घरकोन भाग 56

नात्यांची वीण घट्ट सांधणाऱ्या अल्लड प्रेमळ रेवाची सुंदर प्रेमकहाणी...

घरकोन-56
©राधिका कुलकर्णी.

दिवस रोजच्या प्रमाणे उजाडत आणि मावळत होता.
आई, काका-काकुही नविन घरात रूळत होते.अद्ययावत सुखसोयीमुळे काकांचे करणे काकुंसाठी बरेच सुसह्य झाले होते.नगरच्या घरात बऱ्याच सोयींचा अभाव होता.ती कमी इकडे पुर्ण भरून निघाली होती.त्यामुळे आई व काकुही खूप समाधानी वाटत होत्या.
आणि दिवसभर घरात माणसांचा वावर त्यामुळे रेवा प्रचंड आनंदी होती.
सगळ्यांचे करता करता दिवस कमी पडत होता पण ते करण्यातही तिला मानसिक समाधान मिळत होते.काका खूप आनंदी दिसत होते आल्यापासुन त्यांच्यात बराच फरक दिसत होता.चेहरा प्रफुल्लीत वाटत होता.
सगळ्यांसमोर आवश्यक तेवढे बोलुन सुश जाणवु देत नव्हता की तो रेवाशी बोलत नाहीये.रूटीन व्यवहार नेहमीप्रमाणे होत होते.पण हे असे किती दिवस चालणार.रेवाला काळजी वाटत होती.त्यात उन्मेश जर्मनीला गेलेला त्यामुळे त्याच्याशी बोलायची वाटही बंद होती.
दिवस कसाबसा निघुन जायचा पण रात्र मात्र खायला उठायची तिला.मधेच कधीतरी विचार करता करता डोळा लागायचा.नाहीतर अचानक मधेच जाग यायची असे विचित्र घडत होते तिच्यासोबत.
एकदा रात्री बऱ्याच उशीरा कसल्याशा कुजबुज आवाजाने रेवाला जाग आली.एवढ्या रात्री कोण बोलतेय.बाजुला अंथरूणावर सुश नव्हता. हळुच उठुन ती हॉलकडे आली.तर सुश कोणाबरोबर तरी फोनवर हऴु आवाजात बोलत होता.रेवाची चाहुल लागताच फोन आटोपता घेत तो रेवासमोरून  काही न बोलता बेडवर येवुन झोपला.प्रश्नार्थक नजरेने रेवा सुशकडे बघत राहिली तरीही काहीच न घडल्यागत तो आपल्या जागी जावुन झोपी गेला.आता मात्र काळजीची जागा चिंतेने घ्यायला सुरवात झाली.सुश मला लपवुन एवढ्या रात्रीचे कुणाशी बोलत होता,आणि मी समोर येताच एकदम फोन बंद का केला??काय चाललेय ह्याचे नेमके?
एक ना अनेक शंकांनी मनात घर करायला सुरवात केली.
सकाळी उठल्याबरोबर सुश आईंना उद्देशुन बोलला,
"आई मला आज कामानिमित्त मुबई जायला लागतेय गं.मी दोन दिवस नसणार आहे.मी फोन करून तुमची चौकशी करत राहीन.तिकडे पोहोचल्यावर तिकडचा एखादा नंबर पण इमरजन्सी साठी देवुन ठेवेन..
मग मात्र रेवाला राहवलेच नाही.ती मधेच बोलली," चार दिवसांनी आपली अॅनिव्हर्सरी आहे लग्नाची.आणि तु असा अचानक कुठे चाललाएस?"
"अॅनिव्हर्सरी पर्यंत मी येतोय घरी.काम अर्जंट आहे, जाणे गरजेचे आहे म्हणुन चाललोय."
"अरे पण इतक्या वर्षांनी सगळे एकत्र जमलो आहोत तर छोटीशी पार्टी ठेवावी असे मनात होते माझ्या.तुझ्या प्रमोशनची पार्टी पण ड्यु आहे ना.दोन्हीचे मिळुन सगळ्यांना बोलवुन छान सेलिब्रेशन करू असे आपले ठरले होते ना.तु विसरलास का सगळे?"
"हो बोललो होतो पण आता ते शक्य वाटत नाहीये मला.कारण ही मिटींग खूप इम्पॉर्टंट आहे.आणि तिकडुन आल्यावर सगळी अॅरेंजमेंट करण्याइतका वेळ नाहीये माझ्याकडे.
आपण घरीच सेलिब्रेट करू."
"सुशचे इतके निर्विकार भावनाशुन्य कोरडे उत्तर ऐकुन तर रेवाची खात्रीच पटली की कालचा अपरात्रीचा फोन, माझ्याशी ठेवलेला दुरावा,आणि पार्टी साठी वेडा असणारा चक्क नाही म्हणतोय म्हणजे नक्की कुठेतरी पाणी मुरतेय.माझी जागा कुणी दुसरीने तर............ ???"

