घरसंसार.भाग -८

वाचा तिच्या संसाराची कथा.


घरसंसार.
भाग -८
मागील भागात :-

दहा वर्षानंतर अचानक आपण नितीन मधुराकडे का आलो? याचे कारण कांताताई मधुरा आणि नितीनला सांगत असतात.

आता पुढे.


"सोनू आणि मोनू ही नातवंडे देखील आमच्यावर खूप जीव लावत होती. अशात तुझे लग्न झाले. तुला आम्ही नाकारले. तू घर सोडून गेल्याचे दुःख पाठीशी होते पण त्याचबरोबर घरातील इतरांचा आधार त्यामुळे ते दुःख पचवता आले." त्या क्षणभर थांबल्या.


"मग पुढे असे अचानक काय घडले?" नितीनचा प्रश्न उभा राहिला.


"अचानक असे नाही रे. सारे काही हळूहळू घडत असावे पण आमच्या लक्षात आले नाही." डोळ्यातील थेंब पुसत त्या म्हणाल्या.

"नातवंडं आता मोठी झालीत. आजी आजोबांसाठी त्यांच्याकडे वेळ उरत नाही. तर सून आणि मुलगे थोडे शिथिल झालीत. त्यांना आता आमची मध्येमध्ये केलेली लुडबुड खपत नाही. सुना स्वतंत्र झाल्यात. त्यांना त्यांचे आयुष्य त्यांच्या मर्जीप्रमाणे जगायचे असते. आधी प्रत्येक गोष्टीत आमची गरज भासायची आणि आता आम्हीच नकोसे झाली आहोत."

आईच्या बोलणे नितीन चकित होऊन ऐकत होता. दादा वहीनी असेही वागू शकतात हे त्याच्या कल्पनेपलीकडचे होते.


"आम्ही एकदा स्पष्टपणे त्यांना त्यांच्या वागण्याबद्दल विचारले. तर सुरभी म्हणते कशी, की धाकटा लेक तेवढा मायेचा. लग्नाच्या पहिल्या दिवसापासून बायकोला घेऊन वेगळा राहतोय, त्याच्याबद्दल कोणाला काही म्हणायचे नाहीये आणि आम्ही आता कुठे आपल्या मर्जीप्रमाणे वागायला लागलो तर ते डोळ्यात खुपायला लागले आहे.


मुग्धानेही तिची री ओढली. तिने तर त्यांना वेगळे व्हायचे आहे असे जाहीर करून टाकले. तिकडे नितीन आणि त्याची बायको राजाराणीचा संसार करत आहेत आता आम्हालादेखील आमची हौस पूर्ण करायचीय यावर ती ठाम होती." कांताताई सांगत होत्या.


"पुढच्या आठवड्याभरात एका घराचे तीन तुकडे झाले. मोहित आणि सुमितने आपला वेगळा संसार थाटला. आम्हाला त्यांच्या आयुष्यातून एकदम वजाच करून टाकले.

तुझ्या आईला ही गोष्ट खूप लागली. आजवर तिच्या शब्दाला जो मान होता आता त्याला काडीचीदेखील किंमत उरली नाही हे बघून ती केवळ झुरत होती.

आणि हे सगळं मधुरामुळे झालेय हा विचार तिच्या मनात डोकावला आणि लगेच तो पक्का समज होऊन बसला. ज्या मुलीमुळे आपला मुलगा आपल्याला सोडून गेला, त्यांच्यामुळे आपले घर तुटले तिला चांगलाच धडा शिकवायचा या विचाराने तिला ग्रासले होते.

म्हणून मग आम्ही तुझ्याकडे येतोय असा फोन केला. मधुराने तुला आमच्यापासून वेगळे केले, स्वतः मात्र आपल्या आईवडिलांबरोबर चांगले संबंध ठेवून असेल असा आमचा समज होता. त्यामुळे इथे येताना तिला काय काय त्रास द्यायचा याचा पक्का विचार करूनच आम्ही इथे आलो होतो." केशवराव कांताताईंच्या बोलण्याला पुढे नेत ते म्हणाले.


त्यांचे बोलणे नितीन स्तब्धपणे ऐकत होता. आपल्या आईबाबांच्या मनात मधुराबद्दल असलेली असुया बघून त्याच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले.


"आम्ही मनात एक राग घेऊन इथे आलो होतो, पण येताक्षणीच इथले चित्र बघून आपण चुकतोय याची जाणीव झाली होती. आम्ही आल्यावर तिने केलेला आमचा आदरसत्कार, आमचे हवे नको ते बघणे, सारे काही ती मनापासून करत होती. त्यामुळे हिला त्रास द्यायचा की नाही या संभ्रमात आम्ही होतो.


त्यातच समजले की जसा तुझा आमच्याशी काही संबंध नाही तशी हिचा देखील तिच्या घरच्यांशी काहीच संबंध नाहीये. हे दिसल्यावर तर आम्हालाही वाईट वाटले. एखादया मुलीला माहेर नसणे याचे दुःख काय असते याची जाणीव आम्हाला झाली.

मधुरा वरवर कितीही खूश असली तरी आतल्या एका कोपऱ्यात दुःखी आहे हे एक स्त्री म्हणून मला उमगत होते. पण तरीही आल्या आल्या प्रेमाचा वर्षाव करणे आम्ही टाळले आणि काही दिवस माझ्यातील सासूपणाला जागे ठेवले.

आमचा सासुरवास, सततचे राबवून घेणे यामुळे ही कंटाळेल, तुला आमच्याबद्दल काहीतरी सांगेल असे वाटायचे. पण तिने तसे कधीच केले नाही. ही पोरगी वेगळी आहे, प्रेमासाठी भुकेली आहे, निर्मळ मनाची आहे हे आम्हाला पटले होते. तुझी निवड चुकीची नव्हती हेही लक्षात आले. पुढचे दोन चार दिवस हे नाटक चालू ठेवून नंतर माफी मागून आम्ही इथून जाणारच होतो की आज असे घडले.


मधुरा, आम्ही खरंच चुकलो गं. आम्हाला माफ कर. तुझ्या संसारात विष कालवायचे नव्हते पण नकळत तसे होऊन गेले." कांताताईच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू होते.


त्यांचे बोलणे ऐकून मधुरा त्यांना माफ करेल का? वाचा पुढील भागात.
:
क्रमश:
©®Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*

*******

🎭 Series Post

View all