घटस्फोट: एक आगळीवेगळी कथा

क्षुल्लक कारणावरून झालेला वाद कारण ठरेल का घटस्फोट घेण्याचे?

राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा 

कथेचे शीर्षक - घटस्फोट: एक आगळीवेगळी कथा 

कथेचा विषय - ..आणि ती हसली 

_________________________________________ 


" मला घटस्फोट हवा! " तो म्हणाला. 


" आता गं बया? का? अचानक काय झालं? " तिने गोंधळून विचारले. 


" काय झालं म्हणजे? हे बघ आज परत केस आहे भाजीत... शी... रोजचंच झालंय हे! त्यामुळे इच्छाच मेली आहे माझी जेवायची.. " तो तावातावात बोलला. 


" अय्या खरंच! " ती मात्र उत्साहाने म्हणाली. 


" हो ना डुचके... " तो कुत्सितपणे म्हणाला. 


" मग भारीच आहे की! " तिचा आनंद काही केल्या गगनात मावत नव्हता. 


" यात भारी असं काय आहे बरं? " तो चिडून म्हणाला. 


" अरे यात सगळं भारीच तर आहे. म्हणजे बघ ना, आता तू जेवत नाहीये म्हटल्यावर तेवढंच जेवण उरणार. म्हणजे मला जेवढी भूक असेल तेवढे थोडेफार मी आता खाऊन घेईल पण बाकी उर्वरित राहिलेलं जेवण परत रात्री हेच गरम करून जेवता येईल ना! थोडक्यात, अन्नाचाही अपव्यय होणार नाही आणि मला रात्री स्वयंपाक देखील करावा लागणार नाही. तेवढीच माझी मेहनत वाचणार ना! वाह! आनंदीआनंद गडे! " ती उत्साहात म्हणाली तर दुसरीकडे तिचे उत्तर ऐकून त्याने मात्र डोक्यावर हात मारून घेतला. 


" हे भगवंता, याच्याबद्दल रोज असंच घडू दे आणि माझी मेहनत वाचू दे! " तिने हात जोडले. 


" अगं ए वेडे! माझी माफी मागायचं सोडून हे काय बरळतेय? " तो रागावून बोलला. 


" माफी आणि तुझी? का म्हणून मागावी मी माफी? " ती निरंकुशपणे तिच्या केसांशी खेळत बोलली. 


" हं! काही लोकं अशी असतात जणू निर्लज्जम सदासुखी! " तो म्हणाला. 


" ते तर आहेच मी! आता नवीन काही असेल तर बोल नाहीतर उगाच माझा वेळ वाया घालवू नको. माझी किटी पार्टीची अपॉइंटमेंट आहे म्हणून तुझ्याशी बिन बुडाच्या गोष्टीवर गप्पा करण्याची वा वाद घालण्याची माझी मुळीच इच्छा नाहीये. मी खूप बिझी पर्सन आहे माहीती आहे ना! म्हणून रिकामटेकड्या व्यक्तीशी चर्चा करण्यात मला कोणताच रस नाहीये! " ती बेफिकीर होऊन म्हणाली. 


" नवीन काहीतरी ऐकायचंय ना तुला, तर ऐक! मला घटस्फोट हवा म्हणजे हवा! " तो म्हणाला. 


" काय? खरंच? म्हणजे? तू आता या उतारवयात मला सोडणार? एवढी वर्षे संसार केला तो काय याच दिवसासाठी? असा कसा तू वागू शकतोस? मला खरंच ही अपेक्षा नव्हती तुझ्याकडून... " असं म्हणता म्हणता अचानक ती सोफ्यावर पटकन एकाएकी बसली आणि चेहऱ्यावर हात ठेवून मुसमुस करत रडू लागली. 


" अगं ए खरंच रडतेस की काय? पण ही महामाया रडेल असं वाटत नाही. " तो हळूच पुटपुटला. 


" मी महामाया काय? देवा परमेश्वरा पाहतोय ना? तुझी उपमा ज्या माणसाला दिली तोच आज कसा छळ करतोय माझा? " ती हुंदका आवरत बोलली. 


" अगं ए, गिरणीच्या भोंग्यासारखी का घसा फाडून कोकलतेय? डोकं दुखायला लागलं तुझ्यामुळे, हं! " त्याने परत तिला टोमणा मारला. 


" वाह! माझं रडणं म्हणजे याला गिरणीचा भोंगा वाटतोय! बहुआश्चर्य! हं! " ती परत मुसमुसू लागली. आता मात्र तो जरा घाबरला कारण ती हुंदके देत रडत होती. 


" अगं ए, शांत हो ना! हे बघ मस्करी करत होतो मी. वाटल्यास नको देऊ घटस्फोट, जसं चालतंय तसं चालू दे! पण तू शांत हो आणि आधी रडणं थांबव बघू! " तो तिची समजूत घालत होता. 


