घरसंसार. भाग -१०

वाचा तिच्या संसाराची कथा.
घरसंसार.
भाग १०

मागील भागात :-

दवाखान्यात मधुराला भेटण्यासाठी अचानक तिच्या सासरची सर्व मंडळी येतात, ते बघून ती गोंधळते. तर कांताताई त्यांच्यावर रागावते.

आता पुढे.


"जे हवे होते ते मिळालेच कुठे? उलट त्याचाच तर फैसला करायला आम्हाला इथवर यावं लागलं." मोहित तुच्छतेने हसत म्हणाला.


"इथे भांडू नका. मधुरा पेशंट आहे हे तुम्हाला कळत नाहीये का?" कांताताईंच्या स्वरात ओलसरपणा होता.


त्यांच्या बोलण्यावर चौघांनीही एकमेकांकडे सूचकपणे पाहिले आणि नंतर मधुराकडे नजर टाकली.

"हिच्यामुळेच तर आम्हाला इथवर यावे लागले." तिच्यावर नजर रोखून सुरभी म्हणाली.


"म्हणजे?" मधुराने घाबरत विचारले.


"ए बाई, किती गं घाबरतेस तू? जे खरं आहे ते सांगून टाका नाहीतर हिचा इथला मुक्काम आणखी वाढायचा." मुग्धा खो खो करून हसायला लागली तसे तिच्यासोबत त्या तिघांनीही हसणे सुरु केले.


"मुग्धा, सुरभी काय चाललेय तुमचे? मधुरा हार्टची पेशंट आहे याचे तरी तुम्हाला भान आहे का?" कांताताई गरजल्या तशी दोन क्षण निरव शांतता पसरली आणि मग परत चौघे खळखळून हसायला लागले.


"आई, सॉरी अगं." हसणे थांबवत मोहित कांताताईंच्या गळ्यात हात घालत म्हणाला.


"हो आई, खरंच सॉरी." सुमितदेखील दुसऱ्या बाजूने आला.

"आई आम्ही सुद्धा सॉरी." सुरभी आणि मुग्धाही जवळ आल्या.

त्यांचे काय चाललेय याचा कांताताई सोबत केशवराव आणि मधुराला अंदाज येईना.


"सुमित, मोहित तुम्ही काय बोलत आहात ते जरा स्पष्टपणे सांगाल का?" केशवरावांचा गंभीर आवाज आला तसे तिथले वातावरण देखील गंभीर झाले.


"बाबा, तेच सांगायला तर आम्ही इथे आलो आहोत. खरं तर हे आधीच सांगायचे होते पण योग्य वेळेची वाट बघत होतो आणि कदाचित योग्य वेळ आज आहे." सुमित शांतपणे म्हणाला.


"मधुरा, तुझी जी अवस्था झालीय त्याला अप्रत्यक्षपणे आम्ही सुद्धा जबाबदार आहोत. आईंजवळ आम्ही वेगळे होण्याचा हट्ट केला, तुझ्याबद्दल त्यांचे मन कलूषित केले आणि म्हणूनच आईबाबा तुला छळायला इथे आले." सुरभी मधुराचा हात पकडून म्हणाली.


"पण आई, आमचा हेतू वाईट नव्हता. तुमचे आणि मधुरा नितीनचे संबंध सुधारावे म्हणून आम्ही असे वागलो.आणि बघा आमचा प्लॅन वर्क झाला." मुग्धा मधुराच्या दुसऱ्या बाजूने येत म्हणाली.

"प्लॅन?"

"हो आई, आम्ही जे वागलो ते सर्व प्लॅनचा भाग होता. नितीन आमचा लहान भाऊ. तो असा दुरावला त्याचा त्रास आम्हाला झाला तेव्हा तो तुम्हालाही झाला असावा ना? खूप वर्षापासून त्याला आपल्या घरी आपल्या लोकात परत आणायचे होते, पण कसे ते सुचत नव्हते. त्याची आठवण आम्हा सर्वांना छळत होती. आमचा भाऊ, या दोघींचा दीर आणि मुलांचा लाडका काका परत हवा होता." बोलता बोलता सुमितचे डोळे पाणावले.


