भाग -१३(अंतिम भाग )
मागील भागात :-
हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाल्यानंतर चेतना मधुराला पार्लरमध्ये नेऊन छान तयार करून घरी पाठवते. घरी गेल्यावर मधुरा आणि नितीनला एक सरप्राईज मिळते.
आता पुढे.
"बाहेरचा तेवढा दिवा सुरु आणि घरात अंधार करून दरवाजा लॉक न करता सर्व मंडळी गेली तरी कुठे?" स्वतःशीच बडबडत मधुराने घरातील लाईटचे बटण ऑन केले.
"हॅपी ॲनिव्हर्सरीऽऽ" खोलीत लाईट लागले तसे एकासुरात ओरडत सर्वच बाहेर आले.
मधुरा आणि नितीन तर आ वासून हॉलकडे बघत होते. त्यांच्या घराच्या हॉलचा पूर्ण कायापालट झाला होता. लाल काळ्या रंगाच्या फुग्यांनी घर सजले होते आणि भिंतीवर मध्ये हॅपी ॲनिव्हर्सरीचे स्टिकर लावले होते.
"तुम्हा दोघांनाही लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा." आरतीचे ताट घेऊन येत कांताताई म्हणाल्या तसा मधुराचा कंठ दाटून आला.
"आई, या धकधकीत आजचा दिवस तर मी विसरूनच गेले होते. तुम्ही सर्वांनी मात्र आठवणीने लक्षात ठेवला. इतक्या वर्षात मला मिळालेले हे सर्वात बेस्ट गिफ्ट आहे." ती रडतच म्हणाली.
"अगं पुरे, पुरे. अजून तर आम्ही गिफ्ट सुद्धा दिले नाहीये. ते मिळाल्यावर मग तुझी प्रतिक्रिया दे." कांताताई गोड हसल्या.
"नितीन, मधुरा इथे बसा बघू. आज तुमच्या स्पेशल दिवस आहे. आज फक्त आनंद, डोळ्यात पाणी नको." सुरभी आणि मुग्धा त्या दोघांना सोफ्यावर बसवत म्हणाल्या.
दोघे बसल्यावर कांताताई, मुग्धा आणि सुरभीने त्यांचे औक्षण केले. त्या दोघांनीही मोठ्यांचे आशीर्वाद घेतले. घर अगदी गजबजून गेले होते.
"आता वेळ आली आहे गिफ्टची. विहीणबाई."
कांताताईंनी आत बघत आवाज दिला. पुढच्या क्षणी आतल्या खोलीतून विमलताई आणि हेमंतराव बाहेर आले.
"आई बाबा?" मधुराचा तिच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता.
विमलताईंनी तिला प्रेमाने मिठीत घेतले. त्यांच्याही डोळ्यातून पाणी वाहत होते. हेमंतरावांनी तिला जवळ घेत डोक्यावरून हात फिरवला. त्या दोघांना बघून इतकी वर्ष काळजात रुतलेली सल बाहेर आली होती. तिच्या डोळ्यातील पाणी थांबता थांबत नव्हते. ते दृश्य बघून तिथल्या सर्वांचे डोळे पाणावले.
"सूनबाई, लग्नाच्या वाढदिवसाची भेट कशी वाटली?" केशवराव जवळ येत विचारते झाले.
"बाबा, शब्दच नाहीत. आईबाबा मला परत मिळतील ही आशा मी केव्हाच सोडली होती. केवळ तुमच्या दोघांमुळे हे शक्य झाले. थँक यू सो मच. खरं तर 'थँक यू' हे शब्दही अपुरे आहेत." ती अश्रू पुसत म्हणाली.
"आम्ही इथे आलो तेव्हाच तुझ्या डोळ्यातील सल आम्हाला दिसली होती. तुझ्यावरचा राग मावळायला लागला तसा तुला तुझ्या आईबाबांशी भेट घडवून द्यायचे पक्के केले.
