Sep 25, 2020
कथामालिका

घरकोन भाग 53

Read Later
घरकोन भाग 53

घरकोन-53
©राधिका कुलकर्णी.

दुपार कधी होतेय ह्याची वाट पहातच सकाळची कामे उरकली.जेवणे आटोपुन सगळे जिकडचे तिकडे आपापल्या खोलीत विसावल्यावर मात्र काकुंचा संयम तुटला.त्यांनी रेवाला सगळे काम बाजुला सारून आधी खोलीत यायला सांगितले.रेवा किचनमधे मागची आवराआवर करण्यात उगीचच वेळ काढत होती. पण आता मात्र तिचा नाईलाज होता.फार काळ ती प्रश्नांना थोपवु शकणार नाही ह्याची तिला कल्पना होतीच.
पटापट हातातली कामे आवरून ती वर गेली.काकु खोलीत बसुन तिचीच वाट पहात होत्या.
"किती आवरत बसतेस त्या किचनला?
एक दिवसात ते काही स्वच्छ होणार नाही.आम्ही दोघीही थकलेल्या जेवढे हात हालतील तेवढे करतो आणि नाही जमले की सोडुन देतो.असे आहे सगळे त्यामुळे तु उगीच जीवाचा आटापीटा करून ते साफ करायला जाऊ नकोस.ये बैस अशी माझ्या जवळ."
काकु रेवाला मोकळे वाटावे म्हणुन काहीतरी बोलत होत्या.
"आईऽऽ तुम्ही स्वैपाकाला बाई का लावत नाहीत?आता तुमच्याच्याने होत नाही."
"अग् कामवाल्या बायका उगीच काहीतरी करून फेकुन जातात.त्यात भाऊजीं तर लिक्विडफुड वरच आहेत.
तु तर बघतेच आहेस त्यांचे हाल कसे आहेत.राहता राहिले मी आणि सुशची काकु.आम्हाला असे कितीक जातेय अन्न,, मोजुन एक/दिड पोळी. रात्री तर भातच लागतो.
मग सांग आता तीन पोळ्यांसाठी बाई लावायला कुठुन परवडते?"
"हम्म्ऽऽ.पण तुम्हालाही दगदग होत नाही."
"तुम्ही आता माझ्या बरोबर चला तिकडे बेंगलोरला.आपण सगळे एकत्रच राहु.म्हणजे तुुम्हालाही आराम मिळेल आणि आम्हालाही तिकडे राहुन तुमची काळजी वाटणार नाही."
"ते सगळे नंतर बघु.आधी मला सांग तुमचे नेमके काय बिनसले?"
रेवा पुन्हा शांत झाली.
"अग् बोल ना काहीतरी.तु काहीच बोलली नाहीस तर मला कसे कळेल की काय झाले?"
"काय सांगु आईऽ?"
सांगण्या सारखे काहीच नाहिये.म्हणले तर खूप काही अन् म्हणले तर काहीच नाही.मलाच कळत नाहीये की मी अशी का वागले तर तुम्हाला काय सांगु?"
रेवाचे डोळे पाण्याने डबडबले होते.
काकुंनी तिला जवळ घेतले.मायेने डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाल्या,
"बाळ,तुला मी जेवढे ओळखते तु विनाकारण असे काही करणार नाही,पण नीट सांग तरी की काय झाले तुमच्यात
असे की तु घर सोडुन आलीस?"
रेवाने आधी खुप वेळ रडुन घेतले मनसोक्त. जरा शांत झाल्यावर सर्व हकिकत कथन केली.
"काकु ऐकुन सुन्न झाल्या."
सुन असुन लेकी सारखी माया करणाऱ्या पोरीचे कौतुक करावे की आपल्यासाठी नवऱ्याशी भांडली म्हणुन तिला डाफरावे,काय करावे त्यांना त्याक्षणी खरच काही सुचत नव्हते.
पण मार्ग तर काढावाच लागणार होता.
मनाशीच काहीतरी ठरवुन मग काकु बोलत्या झाल्या.
"रेवा मला सांग खरच तु सांगतेस तसा सुश वागला का तुझ्याशी?"
"हो ना आई,मी मुद्दामहुन काकांविषयी इतके खालच्या पातळीवर जाऊन बोलले.मलाही त्याची काय प्रतिक्रीया येते हे बघायचे होते पण तो असा हात उचलेल हे खरच मला अपेक्षित नव्हते.बर त्याला त्याबद्दल कणभरही पस्तावा नाही,दुसऱ्या दिवशीही न बोलताच गेला.एक फोन नाही दिवसभरात,मग मी त्याला न सांगता आले तर काय चुकले माझे?
त्याला कुठेय माझी पर्वा मग मी तरी का करू त्याची काळजी?"
"अग पण काळजी नसती तर तो असा रात्री अपरात्री भटकला असता का तुला शोधायला?"
"मुळ मुद्दा हा आहे की तुझ्या वागण्यामुळे निदान हे तर कळले की त्याच्या मनात काकणभर का होईना पण काकांप्रती प्रेम आहे. जागा आहे मनात  कुठेतरी थोडी का असेना."
"तो आजवर फक्त पैशांनी मदत करत होता असेच वाटायचे पण त्यामागे भावना पण आहेत हे आज कळतेय,हेही कमी नाहीये ना!"
"हो नाऽ!आहे ना मनात जागा? मग मोकळे पणाने स्विकार करायला काय हरकत आहे?"
"आणि ही  वेळ आलीय आई आता सुशची."
"आई बापां पासुन नाते तोडुन दुर राहण्याचे दु:ख
काय असते हे माझ्याहुन जास्त कोण समजु शकेल?"
तेच शल्य सुशच्या वाट्याला येवु नये म्हणुन मी सतत धडपडत राहिले.पण तेवढे प्रयत्न उपयोगी नव्हते.त्यासाठी काहीतरी जालिम उपायच करायला हवा हे माझ्या लक्षात आले तसे मग मी ठरवले आता आर या पार, ह्यावर तोडगा काढायचाच.माझ्याशी थोडाकाळ चिडेल पण ह्यावेळी तो तुम्हा सर्वांना आपलेसे करणार हे नक्की.
तुम्हीही तुमच्या सुशांतला पुन्हा जुन्याच रूपात अनुभवताल हे नक्की."

