Mar 01, 2024
सामाजिक

घरपण.. घराचे!!

Read Later
घरपण.. घराचे!!

घरपण.. घराचे!!

*********


"काय हा पसारा? वैभव तुला माहीत आहे ना की असलं मला नाही आवडत."

बेडवरचा टॉवेल त्याच्या अंगावर फेकत जयश्री म्हणाली.

"नाही आवडत तर तू आवर ना? मला ऑफिस ला निघायला उशीर होतोय." वैभव.

" हो का? तुझे ते ऑफिस आणि मी कामाला जात नाही का? मलाही उशीर होतोय." 

जया फणकाऱ्याने बाहेर आली. तिच्यामागोमाग तोही आला.

"तुझा डबा भरून ठेवलाय. उद्यापासून आपला डबा न आपण पॅक करत जा." ती.

" नकोय मला. मी कॅन्टीनमध्ये खाऊन घेईन." तो घुश्यातच कार मध्ये जाऊन बसला.


तिच्यासाठी त्याचे हॉर्न वाजवणे सुरु होते पण ती काही बाहेर आली नाही.

त्याचं डबा न घेऊन नं जाणं तिच्या जिव्हारी लागलं होतं. तो निघून गेल्यावर ती रिक्षाने आपल्या ऑफिसला गेली.

कामात लक्ष नव्हतंच तिचं. सारखा वैभव डोळ्यासमोर येत होता. त्याचं चिडणं, घरातला पसारा.. आणि ओट्यावर तसाच असलेला डबा! 'रात्री त्याला तेच खाऊ घालेल.' असा विचार मनात डोकावून गेला.


"काय झालंय? आज अगदी डाउन दिसतेस." शालिनी तिच्या सहकारिणीने विचारण्याचा अवकाश की तिच्या डोळ्यातून टपोरे थेंब गालावर ओघळू लागले.

"परत भांडलात की काय?" तिच्याजवळ येत शालिनी.

तसा तिने आजचा इतिवृत्तांत सांगितला.

"शालू आम्ही वेगळं घर घेतलं ते चुकले का गं? " शेवटी डोळे पुसून तिने विचारले.

"हे मी कसं सांगावं? पण घरात मोठी माणसं असली की बरं असतं गं. माझेच बघ ना, इथे यायचे म्हटले तरी रोज वेळेत सगळे नाही आवरून होतं. मग उरले सुरले सासूबाई आवरतात की. तेवढाच आपल्याला आधार."

" तुझ्यात नी सासूमध्ये कुरबूरी होत नाहीत का गं? "

" होतात ना. पण त्या कुरबूरींना किती महत्व द्यायचे ते आपल्याला कळायला हवे. प्रेमाने सगळं जिंकता येतं आणि काय ना गं तीही शेवटी आपलीच माणसं ना? आपल्याला काही बरंवाईट झालं तर त्यांनाही कुठेतरी त्रास होतोच की.

एक सुचवू? आज ना जरा लवकर घरी जा. वैभवच्या आवडीचे खायला बनव आणि मग एकत्र बसून जरा बोला."

आपला डबा बंद करून शालिनी उठली. लंच ब्रेक संपला होता.


******


"काय रे वैभ्या, वहिनीशी परत भांडलास का?" त्याच्याकडे डबा नाही हे बघून राघवने विचारले.

" हो रे, नेहमीचेच झाले आता. लहान लहान गोष्टीवरून सतत खटके उडत असतात. कंटाळलो रे मी आता. "

"हूं !" राघव.

" नुसता हूं काय करतोस यार! आधी आईबाबांसोबत एकत्र राहायचो तेव्हाही भांडणं व्हायची आता वेगळे आहोत तेव्हाही तेच. काहीतरी सोल्युशन असेल ना?" तो.

"सोल्युशन तर प्रत्येक प्रॉब्लेम वर आहे मित्रा! गरज आहे तुम्हा दोघांना एकत्र बसून ते सोल्युशन शोधण्याची. मी तुला फक्त एक सुचवू शकतो."

"काय?"  उत्सुकतेने वैभव.

"जाताना वहिनीसाठी गजरा घेऊन जा आणि त्यांच्या आवडीच्या जेवणाचे पार्सल सुद्धा!"

"अरे तिला गजरा नाही आवडत रे आणि जेवणाचे पार्सल कशासाठी?"

"आज आवडेल रे! आणि पार्सल बद्दल म्हणशील तर सकाळचा डबा तुला आता खायला लागू नये म्हणून!" हसून राघव.

*****

जयश्री लवकर परतली. घर तसेच होते जाताना सोडून गेलेले.. अस्त्याव्यस्त!

तिने एक सुस्कारा सोडला आणि आधी घर आवरले. सगळ्या वस्तू जिथल्या तिथे ठेवल्यावर तिलाही जरा हायसे वाटले.

स्वयंपाक घरात जाऊन मस्त आलं घातलेला चहा उकळायला ठेवला. ओटा आवरताना उगीच तिला तिच्या सासूची आठवण आली.