तेवढ्यात त्यांच्या खोलीत एक पंचविशीतील तरुणी आली आणि म्हणाली, " आजी, काय झालं? तुम्ही का रडत आहात? ठीक आहात ना? आजोबा, आजी का रडत आहे? " 


" अगं तनु, आम्ही सहज बोलत होतो. " तो नजर चोरून म्हणाला. 


" आजोबा, सहज बोलत असताना आजी का म्हणून रडणार? आता मला खरं काय ते सांगा. कळलं? " ती तरुणी हाताची घडी घालून तिथेच उभी राहिली. 


" ते मला आज सुद्धा भाजीत केस दिसला आणि त्यावरून मी तिला बोललो की, मला घटस्फोट हवा! पण मी फक्त मस्करी केलेली. मला नव्हते माहिती की, ही खरंच रडायला लागेल म्हणून... " तो उदास होऊन म्हणाला. 


" आजोबा, काय ओ तुम्ही? माहिती आहे ना आजी हळवी आहे. " ती तरुणी अर्थात तनु म्हणाली. 


" ह्म्म! सॉरी! " तो म्हणाला. 


" मला कशाला सॉरी म्हणत आहात? ज्या व्यक्तीचं मन दुखावलंत त्याच व्यक्तीला तुम्ही सॉरी म्हणा. " तनु म्हणाली. 


तनुच्या बोलण्याचा अर्थ लगेच ओळखून तो अर्थात आजोबा लगेच त्यांच्या बायकोजवळ सोफ्यावर बसले आणि म्हणाले, " अगं किशोरी, ऐक ना! मी मस्करी करत होतो गं! मला तुझं मन दुखवायचं नव्हतं. हे बघ कान पकडून सॉरी म्हणतो पण आता तू रडू नकोस. " असे बोलून त्यांनी लगेच तिचा हात तिच्या डोळ्यांवरून काढला आणि तिचे अश्रू पुसण्यासाठी तिचा चेहरा ओंजळीत घेतला पण तेवढ्यात ती खळखळून हसायला लागली. 


तिचे असे खळखळून हसणे तनु आणि आजोबाला पेचात पाडून गेले. ते दोघेही एकमेकांना गोंधळून पाहत होते. तेवढ्यात तिने हसण्याला आवर घातला. नंतर खुनशी हसून त्याला म्हणाली, " हं! दि अभिषेक गायकवाड! तुला काय वाटलं, मी असं मुळमुळ रडून मला घटस्फोट देऊ नको अशी तुला विनवणी करणार? हं! गेला उडत... मला तर आनंदच आहे आणि मी तर प्रार्थना करते की, तुझा माझा घटस्फोट होऊ दे! म्हणजे मग मी नवीन जोडीदार शोधायला मोकळी! तशी पण मी तुझ्यापेक्षा तरुण आणि सुंदर आहे. माझ्या चाहत्यांची कमी नाही! हं! सांग कुठे आहेत डिव्होर्स पेपर्स लगेच घेते सही करून! " 


" बघितलंस? बघितलंस तनु? मी इथे हिची समजूत काढत होतो. मला वाटलं, मी हिचे मन दुखावले पण ही तर स्वतःच घटस्फोटासाठी उतावीळ आहे. हं! घटस्फोट हवा ना, सही करायची आहे ना हिला, थांब मी देतोच आता घटस्फोट! " तो तावातावाने म्हणाला. 


" हो तर द्या ना, मी कुठे घाबरते? मलाही पाहिजेच आहे घटस्फोट! " ती तोऱ्यात म्हणाली. 


" तनु..... "आजोबा रागाने ओरडले. 


" प्रवीण...... " आजीही ओरडली. 


आजीने हाक देताच एक तरूण ज्याचे नाव प्रवीण होते, तो त्यांच्या खोलीत आला आणि म्हणाला, " बोला, आज कशावरून भांडण झाले तुम्हा दोघांचे? " 


" ते मी सांगते नंतर पण आधी मला इथून बाहेर घेऊन चल! या माणसाचं हे तोंड सुद्धा मला आता पाहावेसे वाटत नाही. हं! " आजी म्हणाली. 


" बरं! " प्रवीण बोलला आणि आजीला घेऊन बाहेर गेला. 


" बघितलंस? तोंड पाहायचं नाही म्हणे... हं! हेच तोंड घेऊन गेलो होतो मी हिचा हात मागायला तेव्हा बरी भाळली होती क्षणार्धात आणि आता म्हणे, तोंड पाहायचं नाहीये. हं! समजते कोण स्वतःला? अप्सरा म्हणे, हं! चेटकीण आहे ती चेटकीण! सांग तिला... " आजोबा मुद्दाम आजीला ऐकू जावं म्हणून ओरडून बोलत होते. 


