घरटं.. लघुकथा लेखनस्पर्धा (सामाजिक कथा)

हि कथा कुटुंबाची.. पिकलेल्या पानांची..


सामाजिक कथा

घरटं..

“आई बाबा ही फक्त आपली एकट्याचीच जबाबदारी आहे का? बाकीच्या मुलांची काहीच जबाबदारी नाही? हे बघ मंदार, मला एकटीला ऑफिस, घर, मुलं सांभाळणं हेच जमत नाही त्यात अजून यांची जबाबदारी.. मला नाही झेपणार. त्यांचं ते खोकणं, रात्रभर जागत राहणं मला सहन होत नाहीये. त्यांची तू दुसरीकडे काहीतरी सोय कर. आपण यांना एखाद्या वृद्धाश्रमात का पाठवत नाही?”

शलाका मुद्दाम सुरेखाताईना ऐकू जाईल या स्वरात बोलत होती.

“अगं हळू बोल.. किती मोठ्याने बोलतेय. आईबाबा शेजारच्याच खोलीत बसलेत त्यांना ऐकू जाईल ना..”

मंदार तिला थांबवत म्हणाला.

“ऐकू देत की.. खरं तेच बोलतेय. कोणाची भीती आहे का मला की चोरी आहे बोलायची?”

शलाकाच्या तोंडाचा पट्टा चालूच होता. तिचं सारं बोलणं सुरेखाताईंच्या कानावर पडत होतं. सुनेच्या शब्दांनी व्यथित झालेल्या सुरेखाताईंचे डोळे पाणावले. आपली सून आपल्याला वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवतेय या भावनेने त्या उद्विग्न झाल्या.

“आज या मुलांना आमची जबाबदारी नको वाटते. मग आम्ही सारं आयुष्य मुलांसाठी पणाला लावलं त्याला काहीच अर्थ नाही? आम्ही तर सारं त्यांच्यावरच्या प्रेमापोटीच केलं ना? त्या प्रेमाला काहीच किंमत नाही?”

सुरेखाताईचं मन चरफडलं.

“जाऊ दे गं.. तू त्यांच्या बोलण्याकडं लक्ष देऊ नकोस.. सोड ते सगळं. चल आज मी तुझ्या केसांना कोमट तेल लावून मालिश करून देतो. बरं वाटेल तुला.. ”

विनायकराव त्यांना समजावणीच्या सुरात म्हणाले. सुरेखाताई मात्र भूतकाळात रममाण झाल्या. चाळीस वर्षापूर्वीचा काळ सरसर डोळ्यांसमोरून सरकत होता.

चाळीस वर्षापूर्वी सुरू झालेला संसार. कोकणातल्या छोट्याशा गावातून नोकरीच्या निमित्ताने मुंबईत आलेले हे गोडबोले दांपत्य. विनायकराव कापड गिरणीत कामगार म्हणून नोकरीला लागले आणि मग आपसूकच मुंबईकर झाले. मुंबईच्या गर्दीत कधी मिसळून गेले त्यांचं त्यांनाच समजलं नाही. पण तरीही कोकणातल्या मातीचा गोडवा त्यांच्या वागण्यात, चालण्या बोलण्यात कायम जाणवायचा. मुंबईत वरळीतल्या चाळीत दहा बाय दहाच्या खोलीत दोघांचा संसार सुरू झाला. कुटुंबात विनायकराव सर्वात थोरले असल्याने गावाकडं राहणाऱ्या आईवडिलांना भावंडांना त्यांचाच आधार होता. गावाकडे थोडीफार शेतीवाडी होती. विनायकरावांनी आपल्या दोन बहिणींची थाटामाटात लग्नं लावून दिली. धाकट्या भावाचं शिक्षण पूर्ण केलं. आईवडिलांचं आजारपण सारं विनातक्रार केलं. सुरेखाताईंनीही कधीच कुरबुर केली नाही. मोठ्या सुनेची, थोरल्या वहिनीची सगळी कर्तव्ये अगदी हसतमुखानं पार पाडली. कधीही चिडचिड केली नाही. आईवडिलांच्या जागी राहून सगळं छान निभावून नेलं.

