू होते." कोर्टातील नेहमीचा शिपाई म्हणाला. 

"शेवटचा दिवस आहे (आमच्या नात्याचा हळूच म्हणत), मग नंतर काय सगळं निवांतच आहे." तो म्हणाला. 

         ती थोडी दूर बेंचवर शांतपणे बसली होती. गेल्या दोन वर्षापासून घटस्फोटाची केस सुरू होती, त्यामुळे आता तिला सुद्धा एकटीने यायची सवय झाली होती. तिने तिच्या बॅग मधून पाण्याची बॉटल काढली आणि हळूहळू एक एक घोट पित शिपाई आणि त्याच्या मधील बोलणं ऐकत होती.

"साहेब, लंच ब्रेक झाला आहे, कोर्ट सुरू व्हायला आता वेळ आहे." शिपाई बोलून निघून गेला. 

          तसे त्याला आठवले की त्याने सकाळपासून काही खाल्ले नाहीये. त्याने बॅग मधून टिफीन बॉक्स काढला. डब्बा उघडणार तेवढयात त्याला बाजूला बसलेली तिची आठवण झाली. तो तिच्याकडे बघत डब्बा घेऊन उठणार, तेवढयात त्याच्या लक्षात आले की ती नेहमीच वेळेवर खात असते. आणि कुठल्या हक्काने तिला जेवायला विचारू असेही त्याचा मनात एक येऊन गेले. तो परत आपल्या जागी बसला. त्याची सुरू असलेली चुळबुळ डोळ्यांच्या कोनातून ती टिपत होती.  

"अरे यार, पत्ताकोबीची भाजी?" चेहऱ्यावर डब्बा बघून त्याचा चेहऱ्यावर आंबट झाल्यासारखे भाव उमटले. ते बघून तिला हसू आले. 

"अजूनही हा कोबीची भाजी बघितली की तसाच करतो, आईचं लाडावलेलं कोकरू!" ती पलीकडे आपला चेहरा वळवत हसत होती. 

         तो इकडे तिकडे बघत भाजी पोळीचा एक एक घास तोंडात टाकत होता. जवळच कॅन्टीन होते, पण त्याला तिथे जायला सुद्धा जीवावर आले होते, तो तिथेच बसून खात होता. तेवढयात त्याचा फोन वाजला, त्याने फोन सुरू केला. फोनला नीट रेंज येईना म्हणून त्याने पटकन पोळीवर भाजी पसरवली आणि त्या पोळीचा रोल करत एका हातात फोन एका हातात पोळीचा रोल पकडत थोडा पुढे जात पोळीचा एक एक घास खात फोनवर बोलत होता. 

"अजूनही याची ही वाईट सवय गेलीच नाही? कितीदा तरी बोलून, ओरडून झालं होतं की जेवण तरी नीट आरामात करत जा म्हणून. पण नाही, सतत याला कशाची ना कशाची घाई लागलेली असते." त्याला बघत ती स्वतःसोबत बोलत होती.  

          खाता खाता त्याला एकदम जोऱ्याचा ठसका लागला आणि त्याचा डोळ्यात पाणी तरळले. 

"हळू!" म्हणत ती पाण्याची बाटली त्याच्या पुढ्यात पकडत, दुसऱ्या हाताने त्याचा पाठीवर हात फिरवू की नको या विचारात तिथे त्याच्या जवळ उभी होती. शेवटी हाताची मुठी करत तिने आपला हात मागे घेतला. त्याने एकदा तिच्याकडे बघितले आणि तिच्या हातातील पाण्याची बाटली घेत पाणी प्यायला लागला. तेवढयात तिथून एक मुलगी जात होती, तिचा त्याला धक्का लागला आणि त्याचा हातातील बाटली मधले पाणी त्याच्या चेहऱ्यावर चांगलेच उडाले. 