मागच्या महिन्याभरापासून रोज फोन करून आम्ही दोघं त्यांचे विचारपरिवर्तन करण्याचे काम करत होतो. त्यात फारसे यश आले नाही पण तुला आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याने सर्वांनाच झटका बसला.
आपल्या लेकीला बघण्याची, भेटण्याची त्यांची तळमळ वाढली पण मी कसेतरी त्यांना थोपवून धरले. आज तुमचा खास दिवस ना? मग या मंगलप्रसंगी तुमची भेट व्हावी म्हणून डॉक्टरांना विनंती करून तुझाही दवाखान्यातील एक दिवस वाढवून मागितला." कांताताई सांगत होत्या.
"आई, खरंच खूप ग्रेट आहेस गं तू. कसं जमतं गं तुला?" नितीनने त्यांना घट्ट मिठी मारली.
तिनेही दोघांना जवळ घेतले. मोनूने तो क्षण अलगद कॅमेऱ्यात टिपला.
आज घरात आनंदोत्सव होता. कांताताई आणि विमलताईंनी मिळून साग्रसंगीत स्वयंपाक केला होता. सगळे कुटुंबीय आणि चेतनाचे कुटुंब मिळून सगळ्यांनी जेवणाचा आस्वाद लुटला.
*******
"सुनबाई आम्ही आता निघतो. एकमेकांची काळजी घ्या. तुमचे एकमेकांवरचे प्रेम आणि विश्वास असाच राहू द्या."
चार दिवसांनतर सर्वांनी आपापल्या बॅग पॅक केल्या होत्या. कांताताई आणि केशवरावांच्या बरोबरीने मधुराचे आईवडील देखील जायच्या तयारीला लागले.
"आईबाबा, तुम्ही येण्यापूर्वी आम्ही सुखी होतो. तुम्ही आल्यानंतर तुमच्या वागण्याने नकळत मला त्रासही झाला पण तुमच्यामुळेच या वास्तूत आनंदाचे झाड उभे राहिले. तुम्ही कायमचे आमच्यासोबत रहा ना. आम्हाला खरंच छान वाटेल."
"हो आजी, नको जाऊ ना गं." पिहूने बिलगून कांताताईला विळखा घातला.
"अगं बाळा, आम्ही नेहमी येत राहूच. तूही येत रहा." तिची पापी घेत कांताताई म्हणाल्या.
"सुनबाई, हे तुझे घर आहे आणि हा संसारही तुझाच आहे. इतकी वर्ष माझ्या मुलाची सहचारिणी होऊन तुमचं नातं फुलवलंस. आता इथे आमची लुडबुड नको. हो, मात्र तुम्हाला आपल्या घराचे दरवाजे सदैव उघडे आहेत बरं. तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तिथे येऊ शकता, तेही घर तुमचेच आहे." त्यांनी मधुराच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवला.
सुमित, मोहित, सुरभी, मुग्धा, सोनू, मोनू सगळ्यांच्या चेहरे पडले होते. या चार दिवसात सर्वांनी मिळून केलेल्या धमालीत गेल्या दहा वर्षांचा राग, आकस सगळाच नाहीसा झाला होता. तिथून निघायला मन धजावत नव्हते पण परतीचा प्रवासही आवश्यक होता.
डोळ्यात पाणी घेऊन त्यांना निरोप द्यायला नितीन मधुरा आणि पिहू दारात उभे होते.
आत्ता जरी सगळे जाणार होते तरी पुन्हा परत भेटण्याच्या वाटा आता सर्वांसाठी खुल्या झाल्या होत्या.
**समाप्त.**
©®Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
प्रिय वाचकहो, स्पर्धेच्या कौटुंबिक फेरीतील ही कथा कशी वाटली हे सांगायला विसरू नका. कारण तुमचा एक अभिप्राय पुढे लिहायला नवा उत्साह देऊन जातो.
©®Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
प्रिय वाचकहो, स्पर्धेच्या कौटुंबिक फेरीतील ही कथा कशी वाटली हे सांगायला विसरू नका. कारण तुमचा एक अभिप्राय पुढे लिहायला नवा उत्साह देऊन जातो.
धन्यवाद!