हळूहळू त्यांचाही संसार बहरत होता. विनायकराव आणि सुरेखाताईंच्या वंशवेलीला तीन फुलं उमलली. लक्ष्मी-सरस्वतीच्या रूपाने सुरेखाताईच्या पोटी आधी दोन कन्यारत्नांनी जन्म घेतला आणि दोन बहिणींच्या पाठीवर मंदारचा जन्म झाला. घराचं गोकुळ झालं. मुलांच्या दुडूदुडू चालीनं घर आनंदानं भरून गेलं. सारं काही छान सुरळीत चालू होतं पण अचानक त्यांच्या सोन्यासारख्या संसाराला कोणाची तरी दृष्ट लागावी तसं झालं. अचानक गिरणी कामगारांनी संप पुकारला आणि लाखो कामगारांचे संसार रस्त्यावर आले. बायकां मुलांची वाताहत झाली. सर्व कामगारांवर उपासमारीची वेळ आली. काही आपल्या गावाला निघून गेले. काही गुन्हेगारीच्या मार्गाला वळले. विनायकरावांची नोकरी गेली. पोटापाण्याचा मार्ग बंद झाला. निरागस मुलांचे चेहरे पाहून दोघांच्या हृदयात कालवाकालव होत होती. दोघं पती पत्नी हवालदिल झाले. काय करावं समजेना. मग अशा वेळी सुरेखाताई कमरेला पदर खोचून पुढे सरसावल्या. नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून आलेल्या संकटाला तोंड देण्यासाठी उभ्या राहिल्या. खूप विचार केल्यानंतर सुरेखाताईंच्या डोक्यात एक कल्पना आली आणि मग विनायकरावांशी विचारविनिमय करून ती कल्पना प्रत्यक्षात उतरवली.

सुरेखाताईंच्या हातच्या जेवणाला सुरेख चव होती. त्यांच्या जेवणाची नातेवाईक, शेजारी पाजारी कायम कौतुक करत असत. सुरेखाताईंनी घरातच छोटीशी खानावळ सुरू केली. ‘मंदार खानावळ’ सुरू झाली. गिऱ्हाईकाच्या आवडीनुसार शाकाहारी, मांसाहारी स्वयंपाक बनला जाऊ लागला. विनायकराव स्वतः ऑफिसमध्ये जाऊन डबे पोहचवू लागले. दोघं नवराबायको दिवस रात्र कष्ट करू लागले. काटकसरीचा संसार सुरू झाला. तीन चिमुरड्या मुलांच्या भविष्याचा प्रश्न आ वासून उभा होता. सर्वांच्या गरजा भागवता भागवता जीव मेटाकुटीला येत होता. विनायकरावांनी स्वत:ची सगळी सेविंग्स त्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केली. बघता बघता मुलं शिकून उच्च पदावर पोहचली. मुली उपवर झाल्या तसं विनायकरावांचं मुलींसाठी वरसंशोधन सुरू झालं. विनायकरावांनी मुलींसाठी सुयोग्य स्थळांची निवड केली.

मुलींच्या लग्नासाठी त्यांनी आपल्या गावाकडच्या भावाला खर्चासाठी विचारलं.

“दादा, तुला तर माहीत आहे.. शेती आपली बेभरवशाची.. कधी पीक चांगलं येतं कधी नाही.. आमचेच हाल सुरू असतात कायम. मी कुठून तुला पैसे देणार? तुझ्या मुलींच्या लग्नासाठी कुठून तुला मदत करणार?”

धाकट्या भावाने हात वर केले. ज्याच्या शिक्षणासाठी, बहिणींच्या लग्नासाठी मोठा भाऊ म्हणून सगळी कर्तव्ये केली तोच धाकटा भाऊ ‘आमचं तुमचं, तुझं माझं‘ करत होता. विनायकराव निराश झाले. त्यांना उदास झालेलं पाहून त्यांचा धाकटा भाऊ म्हणाला,

“दादा, या समस्येवर मी एक उपाय सुचवू का?”