"अगं ए, डोळे काय घरी ठेऊन आलीस का? हँडसम मुलगा दिसला नाही की लगेच आली धक्का मारायला." ती रावडी आवाजात त्या मुलीवर ओरडली.  

"ओ मॅडम, चुकून धक्का लागला. इथे रस्त्यात उभे राहायचे आणि दोष आम्हाला द्यायचा, हा काय पार्क आहे काय? तिकडं जाऊन करा की आपलं गुलुगुलू." ती मुलगी म्हणाली आणि तिला एक खुन्नस लूक देत तिथून निघून गेली.

"हा? तिची एवढी हिम्मत?" तिचे नाक रागाने लाल झाले होते. 

      तिचे ते बोलणे ऐकून आणि तिचा तो रागाने लाल झालेला चेहरा बघून त्याला हसू आवरले नाही आणि तो खळखळून हसायला लागला. त्याला तसे बालिशपणे हसतांना बघून तिला सुद्धा आता हसू आले होते. ती पण त्याच्या समवेत हसायला लागली. 

"तेव्हा पण सेम असाच हसला होता."

"तू पण अशीच चिडली होती. सेम असच तुझं नाक रागाने लाल झाले होते." 

"हा मग, तेव्हा ती प्रिया तुला अशीच मुद्दाम धक्का देऊन गेली होती आणि असच सगळं पाणी तुझ्या चेहऱ्यावर, कपड्यांवर पडले होते." 

"तिचा चुकून धक्का लागला होता बहुतेक, पण तू तिच्यावर जाम चिडली होती. काय सॉलिड होती तू, तुझ्या त्या एका आवाजाने मी सुद्धा थोड्या वेळ घाबरलो होतो." 

"तू कॉलेजमध्ये तेव्हा नवीन होतास, त्यामुळे ती कशी होती ते तुला माहिती नव्हतं आणि त्यांचा ग्रुप ज्युनिअरला उगाच त्रास देत असायचा."

"हो, मी तुझा ज्युनिअर होतो, तू माझ्या एक वर्ष पुढे होती. पण तू खूप जबरदस्त होती. तुझा तो रुबाब बघून 'लव्ह एट फर्स्ट साईट' असेच झाले होते माझे तर. आता खूप बदलली गं, तेव्हाची तू आणि आताची तू, जमीन आसमानाचा फरक झाला." 

"हम्म, तेव्हा जे पटायचं नाही, जे आवडायचं नाही त्याचा विरोध करता येत होता, बोलता येत होतं, कोणी अडवणार नव्हतं. तू मात्र जसाच्या तसा आहे, अगदी कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून बिनधास्त. तुला कोण आजूबाजूला असते, आता पण लक्ष नसतं. नेहमीच स्वतःच्याच तालात असतो." ती हसत म्हणाली.

"हो, तुला चुकीचं झालेलं काही खपायचं नाही, कॉलेजमध्ये अगदी सिनियरला सुद्धा तू सोडायची नाहीस. माझं बदलायला तसे काही कारणच नव्हते, सगळं कसं मनासारखं होत होते." 

            लग्नाच्या दोन महिंन्यापासूनच तिच्यामध्ये बदल व्हायला लागले होते आणि त्याला लग्नानंतरचे एक एक क्षण आठवू लागले. घरात सगळ्यांशी जुळवून घेताना, मोठ्यांच म्हणणं राखताना, मनाविरुद्ध असलेल्या गोष्टी करताना, चूक असलेल्या गोष्टींना चूक म्हणू शकत नसताना तिला किती त्रास व्हायचा आणि आपल्याजवळ काही सांगायची तर आपण सुद्धा तिला 'ऐकून घे' असेच म्हणत असायचो. त्याला हे सगळं आठवत होते आणि त्याच्या लक्षात आले की नेहमीची रुबाबदार ती हळू हळू शांत व्हायला लागली होती. लग्नानंतर मुलीला किती बदलावे लागते हे त्याच्या आता लक्षात येत होते. 

