Sep 22, 2020
कथामालिका

घरकोन भाग 55

Read Later
घरकोन भाग 55

घरकोन-55
©राधिका कुलकर्णी.
 
म्हणता म्हणता दिवस पालटत होते.डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार काकांना प्रवासाची अडचण नव्हती ही एक जमेची बाजु.बाकी परीस्थिती जैसे थे च होती.आता त्यात तर बदल संभवणारच नव्हता.उत्तम सुश्रुषा आणि योग्य उपचार चालु ठेवणे एवढेच काय ते हातात होते.
आई आणि काकुंचेही रिपोर्ट्स नॉर्मलच होते.
त्यामुळे महत्त्वाचा एक भाग पुर्ण झाला होता.डॉक्टरांनी जायच्या दिवशी अँब्युलन्स आणि नर्सची एअरपोर्ट पर्यंतची सोय करायची तयारीही दाखवली.आता फक्त इथली निरवानिरव आवश्यक सामानाची बांधाबांध इ. गोष्टी बाकी होत्या.रोजच्यारोज उन्मेश कडुन सुशची खुशाली कळतच होती.दु:ख एकच वाटत होते की एक आठवडा होऊनही त्याने स्वत:हुन रेवाशी एक अक्षरही संवाद केला नव्हता.त्यातल्या त्यात आनंद इतकाच की तो आता आईंना मात्र रोज फोन करत होता."वाईटातुन चांगले म्हणतात ते असे"
असा विचार करून रेवा मनाची समजुत घालत होती.कामाचा डोंगर एवढा होता की तसेही तिच्याजवळ विचार करायला ही फुरसद नव्हती.
रोज एक एक काम हातावेगळे करणे चालु होते.सायलीच्या बाबांची ओळख काढुन त्यांच्या मदतीने घरासाठी केअर टेकरची व्यवस्था पण केली होती.सगळी कामे वेळेत निकालात निघत होती.
आता फक्त निघण्याची तारीख फायनल करणे बाकी होते.
आवश्यक सामानाची बांधाबांध,नको असलेले सामान,फर्निचर सगळे एका रूममधे शिफ्ट करणे.अशा कामांना गती आली होती.
उन्मेशने त्यांच्या टिकीटांची सर्व तयारी करून अखेरीस तो दिवस जवळ आला जेव्हा रेवाचे स्वप्न खऱ्या अर्थी पुर्ण होणार होते.
सायली उन्मेशच्या सांगण्यावरून खास सुट्टी काढुन रेवाच्या मदती करता नगरला आली होती.सायलीच्या बाबांनीही काही माणसे मदतीला पाठवली होती.
सगळे नीट सुरळीत पार पडत असताना रेवा मात्र उगीचच थोडी शंकाकुल होती.
"हे एवढे सगळे करतोय खरे पण सुशचा राग कमी नाही झाला तर?माझे काय??"
नकळत डोळ्यात पाणी तरळले.तसेच रूमालाने टिपत देवापुढे हात जोडुन संकल्प सिद्धीची प्रार्थना केली.
काकु आणि आईंचे डोळेही पाणावले होते.लग्न होऊन ज्या घरात संसार थाटला,उभ आयुष्य ज्या घरात गेले ते सोडुन आता निघायचे ह्या कल्पनेनेच काकुंना अस्वस्थ होत होते.
पण फार काळ आपण कुणाच्या आधाराशिवाय राहु शकत नाही हे सत्य ही पटत होते.आणि नगरपेक्षा बेंगलोरमधे राहणे  काकांच्या तब्येतीच्या दृष्टीने योग्यच निर्णय़ आहे हेही पटत होते.पण जोडलेली नाळ अशी तटकन तोडणेही अवघडच होते नां.दोघीही सतत डोळे टिपत टिपतच आवराआवरी करत होत्या.
अखेरीस दारवाजाला टाळे लावुन बेंगलोरच्या दिशेने प्रवासाला सुरवात झाली.
नगरहुन मुंबई आणि मुंबई ते बेंगलोर असा प्रवास करत सर्वजण रेवाच्या घरी पोहोचले.
मेडला सुचना देवुन रेवाने अगोदरच घराची सफाई करून ठेवल्यामुळे घर तसे बऱ्या अवस्थेत होते.सुश अजुन घरी आलेला नव्हता.घरी आल्यावर त्याची प्रतिक्रीया काय असेल हिच शंका रेवाला सतावत होती. 
काका-काकुंची व्यवस्थित सोय लावुन, आईंसाठी त्यांची वेगळ्या बेडरूममधे सोय लावुन घाईने रेवा देवघरात गेली.
देवघर स्वच्छ दिसत होते.म्हणजे ती नसताना सुश देवाची पूजा करत होता तर..तिला मनोमन हसु आले.
देवापुढे सांजवात करत रेवाने नमस्कार केला.इथपर्यंत साथ दिलीस आता पुढेही साथ सोडु नकोस.सगळे व्यवस्थित होऊ दे.सुशला सगळ्यांशी चांगले वागायची सद्बुद्धी दे अशी प्रार्थना मनोमन करतच डोळे मिटले.