"सुमित?" कांताताई आणि केशवराव दोघे एकत्रच म्हणाले.


"आईबाबा तुम्हाला आठवते? मागे आपल्या व्यवसायात खूप मोठा फटका बसला होता तेव्हा नितीननेच आपल्याला मदत केली. आपला सोनू? त्याला चांगल्या कॉलेजमध्ये सुद्धा त्यानेच ॲडमिशन मिळवून दिली. मुख्य म्हणजे हे सगळे करण्यासाठी मधुराने त्याला साथ दिली." मोहित हळवे होत म्हणाला.


"या सगळ्यांची परतफेड करायची म्हणून तुम्हाला एकत्र आणायचा चंग बांधला. तो तडीस नेण्यासाठी मग वाटण्या, वेगळे होण्याचे नाटक केले. खरं तर ते सारंच खोटं होते. आई, आम्ही दोघी इतकी वर्ष तुमच्या तालमीत तयार झालो होतो, मग आम्ही असे स्वार्थी कसे वागू ना?" मुग्धा कांताताईंकडे बघून म्हणाली.


"पण आजी, यांची ॲक्टिंग इतकी भारी होती की तुला ते खरंच वाटलं. मधुरा काकींबद्दल तुझ्या मनात आधीच राग होता, त्यात दोघींनी पुन्हा तेल ओतण्याचे काम केले आणि तुम्ही दोघं इकडे आलात." सोनू, कांताताईंचा मोठा नातू आत येत म्हणाला.


"म्हणजे सोनू तुसुद्धा यांच्यात सामिल होतास?" केशवरावांनी विचारले.


"सॉरी आजोबा, पण दुसरा पर्याय नव्हता ना? आम्ही असे वागलो नसतो तर आमचा लाडका काका आम्हाला परत मिळाला नसता आणि मधुरा काकू इतक्या चांगल्या स्वभावाची आहे हे तुम्हाला कधीच कळले नसते. म्हणून ही उठाठेव!

आणि हो, या सगळ्यांचा सूत्रधार मीच होतो बरं का."


"हो रे माझ्या लाडोबा. तुझ्याएवढा हुशार कोणीच नाही बरं. सोनू तुझे हे नाटक चुकीचे असले तरी त्याचा परिणाम मात्र चांगला झाला. थँक यू बाळा." कांताताई त्याला प्रेमाने कुरवाळत म्हणाल्या.


"चला, पिहू तुला कळलं का?अंत भला तो सब भला. पण दादा तू हे सर्व आधीच करायला हवे होतेस. बघ ना आपली ही लाडकी बहीण तब्बल आठ वर्षानंतर आपल्याला भेटतेय. केवढी गोड आहे रे ही. मला तर फार आवडली आणि अर्ध्या तासात आमची गट्टी सुद्धा जमली." पिहूसोबत मोनू म्हणजे मोहितचा मुलगा आत प्रवेशत म्हणाला.


नितीनसुद्धा तिथे आला होता. मधुरा आणि तो आपल्या कुटुंबियांना पहिल्यांदा असे एकत्र बघून खूप आनंद होत होता.


"नितीन, आम्ही दोघे या सर्वांना घेऊन घरी जातो. तू मधुराजवळ थांब. तसेही या सर्वांची मला चांगलीच खबर घ्यायची आहे." कांताताईंनी आदेश सोडला.


आई आम्हीपण येतो ना. तसेही डॉक्टर तर सुट्टी द्यायला तयार होते." मधुरा लहानसा चेहरा करून म्हणाली.


"नाही बाळा, तू एक दिवस इथेच थांबायचं. मग उद्या घरी यायचेच आहे." कांताताई तिला प्रेमाने समजावून तिथून निघून गेल्या.

घरी गेल्यावर त्या चौघांना कांताताई काही शिक्षा देतील का? वाचा पुढील भागात.
:
क्रमश:
©®Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*

*******

🎭 Series Post

View all