आजी आणि प्रवीण एका खोलीत आले. प्रवीण आजीला उद्देशून म्हणाला, " आजी, काय गरज आहे दररोज भांडण करायची? रोज कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडत करताना तुम्हा दोघानांही कोणता आसुरी आनंद आणि कोणतं समाधान मिळतं? आज ना मला जाणून घ्यायचेच आहे म्हणून तू सांग आजी, का तुम्ही असे भांडण करता? " 


" भांडण? वेड्या ह्याला भांडण म्हणतात का? " एवढे बोलून आजी हसायला लागली. 


" हे भांडण नव्हतं का? " प्रवीणने डोळे विस्फारून विचारले. 


" नाही! " आजी गालातल्या गालात हसून म्हणाली. 


" मग हा नेमका काय प्रकार आहे ते तरी सांगण्याचे कष्ट घेशील का? " प्रवीण म्हणाला. 


" प्रेम आहे हे! " आजी हसून म्हणाली. 


" वाह! आणि ह्या अशा प्रेमाची रोज बरसात का करता आपण? " प्रवीण म्हणाला. 


" तुझ्या आजोबांच्या आनंदासाठी! " आजी म्हणाली. 


" आजी, खरंच? अगं आजी, तू आजोबांना रोज असं छळतेस ते देखील फक्त त्यांच्या आनंदासाठी? यात काहीच तर्क लागत नाहीये बरं! यात कुठला आनंद दडला आहे, सांग मलाही जरा! " प्रवीण म्हणाला. 


" तर्क वगैरे माहिती नाही मला फक्त एवढंच सांगते की, हा सगळा खटाटोप तुझ्या आजोबांसाठीच करते मी! म्हणजे बघ, आम्हाला आमच्या मुलांनी या वृद्धाश्रमात आणून सोडले तेव्हापासून अभिषेकला म्हणजे तुझ्या आणि तनुच्या मानस आजोबाला अल्झायमर सारखा आजार जडला. आताशा त्याला आमची लेकरे होती, हे सुद्धा आठवत नाही. 


                त्याला वाटतं आम्ही निपुत्रिक आहोत आणि तरुण जोडपं आहोत म्हणून मग मीही त्याच्या या भ्रमाला जपत आहे. त्याला वाटतं की, आम्ही नवदाम्पत्य आहोत आणि तो या भासात रममाण आहे म्हणून मी त्याला वास्तवाचे भान करवून देत नाही. नवविवाहित असताना जसे आमच्यात क्षुल्लक कारणांनी खटके उडायचे अन् नंतर लगेच रुसवे दूर व्हायचे, अगदी तेच आयुष्य आम्ही परत जगतोय.


                कसं आहे, आमच्या लेकरांनी तर आम्हाला वाऱ्यावर सोडले. आता आम्ही दोघेच एकमेकांचे सोबती तर मग एकमेकांची मने आम्हाला स्वतःलाच जपायला हवी ना, म्हणून सगळा खटाटोप! " आजी एवढे बोलली आणि ती हसली. 


प्रवीणने लगेच आजीला मिठी मारली आणि म्हणाला, " आजी, ग्रेट यार! " 


" गप रे! काहीच ग्रेट वगैरे नाहीये यात.. चल आता जाऊ त्या म्हाताऱ्याकडे, त्याचा रुसवा घालवायला. " आजी म्हणाली अन् त्याला प्रवीणनेही दुजोरा दिला. 


                   नंतर ते दोघे आजोबा ज्या खोलीत होते, त्या खोलीबाहेर उभे असताना त्यांना आतून तनु आणि आजोबाचे काही शब्द ऐकू येत होते. आजीने इशारा करताच प्रवीणही बाहेरच थांबला मग ते दोघे आतल्या संवादाचा कानोसा घेऊ लागले. 


" आजोबा, का सारखं असं छळता आजीला? " तनु म्हणाली.


" वेडी आहेस तू! यात कसलं आलं छळणं? " आजोबा मंद हसून म्हणाले. 


" आजोबा... " तनुने सूर ताणला. 


" अगं ती वेडी किशोरी, तुझी आजी माझ्या अल्झायमरच्या आजारामुळे माझ्या भ्रमाला जपून ठेवते. मला कायम याच भासात ठेवते की, जणू आम्ही नवविवाहित जोडपं आहोत. तिला वाटतं, मला याची खबर नाही. 


