घरसंसार. भाग -३

वाचा तिच्या संसाराची कथा.


घरसंसार.
भाग -३

मागील भागात :-
सकाळी सकाळी छातीत दुखत असतानादेखील मधुरा नवरा आणि मुलीचे आवरून सासूसासऱ्यांसाठी दुसरे खायला बनवते.
आता पुढे.

"हा घ्या गरमागरम उपमा आणि सोबत चहादेखील." त्यांच्यासमोर हातातील ट्रे ठेवत ती स्मितमुखाने म्हणाली.

कपाळावर आठी घेऊन सासूबाईने एक प्लेट नवऱ्याला दिली आणि दुसरी स्वतः घेतली.


"काय गं तुझा नाश्ता झाला का?" खाता खाता केशवरावांनी मधुराकडे नजर टाकून विचारले.


"नाही हो बाबा, छातीत जरा जळजळ होतेय. मी नंतर करेन." पाण्याचे ग्लास टेबलवर ठेवत ती स्वयंपाकघर आवरायला निघून गेली.


"कशाला उगाच जास्त स्वयंपाक करून ठेवायचा ना? वेळेवर काही करायला आजकालच्या पोरींना खूप जीवावर येत असते आणि मग असली दुखणी मागे लावून घेतात. आमच्या वेळी नव्हतं बाई असलं काही." ती आत वळताच कांताताई नवऱ्याला म्हणाल्या.


"जाऊ दे गं. आपल्याला काय? आपल्याला जे हवं ते वेळेत मिळतेय ना, मग झालं."


"हो, ते आहेच म्हणा. तुमचे झाले असेल तर तेवढा टीव्ही सुरु करा. रात्रीची मालिका नीट कळली नाही, परत बघायची आहे. खुर्चीवर रेलून बसत सासूबाईंनी नवऱ्याला ऑर्डर सोडली.


"बघ. आता दिवसभर तीन तीन वेळा रिपीट बघितल्यावरही रात्री हातातील रिमोट सोडू नकोस." तिच्या हातात रिमोट देत ते.


"बघू द्या हो. त्या मालिकेतल्या सुना बघता ना? कशा त्यांच्या सासूच्या हातात असतात, त्यांना बघून तेवढेच आपले समाधान. नाहीतर आपल्या सुना." काहीतरी आठवल्यासारखे त्यांनी डोळ्याला पदर लावला.


*****

"सूनबाई, जेवायची वेळ झाली हो." दोन तासाने परत केशवरावांची ऑर्डर आली.


"हो बाबा, आलेच." जेवणाची भांडी घेऊन येत तिचा आवाज आला.


"आज एकच भाजी? इतक्यात दोन दोन भाज्या खायची सवय झाली म्हणून विचारतेय." कांताताई ताटातील पनीर भुर्जीकडे बघून नाक वाकडे करत म्हणाले.


"हो, मला जरा अस्वस्थ वाटत आहे, म्हणून जास्त स्वयंपाक केला नाही. साधा वरणभात आणि चपातीसोबत भुर्जी केलीये. पिहूला सुद्धा आवडते, म्हणून तेवढंच." दोघांचे ताट वाढताना ओठावर उसने हसू घेऊन ती म्हणाली.


"आई, काही लागले तर वाढून घ्याल ना तुम्ही? मी जरावेळ पडते."


"अगं, मग तुही चार घास खाऊन घे ना." केशवराव एक नजर बायकोकडे टाकून मधुराला म्हणाले.


"नाही, पिहू आली की तिच्यासोबत बसेन. तसेही आत्ता काही खायची इच्छा नाहीये." ती वळत म्हणाली. तिच्या डोळ्यातील थेंब अलगद मलुल झालेल्या चेहऱ्यावर अलगद उतरले.


पिहू शाळेत जायला लागल्यापासून तिचे तेच रुटीन होते. साकाळचा नाश्ता झाला की दुपारी लेक शाळेतून आल्यावर तिच्या सोबत गप्पा मारत दोघी मिळून जेवत असत. सासूसासरे आल्यानंतरही दुपारच्या जेवणाचे तिचे रुटीन बदलले नव्हते त्यामुळे त्या दोघांनी तिला आग्रह केला नाही.


ती आत जायला निघाली आणि टेबलवर असलेल्या ग्लासला धक्का लागून तो पडल्याचा आवाज झाला.

"अगंऽऽ " कांताताईच्या आवाज आला आणि त्यापाठोपाठ 'धप्प' असा खुर्ची खाली पडण्याचा आवाज झाला. मधुरा छातीवर हात ठेवून पडण्याच्या बेतात होती.


"सूनबाईऽऽ" केशवराव ताट बाजूला सारत उठले पाठोपाठ कांताताईही तिच्याजवळ आल्या.


केशवरावांनी तिला खुर्चीवर बसवले. तिच्या सर्वांगाला दरदरून घाम फुटला होता.

"काय झाले? कांता, पाणी.. पाणी दे बघू."

कांता तिच्या जवळ येऊन छातीला चोळू लागली. मधुराला श्वास घ्यायला त्रास होत होता.


"सूनबाई, थोडे मोठयाने खोकलण्याचा प्रयत्न कर. अहो तुम्ही नितीनला फोन करून कळवा ना. मला फार भीती वाटत आहे." मधुराची स्थिती बघून कांताताईंच्या डोळ्यात पाणी आले.


"अगं, त्याचा फोन लागत नाहीये." मोबाईलकडे हतबल बघत ते म्हणाले. "आता, आपल्यालाच काहीतरी करावे लागेल." परिस्थिती लक्षात घेत ते.


"अहो पण काय करणार? आपली इथे कोणासोबत फारशी ओळखीदेखील नाहीये." काळजीने कांताताईंचा जीव वरखाली होत होता.


या कठीण परिस्थितीत केशवराव आणि कांताताई काही करू शकतील का? की मधुराला कसलीच मदत मिळू शकणार नाही? वाचा पुढील भागात.
:
क्रमश:
©®Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*

🎭 Series Post

View all