त्यांनी प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. तो पुढे बोलू लागला.

“दादा, काही सोय होणार नसेल तर तू तुझ्या वाट्याची शेती विकून का टाकत नाही?”

भावाचं हे बोलणं ऐकून विनायकरावांच्या डोळ्यात पाणी आलं पण त्यांचा नाईलाज झाला. त्यांच्या वाटणीची शेती विकून त्यांनी लग्नाच्या खर्चाची रक्कम गोळा केली. मुलींची मोठ्या थाटामाटात लग्न करून दिली. दोन्ही मुली सासरी सुखात नांदत होत्या. मंदारनेही खाणावळीच्या उद्योगात आपलं लक्ष घातलं.

हळूहळू ‘मंदार खानावळ’चं रूप बदलून एका मोठ्या हॉटेल मध्ये त्याचं रूपांतर झालं. मंदारनेही धंदा छान सांभाळला होता. नव्या टेक्निक, नवी माणसं, पदार्थांचं नवनवीन प्रयोग यामुळे धंदा चांगलाच नावारूपाला आला. कालांतराने मंदार आणि शलाकाचं लग्नही विनायकरावांनी प्रचंड पैसा खर्च करून थाटामाटानं लावून दिला. मुलाच्या सुनेच्या सगळ्या हौशीमौजी पूर्ण केल्या. उरलीसुरली सर्व पुंजी मंदारच्या लग्नात खर्च केली. एक राहतं घर तेवढं विनायकरावांच्या नावावर होतं. दिवस भराभर सरकत होते. मंदार शलाकाचा संसारात अर्णवचं आगमन झालं. थकलेल्या डोळ्यांना नातवाच्या बाललीला पाहण्याचं सुख लाभलं. विनायकराव आणि सुरेखाताई मंदारचं यश आणि त्याचा भरला संसार पाहून तृप्त झाले.

मंदार आपल्या हॉटेलच्या बिझनेसमध्ये छान रुळला होता. धंद्यात छान जम बसला होता. एक दिवस हॉटेल मधून घरी आल्यावर आपल्या आईवडिलांना म्हणाला.

“बाबा, माझ्या डोक्यात एक कल्पना आलीय. आता आपलं कुटुंब वाढत जाणार. अर्णवही मोठा होत चाललाय. आपण मोठं घर घेऊया. टूबीएचके फ्लॅट घेऊ. सर्वांना प्रशस्त वाटेल. हे घर विकून चांगली रक्कम येईल आणि मी बँकलोन करून उर्वरित रकमेची सोय करता येईल. काय म्हणता?”

मंदारने विनायकरावांना प्रश्न केला. विनायकरावांना मंदारचं म्हणणं पटलं. त्यांनी कसलाही विचार न करता लगेच राहतं घर विकून टाकलं आलेले पैसे मंदारला देऊन टाकले. मंदारने मोठा फ्लॅट बुक केला.. चाळीतलं जुनं घर सोडताना, स्नेही, शेजारी पाजारी यांचा निरोप घेताना सुरेखाताई खूप रडल्या होत्या. त्यांनी सर्वांचा निरोप घेतला आणि सर्वजण मोठ्या फ्लॅटमध्ये राहायला आले. विनायकराव आणि सुरेखाताई आपल्या मोठा मुलगा, सून आणि गोंडस नातवासोबत आनंदात राहत होते. हळूहळू ते दोघे चाळीतल्या जुन्या गप्पा मारण्याच्या सवयी सोडून नव्या घरी फ्लॅट सिस्टमशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत होते.

