Login

घारु-2

The Story About A Whispering Sound.
घारू -2
@राधिका कुलकर्णी.

असेच म्हणता म्हणता वर्षं गेले आणि राघवची रवानगी तालुक्यातील वस्तीशाळेत झाली. शिक्षणासाठी तो बाहेरच राहीला पुढे. कधी सुट्ट्यात घरी जाणे होई पण त्यानंतर त्याला आज्जी कधीच वाड्यात दिसली नाही. ‘आज्जी कुठेय?’ विचारले की काहीतरी उत्तरे देऊन वेळ मारून नेली जायची. नंतर शिकता शिकताच त्याचे आपल्याच बरोबर शिकणाऱ्या सरोजवर प्रेम जुळले. दोघांनीही शिक्षण संपून लग्नाचा निर्णय घेतला. राघवला एका प्रायव्हेट कंपनीत नोकरी लागली तसे त्याने लग्न केले आणि सरोजला घेऊन गावी आला. आईवडीलांना त्याचा निर्णय फारसा मानवला नसला तरी त्यांनी विरोध न करता त्याला घरात घेतले. त्याने लग्न केलेय कळल्यावर बाबूरावांनी आज्जीच्या तळघरावरतीच नवीन जोडप्यासाठी रहायला एक खोली बांधून घेतली. दोघांची सोय त्याच खोलीत केली होती. त्या घरातली ती त्यांची पहिली रात्र होती. दोघेही एकमेकांच्या बाहूपाशात शांत पहुडले होते आणि रात्री अचानक राघवला जाग आली. त्याला खोलीत त्याच्या जवळून कोणीतरी गेल्याचा भास झाला. डोळे उघडून लाईट लावून त्याने सगळीकडे बघितले पण काहीच नव्हते. तो पुन्हा झोपला. थोड्या वेळाने कानात कुजबूज जाणवली. अगदी खोल आवाजात ‘घारूऽऽ‘ असा तो आवाज ऐकून तो जागीच थिजला. बाजूला सरोज गाढ झोपलेली. त्याने तिला आपल्या हाताने मिठीत ओढले आणि डोळे घट्ट मिटून घेतले. सकाळी उठल्यावर त्याला खूप ताजेतवाने वाटत होते. रात्री उगीच आपण घाबरलो. असे स्वतःलाच समजावत तो बाहेर आला. दोन दिवस राहून तो पुन्हा आपल्या नोकरीच्या गावी परतला. अगदी लहान वयात शिक्षणासाठी बाहेर पडल्याने त्याचे आईवडीलांशी फार घनिष्ठ नाते कधी जुळलेच नाही.ख्यालीखुशाली, पहीले सणवार अशा निमित्ताने भेटी होत.पण फार आत्मियता दोघांनाही नव्हती.
वर्ष पुढे सरकत होती तसतसा राघव आपल्या संसारात रममाण होत होता आणि एक दिवस अचानक एक फोन आला. राघव उलट्या पावली गावी गेला. घरापुढे बरीच गर्दी जमली होती. सगळेजण त्याच्या येण्याची वाट पहात होते. आकस्मिकपणे आईवडील दोघेही मृत पावले होते. दोन तीन दिवस घराचा दरवाजा कोणीच उघडला नाही म्हणून शेजारपाजारांना शंका आली. कोणीतरी आवाज देऊन बघितले तरीही कुठलाच प्रतिसाद नाही. शेजारच्या छतावरून त्यांच्या वाड्याच्या गच्चीवर उडी मारून एकजणाने मधल्या चौकातून डोकावून बघितले आणि जे दृश्य दिसले ते पाहून त्याच्या काळजाचा थरकाप उडाला. त्याच पावली पोलिस ठाण्यात घटना नोंदवली आणि पोलिस ठाण्यातून फोन आला म्हणून तातडीने राघव गावी पोहोचला. त्याच्या उपस्थितीत घराचा दरवाजा तोडून पोलिसांनी आत प्रवेश मिळवला आणि एक उग्र दर्प घरभर पसरला. त्या दुर्गंधीने राघवला भोवळ आली. दोघांचेही मृतदेह अस्ताव्यस्त अवस्थेत पडले होते. कुजून त्याची दुर्गंधी सर्वत्र पसरली होती. हे असे का आणि कसे घडले? हाच सगळ्यांना पडलेला प्रश्न होता. तसे पाहिले तर राघवच्या आईवडिलांची गावात इतकी खुन्नस कुणाशीच नव्हती किंवा खूप काही गडगंज संपत्ती होती ज्यासाठी कोणी त्यांचा जीव घेईल असेही नव्हते.
तो सगळा प्रकार जरा भीतीदायकच होता.
अखेरीस सगळ्या चौकश्या,जबान्या,पोस्टमॉर्टम सारखे कायदेशीर सोपस्कार पूर्ण होऊन मुडद्यांना मूठमाती देऊन राघवने गावच्या वाड्याला टाळं ठोकलं आणि तो
कायमचा शहरात स्थायिक झाला.

