Login

घारु-3

The Story About A Whispering Sound.
घारुऽ-3
@राधिका कुलकर्णी.

पहाटेच्या पहिल्या गाडीने राघव गावाकडे निघाला. सकाळचा गार वारा अंगाला शिरीशिरी उठवत होता. वातावरण अगदी छान ताजेतवाने होते. अंगाला लागणाऱ्या शीतल वाऱ्याने राघवचे डोळे जड झाले आणि बघता बघता त्याला गाढ झोप लागली. थोडा वेळ डुलकी लागली असेल नसेल तोच पुन्हा कानात तीच हाक ऐकू आली आणि तो झोपेतून जागा झाला. त्याला आता भीती वाटू लागली. एकदा दोनदा नाही वारंवार तीच गोष्ट घडतेय म्हणजे ह्यात काहीतरी तथ्य आहे. पण त्याच्या मुळाशी आपण पोहोचू शकत नाहीये.
हा नेमका काय प्रकार असेल?
राघव आता जरा थंड डोक्याने ह्या घटनेचा विचार करू लागला.
फार वर्षं गावाशी संपर्क तुटल्याने त्याला गावात त्यांचे कोण चिरपरिचित हे देखील माहित नव्हते. आईवडील ज्या अवस्थेत मृत पावले खरंतर तेही एक गूढच होते पण त्यावेळी त्याने जास्त खोलात जाऊन ना त्यावर विचार केला, ना त्याबाबत फारशी चौकशी केली. काही काळानंतर पोलीस तपासही थांबला आणि ती घटना फाईलमध्येच बंद होऊन पडली.
पण आता मात्र त्याला ह्या सगळ्याची सखोल चौकशी केली पाहिजे असे राहून राहून वाटू लागले. गावी गेल्यावर आधी अब्दुलला गाठायचे असे मनाशी पक्के करून त्याने अब्दूलला फोन लावला.
पलिकडून लगेच फोन उचलला गेला. ‘आपण येत आहोत आणि थोडा वेळ काढून ठेव. महत्वाचे बोलायचे आहे’ सांगून राघवने फोन ठेवला.

जे काही घडतेय त्याची सांगड कशी घालायची ह्याचाच तो विचार करत होता. विचारांच्या तंद्रीत कधी डोळा लागला त्याला कळलेच नाही. जाग आली तेव्हा तो त्यांच्या गावी पोहोचला होता. ह्यावेळी मात्र त्याला छान गाढ झोप लागली ज्यामुळे त्याला आता खूपच ताजेतवाने वाटत होते. गेल्या दोन रात्री त्याला त्या आवाजाने शांत झोप लागली नव्हती. ती झोप आत्ता त्याला मिळाली.
गावी उतरताच त्याने अब्दूलला फोन केला. दहा पंधरा मिनिटांतच अब्दूल आपल्या दूचाकीवर स्टँडवर पोहोचला. दोघेही आधी डायरेक्ट अब्दूलच्या घरी गेले. अब्दूलने त्याचे यथोचित आतिथ्य करत चहा पाणी नाष्टा उरकला आणि मग दोघेही राघवच्या वाड्याकडे निघाले. राघव मागच्या सीटवर बसल्या बसल्या हाच विचार करत होता की अब्दूलला घडणाऱ्या घटनेबद्दल सांगावे की नाही?
त्याचा विश्वास बसेल की तो हसण्यावारी नेत आपली टर उडवेल?
विचारांच्या आवर्तनातच दोघे त्यांच्या वाड्याशी जाऊन पोहोचले.
बरेच दिवस राघवची चक्कर न झाल्याने वाड्याची अवस्था खूपच वाईट झाली होती. वाड्याभोवती सगळीकडे काटेरी झुडपांचे रान माजलेले होते. जमिनीच्या फरशा पण उकललेल्या होत्या. त्या उकलेलेल्या फरशांच्या मधल्या फटींमधूनही गवत आणि रानटी झाडे वाढली होती. मुख्य दरवाजाला लावलेले कुलूप तर अक्षरशः गंज चढून लाल झालेले. घराच्या वरच्या सज्जाला ठिकठिकाणी मोठमोठ्या भेगा पडलेल्या होत्या. कालच्या पावसाने जवळचे मोठे वडाचे झाड पुर्णपणे ह्यांच्या घरावर झुकून कुठल्याही क्षणी आदळण्याच्या बेतात होते. नशीब अजून ते घरावर पुर्णतः उन्मळून पडले नव्हते नसता घराची भिंत कालच जमिनदोस्त झाली असती. त्याने पुढे होऊन त्या काटेरी तणांतून वाट काढत आधी दरवाजाचे कुलूप उघडायचा प्रयत्न केला पण खूप गंज पकडल्याने चावी लावूनही कुलूप हलता हलत नव्हते. शेवटी अब्दूलने आपल्या गाडीच्या टूल-कीटमधून एक लोखंडी पान्हा काढला आणि त्याचे दोन तीन वार करताच कुलूप तुटून खाली पडले.
कुलूप तोडल्यावरही दार आतल्या बाजूने ढकलले जात नव्हते. कदाचित आतल्या बाजूनेही झाडेझुडपे उगवून आतला रस्ता गच्च झाला असावा. अब्दूल आणि राघवने मिळून जरा जोर लावून दार लोटताच करऽऽकर्रऽऽ आवाज करत एकदाचे दार उघडले गेले.
दार उघडल्याबरोबर आतून एक उग्र दर्प आला. तुटलेल्या झुडूपांचा एक विशिष्ट गंध त्यात मिसळून खूपच कुबट दर्प नाकात शिरू लागला.
नाकावर रूमाल लावून दोघेही आत शिरले. आतील बाकी खोल्या विशेष फरक पडलेल्या नसल्यातरी खाली सगळीकडे धुळीचे साम्राज्य पसरले होते. काही ठिकाणी पावसाचे पाणी गळून त्याचे ओहोळ वाळल्याने त्याचे नागमोडी आकार जमिनीवर ठिकठिकाणी दिसत होते. घराची एकंदर अवस्था खूपच बकाल होती. हळूहळू तो वरच्या जिन्याकडे गेला. आणि प्रचंड दुर्गंधीने त्याला मागे लोटले.
“हा कसला इतका घाणेरडा वास?”
जरा निरखून पाहिले तेव्हा एक मोठी घूस मरून पडली होती. ज्याचा उग्र घाणेरडा वास सगळीकडे पसरला होता. अलगद त्या घुशीला बाजू सरकवत तो वरती गेला तेवढ्यात अब्दूलने त्याला आवाज दिला,

