घरपण.. घराचे भाग -दोन

एका चौकोनी कुटुंबाची छोटीशी कथा

घरपण.. घराचे.

भाग -२.


"अरे तिला गजरा नाही आवडत रे आणि जेवणाचे पार्सल कशासाठी?"

"आज आवडेल रे आणि पार्सल बद्दल म्हणशील तर सकाळचा डबा तुला आता खायला लागू नये म्हणून." हसून राघव.

******

जयश्री लवकर परतली. घर तसेच होते जाताना सोडून गेलेले.. अस्त्याव्यस्त!


तिने एक सुस्कारा सोडला आणि आधी घर आवरले. सगळ्या वस्तू जिथल्या तिथे ठेवल्यावर तिलाही जरा हायसे वाटले.


स्वयंपाक घरात जाऊन मस्त आलं घातलेला चहा उकळायला ठेवला. ओटा आवरताना उगीच तिला तिच्या सासूची आठवण आली.


एकुलत्या एक मुलाचे हौसेने लग्न करून सून म्हणून आणलेल्या जयश्रीला कुठे ठेऊ नी कुठे नाही असे मीनाताईंना होऊन गेले होते. सुरुवातीचे सासूचे कोडकौतुक जयश्रीलाही आवडले पण नंतर नंतर त्यांच्या या वागण्याचा तिला त्रास होऊ लागला.


"जयू, अगं आज डब्याला हीच भाजी घेऊन जा."

"आज अमकच केलंय, बघ जरा तुला आवडते का?"

उद्या काय तर वेगळ्याच पदार्थाचा बेत..


मीनाताईंचा स्वयंपाकघरातून पाय काही निघेना. रोज त्या जे वाढतील तेच पानात पडे. कोणाला काहीच प्रॉब्लेम नव्हता कारण वर्षानुवर्षे वैभव आणि त्याचे बाबा त्यांच्याच हातचे खात होते.


जयश्रीला मात्र याचा वैताग आला होता. स्वयंपाकघरात काही काम नाही, घरातीलही सगळी आवराआवर त्याच करायच्या. कामाचा इतका उरक की ऑफिसमधून घरी परतल्यावर तिच्यासाठी काही कामच राहायचे नाही उलट आल्याआल्या हातात आयता चहा मिळायचा. आता तिला हे असह्य व्हायला लागले. या घरात एका सुनेपेक्षा पेइन्ग गेस्ट असल्याचा भाव यायला लागला.


"वैभव मला नाही राहायचेय इथे. " एकदिवस कचाकचा भांडलीच ती त्याच्याशी.


"अगं पण का?"


"पेइन्ग गेस्ट असल्याचा फील येतो रे मला. कसली कामं नाहीत की आई काही करू देत नाहीत."


"मग बराय की. बाकीच्यांच्या बायका सासू कामाला जुपते म्हणून नवऱ्याशी भांडत असतील, तू कामं करायला मिळत नाही म्हणून भांडतेस. "


त्यानं सगळं हसणेवारी नेलं. पण मग हळूहळू ती अलिप्तासारखी राहू लागली. दोघातले नाते बिघडायला लागले तसे दोघांनी वेगळा संसार थाटायचा निर्णय घेतला.


'मुलीसारखं वागवलं. कधी कसल्या कामाला हात लावू दिला नाही. ऑफिसमधून आल्यावर हातात चहा दिला. तरी तिने असं वागावं? मुलाला घेऊन वेगळं व्हावं.' हे मीनाताईच्या जिव्हारी लागले. आपण कुठे चुकलो हे त्यांना कळत नव्हते.


नवीन घर जयश्रीने मनासारखे सजवले. हे घर तिच्या हक्काचे होते. तिला वाटेल तसे ती ठेऊ शकणार होती. ती आनंदी होती म्हणून वैभवसुद्धा आनंदी होता. कधी हॉटेलिंग, कधी शॉपिंग.. मनासारखे सर्व घडत होते.

चारपाच महिने बरे गेले नी मग परत खटके उडू लागले. घरातील कामात पुरुषांनी देखील मदत करायची असते हे वैभवला आजवर कधी माहीतच नव्हते. घरी सगळी कामे तर फक्त आईच करायची. बाबा किंवा तो, तिला मदत करावी असे कोणालाही वाटले नव्हते. तशी गरजही पडली नव्हती. नवीन घरात सगळी कामे जयश्री वर येऊन पडली वैभवला काही मदत कर म्हटले तर तो साधा टॉवेल देखील उचलत नव्हता. त्यामुळे इतक्यात त्यांचे परत वाद व्हायला सुरुवात झाली होती.


आपण इथे येऊन चुक तर केली नाही ना? असे तिला वाटून गेले.


 'त्या घरी कसे छान सगळं हातात मिळायचे तरी मी सुखी नव्हते, इथे मी सगळे करते तरीही आनंदी नाहीय. सासूबाई वाईट नव्हत्याच. पण त्यांच्या अतिप्रेमामुळे मला बुजल्यासारखे झाले होते. हे मी त्यांना बोलू शकले असते ना. असे घर बदलणे कितपत योग्य होते?' ती स्वतःला प्रश्न विचारत होती.


'जाऊया का परत?' डोक्यात आलेल्या विचाराचे तिला आश्चर्य वाटले.

:

क्रमश:

©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)

*साहित्यचोरी गुन्हा आहे.*


काय निर्णय घेईल जयश्री? वाचा पुढील भागात.

*****


🎭 Series Post

View all