भाग -९
मागील भागात :-
आपल्या दोन्ही सुनांचे वागणे खटकल्यामुळे आणि या सर्वांना मधुरा जबाबदारी आहे असे वाटल्यामुळे तिला त्रास द्यायच्या हेतूने कांताताई आणि केशवराव तिथे येतात असे कांताताई नितीन आणि मधुराला सांगते.
आपल्या दोन्ही सुनांचे वागणे खटकल्यामुळे आणि या सर्वांना मधुरा जबाबदारी आहे असे वाटल्यामुळे तिला त्रास द्यायच्या हेतूने कांताताई आणि केशवराव तिथे येतात असे कांताताई नितीन आणि मधुराला सांगते.
आत पुढे.
"आमचा सासुरवास, सततचे राबवून घेणे यामुळे ही कंटाळेल, तुला आमच्याबद्दल काहीतरी सांगेल असे वाटायचे. पण तिने तसे कधीच केले नाही. ही पोरगी वेगळी आहे, प्रेमासाठी भुकेली आहे, निर्मळ मनाची आहे हे आम्हाला पटले होते. तुझी निवड चुकीची नव्हती हेही लक्षात आले. पुढचे दोन चार दिवस हे नाटक चालू ठेवून नंतर माफी मागून आम्ही इथून जाणारच होतो की आज असे घडले.
मधुरा, आम्ही खरंच चुकलो गं. आम्हाला माफ कर. तुझ्या संसारात विष कालवायचे नव्हते पण नकळत तसे होऊन गेले." कांताताईच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू होते.
"आईबाबा, तुम्ही मधुराशी असे काही वागाल याची मला कल्पनाही करवत नाही. खूप त्रास दिलात तुम्ही. त्यामुळे तिची काय अवस्था झालीये, बघितले ना?" नितीनला त्यांच्यावर चिडावे की मधुराची माफी मागावी कळत नव्हते.
"म्हणजे आजी, मम्माची तब्येत तुझ्यामुळे बिघडली?" पिहू रागाने विचारत होती.
"नितीन तू शांत हो बघू आणि पिहू तू देखील रागावर नियंत्रण ठेव. मला जे झाले ते आईबाबांमुळे नाही तर गैरसमजुतीमुळे घडले. नाहीतर त्यांनी हे सगळे का कबूल केले असते?" नितीनकडे बघून ती हळूवारपणे म्हणाली.
"आई, तुम्ही अशी सारखी माफी नका ना मागू. मला अवघडल्यासारखं होतेय. मी तर तुमच्यात माझी आई शोधत होते." रडवेली होत ती.
"हो, मला ते दिसत होतं गं बाळा. आमचा हा पोरखेळ दोन दिवसांनी संपवून तुला लेकीसारखेच वागवायचे होते पण त्या आधीच हे घडले. मधुरा, तुला काही झाले असते तर आम्ही स्वतःच्याच नजरेतून कायमचे उतरलो असतो गं."
"आई, आता तसे काही नाहीये ना, मी ठीक आहे आणि खरं सांगू? औषधंपेक्षा तुम्ही आत्ता जे बोलत आहात ना त्यानेच मला खूप बरे वाटू लागलेय." ती गोड हसली तसे कांताताई आणि केशवरावांच्या मनावरचा खूप मोठा भार हलके झाल्यासारखे वाटले.
कांताताईंनी मधुराला कुरवाळत एक मिठी मारली. त्या मिठीत त्यांच्या हातून घडलेल्या चुकीचा पश्चाताप जाणवत होता.काही वेळाने नितीन आणि पिहूदेखील त्यांच्या मिठीत विसावले. आईवडील मुलांच्या चुका पदरात घालतात, आज मात्र मुलांनी त्यांच्या चुकांवर पांघरून घातले होते.
"मिसेस मधुरा, तुमच्या प्रकृतीत बऱ्यापैकी सुधारणा झालीये. तुम्ही आज घरी जाऊ शकता."
दवाखान्यात भरती होऊन दोन दिवस उलटले होते. डॉक्टर मधुराची तपासणी केल्यानंतर बोलत होते.