"हो, कॉलेजमध्ये तू किती माझ्या मागे लागलेला,बापरे! काय काय तुझ्या नौटंकी चालायच्या ना? कधी कधी राग यायचा तर कधी हसू." 

"तू आधीच सीनिअर, त्यात मी तुझ्यासाठी पागल झालो होतो. तुला पटवायला माझे मित्र काय काय बकवास आयडिया द्यायचे माहिती? आता आठवले की हसू येतं." तो थोडासा लाजत म्हणाला.  

"हो काय काय धिंगाणे घालायचा तू? माझं तुझ्याकडे सगळं लक्ष असायचं. कॉलेजच्या पहिल्या दिवसाला बघितलेला तो लाजरा मुलगा नंतर चांगलाच मस्तीखोर झाला होता." ती हसत म्हणाली. 

"पण तू माझ्यावर कधी चिडायची नाही. मी बघितले होते, तुझे ते माझ्याकडे बघून गालात हसणे. एकदा तू माझ्याकडे बघून हसली होती, किती गोड होतं ते हास्य म्हणून सांगू, तेव्हा तर मग मित्रांना सांगितलेच हीच तुमची वहिनी." 

"हा हा हा! गोडच होता तू."

    

'आता पण मी त्याच्या चुका मागे का नाही घातल्या, जसे तेव्हा कॉलेजमध्ये असताना घातल्या होत्या? एकदा तसच हसून बघितले असते, तर याचा राग निवळला असता काय? मी जास्तीच ताणून धरलं काय?' तिच्या मनात एक विचार डोकावून गेला. 

"गोड? मला तुम्हा मुलींचं हेच गोड, क्यूट म्हटलेले आवडत नसायचे, मी तेवढयासाठी जिम जॉईन केली होती." 

"हो, थर्ड ईअरला होता, तेव्हा तू भारी हँडसम दिसायला लागला होता." 

" तू फायनल ईअरला होती तेव्हा मला किती टेन्शन आलेलं, वाटलं झालं आता पुढल्या वर्षी पासून तू दिसणार नाही. त्यात किती हिंमतीने तुला प्रपोज केले होते. तू उत्तर पण देत नव्हती. माझ्याकडे किती रागाने बघायची, किती जीव तुटायचा माझा." 

"माझ्या घरी किती कडक वातावरण होते, मला खूप भीती वाटायची."

"हो माहिती,अन् एकदा तर तुझ्या दादाने मला मारलं सुद्धा होते. तुझ्यापासून दूर राहायचं नाहीतर वाईट होईल, त्याने अशी धमकी पण दिली होती." 

"हे तर तू कधी सांगितलेच नाही?" 

"भाऊ होता गं तो, आपल्या बहिणीसाठी एका भावाची काळजी होती गं त्यात." 

             बोलता बोलता त्याच्या लक्षात आले, की आता जेव्हा तिच्या भावाने तिला पोस्ट ग्रॅज्युएशन करायला पैसे दिले होते, तर आपण किती गोंधळ घातला होता. बहिणीच्या भविष्याची त्याला काळजी होती, म्हणूनच तर तो तसा वागला होता. आता का आपण तिच्या भावाला समजून घेऊ शकलो नाही,जसे तेव्हा समजून घेतले होते, जेव्हा त्याने मला मारले होते. का आपण पुढल्या शिक्षणासारख्या एका चांगल्या गोष्टीचा विरोध करत, तिच्यासोबत इतका वाद घातला होता? त्याच्या डोक्यात विचार येऊन गेला.  

"हो रे, दादाचा माझ्यावर नेहमीच खूप जीव होता. मला थोडासाही त्रास झालेला त्याला आवडत नसे. जे हवे ते नेहमीच मिळायचे." 

"हो, त्याने मला जो मार दिला होता, त्यातूनच मला कळले होते त्याचा तुझ्यावर किती जीव होता ते. पण माझं पण तुझ्यावर काय कमी प्रेम नव्हतं." 