एकुलत्या एक मुलाचे हौसेने लग्न करून सून म्हणून आणलेल्या जयश्रीला कुठे ठेऊ नी कुठे नाही असे मीनाताईंना होऊन गेले होते. सुरुवातीचे सासूचे कोडकौतुक जयश्रीलाही आवडले पण नंतर नंतर त्यांच्या या वागण्याचा तिला त्रास होऊ लागला.

"जयू, अगं आज डब्याला हीच भाजी घेऊन जा."

"आज अमकच केलंय, बघ जरा तुला आवडते का?"

उद्या काय तर वेगळ्याच पदार्थाचा बेत..

मीनाताईंचा स्वयंपाकघरातून पाय काही निघेना. रोज त्या जे वाढतील तेच पानात पडे. कोणाला काहीच प्रॉब्लेम नव्हता कारण वर्षानुवर्षे वैभव आणि त्याचे बाबा त्यांच्याच हातचे खात होते.

जयश्रीला मात्र याचा वैताग आला होता. स्वयंपाकघरात काही काम नाही, घरातीलही सगळी आवराआवर त्याच करायच्या. कामाचा इतका उरक की ऑफिसमधून घरी परतल्यावर तिच्यासाठी काही कामच राहायचे नाही उलट आल्याआल्या हातात आयता चहा मिळायचा. आता तिला हे असह्य व्हायला लागले. या घरात एका सुनेपेक्षा पेइन्ग गेस्ट असल्याचा भाव यायला लागला.


"वैभव मला नाही राहायचेय इथे." एकदिवस कचाकचा भांडलीच ती त्याच्याशी.

"अगं पण का?"

"पेइन्ग गेस्ट असल्याचा फील येतो रे मला. कसली कामं नाहीत की आई काही करू देत नाहीत."

"मग बराय की. बाकीच्यांच्या बायका सासू कामाला जुपते म्हणून नवऱ्याशी भांडत असतील, तू कामं करायला मिळत नाही म्हणून भांडतेस. "

त्यानं सगळं हसणेवारी नेलं. पण मग हळूहळू ती अलिप्तासारखी राहू लागली. दोघातले नाते बिघडायला लागले तसे दोघांनी वेगळा संसार थाटायचा निर्णय घेतला.


'मुलीसारखं वागवलं. कधी कसल्या कामाला हात लावू दिला नाही. ऑफिसमधून आल्यावर हातात चहा दिला. तरी तिने असं वागावं? मुलाला घेऊन वेगळं व्हावं.' हे मीनाताईच्या जिव्हारी लागले. आपण कुठे चुकलो हे त्यांना कळत नव्हते.


नवीन घर जयश्रीने मनासारखे सजवले. हे घर तिच्या हक्काचे होते. तिला वाटेल तसे ती ठेऊ शकणार होती. ती आनंदी होती म्हणून वैभवसुद्धा आनंदी होता. कधी हॉटेलिंग, कधी शॉपिंग.. मनासारखे सर्व घडत होते.

चारपाच महिने बरे गेले नी मग परत खटके उडू लागले. घरातील कामात पुरुषांनी देखील मदत करायची असते हे वैभवला आजवर कधी माहीतच नव्हते. घरी सगळी कामे तर फक्त आईच करायची. बाबा किंवा तो, तिला मदत करावी असे कोणालाही वाटले नव्हते. तशी गरजही पडली नव्हती. नवीन घरात सगळी कामे जयश्री वर येऊन पडली वैभवला काही मदत कर म्हटले तर तो साधा टॉवेल देखील उचलत नव्हता. त्यामुळे इतक्यात त्यांचे परत वाद व्हायला सुरुवात झाली होती.

'आपण इथे येऊन चुक तर केली नाही ना?' असे तिला वाटून गेले.

 'त्या घरी कसे छान सगळं हातात मिळायचे तरी मी सुखी नव्हते, इथे मी सगळे करते तरीही आनंदी नाहीय. सासूबाई वाईट नव्हत्याच. पण त्यांच्या अतिप्रेमामुळे मला बुजल्यासारखे झाले होते. हे मी त्यांना बोलू शकले असते ना! असे घर बदलणे कितपत योग्य होते?' ती स्वतःला प्रश्न विचारत होती.

'जाऊया का परत?' डोक्यात आलेल्या विचाराचे तिला आश्चर्य वाटले.

दारावरच्या थापेने तिची तंद्री भंग झाली.

वैभव आला होता.

'बापरे! किती वेळचे मी असेच बसलेय?' खोलीत अंधार झाला होता.

लाईट लावल्यावर लक्षात आले सात वाजलेत. वैभवसाठी त्याच्या आवडीचे काही बनवावे म्हणून लवकर परतलेली ती तो आला तरी स्वयंपाकाला सुरुवात झाली नव्हती.

 जेवण बनवायचे म्हणून ती आत गेली तर स्वारी आधीच ओट्याजवळ उभी होती.


" खूप भूक लागली का? थांब मी लगेच काहीतरी करते. "

तिने ओट्यावर भांडी घेतली.

