घरपण.. घराचे. भाग ३(अंतिम भाग.)

एका चौकोनी कुटुंबाची छोटीशी कथा.

घरपण.. घराचे.

भाग -३(अंतिम भाग.)


 'त्या घरी कसे छान सगळं हातात मिळायचे तरी मी सुखी नव्हते, इथे मी सगळे करते तरीही आनंदी नाहीय. सासूबाई वाईट नव्हत्याच. पण त्यांच्या अतिप्रेमामुळे मला बुजल्यासारखे झाले होते. हे मी त्यांना बोलू शकले असतं ना. असे घर बदलणे कितपत योग्य होते?' ती स्वतःला प्रश्न विचारत होती.

'जाऊया का परत?' डोक्यात आलेल्या विचाराचे तिला आश्चर्य वाटले.


दारावरच्या थापेने तीची तंद्री भंग झाली. वैभव आला होता.


'बापरे! किती वेळचे मी असेच बसलेय?' खोलीत अंधार झाला होता.

लाईट लावल्यावर लक्षात आले सात वाजलेत. वैभवसाठी त्याच्या आवडीचे काही बनवावे म्हणून लवकर परतलेली ती तो आला तरी स्वयंपाकाला सुरुवात झाली नव्हती.


 जेवण बनवायचे म्हणून ती आत गेली तर स्वारी आधीच ओट्याजवळ उभी होती.

"खूप भूक लागली का? थांब मी लगेच काहीतरी करते." तिने ओट्यावर भांडी घेतली.


"हो भूक तर लागलीच आहे.." म्हणत त्याने मागून तिला मिठी मारली आणि हळूच केसात गजरा माळला.


"हे काय?"


"गजरा..! आणि मी बाहेरून जेवण घेऊन आलोय सो काही करायची गरज नाहीये." त्याने आपली मिठी आणखी घट्ट केली.

******


रात्री झोपतांना तिने विषय काढलाच.

"वैभव, आपले चुकले का रे? असं आईबाबांना सोडून वेगळे रहायला नको होते का? ह्या घरी माझ्या मनासारखं सगळं आहे पण घराला घरपण नाहीये रे. जायचं का आपण तिकडे परत?"


"तुला झेपेल ना आईचे प्रेम? पुन्हा तिथे गुदमरायला झाले तर?" तिच्या केसांशी खेळत त्याने विचारले.


"नाही होणार." ती हसली.



दुसऱ्या दिवशी सकाळी दोघेही जुन्या घराच्या दारात हजर! मीनाताईंना कोण आनंद झाला. त्यांचे हात लागलीच जयश्रीला मिठी मारायला धजावले पण मग लगेच आखडते घेतले. न जाणो तिला नाही आवडले तर?


दुपारी जेवतांना जयश्रीने सांगून टाकले, "आम्ही इकडे परत येतोय." मीनाताईना आनंद झाला.


"माझे काही चुकले तर माफ करशील ना?" त्यांनी विचारले.


"आई, अहो तुमचं कुठे काय चुकले? तुम्ही माझी आई बनायला गेला होता, मलाच तुमची मुलगी बनता आले नाही." डोळे पुसत ती.


सायंकाळी तिने चहा केला. मीनाताई काही बोलल्या नाही.

 चहा पिताना तिने सहज विचारले, "आई, तुम्हाला असे कधी बसून दुसऱ्यांनी केलेलं खावंस वाटलं नाही का हो? "

तिच्या प्रश्नाने त्यांचे डोळे पाणावले.


" लग्न झाले आणि पहिल्या दिवसापासून सासूबाईनी कामाला जुपले. तेव्हाची कामच करतेय बघ. त्यामुळे असा विचार कधी आलाच नाही कारण आला असता तर कोणाला सांगू? वाटलं देवाने मुलगी पदरात टाकली तर तिला एकही काम करू देणार नाही. राणीसारखे ठेवेन. ते सुख नाही मिळालं मला. तू आलीस नि मुलींसाठी जे जे करणार होते ते तुझ्याबाबतीत करायला लागले आणि तूही दुरावलीस." त्या मन मोकळं करत होत्या.


"मला ती चुक कळली आई! आता मला तुमच्या तालमीत तयार व्हायचे आहे आणि सोबत वैभवला देखील शिकवा त्याला काहीच येत नाही." तिने त्यांचे डोळे पुसले.

*****


दुसरा दिवस उजाडला तो लुसलुशीत पोहयांच्या सुगंधाने आणी चहाच्या सु्वासाने.

स्वयंपाकघरात बाबा आणि वैभव आपली कलाकृती तयार करत होते. वैभवने पोहयांच्या बश्या आणि बाबा चहाचा ट्रे घेऊन बाहेर आले.


"बायकोला मदत करायची हे मलाच कधी कळले नाही तर वैभवला कुठून कळणार? पण आता आम्ही दोघे कसे ट्रेन होतो, बघाच तुम्ही!" बायकोच्या हातात चहाचा कप देत ते म्हणाले.

वैभवने देखील आई आणि जयश्रीसमोर पोह्यांची बशी ठेवली.

मीनाताईंच्या डोळ्यात पाणी आले.. कदाचित आनंदाश्रू!

जयश्रीने त्यांना एक घट्ट मिठी मारली. सगळ्यांनी मग हसतखेळत नाश्ता केला.



आता जयश्री सासूबाईच्या हाताखाली ट्रेन होते आहे. बाबा आणि वैभव स्वतःच्या जबाबदाऱ्या घ्यायला लागलेत. मीनाताईंनी जास्तीची लुडबुड करणं सोडून दिलंय. त्या दोघींचे मैत्रीचे नवे नाते निर्माण झालेय.

इतके दिवस भकास वाटणाऱ्या घराच्या भिंती हसऱ्या झाल्यात. घराला घरपण आलेय!!

********* समाप्त *********

©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)

घराला घरपण यायला काय लागतं? एकमेकांप्रती थोडे प्रेम, थोडा जिव्हाळा!

घरातील सासू सून या दोन स्त्रियांत जर मैत्री झाली तर मग कोणत्याच घराच्या भिंती भकास होणार नाही. घराचे घरपण टिकून राहील!

बरोबर ना? तुम्हाला काय वाटते?

ही छोटीशी कथा कशी वाटला नक्की सांगा.धन्यवाद.

   *साहित्यचोरी गुन्हा आहे!*


🎭 Series Post

View all