"हो माहिती तुझं प्रेम, मी नकार दिला होता, त्या वर्षी तू परीक्षेत नापास झाला होता. तू एवढं मनाला लावून घेतले होते की ड्रिंक करायला लागला होता. तुझी किती वाईट हालत झाली होती, तू किती डिस्टर्ब झाला होता." 

"प्रेमाच्या नादात दोन वर्ष तुझ्या मागे नापास झालो." 

ती हसायला लागली. 

"हसतेस काय? तू होकार तर दिला, पण नंतर हे सगळं भरून काढायला मला किती भारी गेले होते? त्यात तू एवढी हुशार, तुझं कॅम्पस सिलेक्शन झालं, अन् मी ढप्पू. तुझ्या बाबांनी सांगितले मुलीचा हात हवा असेल तर तुझ्यापेक्षा मोठ्या पदावर जाऊन दाखव, हिटलर कुठले!" 

       ते ऐकून तिला अजून जोरजोराने हसू येत होते.  

"मीच तर घेतला होता तुझा अभ्यास, किती नोट्स गोळा केले होते मी, बापरे! एवढे तर मी स्वत:साठी पण गोळा नव्हते केले." 

"ॲक्चुअली तू होतीच हुशार, तुला इतर नोट्सची गरजच नव्हती. कामाच्या निमित्ताने चार पाच देशात पण फिरून आलीस, तरी घरच्यांना वाटत होते तुला काहीच येत नाही." तो हसला. 

"हा हा हा, तुला पण तर असेच वाटायचं रे. कधी जर मी तुला इंवेस्टमेंटबद्दल, प्रॉपर्टीबद्दल काही सुचवले तर तू तरी कुठे ऐकायचा?"

"त्यात तू ढ च होती. तुला प्रॅक्टिकल विचार कधी करता येतच नव्हतं. तू सगळ्यात खूप भावनिकरित्या गुंतायची." 

"हम्म! तू माझ्या बाबांना हिटलर म्हणायचा?"

"हो गं, पण ते फक्त माझ्यासाठी. लेक आपल्या बाबाची जीव की प्राण असते गं. प्रत्येक बाबा आपल्या लेकीसाठी प्रोटेक्टिव असतो. त्यांनी तुझं चांगलं भविष्यच चिंतले होते."

    हे बोलता बोलता अचानक त्याला त्याचा बहिणीच्या लग्नाच्या वेळी त्याचा वडिलांची सुरू असलेली घालमेल आठवत होती. तिला सुद्धा बहिणीच्या लग्नात जड झालेले त्याचं मन आता कळत होते.

        

       

"हो, आईचं पण सतत सुरू असायचं, असं करू नकोस, तसं करू नकोस, सासरी जाणार आहेस तर हे यायला हवं, ते जमायला हवे. मी कितीदा तिला फोन करून इकडे मला त्रास होतो आहे वगैरे सांगायची, तर मलाच समजवायची, मोठ्यांचं ऐक, उलट उत्तरं द्यायची नाही. ती माझी कधीच बाजू घेत नव्हती. मी तर बरेचदा मग चिडून फोन ठेऊन द्यायची. नंतर करायची सुद्धा नाही. मग बाबाच आमच्यात मध्यस्थी करत आमची समजूत काढत असायचे." 

            ती बोलत होती तर त्याला आठवत होते की,' ती जर घरच्यांना थोडे सुद्धा उलट उत्तर द्यायची, तर घरात सगळे तिचे संस्कार काढायचे, तिच्या माहेरच्यांना लेकीच्या संसारात नाक खुपसतात म्हणत असायचे. आपल्या आईवडिलांना कोणी काही बोललं तर आपण किती चिडतो, रागावतो. मग तिच्या आईवडिलांना कोणी काही म्हणाले तर तिचं चिडणं साहजिकच नव्हतं का? घरात जेव्हा हे वाद होत होते, तेव्हा का आपण ते सिरीयसली घेतले नाही आणि मध्यस्थी केली नाही? घरात अशा गोष्टी होतातच म्हणून का दुर्लक्ष केले? संसार, घर माझं होतं, तर मला बोलायला हवे होते.' तो तिच्याकडे बघत विचार करत होता. 