                  खरंतर, या आजारामुळे मी कायम विसरून जातो आमच्या लेकरांबद्दल.. पण असेही नाही की, मी आमच्या लेकरांना वा त्यांनी दिलेल्या वागणुकीला विसरलोय. तसं नाहीच मुळी! आठवतं मला सगळंच फक्त जेव्हा केव्हाही आठवण येते तेव्हा मी मुद्दाम एखाद्या छोट्याशा कारणावरून किशोरीशी भांडण करतो वा तिच्यावर रुसून बसतो. मग आमच्या या रुसव्याफुगव्याच्या खेळात मला आमच्या लेकरांचा विसर पडतो अन् मग तिलाही आमच्या लेकरांची आठवण येणार नाही, याची दक्षता घेतो. " आजोबा म्हणाले. 


" काय आजोबा, खरंच? " तनुने विचारले. 


" ह्म्म! " आजोबांनी मंद हसून हुंकार भरला. 


" आजोबा, तुम्ही ना खरंच किती भारी आहात ओ! " तनु म्हणाली. 


" यात काहीच भारी नाहीये गं! तुझी वेडी आजी माझ्यासाठी जे करतेय ना त्याबदल्यात हे काहीच नाहीये. " आजोबा हसून म्हणाले. 


" आजोबा, यु बोथ आर सो स्वीट! " असे बोलून तनुने आजोबांना मिठी मारली. 


" ह्म्म, आता गप्प बसायचं! ती वेडी येतच असेल माझा रुसवा घालवायला! " आजोबा म्हणाले त्यावर तनु हसली. 


                   दुसरीकडे खोलीबाहेर उभे असलेल्या प्रवीण आणि आजीने आतला संवाद ऐकला. आजोबांचे बोलणे ऐकून प्रविण आजीकडे पाहून हसला. आजीनेही प्रविणकडे पाहिले, तिला परत एकदा आजोबांचे शब्द आठवले आणि ती हसली.


खोलीत येताच आजी म्हणाली,

" जगाचा कैवारी तो

त्यानेच ठेवली रिक्त झोळी माझी

जेव्हा जेव्हा मी केली हात जोडून प्रार्थना

तेव्हा तेव्हा त्याने दाखविली मज फक्त पाठ त्याची! 

असा कसा तो निष्ठूर झाला? 

जगाला न्याय्य वागणूक देताना

माझ्याशी मात्र तो

निव्वळ अन्याय करत राहिला... 

काय मागितले होते मी एवढे? 

फक्त एक जोडीदार राजहंसासारखा

त्यातही फक्त हाती निराशा आली, 

राजहंस नव्हे एका कावळ्याशी

या विधात्याने माझी रेशीमगाठ बांधली! "


" हं! राजहंस हवा होता म्हणे चेटकीणीला! हं! डुचकीची डुचकी कविता... " आजोबा उगाच रुसण्याचे ढोंग करत म्हणाले. 


" हं! " आजीने सुद्धा परत थोडे रुसण्याचे नाटक केले. 


" मीही केली होती फक्त एकच अपेक्षा

की, रोज प्रातःकाळी कोकीळेचा

सुमधूर स्वर ऐकावा... 

त्याच मधूर आवाजाच्या सानिध्यात

सायंकाळी दाटलेली आभा न्याहाळताना

चंद्राच्या सौंदर्याशी

जीवनसंगिनीच्या सौंदर्याशी तुलना करणार! 

पण खरंच, फुटकं माझं हे नशीब, 

म्हणून तर या प्रारब्धात 

हा कर्णकर्कश गिरणीचा भोंगा 

वा निव्वळ अप्सरेसम दिसणारी 

ही चेटकीणच बायको म्हणून मिळाली.. 

म्हणून मीही करतो निषेध देवा तुझा, 

अन् साधून अबोला करतो तुझ्याशी कट्टी!" आजोबा म्हणाले. 


" कावळ्याची काव काव करणारी कविता! हं! " आजीनेही टोमणा मारला. तर आजोबांनी डोळे बारीक केले. 


" आजी? आजोबा? काय हे? सोडा ना रुसवा... आता घ्या ना जे पदरात पडलंय त्यालाच गोड मानून! " तनु म्हणाली. 


" हं! " आजी आजोबांनी एकमेकांकडे पाहिले अन् परत पाठ फिरवून घेतली. 


" आजी आजोबा, खूप झाला आता रुसवा! आता घ्या पटकन मिठी मारा, सॉरी म्हणा आणि झाले गेले विसरून जा! " प्रवीण म्हणाला व त्याने दोघांनाही एकमेकांकडे वळवले. 


" ह्म्म! सॉरी! " आजी आजोबांनी मुद्दाम नाराजीचा सूर काढला पण नंतर दोघांनीही एकमेकांकडे पाहताच दोघेही अलगद हसले व एकमेकांच्या मिठीत शिरले. आजी - आजोबांनी मिठी मारताच तनु आणि प्रवीणनेही गालातल्या गालात हसून त्या दोघांना मिठी मारली. 


समाप्त. 

©®

सेजल पुंजे. 

०८/०८/२०२२.

टीम नागपूर.