घरसंसार.भाग-७

वाचा तिच्या संसाराची कथा


घरसंसार.
भाग -७.

मागील भागात :-
दवाखान्यात भरती असलेल्या मधुराला भेटण्यासाठी कांताताई येतात. येताना तिच्यासाठी डबा आणतात. तिची काळजी घेतात. त्यांचे वागणे बघून मधुरा गोंधळून जाते.

आता पुढे.


मधुराला हे सगळं नवीन होते. चार महिन्यापासून घरात तळ ठोकलेल्या सासुसासऱ्यांनी एवढी प्रेमळ वागणूक कधी दिली नव्हती. सतत कसला आदेश नाहीतर सूचना सुरु असायच्या.


आजचे संपूर्ण वागणे वेगळे होते. सकाळी दवाखान्यात आले तेव्हा केशवरावांचा धीर देणारा आश्वासक स्पर्श आणि आता कांताताईंची ही काळजी सगळेच नवीन होते. त्यांच्या वागण्यात खोटेपणा जाणवत नव्हता पण खरे वागत असतील याची शाश्वतीही नव्हती. त्यांचे हे वागणे बघून मधुरा बुचकाळ्यात पडली.


"आई.." ती भारावल्यासारखे म्हणाली.


"मधुरा, या क्षणी तुला काय वाटतेय याची कल्पना आहे मला. तुझ्या या अवस्थेला कुठेतरी मीच कारणीभूत आहे. मला माफ कर." कांताताई हात जोडून म्हणाल्या.


"आई? तू असे का बोलते आहेस?" नितीन आश्चर्याने तिच्याकडे पाहत होता.


"नितीन, मला बोलू दे. आज जर मी बोलले नाही तर अपराधीपणाची बोच मला आयुष्यभर लागून राहील. माझ्यामुळे माझ्या सुनेला काही झाले असते तर मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते." त्यांच्या डोळ्यात पाणी होते आणि बोलण्यातील सच्चेपणा सगळ्यांना जाणवत होता.


"आई, माझी तुमच्याबद्दल कधीच काही तक्रार नव्हती." कातर स्वरात मधुरा म्हणाली.


"मला माहितीये गं आणि बाळा हा तुझा मोठेपणा झाला. पण चुकल्यानंतर माफी मागणे माझे काम आहे, तेच मी करतेय." तिच्या डोक्यावर त्यांनी हात ठेवला.


"आई तू काय म्हणते आहेस मला काहीच अंदाज येत नाहीये. मला कळेल असं बोलशील का?" नितीनला देखील जाणून घ्यायचे होते.


"हो, मी सर्वकाही सांगते. आधी तुम्ही जेवून घ्या." प्लेटमध्ये खिचडी वाढून घेत त्या म्हणाल्या.


ती मऊ मऊ खिचडी बघून नितीनला भरून आले. लहानपणी आईच्या हातची खिचडी त्याला फार आवडायची. दहा वर्षापासून ती खिचडीच काय आईच्या हातचे आणखी दुसरे काहीच खाऊ शकला नव्हता.


आजच्या दिवसावर हसावे की रडावे त्याला कळत नव्हते. मघाची बाबांची आश्वासक मिठी, आता आईने स्वतःच्या हाताने केलेली खिचडी आणि या सर्वांसाठी निमित्त झालेले मधुराचे जीवघेणे दुखणे. त्यात कांताताईंनी मागितलेली तिची माफी. त्याला कशाचा संबंध कशाशी जुळतोय काहीच समजत नव्हते.

ताटात वाढलेली खिचडी त्याने कशीबशी संपवली आणि आई काय सांगतेय ते ऐकायला तयार झाला.


"नितीन, आई जे सांगणार आहे त्यावरून तिला एकटीला जज नको करू. या गुन्ह्यात किंवा खेळात तिच्या बरोबरीने मीही सहभागी आहे. त्यामुळे मधुराला झालेल्या त्रासात मी सुद्धा तेवढाच दोषी आहे."

कांताताईने सुरुवात करण्यापूर्वी केशवरांवानी प्रस्तावना दिली.


"असे गोंधळून जाऊ नका. मी स्पष्टच सांगते." मधुरा आणि नितीनच्या चेहऱ्यावरचा गोंधळ वाचून कांताताई पुढे बोलू लागल्या.


"नितीन, तू आमच्या मनाविरुध्द लग्न केलेस ते आम्हाला आवडले नव्हते. खरे तर आम्हाला मधुरा ही मुलगीच पटली नव्हती. आमचा अहंकार दुखावला गेला. तिच्यासाठी तू आम्हाला सोडलेस त्यामुळे तर आम्ही आणखीनच जास्त दुखावले गेलो. या मुलीपायी आपला मुलगा दुरावला ही सल हृदयात रुतून बसली होती." त्या आवंढा गिळून म्हणाल्या.


"आई, अगं तो भूतकाळ होता. आता तुम्ही आमच्यासोबत आहात ही आनंदाची गोष्ट नाहीये का?" नितीनचा स्वर हळवा झाला होता.


"नितीन, इतके दिवस गेल्यानंतर दहा वर्षांनी अचानक आम्ही तुझ्याकडे का आलो हा प्रश्न तुला कधीच पडला नाही का?" त्यांची नजर नितीनवर खिळली होती.


"तुम्ही माझे जन्मदाते आहात. मग मला हा प्रश्न का पडावा? उलट तुम्ही आलात त्यामुळे मला रादर आम्हा तिघांनाही आनंदच झाला होता." नितीन उत्ततला.


"आम्ही मात्र वेगळेच कारण घेऊन तुझ्याकडे आलो होतो." कांताताई खिन्न हसल्या.


"म्हणजे?"


"मोहित आणि सुमित, तुझे दोन भावंडे. मागील दोन वर्षांपासून त्यांचे वागणे अचानक बदलले. त्यांच्यासोबत त्यांच्या बायकांचे सुद्धा. सुरभी आणि मुग्धा, माझ्या दोन्ही सुना. मला कायम वाटायचे दोन्ही पोरांच्या बायका मी लाखातून शोधून आणल्या आहेत. आम्हा दोघांना त्यांच्याकडुन मिळणारा मान, माझा प्रत्येक शब्द झेलण्याची त्यांची वृत्ती बघून मला सासू म्हणून खूप आनंद मिळत असे.


सोनू आणि मोनू ही नातवंडे देखील आमच्यावर खूप जीव लावत होती. अशात तुझे लग्न झाले. तुला आम्ही नाकारले. तू घर सोडून गेल्याचे दुःख पाठीशी होते पण त्याचबरोबर घरातील इतरांचा आधार त्यामुळे ते दुःख पचवता आले." त्या क्षणभर थांबल्या.


"मग पुढे असे अचानक काय घडले?" नितीनचा प्रश्न उभा राहिला.

अचानक काय घडले असेल? वाचा पुढील भागात.
:
क्रमश:
©®Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*

🎭 Series Post

View all