 किचनची अवस्था बघता आज स्वैपाक होणे शक्यच वाटत नव्हते.तिने पटापट मैत्रिणीला सांगुन बाहेरून जेवण मागवले.
सगळ्यांची जेवणेच उरकत होती एवढ्यात सुशच्या गाडीचा हॉर्न वाजला.नकळत रेवाच्या हृदयाची धडधड वाढली.पटकन जाऊन ती आईंचा हात घट्ट हातात पकडुन पुढे काय होणार ह्याची कल्पना करत उभी राहिली.
दार बंद होते.नेहमीप्रमाणे लॅचकीने दार उघडुन सुशांत घरात आला.दारातुन आत येताच हॉलमधे डायनिंगजवळ आई,काकु रेवाला बघुन तो स्तब्द्ध झाला.क्षणभर त्याला समजेचना की आपण स्वप्न पाहतोय की सत्य आहे.
पण क्षणभरच..... पुढल्याक्षणी हातातली बॅग सोफ्यावर फेकत तो धावतच आईकडे गेला.
आईऽऽऽऽऽ..... कधी आलीस,कशी आहेस तु!!!
खूप मिस केले गं मी तुला...सुशांतचा इतके वर्षांचा ओढलेला मुखवटा गळुन पडला होता.लहान मुलागत आईंच्या कुशीत शिरून तो रडत हो.
काकु/आईनाही अश्रु आवरत नव्हते.
रेवालाही काही सुचेना.पण त्या क्षणी तरी तिला तिकडे जागा नव्हती.ती हळुच हॉलमधुन त्यांच्या बेडरूममधे गेली.दार लोटुन भिंतीला टेकुन ती आपल्या अश्रुंना वाट करून देत होती.
आज ती तिच्या कार्यात सफल झाली होती.सुशांतची तुटलेली नाळ पुन्हा जोडुन दिली होती तिने. हा घरकोन साधण्यात तिला अखेर यश मिळाले होते. 
इतके सगळे मनासारखे घडुनही कुठेतरी काहीतरी ठसठसत होते.
एवढे सगळे होत असतानाही मन मात्र अजुनही रितेच होते.
ज्याच्यासाठी हा खटाटोप केला तो तर आल्यापासुन साधे दृष्टीक्षेपातुनही बोलला नव्हता तिच्याशी.
"आज्जी तु कुठेस गं..??"
"आज तुझी लाडकी नात भरल्या घरात एकटी पडलीय..आज्जी मी चुकलेय का ग कुठे?"
"मग का माझ्याच वाट्याला हा नात्यांचा दुरावा?
आई-बाबा कधी बोलतील  ग माझ्याशी?"
"सुशला त्याची नाती मिळाली पण माझा कोन अजुनही फाटकाच ...."
रेवाला भावना अनावर झाल्या होत्या.
आपल्या दु:खाला एकांतात वाट करून देत होती.मनात साचलेले किती दिवसांचे मळभ आज रिते होत होते.
दाराच्या अलिकडे आणि पलिकडे आश्रुंचे पाट वहात होते.फरक फक्त इतकाच की पलिकडे आनंदाश्रु होते आणि अलिकडे मात्र विरहाचे आश्रु वहात होते......
फोन खणखणला तशी रेवा भानावर आली.डोळे पुसतच ती धावत फोनपाशी गेली.
उन्मेशचाच फोन होता.
"हॅलो.....!"
"हं बोल मी रेवा बोलतीय.
"अरेऽ, तु कधी पोहोचलीस?"हे काय आत्ताच येतोय.सुशांतला देऊ का फोन?"
हो दे पण आधी तुझ्याशी तर बोलु दे,मला. "
कसा झाला प्रवास? मी विचारतो त्याची हो नाही मधे उत्तरे दे.कारण सुशाला माहित नाहीये की मी तुझी मदत केलीय.
"हो का..बंर बंर."रेवाही आता सावरून बोलत होती.
"काही अडचण नाही आली ना प्रवासात?"
नाही.छान झाला प्रवास.
सगळे ठिक आहेत.मी जरा थकलेय,नंतर बोलते.तु सुशशी बोल हं."
जुजबी उत्तरे देवुन रेवाने फोन सुशांतला दिला.
सुशांतचे डोळे लाल झाले होते रडुन.पण तो खूप आनंदी दिसत होता.त्याच्या चेहऱ्यावर आई आपल्या घऱी कायमची रहायला आली ह्याचा आनंद साफ दिसत होता.आणि त्याचा आनंद बघुन रेवाही आपले दु:ख विसरून आनंदी झाली होती.पुढल्या आठवड्यातच त्यांच्या लग्नाचा तिसरा वाढदिवस येणार होता.हे वर्ष खऱ्या अर्थी सेलिब्रेट करण्याजोगे होते..मिशन मिलाप यशस्वी झाले होते.
सगळे झाले.गप्पा जेवणे उरकली.पण बेडरूममधे आल्यावर मात्र सुश अजुनही मौनातच होता.इतके सगळे छान होऊनही त्याने रेवाला मात्र माफ केले नव्हते.का???"
रेवा अचंबीत होती.कसे समजवायचे ह्याला असा विचार करतच  सुशच्या जवळ गेली.केसातुन हात फिरवला.

