Feb 23, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

घरसंसार.भाग -६

Read Later
घरसंसार.भाग -६


घरसंसार.
भाग -६

मागील भागात :-

एखाद्या मानसिक ताणामुळे मधुराला त्रास झालाय हे डॉक्टर नितीनला सांगतात. नितीन त्याबद्दल मधुराला विचारतो पण त्यावर ती काहीच सांगत नाही.

आता पुढे.

"पिहू? ती कुठे आहे?" त्याच्या प्रश्नाचे उत्तर न देता ती इकडे तिकडे बघत म्हणाली.


"पिहू घरी आहे आणि तिच्यासोबत आईबाबा आहेत गं. तू नको ना काळजी करू. डॉक्टरांनी तुला अजिबात स्ट्रेस घ्यायचा नाही असे बजावून सांगितले आहे.

मधू कसल्या टेंशनमध्ये आहेस यार. एकदा माझ्याशी शेअर तर करून बघ." बोलताना त्याच्या डोळ्यात पाणी जमा झाले होते.

मधुरा मात्र काही न बोलता डोळे मिटून होती.

*******

"पिहू कुठे आहे गं?" घरी आल्या आल्या केशवरावांनी बायकोला विचारले.


"झोपलीय ती. आईच्या आठवणीत पोर पार कोमेजलीय. बरं, सुनबाई कशी आहे? डॉक्टर काय म्हणाले?" कांताताईची प्रश्नावली सुरु झाली.


"मधुराला दोनचार दिवस भरती ठेवणार आहेत म्हणाले. नितीनची अवस्था बघवत नव्हती गं." रुद्ध स्वरात त्यांनी दवाखान्यात जे घडले ते कांताताईंना सांगितले.


"मी स्वयंपाकाचे बघते. ते आटोपले की पिहूला घेऊन आपण हॉस्पिटलला जाऊया. पोरीला तिच्या आईला भेटायचे असेल ना?"


"आणि तुला? तुला नाही का भेटायचे आहे?" केशवरांवानी त्यांच्याकडे सूचकपणे पाहिले. त्यावर काहीच प्रतिक्रिया न देता कांताताई स्वयंपाकघरात गेल्या.


"कांता, आपण फार चुकीचे वागलो का गं?" स्वयंपाकघरात बायकोजवळ उभे राहून केशवराव विचारत होते.

त्या मात्र काही न बोलता खिचडीचा कुकर लावत होत्या.


"सासूसासरे म्हणून चुकलो का गं आपण? की आईबाबा म्हणूनच चुकलो? आपल्या मुलांना समजून घेण्यात खरंच का गं आपण कमी पडलो?" त्यांनी परत प्रश्न केला.


"सासूसासरे म्हणून ठाऊक नाही परंतु आईबाबा म्हणून आपण आपली सर्व कर्तव्य पार पाडलीत. आपल्याला समजून घ्यायला आपली मुलंच कुठेतरी कमी पडलीत." त्यांच्याकडे एक कटाक्ष टाकून कांताताई उत्तरल्या.


"आपल्याला समजून घ्यायला मुलं कमी पडलीत म्हणजे त्यांच्यावरचे आपले संस्कार कमी पडले असावेत का गं?" ते काहीसे हळवे झाले होते.


"मी खिचडी डब्यात भरली आहे. तुम्ही तुमचे आवरून घ्या आणि पिहूला उठवा. तिचे आवरले की आपण निघूया." निर्विकार चेहऱ्याने कांताताई बाहेर आल्या."पिहू, बाप्पाला नमस्कार कर. म्हणावं मम्माला लवकर बरे कर. बाप्पा छोट्या मुलांचं ऐकतो." केशवरावांसोबत हॉल मध्ये आलेल्या पिहूला कांताताई म्हणाल्या.


"आजी, बाप्पा आपलं म्हणणं खरंच ऐकतो?"


"हो तर. निर्मळ मनाने जो बाप्पाला शरण जातो, त्याचे तो नक्कीच ऐकतो." कांताताईने तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हटले आणि मग समईत एक चमचा तूप टाकून दुपारपासून सुरु असलेल्या दिव्याची अखंड वात सरळ केली.


"बाप्पा, मम्माला लवकर बरे होऊ डे. हवे तर मी फारसा हट्ट करणार नाही. होमवर्क पण पूर्ण करणार. पण मम्माला लवकर घरी येऊ दे." ती मनोभावे हात जोडून उभी होती.

****

"मधुरा, बरं वाटतंय ना गं?" खोलीत आल्या आल्या कांताताईंचा स्वर कानावर पडला.

मधुराने डोळे उघडले. नजरेत काळजीचे भाव घेऊन समोर सासूबाई उभ्या होत्या.


"तुझ्यासाठी छान मऊ अशी खिचडी आणली आहे. ऊठ आणि दोन घास खाऊन घे बघू. सकाळपासून पोटात अन्नाचा कण देखील नाहीये."


नितीन आईकडे एकटक बघत होता. तो घरी असताना एवढ्या प्रेमाने मधुराशी बोलताना त्याने आईला कधी बघितले नव्हते. म्हणजे वाईट असं नाही पण इतके चांगले देखील त्याला अपेक्षित नव्हते.


मधुरा तर चकित झाली होती. सुनबाई शिवाय कधीच हाक न देणाऱ्या सासूबाईंनी तिला चक्क तिच्या नावाने बोलत होत्या शिवाय तिच्यासाठी डबा देखील घेऊन आल्या होत्या.


"आई, सॉरी अहो, माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला. हे डबा वगैरे कशाला घेऊन आलात? इथून कॅन्टीन मधून मागावले असते ना?" सासूकडे भारावून बघत मधुरा म्हणाली.


"रोज आमच्यासाठी एवढं काही करत असतेस मग आज मी तुझ्यासाठी इतकं तर करूच शकते ना? घे, थोडंसं खाऊन घे. नितीन तू सुद्धा खा बाबा."


"पिहू?" मधुराचा स्वर अडखळत होता.

"मम्मा, मी जेवलेय आणि आजीच्या सांगण्यावरून बाप्पाजवळ तुझ्यासाठी प्रार्थना देखील केलीय. आता तू लवकर बरी होशील. हो ना गं आजी?" बोलता बोलता पिहूने कांताताईकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर मंद स्मित होते.


मधुराला हे सगळं नवीन होते. चार महिन्यापासून घरात तळ ठोकलेल्या सासुसासऱ्यांनी एवढी प्रेमळ वागणूक कधी दिली नव्हती. सतत कसला आदेश नाहीतर सूचना सुरु असायच्या.


आजचे संपूर्ण वागणे वेगळे होते. सकाळी दवाखान्यात आले तेव्हा केशवरावांचा धीर देणारा आश्वासक स्पर्श आणि आता कांताताईंची ही काळजी सगळेच नवीन होते. त्यांच्या वागण्यात खोटेपणा जाणवत नव्हता पण खरे वागत असतील याची शाश्वतीही नव्हती. त्यांचे हे वागणे बघून मधुरा बुचकाळ्यात पडली.


खरंच का केशवराव आणि कांताताईंचे वागणे बदलले असेल? की असे वागण्यामागे काही कारण असेल? वाचा पुढील भागात.
:
क्रमश:
©®Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//