Login

घारु अंतिम भाग -5

The Story About A Whispering Sound.
घारू.-5
अंतिम भाग.
@राधिका कुलकर्णी.


अब्दूलच्या वडिलांच्या सांगण्यानुसार राघवची आज्जी त्याची सख्खी आज्जी नव्हतीच. त्याच्या वडीलांची ती सावत्र आई होती. राघवच्या वडीलांची जन्मदात्री लहानपणीच वारली. मग राघवच्या आजोबांनी दुसरं लग्न केलं. ह्या आज्जीला स्वतःचं मूल झालं नाही पण तिने राघवच्या वडीलांना पोटच्या मुलागत सांभाळलं. पण जसजसे ते मोठे होत गेले त्यांना आपली आई ‘सावत्र’ आहे कळल्यावर त्यांनी आईशी तुटक वागणं सुरू केले. हळूहळू त्यांच्यातले अंतर वाढतच गेले.

अशातच आजोबा अचानक वारले आणि कायद्याने सगळ्या प्रॉपर्टीची मालकीण आज्जी झाली.

जसजसे आज्जीचे वय आणि हातपाय थकायला लागले, बाबूराव तिच्यावर प्रॉपर्टी आपल्या नावे करण्यासाठी जबरदस्ती करू लागले. आज्जीला माहीत होते की बाबुरावांना दारू,जुगाराचे व्यसन आहे. हाती थोडा पैसा आला की ते लगेच तो दारू/मटक्यात उडवीत. हे जाणूनच आज्जी प्रॉपर्टी त्यांच्या नावे करायला तयार नव्हती.

राघवने घरात जे भांडण झालेलं पाहीलं होतं तेही त्याच कारणामुळे..

शेवटी ती ऐकत नाही म्हणल्यावर त्यांनी तिला तळघराच्या खोलीत बंद करून टाकले. शेवटीशेवटी तिच्या शरीराचा नुसता सापळा होऊन ती मरणाची वाट पाहत दिवस कंठत होती. अखेरीस एक दिवस ती गेली. नंतर लक्षात आले की तिने प्रॉपर्टी खूप आधीच राघवच्या नावे करून त्याच्या आईवडिलांना तो सज्ञान होईपर्यंत त्याचे पालनकर्ते बनवले होते. त्या सगळ्यामुळे बाबूरावांचा नुसता तीळपापड झाला.

आज्जीच्या मृत्यू मागचे रहस्य कळले तर राघव कधीच आईवडिलांना माफ करणार नाही हे जाणून त्यांनी ती गोष्ट त्याच्यापासून लपवूनच ठेवली. प्रॉपर्टीची कागदपत्रेही आज्जीने कुठेतरी लपवून ठेवलेली खूप शोधाअंती त्यांना सापडली. गैरमार्गाने ती प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले पण त्यांचा अचानक मृत्यू ओढवला.
आता तो कसा झाला? हे मात्र एक गूढ बनुनच राहिले. पोलिसांनाही तपासात काहीच समजले नाही. गावात अशी वावडी उठली होती की म्हातारीच्या आत्म्यानेच त्यांचा जीव घेतला. खरं खोटं परमेश्वर जाणे!

राघवचं डोकं फुटायची पाळी आली होती हे ऐकून.
ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या असल्या तरीही आता आपल्याला होणारे भास काय सांगताहेत?
पीरबाबांनी सांगितले तसे आज्जीची इच्छा असेल का की आपण ह्या घरी रहावे?

विचार करता करता राघवला कधी झोप लागली कळलं नाही. बऱ्याच वेळाने पुन्हा कानात एक अस्फुट ध्वनी आला..

“घारूऽ, वाड्यावर येऽ!”

त्या आवाजाने दरदरून घाम फुटला राघवला. तो घामाने डबडबलेल्या अवस्थेत उठून बसला. बाजुच्याच बाजेवर झोपलेल्या अब्दूलला आवाजाने जाग आली.

“ए रघ्याऽ, क्या हुआ? इतना पसीना क्यू आया है तुझे? तबियत तो ठीक है ना?”

अब्दूलने घाबरून विचारले.

“यार, मै थक गया हुं। मुझे ये पैसा,प्रॉपर्टी कुछ नहीं चाहिए, बस सुकून चाहीए। वरना मै मर जाऊंगा ये सहते सहते।”

राघवच्या सहनशक्तीचा बांध आता तुटला होता. तो अब्दूलच्या खांद्यावर डोकं ठेवून फुटून फुटून रडत होता. थोड्यावेळ त्याला रडून मोकळं होऊ दिल्यावर अब्दूलने त्याला विचारले,

“हुवा क्या है मेरे भाई?”

“कुछ नहीं, फिरसे कान में वही आवाज गुंजी। ‘वाड्यावर ये.’
लेकीन मुझे अब बहोत डर लगने लगा है।”

“देख रघ्याऽ, डर मत, बात को समझ। तेरे दादी की आत्मा इस घर को सही हाथों मे देना चाहती है, तभी तो उसे सुकून मिलेगा।
क्या तु नही चाहता की उसको शांती मिले?
अगर हां, तो कल सुबह ही तू बाडे पे जा।
चल, अब सो जा। मै हू तेरे पास।”

अब्दूलने अगदी लहान मुलागत राघवला थोपटले. मानसिक तणावाने थकलेल्या राघवला लगेचच खूप गाढ झोप लागली.