हळूहळू सुरेखाताईंना शलाकाच्या वागण्यात बदल दिसू लागला. शलाका त्यांच्याशी फटकून वागू लागली. सुरुवातीला सुरेखाताई आनंदाने घरातली सर्व कामे करायच्या. आता ती कामे त्यांनीच केली पाहिजेत असा हट्ट होऊ लागला. “आपल्या घरी यांना फुकट का पोसायचे?” असा विचार करत शलाकाने मोठ्या चलाखीने घरातल्या कामवाल्या मावशींना काढून टाकत सगळी कामं सुरेखताईंवर सोपवली. अर्णवला आधी शाळेत जाण्यासाठी रिक्षा लावली होती. रिक्षावाले काका शाळेत सोडायचे, आणायचे पण आता शलाकाने रिक्षा बंद केली होती. “तेवढाच तुमचा व्यायाम होईल.” असं म्हणून विनायकरावांना अर्णवला शाळेत सोडायला आणायला सांगितलं. रोज त्याला शाळेत सोडल्यावर येताना बाजारातून भाजी घेऊन यायला सांगितलं होतं. कधी काही कमी जास्त झालं तर ती खूप टाकून बोलायची. इतके दिवस कधीही तोंड वर न करून बोलणारी शलाका पदोपदी दोघांचा अपमान करू लागली. घरातल्या अडगळीसारखी त्यांची स्थिती झाली होती. मंदारही त्यांच्याकडे दुर्लक्ष करू लागला. कधी कामाच्या व्यापामुळे, तर कधी स्वतःच्या बायकामुलांसोबत व्यस्त असल्याने आपल्या आई वडीलांकडे लक्ष द्यायला त्याचाकडे वेळ नव्हता किंबहुना स्वतःच्या त्रिकोणी कुटुंबापलीकडे दुसरं काही पाहण्याची इच्छा नव्हती. एकाच घरात राहून कित्येक दिवस मंदार आपल्या आईवडिलांशी दोन घटका शांतपणे बोलला नव्हता. वेळ नव्हता.. की प्रेम उरलं नव्हतं? सारेच प्रश्न अनुत्तरित.

“आता किती दिवस राहिलेत? आठ गेले चार राहिले.. पिकलं पान कधीतरी गळून पडणार.. ”

असा विचार करून विनायकराव दुर्लक्ष करायला शिकले होते पण सुरेखाताई मात्र फारच मनाला लावून घेत. मुलाच्या एका भेटीसाठी त्या आतुर होत. कधी कधी जुनी ट्रंक उघडून आत घडी घालून ठेवलेल्या मंदारच्या लहानपणीच्या कपड्यांवरून उगीच हात फिरवत राहत. त्याच्या वस्तूंना हात लावून त्याच्या स्पर्शाची भूक भागवून घेत. मुली त्यांच्या सासरी आपल्या संसारात मग्न होत्या. आईवडिलांची साधी चौकशी करायलाही त्यांना वेळ नव्हता. दिवसेंदिवस त्या आतून खूप खचत चालल्या होत्या आणि आज तर शलाकाने अगदी जिव्हारी लागणारे शब्द उच्चारले होते. शलाकाच्या बोलण्याने सुरेखाताई खूप व्यथित झाल्या होत्या. सुरेखाताई विचार करू लागल्या. आर्त भाव चेहऱ्यावर दाटू लागले. डोळ्यांत पाणी साठू लागले. डोळे पुसत त्या विनायकरावांना म्हणाल्या,