"ती आई असते, तिला आपल्या मुलांना झालेला त्रास बघवत नाही. कधी कधी तर त्या ओव्हर प्रोटेक्टीव, ओव्हर पझेसिव्ह होतात. माझी आई नाही तुला, माझ्या मुलाला कामं सांगू नको म्हणून रागवायची. कधी कधी तर उगाच तिला वाटायचं की मी तुझंच ऐकतो, तुझ्याच मुठीत गेलो, ताटा खालचं मांजर झालो, वगैरे वगैरे. त्यावरूनच आई तुझ्यावर किती चिडत असायची." 

"तू तर कोणाच्या बापाचं कधी ऐकले नव्हतं, मुठीत तर कधीच आला नाही. कधी काही सांगायला गेले की तुझा आपला तिसराच पंथ असायचा." 

"तू मावशी आजीचे ऐकलं होतं ना."

"हो मग काय करणार आणि ती तुझीच आजी होती ना? आपल्यात किती वाद व्हायला लागले होते, आजी म्हणाली होती एक बाळ येऊ द्या, सगळं छान सुरळीत होईल." 

"जुने लोकं, त्यांना तसेच वाटते, ते आपल्या काही अनुभवातून बोलत असतात. आपलं सगळं चांगलं व्हावं, हाच तिचा उद्देश होता." 

"हो रे, म्हणून तर नाही का, मग आपण बाळ होण्याचा निर्णय घेतला होता." 

"हो आणि जेव्हा नर्सने आपली मुलगी माझ्या हातात दिली होती, तिला बघून खूप त्रास झाला होता गं!" त्याचे डोळे पाणावले होते.

          त्याला आठवले की घरामध्ये आणि परिणामी त्यांच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टीच मोठे रूप धारण करत होते आणि वाद विवाद खूप वाढले होते. त्यात ती गरोदर होती. आधीच घर ऑफिस सांभाळणे, तिची अशी तारेवरची कसरत सुरू होती. तिच्या गरोदरपणात तिच्या डोक्यावर मायेचा हात हवा होता तर, तिच्याकडूनच सगळ्या अपेक्षा केल्या जात होत्या. आई, जुनी लोकं तिलाच सतत उपदेश देत होती. थकली असली तरी तिला आराम नव्हते करू देत आणि या सगळ्याचाच परिणाम असा झाला की गरोदरपणाच्या आठव्या महिन्यातच त्यांचे बाळ दगावले होते. आईबाबा बनण्याचे त्यांनी किती सुंदर स्वप्न रंगवले होते, पण त्याचा अंत असा झाला होता.  

' तेव्हा याची तरी काय चूक होती, त्याने पण तर आपलं बाळ गमावले होते. तो पण तर होणारा बापच होता आणि पोर गमवण्याचं आईसारखं दुःख बापाला पण तर होतच असते. तो रडतांना दिसला नाही म्हणून आपण कसे काय गृहीत धरले त्याला काहीच दुःख झालेले नाही." त्याच्या पाणावल्या डोळ्यांकडे बघत तिला त्याच्यातील बापाच्या भावना कळत होत्या. 

               

'स्वतःच्या तब्येतीची काळजी नीट घेता येत नाही का, असे बोलून आपण पण तर तिलाच दोष देऊन मोकळे झालो होतो.' तिच्या डोळ्यातील अश्रू बघून तिला पण तेव्हा किती वेदना झाल्या होत्या, हे त्याला आता कळत होते.   

"सॉरी!" दोघंही एकत्रच म्हणाले. 

दोघंही पाणावलेल्या नजरेने एकमेकांना बघत होते. 

