घरसंसार. भाग -५

वाचा तिच्या संसाराची कथा

घरसंसार.
भाग -५


मागील भागात :-
छातीत कळ आलेल्या मधुराला मानसिक ताणामुळे हृदयविकाराचा एक छोटा झटका आल्याचे डॉक्टर निदान करतात आणि तिला ॲडमिट करण्याचा सल्ला देतात.

आता पुढे.


"तुमच्या सुनेची आधीची अशी काही हिस्टरी नाहीये आणि तुमच्या प्रेमळ वागण्यावरून घरात काही प्रॉब्लेम आहे, असेही वाटतं नाही. पण एवढं मात्र खरं, की त्यांच्या डोक्याला खूप स्ट्रेस आहे आणि त्याचाच ताण हृदयावर पडलाय.

आशा आहे की औषधाबरोबरच तुमच्या कुटुंबियांच्या मदतीने तुम्ही त्यांना या सिच्यूएशन मधून बाहेर काढू शकाल.

तुम्ही ही औषधं घेऊन या. आपण लागलीच ॲडमिट करून टाकू." केशवरावांच्या हातात औषधांची चिट्ठी देत डॉक्टर म्हणाले.

******

"मधूऽऽ" नितीनने घाबरलेल्या अवस्थेत मधुराला भरती केलेल्या खोलीत येत साद घातली.

चेतनाने फोन करून त्याला बोलावून घेतले होते. त्यापूर्वी मिटिंगमध्ये असल्या कारणाने कांताताईचा कॉल घेऊ शकला नव्हता.

तो आत आला तेव्हा मधुरा शांत झोपली होती. केशवराव तिच्या शेजारच्या खुर्चीवर बसले होते.


"बाबा, मधुरा.." त्याच्या डोळ्यात पाणी उभे राहिले.


"शांत हो. ती ठीक आहे. डॉक्टरांनी केवळ काही दिवसांसाठी भरती केलेय." त्याच्या खांद्यावर हात ठेवून ते बोलत होते आणि ते ऐकता ऐकता नितीनने त्यांना घट्ट मिठी मारली.


"बाबा, मधुला काही झाले तर मी नाही हो जगू शकणार." तो रडतच म्हणाला.


"वेड्या, मला माहित नाही का? इतक्या वर्षांची तुमची सोबत, तुमचे प्रेम सर्वांनाच ठाऊक आहे. विश्वास ठेव, तिला काही होणार नाही." त्याला पाठीवर थोपटत ते म्हणाले आणि नितीनला पुन्हा भरून आले.


लहान असताना काही झाले तरी तो असाच बाबांच्या कुशीत येऊन विसावत होता. प्रत्येक मुलाला आईचा पदर हवा असायचा, हा मात्र वडिलांच्या मिठीत सगळी दुःख मोकळी करायचा. आज इतक्या वर्षांनी पुन्हा त्याच आश्वासक मिठीत तो विसावला होता.


दहा वर्षापासून हिरावलेले हे सुख त्याला आज मिळत होते पण त्यासाठी बायकोला इतका त्रास सहन करावा लागतोय हे त्याला सहन होत नव्हते.


"चेतना? ती कुठे आहे?" त्याला अचानक तिची आठवण झाली. तिनेच तर त्याला फोन करून बोलावून घेतले होते.


"अरे, तिला मी आत्ताच घरी पाठवले. तिची मुलगी आपल्याच घरी आहे. तिलाही तिचे कुटुंब आहे ना?"


"बाबा, तुम्हीही घरी जा. आईसुद्धा काळजीत असेल आणि तुमचीही खूप धावपळ झालीय. हवे तर थोडा आराम करून सायंकाळी पिहू आणि आईला घेऊन या."

त्याचे बोलणे त्यांना पटले. कांताताई स्वतःला दोष देत बसल्या असतील याची त्यांना कल्पना होती. त्यामुळे मुलाचे ऐकून ते घरी जायला तयार झाले. तिथल्या रिक्षावाल्याला नीट पत्ता सांगून ते परत निघाले.

******

"त्यांना कशाचे टेंशन वगैरे आहे का? काही मानसिक ताण?" राउंडवर आलेले डॉक्टर नितीनला विचारत होते. त्यावर त्याने फक्त नकारात्मक मान हलवली.


"असं कसं शक्य आहे? इतक्यात काही वेगळ्या घटना घडल्यात का? ज्याचा त्यांना त्रास होऊ शकतो?"


"त्रास होण्यासारखं नाही पण एक घटना घडलीय. चार महिन्यापूर्वी माझे आईबाबा आमच्याकडे राहायला आलेत. पण मधुरा त्यांचं अगदी मनापासून सर्व करते. तिला त्यांचा त्रास झाला असता तर ती एकदातरी माझ्याशी बोलली असती."


"कदाचित तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून त्यांनी टाळले असेल."


"कदाचित." तो विचार करून म्हणाला.

"तसे छातीत जळजळ वगैरे मागच्या महिन्यापासून सुरु आहे पण साधे पित्त असेल म्हणून आम्ही लक्ष दिले नाही." त्याच्या चेहऱ्यावर अपराधीपणाचे भाव होते.


"हम्म. खूपदा अशी गफलत होत असते. कारण हृदयाचे दुखणेआणि पित्त यांचा त्रास जवळपास सारखा आणि त्याच एरियात होतो, म्हणून आपल्याला तसे वाटते.

आता तुम्ही काळजी करू नका. त्यांना तसा काही धोका नाहीय पण भविष्यात सांगता येत नाही, तेव्हा स्ट्रेस येणार नाही याची काळजी घेणं तुमचं काम आहे."
डॉक्टर त्याला समजावून खोलीच्या बाहेर पडले.


"नितीन." मधुराच्या हाकेने तो तिच्याजवळ आला.


"मधू, काळजी करण्यासारखं फारसं काही नाही म्हणाले गं डॉक्टर. मी किती घाबरलो होतो यार. आणि काय गं? कसला एवढा स्ट्रेस घेतेस? मी घरी नसताना आईबाबा काही बोलतात का तुला ?"

तिचा हात हातात घेत तो विचारत होता. तिच्याबद्दलचे प्रेम आणि चिंता डोळ्यात स्पष्ट दिसत होती.



"पिहू? ती कुठे आहे?" त्याच्या प्रश्नाचे उत्तर न देता ती इकडे तिकडे बघत म्हणाली.


"पिहू घरी आहे आणि तिच्यासोबत आईबाबा आहेत गं. तू नको ना काळजी करू. डॉक्टरांनी तुला अजिबात स्ट्रेस घ्यायचा नाही असे बजावून सांगितले आहे.

मधू कसल्या टेंशनमध्ये आहेस यार. एकदा माझ्याशी शेअर तर करून बघ." बोलताना त्याच्या डोळ्यात पाणी जमा झाले होते.


कसले टेंशन असेल मधुराला? नितीनला ती काही सांगू शकेल का? वाचा पुढील भागात.
:
क्रमश:
©®Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*

🎭 Series Post

View all