नुसत्या विचारांनीच रेवाच्या हातापायाला कंप सुटायला लागला.कपाळावर घर्मबिंदुंनी दाटीवाटी केली.
पायाखालची जमिन सरकतेय की काय असा भास व्हायला लागला.
आपल्यातील बदल कुणाच्या लक्षात येण्यापुर्वीच ती तिकडुन सटकली.बेडरूम मधे ए.सी.लावुनही तिला गरम होत होते.खूप अस्वस्थ वाटत होते.कुणाजवळ मन मोकळे करावे असे कोणीच जवळ नव्हते.किचनमधुन अचानक बेडरूम मधे गेलेली बघुन आईंनी सुशला रूममधे पाठवले."बघ तिला काय झाले.पोर रुसली वाटते.जा बघ जरा."
सुशांत रूममधे आला तर रूमचा ए.सी फुल स्पीडवर.तरीही रेवा काळजीयुक्त भीतीने भिंतीकडे एकटक कसल्यातरी विचारात त्रासिक चेहरा करून बघत होती.बेडवर बसुन जमिनीवर सोडलेल्या पायांची अस्वस्थ हालचाल तिच्या बेचैन मन:स्थितीला साफ दर्शवत होते.
सुशांतला तिची अवस्था बघुन क्षणभर काळजी वाटली.पण लगेच भावनेला आवर घालत तो बोलला."आई किचनमधे बोलावतीय तुला.जा बघ तिला काय हवेय."
अंऽऽ.. तिने नजर उचलुन सुशकडे बघितले.त्याला वाचण्याचा प्रयत्न करत होती पण तो,मात्र निर्विकार होता.
निरोप देऊन तो त्याच पाऊली बाहेर गेला.आज पहिल्यांदा रेवाला एकांताची गरज होती पण नाईलाजाने का होईना तिला बाहेर जावे लागत होते.
जड मनानेच ती किचनकडे गेली.

रोजची कामे सवयीने उरकत होती पण मन मात्र थाऱ्यावर नव्हते.आज सुश घराबाहेर पडल्यावर पुढले दोन दिवस त्याच्याशी बोलताच येणार नव्हते.काय करावे? आजच बोलुन सोक्षमोक्ष लावावा का?
तिला काहीच सुचत नव्हते.
काय चुक काय बरोबर.,कोण चुकतेय काहीच समजायला मार्ग नव्हता.
उन्मेश आणि सायलीला तिने अॅडव्हान्स मधेच इन्व्हीटेशन दिले होते पार्टीचे.पण आता हे काय होऊन बसलेय सगळे.फक्त दहा दिवसात सुश इतका कसा बदलला?माझ्याशिवाय एक क्षण राहु न शकणारा सुश मी येुवनही तीन दिवस झाले तरी माझ्याशी साधे एक अक्षर देखील बोलला नव्हता.मला साधा पुसटसा स्पर्शही करावा वाटला नाही त्याला.इतकी का मी परकी झाले ह्याला.??"
रेवाचे विचारांचे वादळ काही केल्या शमत नव्हते.
ती मनातल्या मनात आपल्याशीच संवाद साधत होती.तोवर सुश तयार होऊन काका-काकु,आईंना बाय करून निघाला देखिल.
"अरे सुश डबा तरी घेवुन जा.थांब जरा."
नको,खाईन कँटीनमधेच.आणि मी तिकडुन तिकडेच जाणार आहे फ्लाईटनी.मी पोहोचलो की कळवतो.चला बाय, आई निघतो गं.,म्हणत तो बाहेर पडला देखिल.
त्याने रेवाकडे बघणे देखील टाळले निघताना.
त्याचे वागणे कमालीचे खटकत होते तिला पण कुणाला बोलुन दाखवायची पण सोय नव्हती.
रडु अनावर झाले तसे घाईने ती देवघरात गेली.देवापुढे हात जोडुन शांतपणे संवाद साधत होती.देवा काय चुकलेय माझे ते तरी सांग.का ही शिक्षा माझ्या वाट्याला.नात्यांच्या बाबतीत मी अशीच कमनशिबीच राहणार का रे?"
आधी आई वडील दुरावले.सुशला पदरात टाकलेस.तेव्हा सासुच्या रूपाने आई मिळाली वाटेपर्यंत सुशनेच आईंना दूर केले.मग पर्यायाने तेही नाते लांबच झाले.
आता सुशची सगळी नाती जवळ आली तर सुशलाच माझ्यापासुन दुर  केलेस.
म्हणजे सर्व नाती एकत्रीत पणे उपभोगायचे नशिबातच नाहीये का माझ्या?
काय लिहुन ठेवलेस पुढे ते तरी सांग.सुशचे असे कोरडे वागणे मला असह्य होतेय देवा.मला मार्ग दाखव.
तिची लागलेली समाधी आईंच्या आवाजाने भंगली.
धावतच ती आईंकडे गेली.
काकु नाष्ट्यासाठी बोलवत होत्या.
तिला जेवायची अजीबात इच्छा नव्हती पण तरीही बळजबरीच दोन घास पोटात ढकलत ती टेबलवरून उठली.बरे वाटत नाहीये जरा पडते असे सांगुन ती बेडरूममधे आली.
अति विचारांनी मनावर ताण आल्याने तिला पडल्या पडल्याच झोप लागली.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~
(क्रमश:)
घरकोन-56
©®राधिका कुलकर्णी.
-------------------------------------
नमस्कार मंडळी,कसा वाटला आजचा भाग?
घरकोन आवडतेय की नाही हे कमेंटद्वारे जरूर कळवा.
(लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासकट कथा नक्की शेअर करू शकता.) 
धन्यवाद.

🎭 Series Post

View all