“आपल्या पोटच्या मुलांना आईवडील ही एक जबाबदारी वाटावी? या मुलांना मोठं करताना किती खस्ता खाल्ल्या.. किती कष्ट उपसले.. त्यांच्या आजारपणात कित्येक रात्री त्यांच्या उशाशी बसून जागून काढल्या. आयुष्यभराची सर्व पुंजी यांच्या सुखासाठी खर्च केली. होतं नव्हतं ते सगळं अगदी राहतं घरही विकलं.. यांच्या नावी करून देऊन आता आमच्याकडे यांना द्यायला मायेपेक्षा अधिक काही नाही म्हणताना आईवडील म्हणजे एक नको असलेली जबाबदारी वाटावी? प्रेम नाहीच का ओ? यांना फक्त पैसा अडका का दिला आम्ही? आम्ही दिलेलं प्रेम, माया? त्याचं काय झालं? ते कुठे गेलं? आणि आईवडिलांना सांभाळण्याची जबाबदारी फक्त लेकाची? आपल्या मुलींची का नाही? वडिलोपार्जित संपत्तीत बरोबरीचा हक्क सांगून आपली वाटणी मागून घेताना आईवडिलांना सांभाळण्याची जबाबदारी सुद्धा वाटून घ्यायला काय अडचण असते? पण फक्त हक्क हवा असतो त्यासोबत येणारी जबाबदारी मात्र नको. कायद्याच्या धाकाने आपण सांगू शकतो पण मग ते फक्त डोक्यावर पडलेलं कर्तव्य म्हणून केल्यासारखं! त्यात प्रेमाचा साधा लवलेशही नाही.”

डोक्यात थैमान घातलेल्या विचारांनी घेरल्यावर त्या एकदम रडवेल्या झाल्या. विनायकरावांनी त्यांना जवळ घेतलं तसं त्या त्यांच्या कुशीत शिरत हमसून हमसून रडू लागल्या. विनायकराव त्यांना मायेने गोंजारत समजावत होते. दुर्लक्ष करायला सांगत होते. मध्येच त्यांना काहीतरी आठवलं आणि त्या म्हणाल्या,

“ओ, चला.. आता आपल्याला एक क्षणही इथे थांबायचं नाही. परवा शेजारच्या जोशी काकू एका वृद्धाश्रमाला भेट द्यायला गेल्या होत्या. आधार का काही नाव होतं त्याचं.. आपण तिथे जाऊ. पैसे किती लागतील ते विचारू आणि राहू तिथेच. यांना राहू दे त्यांच्या संसारात खुश. आपण कशाला त्यांच्या पायातली धोंड व्हायचं?”

असं म्हणत त्या विनायकरावांच्या कुशीतून दूर होत उठून उभ्या राहिल्या. गळ्यातली सोन्याची मोहनमाळ त्यांच्या हातात देत म्हणाल्या.

“याने आपली थोडीफार तरी पैश्यांची सोय होईल ना? मग बघू पुढच्या पुढे.. इथे काम करतोच आहे आश्रमात काम शोधू.. मिळेलच काहीतरी. पण आता मला इथे श्वासही घ्यायचा नाहीये. चला निघू.. कमीत कमी आयुष्याचे उरलेले दिवस तरी सुखासमाधानाने घालवू.. ही माझी तुमच्याकडे शेवटची मागणी समजा.. शेवटची इच्छा..”

आपल्या पत्नीचा डोळ्यातलं पाणी पाहून ते व्याकुळ झाले. तिची ती अवस्था दयनीय होती आणि त्यांना पटण्यासारखी होती. कारण समोरच्याला ताट तर दिलंच होतं पण सोबत बसायचा पाटही देऊन त्यांनी खूप मोठी चूक केली होती. आता निदान तिची एवढी मागणी पूर्ण करून उरलेलं आयुष्य तरी या गुदमरून टाकणाऱ्या आयुष्यापासून दूर नेऊयात तिला.. असा विचारत करत विनायकरावांनी तयारी केली.

“बाळांनो, तुमच्यावरचं ओझं कमी करतोय. आम्ही घर सोडून जातोय. आम्हाला शोधण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही सुखात रहा. आशीर्वाद..”

अशा आशयाची चिठ्ठी लिहून घराबाहेर पडले.. कधीही परत न येण्यासाठी.. घरट्यातून पिलं बाहेर पडण्याचा प्रघात मोडून आज अजून दोन चिमणा चिमणी आपल्या कष्टाने बांधलेल्या घरट्याला सोडून उडून गेले होते.

पूर्णविराम.

© निशा थोरे (अनुप्रिया)