"हो भूक तर लागलीच आहे.." म्हणत त्याने मागून तिला मिठी मारली आणि हळूच केसात गजरा माळला.

"हे काय?"

"गजरा..! आणि मी बाहेरून जेवण घेऊन आलोय सो काही करायची गरज नाहीये."

त्याने आपली मिठी आणखी घट्ट केली.

रात्री झोपतांना तिने विषय काढलाच.

" वैभव, आपले चुकले का रे? असं आईबाबांना सोडून वेगळे रहायला नको होते का? ह्या घरी माझ्या मनासारखं सगळं आहे पण घराला घरपण नाहीये रे. जायचं का आपण तिकडे परत? "

"तुला झेपेल ना आईचे प्रेम? पुन्हा तिथे गुदमरायला झाले तर?"

"नाही होणार." ती हसली.


दुसऱ्या दिवशी सकाळी दोघेही जुन्या घराच्या दारात हजर! मीनाताईंना कोण आनंद झाला. त्यांचे हात लागलीच जयश्रीला मिठी मारायला धजावले पण मग लगेच आखडते घेतले. 'न जाणो तिला नाही आवडले तर?'

दुपारी जेवतांना जयश्रीने सांगून टाकले, "आम्ही इकडे परत येतोय." मीनाताईना आनंद झाला.

"माझे काही चुकले तर माफ करशील ना?" त्यांनी विचारले.

"आई, अहो तुमचं कुठे काय चुकले? तुम्ही माझी आई बनायला गेला होता,मलाच तुमची मुलगी बनता आले नाही." डोळे पुसत ती.

सायंकाळी तिने चहा केला. मीनाताई काही बोलल्या नाही.

 चहा पितांना तिने सहज विचारले, "आई, तुम्हाला असे निवांत बसून दुसऱ्यांनी केलेलं कधी खावंस वाटलं नाही का हो? "

तिच्या प्रश्नाने त्यांचे डोळे पाणावले.

" लग्न झाले आणि पहिल्या दिवसापासून सासूबाईनी कामाला जुपले. तेव्हाची कामच करतेय बघ. त्यामुळे असा विचार कधी आलाच नाही कारण आला असता तर कोणाला सांगू? वाटलं देवाने मुलगी पदरात टाकली तर तिला एकही काम करू देणार नाही. राणीसारखे ठेवेन. ते सुख नाही मिळालं मला.

तू आलीस नी मुलींसाठी जे जे करणार होते ते तुझ्याबाबतीत करायला लागले आणि तुही दुरावलीस." त्या मन मोकळं करत होत्या.

"मला ती चुक कळली आई! आता मला तुमच्या तालमीत तयार व्हायचे आहे आणि सोबत वैभवला देखील शिकवा त्याला काहीच येत नाही." तिने त्यांचे डोळे पुसले.


दुसरा दिवस उजाडला तो लुसलुशीत पोहयांच्या सुगंधाने आणी चहाच्या सु्वासाने!

स्वयंपाकघरात बाबा आणि वैभव आपली कलाकृती तयार करत होते. वैभवने पोहयांच्या बश्या आणि बाबा चहाचा ट्रे घेऊन बाहेर आले.

"बायकोला मदत करायची हे मलाच कधी कळले नाही तर वैभवला कुठून कळणार? पण आता आम्ही दोघे कसे ट्रेन होतो, बघाच तुम्ही!" बायकोच्या हातात चहाचा कप देत ते म्हणाले.

वैभवने देखील आई आणि जयश्रीसमोर पोह्यांची बशी ठेवली.

मीनाताईंच्या डोळ्यात पाणी आले.. कदाचित आनंदाश्रू!

जयश्रीने त्यांना एक घट्ट मिठी मारली. सगळ्यांनी मग हसतखेळत नाश्ता केला.


आता जयश्री सासूबाईच्या हाताखाली ट्रेन होते आहे. बाबा आणि वैभव स्वतःच्या जबाबदाऱ्या घ्यायला लागलेत. मीनाताईंनी जास्तीची लुडबुड करणं सोडून दिलंय. त्या दोघींचे मैत्रीचे नवे नाते निर्माण झालेय.

इतके दिवस भकास वाटणाऱ्या घराच्या भिंती हसऱ्या झाल्यात. घराला घरपण आलेय!!

     ********* समाप्त *********


घराला घरपण यायला काय लागतं? एकमेकांप्रती थोडे प्रेम, थोडा जिव्हाळा!  थोडा समंजसपणा!!

घरातील सासू सून या दोन स्त्रियांत जर मैत्री झाली तर मग कोणत्याच घराच्या भिंती भकास होणार नाही. घराचे घरपण टिकून राहील!

तुम्हाला काय वाटते?


हा लेख कसा वाटला नक्की सांगा. कंमेंट तर तुम्ही करताच त्याबरोबर आपल्या फेसबुक पेजवर लाईक देखील करत रहा. कथा शेअर करावीशी वाटल्यास फेसबुक पेजची लिंक शेअर करू शकता.


धन्यवाद!   *साहित्यचोरी गुन्हा आहे!*


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//