“रघ्याऽ रूक। आगे मत जाऽ।”

अब्दूलच्या वाक्याने राघव विस्मयचकित होऊन तिथेच थबकला.

“अरे, क्या हुवा? क्यू रोका मुझे ?”

“अरे भाईऽ, बहोत सालों से घर बंद है। तो पुरानी छत कही पैर रखते ही खिसक न जाए। इसलिए संभल के चल बोल रहा था।”

“ओह्! ऐसा! यार, मै कितना डर गया था। मुझे लगा तुझे कुछ दिखा।”

राघवच्या मनातली खरी खळबळ तर त्याला अजून व्यक्त पण करता आली नव्हती. हा विषय त्याच्याशी बोलावा की नाही ह्याच कश्मकशमध्ये होता अजून राघव. मनातल्या विचारात पुढे चालतोय तोच त्याच्या पावलाखालची जमीन अचानक क्रॅक पडून त्याच्या वजनाने तिथे खड्डा पडला. त्याने ते पाऊल तसेच्या तसे अलगद हवेत उचलले आणि आल्या पावली परत फिरला. अब्दूलची शंका रास्त होती हे आता राघवला पटले.
तिथुनच त्याने घराच्या चारही बाजूने आपली नजर फिरवली आणि पुढे काय करायचे हा विचार करत मागे फिरला. तो जिन्याकडे वळतच होता की त्याला कोणीतरी कानाशी फुंकर घातल्याचा भास झाला. तो जागीच थबकला. इकडे तिकडे बघितले. हवा पण शांत होती. वातावरण पण स्तब्ध, मग ही फुंकर !

त्याच्या अंगांगातून भीतीची एक लहर दौडली. हे भास आहेत की सत्य हेच त्याला समजत नव्हते.

“एऽ रघ्या,अबे चल जल्दी. क्यू रूक गया।”

अब्दूलच्या हाकेने तो भानावर आला आणि पटापट पायऱ्या उतरून खाली आला.
तो अजूनही कसल्यातरी विचारात गढलेला पाहून अब्दूलने विचारलेच शेवटी,

“आये जबसे देख रहाॅं हुॅं, कोनसे तो भी खयाॅंलोंमे डुबा हुआ दिख रहा है तु। क्या बात है, कोई चिंता का विषय तो नहीं, घर पर सब ठीक नाऽ?”

शेवटी मित्रच तो! त्याने त्याच्या डोळ्यातले भाव बरोबर वाचले. पण आता ह्याला नेमकं काय सांगावं हाच राघवला पडलेला पेंच होता. त्याच्या कपाळावरची चिंतेची पुसटशी अढी नजरेने हेरत त्याच्या खांद्यावर हात टाकत अब्दूल म्हणाला,

“अरे क्यू चिंता करता है मेरे भाई, मै हू ना। तु फिक्र मत कर। हम मिलके सब प्रॉब्लेम का हल निकालेंगे। चल अब घर चल। तेरी भाभी खाने के लिए इंतजार कर रही होगी।”

राघवला त्याक्षणी अब्दूल जणू एक पहाडासारखा भक्कम आपल्या पाठीशी असलेला आधार भासत होता. डोळ्यांच्या ओलावलेल्या कडा अलगद टिपत दरवाजा तात्पूरता कडीबंद करत दोघेही अब्दूलच्या घराकडे रवाना झाले.
नियती मात्र इकडे राघवला आपल्या जाळ्यात ओढण्याच्या पूर्ण तयारीला लागली होती.
—-----------------------------------------------------------
घालू.
क्रमशः -3
@राधिका कुलकर्णी.

राघव अब्दूलला विश्वासात घेऊन सगळे सांगू शकेल का?
अब्दूलची त्याला साथ मिळेल की हेही नियतीने विणलेले मायेचे जाळे आहे, ज्यात राघव अलगद फसत चाललाय?
राघवला येणारे चित्रविचित्र अनुभव कोणत्या पुढच्या संकटांची चाहूल तर नाही!
त्या सगळ्या संकटांवर मात करण्यात राघव यशस्वी होईल का?
काय रहस्य दडलेय ह्या भास-आभासांमागे?
काय आहे नियतीचा डाव?
ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायला पुढील भाग नक्की वाचा.