"एवढं सगळं कळत आहे, तुम्हाला तुमच्या चुका समजत आहे, तुमचं एकमेकांवर प्रेम पण दिसत आहे, तर का इथे घटस्फोट घेण्यासाठी आलात?" एक बाई यांचं बोलणं ऐकत होती, ती थोडी कुत्सितपणे हसत म्हणाली. 

"हा आमचा पर्सनल इश्यू आहे. आमचं आम्ही बघून घेऊ, तिसऱ्या व्यक्तीला मधात बोलायची गरज नाही." तो थोडा चिडत रागातच म्हणाला. 

"हे कळलं असतं, तर आज इथे पोहचले नसते? नात्यांचा, नात्यांमधील मानसन्मान काय असतो माहिती काय? त्याचीच तुमच्या नात्यात कमतरता होती."ती बाई परत म्हणाली.  

"ओ मॅडम, तुम्ही आता जास्त बोलत आहात."

"मॅडम सॉरी!" ती म्हणाली, तशी ती बाई निघून गेली. 

"त्या खरंच तर बोलत होत्या. आपल्या नात्यात सन्मानच तर नव्हता?" ती म्हणाली. 

"होता." 

"खरंच? सन्मान असता तर घरात एवढया पंचायती नसत्या बसल्या? सर्वांसमोर माझ्या अब्रूची चिंध्या नसत्या झाल्या? सगळ्यांसमोर माझा अपमान नसता झाला? तुझ्या बायकोचा अपमान होत होता आणि तू ते सगळं चुपचाप ऐकत उभा नसता?" तिच्या डोळ्यात पाणी होते. 

"तू चुपचाप ऐकत उभा नसता." हे वाक्य ऐकले आणि आता त्याला त्याची चूक डोळ्यांपुढे स्पष्ट दिसत होती. 

       त्याने आणि तिने आपले बाळ गमावले होते. आधीच घरातील या कुरबुरी, त्यात घरात सगळ्यांनीच बाळ गमावण्याचा दोष तिलाच दिला होता. उठताबसता तिला सगळी बोलणी ऐकावी लागत होती. यामुळे तिचं आता घरात, कशातच मन लागत नव्हते. ती वेंधळेपणाने वागत होती. कामात खूप चुका होत होत्या, मोठ्यांना उत्तरं द्यायला लागली होती. त्याला सतत तू मध्ये बोल म्हणून सांगत होती, पण तो आईवडिल, मोठ्यांपुढे बोलत नव्हता. त्यात ती कुठल्यातरी पुरूषासोबत बाहेर हॉटेलमध्ये दिसली असे कोणी नातेवाईकाने येऊन त्याच्या घरी सांगितले होते. त्याने तिचं असं काही नाही आहे, असे सांगितले होते, तरी सुद्धा तुला काही समजत, आंधळा आहेस तू, असे म्हणत त्याला चूप केले होते आणि तो सुद्धा घरच्यांच्या ऐकलेल्या गोष्टीचा बळी पडला होता.

      संसार विस्कळीत होतो आहे बघून मोठ्यांनी बैठक घेऊन समजवण्याचा प्रयत्न करू, असा विचार केला. आणि एकदा तिच्या आईवडील आणि लग्न बैठकीच्या वेळी असणारी सगळी मंडळी बोलावण्यात आली. त्याच्या घरच्यांनी सगळ्यांसमोर तिचे दोष, चुका सांगायला सुरुवात केली. तिच्या चारित्र्यावर पण चिखलफेक करण्यात आली. तिचे आईवडील ते दोष खोडून काढण्याचा प्रयत्न करत होते. यातच दोन्ही परिवारात थोडा वाद वाढला होता. ती काहीच बोलत नव्हती, फक्त त्याच्याकडे बघत उभी होती आणि तो पण चुपचाप मोठ्या लोकांचे बोलणे ऐकत उभा होता. आईवडिलांच्या विरोधात बोलून सगळ्यांसमोर आईवडिलांचा अपमान होऊ नये, हाच त्याचा हेतू होता. त्याच्या डोळ्यांदेखत तिचा अपमान सुरू होता, अन् तो चुपचाप उभा होता. 

