घरपण.. घराचे. भाग -१

वाचा एका चौकोनी कुटुंबाची छोटी कथा.

घरपण.. घराचे.

भाग -१


"काय हा पसारा? वैभव तुला माहीत आहे ना की असलं मला नाही आवडत." बेडवरचा टॉवेल त्याच्या अंगावर फेकत जयश्री म्हणाली.


"नाही आवडत तर तू आवर ना? मला ऑफिस ला निघायला उशीर होतोय." वैभव.


" हो का? तुझे ते ऑफिस आणि मी कामाला जात नाही का? मलाही उशीर होतोय." जया फणकाऱ्याने बाहेर आली. तिच्या मागोमाग तोही आला.


"तुझा डबा भरून ठेवलाय. उद्यापासून आपला डबा ना आपण पॅक करत जा." ती.


" नकोय मला. मी कॅन्टीनमध्ये खाऊन घेईन." तो घुश्यातच कार मध्ये जाऊन बसला.

तिच्यासाठी त्याचे हॉर्न वाजवणे सुरु होते पण ती काही बाहेर आली नाही.

त्याचं डबा न घेऊन नं जाणं तिच्या जिव्हारी लागलं होतं. तो निघून गेल्यावर ती रिक्षाने आपल्या ऑफिसला गेली.


कामात लक्ष नव्हतंच तिचं. सारखा वैभव डोळ्यासमोर येत होता. त्याचं चिडणं, घरातला पसारा.. आणि ओट्यावर तसाच असलेला डबा! \"रात्री त्याला तेच खाऊ घालेल.\" असा विचार मनात डोकावून गेला.


"काय झालंय? आज अगदी डाउन दिसतेस?" शालिनी तिच्या सहकारिणीने विचारण्याचा अवकाश की तिच्या डोळ्यातून टपोरे थेंब गालावर ओघळू लागले.

"परत भांडलात की काय?" तिच्याजवळ येत शालिनी.


तसा तिने आजचा इतिवृत्तांत सांगितला.

"शालू आम्ही वेगळं घर घेतलं ते चुकले का गं? " शेवटी डोळे पुसून तिने विचारले.


"हे मी कसं सांगावं? पण घरात मोठी माणसं असली की बरं असतं गं. माझेच बघ ना, इथे यायचे म्हटले तरी रोज वेळेत सगळे नाही आवरून होतं. मग उरले सुरले सासूबाई आवरतात की. तेवढाच आपल्याला आधार." शालिनी.


"तुझ्यात नी सासूमध्ये कुरबूरी होत नाहीत का गं?" जयश्रीचा अवघडलेला प्रश्न.

"होतात ना. पण त्या कुरबूरींना किती महत्व द्यायचे ते आपल्याला कळायला हवे. प्रेमाने सगळं जिंकता येतं आणि काय ना गं तीही शेवटी आपलीच माणसं ना? आपल्याला काही बरंवाईट झालं तर त्यांनाही कुठेतरी त्रास होतोच की.

एक सुचवू? आज ना जरा लवकर घरी जा. वैभवच्या आवडीचे खायला बनव आणि मग एकत्र बसून जरा बोला."

आपला डबा बंद करून शालिनी उठली. लंच ब्रेक संपला होता.

******


"काय रे वैभ्या, वहिनीशी परत भांडलास का?" त्याच्याकडे डबा नाही हे बघून राघवने विचारले.


"हो रे, नेहमीचेच झाले आता. लहान लहान गोष्टीवरून सतत खटके उडत असतात. कंटाळलो रे मी आता. "


"हूं." राघव.


" नुसता हूं काय करतोस यार? आधी आईबाबांसोबत एकत्र राहायचो तेव्हाही भांडणं व्हायची आता वेगळे आहोत तेव्हाही तेच. काहीतरी सोल्युशन असेल ना?" तो.


"सोल्युशन तर प्रत्येक प्रॉब्लेम वर आहे मित्रा! गरज आहे तुम्हा दोघांना एकत्र बसून ते सोल्युशन शोधण्याची. मी तुला फक्त एक सुचवू शकतो."

"काय?" उत्सुकतेने वैभव.

"जाताना वाहिनीसाठी गजरा घेऊन जा आणि त्यांच्या आवडीच्या जेवणाचे पार्सल सुद्धा!"


"अरे तिला गजरा नाही आवडत रे आणि जेवणाचे पार्सल कशासाठी?" वैभव बाळबोधपणे.


"आज आवडेल रे आणि पार्सल बद्दल म्हणशील तर सकाळचा डबा तुला आता खायला लागू नये म्हणून!" हसून राघव.

:

क्रमश:

©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)

*साहित्यचोरी गुन्हा आहे.*

*****

राघवने सांगितलेली ट्रिक पडेल का वैभवच्या कामी? वाचा पुढील भागात.


🎭 Series Post

View all