इतके दिवसांचा विरह बघता रेवाच्या कल्पने प्रमाणे सुशने तिला घट्ट मिठीत ओढुन सगळी तहान /भूक मिटवायचा प्रयत्न करणे अपेक्षित होते.रेवालाही सुशचा विरह असह्य झाला होता.
इतक्या वर्षात कधीही एक रात्रही ती सुशला सोडुन राहिली नव्हती.त्यामुळे कधी एकदा त्याच्या कुशीत शिरते असे झाले होते तिला.
आणि त्यात इतके छान सरप्राईज बायकोने दिले म्हणल्यावर तर आजची  रात्र जागुनच काढणे अपेक्षित होते.पण 
सुश तोंडावर पांघरूण आेढुन विरूद्ध दिशेला तोंड करून झोपी गेला.

तिच्या कल्पनेच्या विपरीत सुशचे असे वागणे रेवाला विषण्ण करून गेले.
रेवाच्या डोळ्यातील एक थेंब सुशच्या उघड्या दंडावर पडला.
असहाय्यपणे सुस्कारा सोडत रेवाही त्याच्याकडे पाठ करून नाईलाजाने लवंडली.
एकाच छताखाली राहुन हा मौनाचा प्रवास खरोखर जीवघेणा होता रेवासाठी.....
भविष्यातली सकाळ काय काय रंग दाखवते हेच पहाणे बाकी होते....
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
(क्रमश:)
घरकोन-55
©®राधिका कुलकर्णी.
-------------------------------------
नमस्कार मंडळी,कसा वाटला आजचा भाग?
घरकोन आवडतेय की नाही? हे कमेंटद्वारे जरूर कळवा.
(लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासकट कथा नक्की शेअर करू शकता.) 
धन्यवाद.

Circle Image

Radhika Kulkarni

Writer

I am Radhika Kulkarni. Am BSc MA BEd. Previously was a teacher but now homemaker. I have hobby of reading and writing. Listening music is my hobby . I like to make friends..I have written so many poems stories in marathi and some poems in Hindi also ...please read my stories and follow the blog..