     त्यानंतर तिने घटस्फोटसाठी अर्ज केला होता. 

                

"लंच ब्रेक संपला. थोड्या वेळातच तुम्हाला आतमध्ये बोलावू, तुम्ही तयार रहा." नेहमीचा शिपाई त्यांच्या जवळ येत सांगून गेला. 

        

"तुझा फोन देशील? प्लीज?" त्याने हात पुढे केला. तिला काही कळले नाही, पण तरीही तिने त्याला आपला फोन दिला. 

           त्याने लगेच आपला फोन घेतला, तिच्या आणि आपल्या फोनमध्ये काहीतरी केले आणि काही क्षणात दोघांचेही परिवार व्हिडिओ कॉलमध्ये आले होते. 

"आय एम सॉरी! मला माफ करशील? माझी बायको मला एकदाच माफ करेल काय? मला फक्त आणि फक्त एक संधी देईल काय? मी सगळ्यांसमोर प्रॉमिस करतो की मी तुझा आत्मसन्मान नेहमी जपेल. आय लव यू! माझी होशील काय? प्लीज!" तो अगदी तिथे सगळ्यांसमोर तिच्या पुढ्यात आपल्या एका गुडघ्यावर बसून तिची माफी मागत होता. 

"से येस, से येस!"

"त्याचं तुझ्यावर खरंच प्रेम आहे." 

"सगळ्यांसमोर माफी मागायला खूप मोठं मन लागतं. बायको पुढे झुकायला वाघाचं काळीज लागतं. होकार दे त्याला, आपलं नातं असं संपवू नका." 

        ती उपदेश देणारी बाई, ती धक्का मारून गेलेली मुलगी, दोन वर्षात त्यांचा आगाऊपणा झेलणारा तो वकील, फॅमिली कोर्टची ती काउंसलर ते सगळे पुढे येत त्याला होकार दे असे सांगत होते. 

   

      त्याला असे सगळ्यांसमोर माफी मागतांना बघून तिचा कंठ दाटून आला होता, डोळ्यातील अश्रू गालांवर ओघळू लागले. तिने त्याच्या नजरेत बघत होकारार्थी मान हलवली. त्याने लगेच उभे होत तिला आपल्या कुशीत घेतले. 

"सॉरी! प्रेम तर प्रेम असते ना, हा मानसन्मान मी आपल्या नात्यात येऊ द्यायला नको हवा होता." ती म्हणाली.  

       तिथे उपस्थित सगळे आनंदाने टाळ्या वाजवत होते. आज एक घर तुटण्यापासून वाचलं होतं. कारण त्यांनी तिथे कितीतरी लाखो घरं तुटताना, मोडतांना बघितली होती. तोडणं सोपी असते, पण जोडणं किती कठीण असतं, त्यांना चांगलंच ठाऊक होते. 

        तिला दुसरे काय म्हणत आहेत, कोण तिच्या चारित्र्याचा दर्जा ठरवत आहे, याने तिळमात्र फरक पडला नव्हता, तिला फक्त तिचा पती काय विचार करतोय याने फरक पडत होता. तिला तिचा पती फक्त तिच्या सोबत उभा हवा होता. 

     

             तो शिपाई बोलून गेला तेव्हा तिच्या डोळ्यातील पाणी त्याला दिसले होते. ती अजूनही त्याचावर प्रेम करते, हे तर अजूनही त्याला तिच्या कृतीतून दिसत होते, तिला फक्त तिचा सन्मान हवा होता. प्रेम चार भिंती आड असेल, पण सन्मान हा सगळ्या समोर करायला हवा, हे त्याला आता कळले होते.

 ___________

©️ मेघा अमोल