घरसंसार. भाग -१२

वाचा तिच्या संसाराची कथा


घरसंसार.
भाग -१२

मागील भागात :-

घरातील सर्वांना एकत्र बघून मधुरा आणि नितीन आनंदित होतात. घरी आल्यावर कांताताई एक प्लॅन तयार करतात तेवढ्यात दारात कोणीतरी येतो.

आता पुढे.


"आणि स्वयंपाकाचे?"


"त्यासाठी मी आहे ना, ते मी सांभाळेन." कांताताई म्हणाल्या.


"तुम्ही एकट्याच कशाला? मदतीला मीही आहेच की. आपण दोघी मिळून करूया. चालेल ना तुम्हाला?" कांताताईंसाठी थोडा परिचित आणि इतरांसाठी अपरिचित आवाज आला तसे सर्वांनी दरवाजाकडे नजर वळवली.


"विमल आजी? म्हणजे विमल आजीच ना गं तू?" पिहूने दरवाज्याकडे धावत जात त्या चेहऱ्याकडे एकटक न्याहाळत विचारले.


"हो. तू पिहू ना? तुझा फोटो मी बघितलाय. मीच तुझी विमलआजी आणि हे तुझे हेमंत आजोबा.

पिहू तू तर तुझ्या आईची अगदी कॉर्बन कॉपी आहेस गं." विमलताई तिचे मुके घेत म्हणाल्या.


"आई?" मुग्धा आणि सुरभी आश्चर्याने कांताताईकडे बघत होत्या.


"हम्म. तुमचा प्रश्न मला कळलाय. या विमलताई आणि हे हेमंतभावोजी. आपल्या मधुराचे आईबाबा. त्यांना आम्ही दोघांनी बोलावून घेतलेय. आता आम्ही कसे, कधी भेटलो हा विषय सध्या महत्त्वाचा नाहीये. त्यांचे इथे येणे तेवढे महत्त्वाचे आहे." सुनांना आणि सोबतच इतरांना समजावत त्या म्हणाल्या.


"विमलताई, हेमंतभावोजी तुमच्या लेकीच्या घरात तुमचे स्वागत आहे. आत या." त्यांना आत घेत कांताताई म्हणाल्या.

*******


"चेतना, अगं काय हे? तू मला पार्लरमध्ये का घेऊन आलीस? आणि मुळात मला घ्यायला तू का आलीस? घरचे कोणी येऊ शकले असते ना?"

मधुरा लहानसा चेहरा करून विचारत होती. आज तिला डिस्चार्ज मिळाला होता आणि नेमके नितीनला ऑफिसला जावे लागले होते.


"वा गं वा! घरची माणसं आलीत तर मैत्रीण नकोशी झाली होय ना? हॉस्पिटलमध्ये मीच तुला घेऊन आले होते म्हणून घ्यायलाही मीच आलेय. पार्लरमध्ये काम आहे म्हणून गाडी इकडे टाकली." तिला स्पष्टीकरण देत चेतना म्हणाली.


"अगं पण इथे?"


"मग आणखी कुठे? चेहरा बघ कसा निस्तेज झाला आहे? म्हणून थोडासा मेकअप करायला आलो आहोत." चेतना तिला म्हणाली आणि मग तिथल्या ब्युटीशियनला तिला छान तयार करायला सांगितले.


मधुराला असे काही करायचे नव्हते पण आता अपॉइंटमेंट घेतली होती शिवाय पैसेही आगाऊ पे केले होते त्यामुळे नाईलाजाने ती तयार झाली.


तासाभराने मधुरा बाहेर आली तीच मुळी छानशी नटून. एखाद्या नव्या नवरासारखा तिचा साज केला होता. तिच्या गोऱ्या वर्णावर उठून दिसणारी जांभळ्या रंगाची पैठणी, त्यावर साजेसे दागिने.. ती एकदम उठून दिसत होती.


"वॉव! मधुरा, कसली गोड दिसते आहेस?" चेतनाच्या नजरेत मैत्रिणीचे कौतुक दिसत होते.


"तूही खूप सुंदर दिसते आहेस." नवी साडी, मेकअप करून नटलेल्या चेतनाला बघून मधुरा गोड हसली.


"पण काय गं? इतके नटून आपल्याला जायचे तरी कुठे आहे?" मघाचा तिचा प्रश्न पुन्हा उभा राहिला.


"कार्यक्रमाला." चेतना बोलतच होती की तिचा फोन वाजला.


"ऐक ना, मधुरा मला जरा एक महत्त्वाचे काम आलेय मी निघते. तू जरावेळ इथेच थांब." तिला एकटीला सोडत चेतना पुढे निघाली.


"अगं पण मग मी घरी कशी जाऊ?"


"मी काहीतरी सोय करते. डोन्ट वरी." कारमधून ओरडत चेतना निघून गेली.


"मधुरा." चेतना गेल्यावर पाच मिनिटांनी तिच्या कानावर नितीनची हाक आली.

पिस्ता कलरची शेरवानी घातलेला तो एकदम राजबिंडा दिसत होता.


"नितीन, अरे तू तर ऑफिसला गेला होतास ना?"


"अगं हो. नंतर सोनूचा फोन आला आणि तो मला तयार व्हायला घेऊन गेला आणि आता चेतनाने मला कळवले की तू इथे आहेस म्हणून मी तुला घ्यायला आलोय. बाय द वे, खूप सुंदर दिसते आहेस हं."

त्याच्या स्तुतीने ती हलकेच लाजली.


"नितीन तू देखील खूप भारी दिसतो आहेस. एवढे नटलोय पण नेमक्या कुठल्या कार्यक्रमाला जातोय तेच कळत नाहीये." कारमध्ये बसताना ती हसून म्हणाली.


"चेतना म्हणाली की परस्पर घरीच या. तिथे थोडीशी गडबड झालीये." घराच्या दिशेने कार चालवत नितीन तिला सांगत होता.


"अरे, आता काय झाले?" ती डोक्याला हात लावून बसली.

एकतर या तीन चार दिवसात सगळ्या घटना अशा घडत होत्या की आणखी पुढे काय घडेल याचा ती अंदाज लावू शकत नव्हती.

"काळजी करू नकोस गं. घरी गेल्यावर कळेलच." तो तिला शांत करत होता मनात मात्र त्याचीही तिच्यासारखीच अवस्था झाली होती.


कार पार्क केल्यावर दोघेही त्यांच्या घराच्या दारात पोहचले. दारात त्यांना वेलकम करणारी सुंदरशी रांगोळी काढली होती.

दाराची बेल वाजवून देखील कोणीच दार उघडेना म्हणून त्याने हलकेच दरवाज्याला हात लावला तर तो सहज
उघडला.

"बाहेरचा तेवढा दिवा सुरु आणि घरात अंधार करून दरवाजा लॉक न करता सर्व मंडळी गेली तरी कुठे?"

स्वतःशीच बडबडत मधुराने घरातील लाईटचे बटण ऑन केले. तर त्यांच्यासाठी एक छानसे सरप्राईज तयार होते.


काय होते ते सरप्राईज? वाचा पुढील अंतिम भागात.
:
क्रमश:
©®Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*

🎭 Series Post

View all