दवाखान्यात भरती होऊन दोन दिवस उलटले होते. डॉक्टर मधुराची तपासणी केल्यानंतर बोलत होते.
"डॉक्टर, बऱ्यापैकी म्हणजे पूर्णपणे बरी नाही झालीये ना? मग आजचा दिवस राहू द्या की. तसेही तुम्ही चार दिवस ॲडमिट ठेवणार होता ना?" कांताताई लगेच डॉक्टरांना म्हणाल्या.
"अहो काकू, तुम्ही तुमच्या सुनेची इतकी काळजी घेताय त्यामुळे त्या लवकर बऱ्या झाल्यात. म्हणून जास्त दिवस ठेवण्याची गरज नाहीये. एक सांगू का? सासू सुनेमध्ये एवढं चांगलं बॉण्डिंग मी पाहिल्यांदाच बघतोय. अगदी मुलीसारखी तुम्ही तिची काळजी घेतलीत. तुम्हा दोघींचे प्रेम असेच राहू द्या." डॉक्टर म्हणाले.
त्यावर कांताताई केवळ हसल्या पण हट्टाने त्यांना एक दिवस वाढवून मागला तो मागलाच.
"आई, कशाला हो हट्ट करताय? मलाच आता घरी जायची ओढ लागलीय." मधुरा हिरमुसून म्हणाली.
"अगं हो, घर तर तुझेच आहे. तिथे परत जावेच लागेल. पण आता मला कसली रिस्क घ्यायची नाहीये. तेव्हा आणखी एक दिवस डॉक्टरांच्या नजरेखाली तू रहावीस एवढी इच्छा आहे आणि सासूचा आदेश तुला मानवाच लागेल." त्या तिला म्हणाल्या त्यावर ती नाईलाजाने तयार झाली.
******
"काय जाऊबाई? अजून किती दिवस हॉस्पिटल मध्येच घालवायचे आहेत?"
"आणि आमच्या सासूबाईंकडून किती दिवस सेवा करून घ्यायची इच्छा आहे?" एकापाठोपाठ आलेल्या आवाजाने मधुराने डोळे उघडले.
"सुरभी, मुग्धा? तुम्ही? तुम्ही दोघी इथे काय करत आहात?" कांताताईंच्या आवाजातील जरब स्पष्ट जाणवत होती.
"आम्ही आमच्या लहान जाऊबाईच्या तब्येतीची विचारपूस करायला आलो आहोत." मुग्धा नाक उडवत म्हणाली.
"हो ना, आम्हाला आमच्या दिराच्या बायकोला भेटण्यापासून कोणीही अडवू शकत नाही." सुरभी सासूकडे तिरकस पाहत म्हणाली.
"मला इथे कुठलाही तमाशा नको आहे. तुम्ही दोघी जशा आलात तशा इथून निघून जा." आवाजावर शक्य तितके नियंत्रण ठेवत कांताताई म्हणाल्या.
"त्या का निघून जातील? त्या आमच्या सोबत आल्या आहेत." एकाचवेळी सुमित आणि मोहित आत आले.
"तुम्ही सगळे इथे एकत्र? जे हवे ते तर मिळाले ना तुम्हाला आता आणखी काय हवंय म्हणून इथे आला आहात?" केशवराव उठून उभे राहिले.
"जे हवे होते ते मिळालेच कुठे? उलट त्याचाच तर फैसला करायला आम्हाला इथवर यावं लागलं." मोहित तुच्छतेने हसत म्हणाला.
"इथे भांडू नका. मधुरा पेशंट आहे हे तुम्हाला कळत नाहीये का?" कांताताईंच्या स्वरात ओलसरपणा होता.
त्यांच्या बोलण्यावर चौघांनीही एकमेकांकडे सूचकपणे पाहिले आणि नंतर मधुराकडे नजर टाकली.
या चौघांच्या अचानक येण्याने मधुराच्या आयुष्यात पुन्हा काही उलथापालथ होईल का? वाचा पुढील भागात.
:
क्रमश:
©®Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
:
क्रमश:
©®Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
*******