सकाळी सगळ्यात आधी राघव तिथल्या गुरूजींशी आज्जीच्या उदक शांतीच्या विधीविषयी बोलून आला.
अब्दूलने गावातल्या काही लोकांना वाड्याच्या सफाई करता बोलावून घेतलं. आधी बाहेरचे तणं काढण्यापासून सुरुवात होत हळूहळू सगळा वाडा स्वच्छ होऊ लागला. आता फक्त ती खोली जिला भिंतीत गाडून टाकून वरून गिलावा केला गेला होता ती स्वच्छ करणे बाकी होते.
त्यासाठी आधी वरचा गिलावा आणि भिंत पाडायला गवंडी माणसं बोलवावी लागणार होती.

म्हणायचा अवकाश की लगेच अब्दूलने तासाभरात गवंडी बोलावले. गिलावा पाडून आता वरची भिंत पाडायला जसजशी सुरुवात झाली तसतसा राघवला तोच ध्वनी मंत्रांच्या आवर्तनासारखा कानी पडू लागला. आधी धिम्या स्वरातला आवाज जसजसे भिंतीचे पापुद्रे हटू लागले तसतसा अधिकच गडद होऊ लागला.

राघवने काम करणाऱ्या गडी माणसांकडे बघितले. ते त्यांच्या कामात व्यग्र दिसत होते. म्हणजेच तो आवाज फक्त राघवलाच ऐकू येत होता. हळूहळू सगळी भिंत पडली आणि आतला दरवाजा दृष्टीसमोर आला. राघव कडी उघडून घाईने पायऱ्या उतरत खाली गेला.

आश्चर्य म्हणजे खालच्या खोलीत एक मंद सुगंध दरवळत होता. वाड्यात जिथे सगळीकडे दुर्गंधी पसरली होती तिथे ह्या खोलीत इतका सुगंध कसा?
राघवला खुपच नवल वाटले ह्याचे.

जी खोली गेले कित्येक वर्षे जमिनीखाली गाडली गेलेली होती त्या खोलीत इतका सुगंध आणि प्रसन्नता हे कुठल्या चमत्कारापेक्षा कमी नव्हते. त्याने अब्दूललाही खाली बोलवून घेतले. दोघेही दिङमूढ झालेले.

ह्याचाच अर्थ कदाचित…!

पुढचा विचार तसाच मागे सोडून राघव खोलीचे बारकाईने निरीक्षण करू लागला आणि त्याचे लक्ष आज्जीच्या पलंगाकडे गेले.
आत्ताही एका कागदावर तिथे साखरफुटाण्याचा खाऊ ठेवलेला होता. ते बघून राघवला अश्रू अनावर झाले. त्याने झडप घालून त्यातले दोन तोंडात आणि दोन आपल्या खिशात टाकले. त्या खालील कागदावर एक नाव लिहीलेले होते. ‘दामोदर भहिरट.’
कोण ही व्यक्ती? त्याला उलगडा होत नव्हता.

अब्दूलने लगेच माहिती काढली. गावात ह्या नावाचे एक वकील होते जे आता गाव सोडून गेले होते. खटपट करून त्यांचा दुरध्वनी क्रमांक मिळवून राघवने त्यांना फोन लावला. ते काही तासांतच तिथे हजर झाले.
त्यांच्या हातात आज्जीचे मृत्यूपत्र होते. त्याचे वाचन फक्त नातवासमोरच व्हावे अशी तिची इच्छा होती म्हणून इतके वर्ष ते तसेच पडुन राहिले होते. अखेरीस आज तो मुहूर्त लागला होता..

अजूनही असे काहीतरी होते जे कदाचित अजून मिळायचे असावे म्हणून राघवच्या कानात घुमणारा तो आवाज थांबला नव्हता. तिथे एक रूंद देवडी होती. आज्जीचे वेणीफणी,आरसा इत्यादीचे सामान ती तिथे ठेवत असे.
त्याने देवडीच्या भिंतीला एक धक्का दिला आणि ती एखादी पोकळ भिंत वाजावी तशी डबडब वाजली.

जरा जोराचा धक्का दिला आणि काय आश्चर्य ती भिंत पडून तिथे अजून एक लहान खोली दिसत होती.
मातीविटा बाजूला करून त्या भगदाडातून राघव आत गेला आणि त्याच्या आश्चर्याला पारावरच उरला नाही. एक खजिनाच जणू उघडा झाला होता तिथे.

तिथे काही चांदीच्या मूर्ती, एक भगवद्गीता गुंडाळून ठेवलेली आणि एक पितळी डबा ज्यात काही जुन्या घडणावळीचे सोन्याचे दागिने दिसत होते. कदाचित आज्जीचेच असावेत.
हाच सगळा ऐवज राघवपर्यंत पोहोचावा म्हणून कदाचित आज्जी सतत त्याला आवाज देत होती.
राघवचे सर्व प्रश्न आज्जीने एका झटक्यात चुटकीसरशी सोडवून टाकले होते.
विशेष म्हणजे आता तो ध्वनी पण शांत झाला होता.

राघवने सरोजसोबत आज्जीच्या श्राद्धाचे सारे विधी यथासांग पार पाडले.

मिळालेल्या मालमत्तेचाच वापर करुन त्याने आज्जीच्या स्मृतीप्रित्यर्थ एक वृद्धाश्रम स्थापन करण्याचा निर्णय घेतला. भगवद्गीता मात्र स्वतःकडेच ठेवून घेतली आज्जीचा आशीर्वाद म्हणून.

हा निर्णय घेतल्याबरोबर आज्जी ‘घारूऽऽ, येते रे!’ असे म्हणत कायमची अनंतात विलीन झाली.

—------------------------------------------------------------
घारूऽ.-5
(अंतिम भाग)
समाप्त

कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा.
धन्यवाद
@राधिका कुलकर्णी.


🎭 Series Post

View all