घरसंसार. भाग -१

कथा तिच्या संसाराची


घरसंसार.
भाग -१

"आँऽऽ, आई गंऽऽ"
छातीवर हात ठेवून मधुरा कळवळली तसा नितीन, तिचा नवरा धावतच जवळ आला.


"काय गं? त्रास होतोय का काही?" त्याने काळजीने विचारले.


"हो रे, थोडं छातीत दुखतेय." वेदनेच्या स्वरात ती उत्तरली.


"हल्ली तुझे हे नेहमीचेच झालेय गं. कशाला उरलेले शिळे अन्न वगैरे खात असतेस? मग हा असा ॲसिडिटीचा त्रास मागे लागतो. जा, थोडा आराम कर."

"आराम काय रे? साधी ॲसिडिटीच आहे की. कोमट पाण्यात लिंबाचा चमचाभर रस मिसळवून पिते. मग बरे वाटेल. आराम करत राहिले तर तुझा आणि पिहूचा टिफिन कसा रेडी होईल बरं?"

बोलता बोलता तिने गॅसवर पातेले ठेवून पाणी गरम देखील केले आणि लिंबू पिळून पाणी प्यायली देखील.


"जा, तू तुझं आवर. मी पिहूला बघते." तिच्याजवळ उभ्या असलेल्या नितीनला तिने आवरायला पिटाळले.

तोही निघून गेला. काही वेळ थांबला असता तर ऑफिसमधल्या लेटमार्कची भीती होतीच.


"पिहू, ऊठ रे राजा. शाळेत जायचंय ना माझ्या बबडीला? चला चला पटापट आवरा." तिच्या लाडक्या कन्येला लाडेलाडे उठवण्याचा मधुरा प्रयत्न करत होती.


"मम्मा, पाच मिनिटं झोपू दे ना गं." आठ वर्षांची पिहू चादर अंगाशी घट्ट गुंडाळत म्हणाली.


"नाही हं बाळा, उशीर झाला तर स्कुलबस निघून जाणार हं. मग तुलाच टिचरचा ओरडा पडेल. माझ्या बबडीला कुणी ओरडले तर आवडेल का?"

मधुरा पिहूच्या अंगावरची चादर बाजूला करत म्हणाली. खरे तर अशी गाढ झोपलेल्या लेकीला उठवायला तिला रोजच जीवावर यायचे. पण पर्याय नव्हता.


"हं, उठतेय गं आणि काय गं मम्मा? मला बबडी नको ना म्हणूस. मी आता मोठी होतेय ना?" उठल्याबरोबर पिहू तिच्याकडे तक्रार करत म्हणाली.


"नाही म्हणणार बबडी, झालं तर? आता पळा आणि
आवरा. उशीर होईल." चादरेची घडी घालत मधुरा हसली.

"मधुराऽऽ माझा रुमाल."

"मम्माऽऽ मला नाश्ता."

"अगंऽऽ माझं वॉलेट कुठे दिसत नाहीये."

"मम्माऽऽ माझी वेणी गुंफुन दे ना."

नवऱ्या आणि मुलीच्या आवाजाने हिची नुसती धांदल उडत होती.


"काय रे? सगळ्या वस्तू जागेवर असतात तरी तुला कसे दिसत नाही? " नितीनच्या हातात वॉलेट कोंबत ती म्हणाली.


"दिवसभर तू माझ्या मनात असतेस, पण घरी आल्यावर तुला बघितल्याशिवाय चैन पडत नाही तसे या वॉलेटचे आहे. तुझ्या हाताने घेतल्याशिवाय त्यालाही करमत नाही. चल बाय, येतो."

तिच्या गालावर ओठांची मोहोर उमटवून तो निघून गेला. या लगबगीत त्याच्या ओठांचा होणारा स्पर्श तिलाही दिवसभर पुरायचा. तो गेल्यावरही क्षणभर ती त्याच विश्वात हरवली.

"मम्मा, माझी वेणीऽऽ"

लेकीच्या आवाजाने नितीनला विसरून ती लगेच तिच्या दिमतीला हजर राहिली. बाहेरून स्कुलबसचा हॉर्न ऐकू येत होता.

"बाय मम्मा." पिहू पळत बसकडे गेली.


"पिहू, शाळेत नीट लक्ष द्यायचे, टिफिन पूर्ण फिनिश करायचा हं. बाय, एंजॉय युअर डे." बसमध्ये चढलेल्या लेकीला बस सुरू होईपर्यंत ती सूचना देत होती.

बस दिसेनाशी झाली आणि ती घराकडे वळली तर परत तिच्या छातीत दाटल्यासारखे झाले.मधुराला वारंवार होणारा त्रास एखाद्या मोठया आजाराला निमंत्रण तर देणार नाही ना? वाचा पुढील भागात.
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
******

🎭 Series Post

View all