घरसंसार भाग -४

वाचा कथा तिच्या संसाराची.

घरसंसार.
भाग-४


मागील भागात:-

मधुराला अचानक झालेला त्रास बघून केशवराव आणि कांताताई घाबरून जातात. त्यांना काय करावे हे सुचत नाही.

आता पुढे.

"अगं, त्याचा फोन लागत नाहीये." मोबाईलकडे हतबल बघत ते म्हणाले. "आता, आपल्यालाच काहीतरी करावे लागेल." परिस्थिती लक्षात घेत ते.


"अहो पण काय करणार? आपली इथे कोणासोबत फारशी ओळखीदेखील नाहीये." काळजीने कांताताईंचा जीव वरखाली होत होता.


"मम्माऽऽ" तेवढ्यात दारात पिहूचा आवाज आला.


"पिहू, मम्माला बरं नाहीये आणि तुझ्या पप्पांचा फोन लागत नाहीये." त्या अजाणत्या जीवाकडे बघून कांताताई रडायला लागल्या.


"अगं, आजी रडू नकोस. मी बघते." लहानगी पिहू मधुराकडे जात म्हणाली.


मधुराच्या चेहऱ्यावरच्या वेदना बघून तिला काय वाटले कुणास ठाऊक पण तिचा मोबाईल घेत तिने दोन घरापलीकडे राहणाऱ्या चेतनाला फोन केला.

"हॅलो, चेतना आँटी. माझ्या मम्माला काहीतरी झालेय. तिला हॉस्पिटलला न्यावे लागेल. प्लीज घरी या ना."

तिच्या एका फोनवर पुढच्या पाच मिनिटात चेतना तिची कार घेऊन दारात हजर झाली.


चेतना म्हणजे सावीची मम्मी. सावी आणि पिहू एकाच वर्गात होत्या. त्यामुळे दोघी मैत्रिणी होत्या आणि त्यांच्यासोबतीने त्यांच्या आया देखील एकमेकांच्या चांगल्या मैत्रिणी झाल्या.


"मधुरा, बरी आहेस ना? काय होतेय?" तिने आत येत काळजीने विचारले.

"अचानक छातीत कळ दाटून आलीय गं आणि आताही दुखते आहे." ती क्षीण आवाजात म्हणाली.


"पोरगी एकदम पार घामाघूम झाली होती." कांताताई म्हणाल्या.

"काकू, तुम्ही मुलींसोबत घरी थांबा. काका, आपण मधुराला घेऊन दवाखान्यात जाऊयात. मला तिचे लक्षण काही ठीक दिसत नाहीयेत." चेतनाने केशवरावांना म्हटले आणि मधुराला उठवत बाहेर घेऊन आली.


एव्हाना काहीतरी गंभीर आहे याची जाणीव मधुराला झाली होती. आपली पर्स घेऊन तिही मुकाट्याने तयार झाली.

"पिहू डॉक्टरांशी बोलल्यावर मी फोन करते बेटा. टेन्शन घेऊ नकोस. काकू पोरींना जेवायला लावा. येतो आम्ही." ती कार सुरु करत म्हणाली.


"आजी, मम्मा ठीक होईल ना गं?" ती गेल्यावर पिहू कांताताईंना बिलगून रडू लागली.


"हो बाळा, तुझ्या मम्माला काहीही होणार नाही. आत चला, मी तुम्हा दोघींना खायला देते." तिला कसेबसे समजावत कांताताई आत घेऊन गेल्या.

*****

"आपल्याला एक इको करावा लागेल." मधुराचा इसीजी रिपोर्ट बघून डॉक्टरांनी सुचवले.


"काय झाले डॉक्टर? सगळे ठीक आहे ना?" इकोचा रिपोर्ट बारकाईने पाहणाऱ्या डॉक्टरांना तिने सांशकतेने विचारले.


"तुमचे हजबंड आले नाहीत का?" प्रतिप्रश्न करत डॉक्टर.


"मी आहे ना. सासरा आहे तिचा. काय झालेय ते तुम्ही मला सांगू शकता." मधुराच्या हातावर हात ठेवत केशवराव म्हणाले.


त्यांचा स्पर्शात तिने कधी न अनुभवलेली एक आश्वासकता होती. त्या स्पर्शाने तिला धीर आला अन डोळ्यात पाणी देखील.


"मिसेस मधुरा, तुम्ही जरा बाहेर थांबता? मी यांच्याशी बोलतो." डॉक्टर तिच्याकडे सूचकतेने पाहत म्हणाले.

केशवरांवानीही तिला इशारा केला. त्यामुळे चेतनासह ती बाहेर येऊन बसली.


"काका, त्यांना एक मायनर अटॅक येऊन गेलाय. तुमच्या सुनेचे वय काही फारसे नाहीय. ऐन पस्तीशीत असा अटॅक येणे ही खरंच एक गंभीर बाब आहे. आपल्याला त्यांना काही दिवस ॲडमिट ठेवावे लागेल आणि प्रॉपर उपचार सुरु करावे लागतील." डॉक्टर त्यांना सांगत होते.


"ॲडमिट? किती दिवसांसाठी डॉक्टर? आणि इतक्या लहान वयात तिला अटॅक कसा काय येऊ शकतो?"


"चार दिवस किंवा जास्तही." डॉक्टरा त्यांना म्हणाले.


"त्यांचे वय तसे लहान आहे. पण आजकाल कोणालाही हृदयाचे त्रास होऊ शकतात. हल्ली तर तरुणाईत हा आजार जरा जास्तच फोफावत आहे.

तुमच्या सुनेची आधीची अशी काही हिस्टरी नाहीये आणि तुमच्या प्रेमळ वागण्यावरून घरात काही प्रॉब्लेम आहे, असेही वाटतं नाही. पण एवढं मात्र खरं, की त्यांच्या डोक्याला खूप स्ट्रेस आहे आणि त्याचाच ताण हृदयावर पडलाय.

आशा आहे की औषधाबरोबरच तुमच्या कुटुंबियांच्या मदतीने तुम्ही त्यांना या सिच्यूएशन मधून बाहेर काढू शकाल.

तुम्ही ही औषधं घेऊन या. आपण लागलीच ॲडमिट करून टाकू." केशवरावांच्या हातात औषधांची चिट्ठी देत डॉक्टर म्हणाले.


चिठ्ठी हातात घेऊन केशवराव उठले खरे पण अनेक विचारांचे मोहळ त्यांच्या डोक्यात उठले होते.


मधुराला ॲडमिट करायला केशवराव होकार देतील का? वाचा पुढील भागात.
:
क्रमश:
©®Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*


🎭 Series Post

View all