घरसंसार. भाग-२

वाचा एका संसाराची कथा


घरसंसार.
भाग - दोन.

मागील भागात आपण पाहिले की एक गृहिणी असलेल्या मधुराच्या छातीत सतत दुखत असते पण घरच्या रहाटगाडग्यात ती दुखणे बाजूला सारून कामाला जंपलेली असते.
आता वाचा पुढे.

"पिहू, शाळेत नीट लक्ष द्यायचे, टिफिन पूर्ण फिनिश करायचा बरं. बाय, एंजॉय युअर डे." बसमध्ये चढलेल्या लेकीला बस सुरू होईपर्यंत ती सूचना देत होती.
बस दिसेनाशी झाली आणि तिच्या छातीत पुन्हा दाटल्यासारखे झाले.

'हे काय? पुन्हा त्रास होतोय, आता ना मोजकाच स्वयंपाक करत जाते म्हणजे शीळे तरी खावे लागणार नाही.' स्वतःशी बोलत ती घरात पोहचली.


"सूनबाई, अगं आमचा चहा नाश्ता तयार आहे ना? तेलकट वगैरे असेल तर नको देत जाऊ गं बाई. या वयात सोसवत नाही आता." ती आत पाय ठेवत नाही तोच हॉलमध्ये बसलेले सासरेबुवा तिला हाक देत म्हणाले.


"हो, बाबा. छान लुसलुशीत पोहे केलेत. गरम करून देते तुम्हाला." स्वयंपाकघरात वळत मधुरा उत्तरली.


"अगं, पोहे कशाला केलेस? तुझ्या सासूला नाही आवडत. आमच्यासाठी नरम नरम उपमा केलास तरी चालेल." सासरेबुवांनी म्हणजे केशवरावांनी ऑर्डर सोडली.


"बरं." म्हणून तिने उपम्यासाठी रवा भाजायला घेतला.

'बघितलंत का पोहयांनो तुम्हाला आता माझ्याच पोटात गडप व्हायचे आहे बरं.' बाजूच्या कढईतून डोकावणाऱ्या पोह्याकडे बघून तिला उगाच हसू आले.


हे असे खूपदा व्हायचे. सासूबाई आणि सासरेबुवांना पोहे केले तर उपमा हवा असायचा आणि उपमा केला तर मग फोडणीच्या शेवया. कधी इडली केली तर डोशांचा हट्ट आणि डोसे केले तर वडासांबार का केला नाही हा प्रश्न.


मधुरा आणि नितीनच्या लग्नाला दहा वर्षांचा काळ लोटला होता. नितीन म्हणजे त्याच्या घरातील शेंडेफळ. म्हणून त्याच्या लग्नाबद्दल त्याच्या आईबाबांनी खूप चित्र रंगवले होते. प्रत्यक्षात मात्र नितीनने त्यांच्या जातीबाहेर असलेल्या मधुरासोबत गाठ बांधण्याचा निर्णय घेतला.
त्याच्या निर्णयाने त्याचे आईबाबा फारच दुखावले. 'लग्नानंतर या घरात तुम्हाला थारा नाही' म्हणून नव्या सुनेला घरात प्रवेश देखील नाकारला.


मधुरा नितीनचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते. आज ना उद्या घरचे स्वीकारतील या आशेवर त्यांनी दुसऱ्या शहरात आपला संसार उभा केला. दोन वर्षात पिहूच्या रूपाने घरात छोटी पाऊलं घरभर फिरू लागली.


सुरुवातीला नोकरी करणाऱ्या मधुराने पिहूच्या आगमनानंतर मात्र स्वतःला पूर्णवेळ घरात झोकून दिले. तिघांचे त्रिकोणी कुटुंब समाधानाने राहत होते आणि अशातच एक दिवस नितीनने घरात बॉम्ब टाकला.


"मधू, आईचा फोन होता. ती दोघं इकडे आपल्याकडे येणार आहेत. काही दिवसांसाठी." त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडत होता.


जवळपास दहा वर्षांपासून आईबाबांशी बोलणे सुद्धा झाले नव्हते आणि आता ते त्यांच्याकडे येणार होते. त्याचा आनंद बघून मधुरा देखील सुखावली होती. आपल्यामुळे त्याचे घर त्याला दुरावले याची टोचणी तिला सतत लागली असायची. तसे तिच्या आईवडिलांनी देखील तिला त्यांच्या आयुष्यातून वजा केले होते. त्यामुळे तिलाही वडिलधाऱ्यांच्या प्रेमाची आस होती आणि म्हणूनच सासुसासऱ्यांच्या आगमनाने तिला आनंद झाला होता.


ती आनंदी होती. सासूसासऱ्यांशी प्रेमाने वागून त्यांचे संबंध सुधारावेत असे तिलाही मनोमन वाटत होते. तिचे प्रयत्न त्या दिशेने चालू होते आणि म्हणूनच त्यांचे बोलणे मनावर न घेता ती सर्व ऐकून घेत होती.


"उपमा मिळेल का आज? नाहीतर असू दे बाई, किमान चहा तरी ओत आमच्या पुढ्यात." प्लेटमध्ये उपमा वाढून त्यावर कोथिंबीर पेरत असताना कांताताईंचा, तिच्या सासूचा आवाज मधुराच्या कानावर आदळला आला तशी लगबगीने ती बाहेर आली.


"हा घ्या गरमागरम उपमा आणि सोबत चहादेखील." त्यांच्यासमोर हातातील ट्रे ठेवत ती स्मितमुखाने म्हणाली.

कपाळावर आठी घेऊन सासूबाईने एक प्लेट नवऱ्याला दिली आणि दुसरी स्वतः घेतली.


मधुराच्या प्रयत्नांना येईल का यश? त्यांच्यातील नाते होतील का व्यवस्थित? वाचा पुढील भागात.
:
क्रमश:
©®Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*

🎭 Series Post

View all