ह्या घटनेला आता आठ दहा वर्षे उलटली होती.
आणि अचानक काल ही विचित्र अनुभूती. राघवला समजतच नव्हते की ह्या सगळ्याचा नेमका काय अर्थ आहे?

आज्जी इतक्या दिवसांनी आपल्याला स्वप्नात का दिसली?

तिला आपल्याला खरंच काही सांगायचे असेल का?

की हा आपल्या मनाचा काही खेळ आहे?

ते नक्की स्वप्न होते की सत्य?

की सत्यातला आभास?

ह्याचा सगळ्याचा उलगडा कसा होणार?

अशा सगळ्या विचारात असतानाच राघवच्या फोनची घंटी वाजली.
बातमी ऐकून राघव सुन्न झाला. बरेच दिवसांपासून त्याच्या डोक्यावर ही टांगती तलवार होतीच जे आज शेवटी घडलेच. रेसेशनमुळे बऱ्याच लोकांना कामावरून कमी करण्याचे सत्र कंपनीत चालू होते. राघव तसा खूप सिनियर एम्प्लॉई होता. त्यामुळे पगारही बरा होता त्याचा. पण आज त्याच्या नोकरीवर पण गदा आली होती. त्याच्या डोळ्यापुढे पुर्ण अंधार दिसत होता. ह्या वयात दुसरी नोकरी शोधण इतकं सोप्पं नव्हतं. आता घराचे कर्ज, इतर लोनचे हप्ते कसे फिटणार?
म्हणतात ना संकटं आली की चारी बाजूंनी घेरतात तसेच काहीसे झाले होते. ही बातमी अजून पचवतोय न पचवतोय तोच रात्री अब्दुलचा गावाकडून फोन आला. अब्दूल राघवचा शाळकरी मित्र. गाव सुटलं तरी त्यांच्यातले मैत्र मात्र छान टिकून होते. कधीमधी गावच्या काही बातम्या, इतर घडामोडी राघवला अब्दूलमुळेच कळायच्या. आत्ताही पावसामुळे घरावर एक जुनं झाड पडून घराची पडझड झाल्याचे अब्दुल सांगत होता.
“तू एकदा लवकरात लवकर गावी येऊन जा” असे तो सांगत होता.

मधल्या काळात राघवला खूपदा गावचे घर विकायचा विचार आला होता पण इतक्या जुन्या मोडकळीस आलेल्या घराला गावात फारशी किंमत नव्हती त्यामुळे विकायला चांगला रेट नाही म्हणून ते तसेच पडले होते.

वर्ष जसजशी पुढे सरकत होती घर पण जास्तच जूनं होत चालले होते. त्यात ह्या बातमीने राघव जास्तच चिंतित झाला. उद्या पहाटेच गावाकडे जावे आणि एकदा त्या घराचा सोक्षमोक्ष लावावा असे मनाशी ठरवून त्याने एक सिगारेट शिलगावली.
—------------------------------------------------------
क्रमशः -2
@राधिका कुलकर्णी.

राघव गावी गेल्यावर त्याच्या पुढे काय वाढून ठेवलंय हे कोणालाच माहीत नव्हते.
कदाचित नियतीने आखलेला हा डाव तर नसेल राघवला गावी बोलावून घेण्याचा?
काय होणार पुढे?
हे वाचायला पुढील भाग नक्की वाचा.


🎭 Series Post

View all