घरसंसार. भाग -११

वाचा तिच्या संसाराची कथा


घरसंसार.
भाग -११

मागील भागात:-
कांताताई आणि केशवरावांच्या वागण्यामागे त्यांच्या घरातील इतर मंडळी कारणीभूत असतात हे सर्वांना कळते.

आता पुढे.

"नितीन, आम्ही दोघे या सर्वांना घेऊन घरी जातो. तू मधुराजवळ थांब. तसेही या सर्वांची मला चांगलीच खबर घ्यायची आहे." कांताताईंनी आदेश सोडला.


आई आम्हीपण येतो ना. तसेही डॉक्टर तर सुट्टी द्यायला तयार होते." मधुरा लहानसा चेहरा करून म्हणाली.


"नाही बाळा, तू एक दिवस इथेच थांबायचं मग उद्या घरी यायचेच आहे." कांताताई तिला प्रेमाने समजावून तिथून निघून गेल्या.


"नितीन, आपल्या घरचे सर्वच खूप चांगले आहेत रे. इतकी दिवस ही मायेची माणसं आपल्या वाट्याला का नाही आलीत?" हळवे होत मधुरा नितीनला म्हनत होती.


"ही माणसं आपल्या सोबत होतीच गं. आईबाबाच्या आदरामुळे फक्त आपल्याजवळ पोहचू शकत नव्हती." तो तिला कवटाळत म्हणाला.


"आईबाबा खूप छान आहेत रे. मला किती जीव लावत आहेत. मीच मनात त्यांच्याबद्दल धडकी भरून घेतली होती आणि त्यामुळे हे दुखणं पाठी लागलं."


"हम्म. प्रत्येकाचे आई बाबा छानच असतात. फक्त व्यक्त व्हायला योग्य वेळ हवी असते. आपल्या आयुष्यात ही वेळ दहा वर्षानंतर आली असे समजूया."


तो अलवारपणे तिला समजावत होता. तीही ऐकत होती. मनाच्या एका कोपऱ्यात मात्र स्वतःच्या आईवडिलांच्या आठवणीने व्याकुळ व्हायला होत होते.

कांताताई केशवराव दहा वर्षांनी का होईना मुलाच्या दारात उभे होते. पण मधुराला मात्र तिच्या आईवडिलांबद्दल कुठलीही आशा नव्हती.

*****

"कार्ट्यांनो दोन वर्षांपासून तुम्ही सगळे आमच्याशी डाव खेळत होतात होय?" घरी आल्यावर दोन्ही मुलांचे कान ओढत कांताताई म्हणाल्या.


"आजी आणखी जरा जोराने ओढ." सोनू त्यांना अंगठा दाखवत म्हणाला.


"मेल्या, तू यांचा सूत्रधार होतास ना? तुझाच कान जोरात पिरगाळते, ये इकडे." मुलांचे कान सोडत त्या नातवाकडे वळल्या.
सोनुची आता काही खैर नाही हे सगळ्यांना वाटत असतानाच त्यांनी त्याला प्रेमाने गोंजारले.


"सोनू, जे शहाणपण आम्हा मोठ्यांना आले नाही ते मात्र लहान असून तुला कळले. तुझ्यामुळे आपले घर एकत्र जुळलेय याचा मला आनंद आहे रे आणि तुझे खूप कौतुक सुद्धा." त्याच्या चेहऱ्यावरून त्यांनी मायेने हात फिरवला.


"यालाच म्हणतात नेव्हर जज ए बुक बाय इट्स कव्हर." मोनू आजीजवळ येत म्हणाला.

"म्हणजे रे?"

"म्हणजे कोणालाही त्याच्या बाह्य रूप रंगावरून किंवा लोकांच्या सांगण्यावरून तो कसा आहे हे ठरवू नये. आजी तू मधुराकाकूंशी तसेच वागलीस. तिच्यासोबत एक दिवस देखील घालवला नाही पण ती कशी चुकीची आहे, काकाला आपल्यापासून कसे तोडले याचा दोष देत बसलीस." मोनू समजावत म्हणाला.


"हो रे. चुकलंच माझं. असा कोणाविषयी पूर्वग्रह मनात ठेवून आपले मत तयार करणे चुकीचेच. ती चूक मला उमजलीय आणि आता ती सावरायचा उपाय देखील सापडला आहे."

"कोणता?" मुग्धाने उत्सुकतेने विचारले.

"इकडे या सांगते." म्हणून सगळ्यांना जवळ बोलावून कांताताई हळू आवाजात खुसरफुसर करू लागल्या.


"आजी, इट इज नॉट फेअर. तुमचे काय चाललेय ते मला पण कळू द्या ना." पिहू तोंड फुगवून म्हणाली.


"तुला सांगायचे तर तू तुझ्या मम्मा पप्पांना सांगशील ना? तू त्यांच्या टीममध्ये आहेस ना?" केशवाराव हनुवटीवर बोट ठेवून म्हणाले.


"नाही हो आजोबा, पिहू तर आपल्या टीममध्ये असणार आहे. हो ना गं पिहू?" मोनू तिला जवळ घेत म्हणाला.


"हो, हो. मला तुमच्याच टीममध्ये घ्या. आवडेल मला."

काय घडतेय हे तिला काहीच ठाऊक नव्हते पण उत्साह मात्र कमालीचा होता. तिचा उत्साह बघून तर दोन्ही काकूंनी तिची पापी घेतली.


"अगं पण आई नेमके काय करायचे आहे ते तू आम्हाला उलगडून सांगितलेच नाहीस." मोहित.


"काही विशेष असं नाही. तुम्ही दोघांनी मुलांच्या मदतीने घर तेवढे सजवायचे." कांताताई.


"आणि आम्ही?" सुरभी.


"तुम्ही दोघींनी तुमचे आवडीचे काम करायचे. खरेदीचे. तुमच्यासाठी आणि मधुरासाठी स्पेशल अशा साडया घ्या. सोनूला सोबत घेतलेत तर मग तो पुरुषमंडळीसाठी आणि खास करून नितीनसाठी कपडे निवडायला मदत करेल."


"हो आई पण आम्हाला इथल्या दुकानाबद्दल माहिती कुठे आहे?"


"मग काय झाले? बाजूलाच मधुराची मैत्रीण आहे, चेतना. तिला बरोबरीला घ्या. आजपासून दोन दिवस तिला आपल्याकडेच जेवायला बोलवा म्हणजे तिलाही तिच्या घरचे फारसे टेंशन उरणार नाही आणि तुम्हालाही मदत होईल." सासूबाईंची युक्ती दोन्ही सुनांना पटली.


"आणि स्वयंपाकाचे?"


"त्यासाठी मी आहे ना, ते मी सांभाळेन." कांताताई म्हणाल्या.


"तुम्ही एकट्याच कशाला? मदतीला मीही आहेच की. आपण दोघी मिळून करूया. चालेल ना तुम्हाला?" कांताताईंसाठी थोडा परिचित आणि इतरांसाठी अपरिचित आवाज आला तसे सर्वांनी दरवाजाकडे नजर वळवली.

यावेळी दारात कोण आले असेल? वाचा पुढील भागात.
:
क्रमश:
©®Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*

*******

🎭 Series Post

View all