रेवाच्या डोळ्यात बोलता बोलता पाणी तरळले.पण ह्यावेळी हे अश्रु एका चांगल्या कार्याची फलश्रुती मिळण्याच्या समाधानातले होते.
"मग काय ठरवताय कधी निघायचे आपण इकडुन?"
रेवा नव्या उत्साहाने बोलत होती.
काकु मात्र चिंतेत दिसत होत्या.
इकडे आड अन् तिकडे विहीर अशी अवस्था झाली होती त्यांची.पोर इतक्या निरागसतेने सगळे ठरवतीय पण असेच सगळे नाही झाले तर परक्या ठिकाणी परधार्जिणे होऊन पडण्यासारखे दुसरे दु:ख नाही.आपल्याच विचारात काकु गंभीर झाल्या पण तुर्तास तिला हे सगळे बोलुन तिचा हिरमोड करायचा नाही म्हणुन त्या काही न बोलता शांत बसल्या.
मग काहीतरी आठवल्यासारखे करत त्यानी विचारले,"काय गं मी खाली आले सकाळी तेव्हा तु फोनवर कुणाशी बोलत होतीस?"
"मी सकाळी विचारायचेच विसरले."
"आईऽऽ तुम्ही रागावणार नसाल तर सांगते."
"नाही रागावणार सांग."
"आई सुशचे अॅपेंडिक्सचे ऑपरेशन झाले तेव्हा तुम्हाला आठवते का सुशचा एक जिगरी दोस्त खूप मदत केला होता,उन्मेश पंडीत.आठवले का?"
हो,एक मुलगा यायचा रोज.नाव नाही आठवत आता,पण त्याचे काय?"
अहो आईऽऽ, मागच्या काही दिवसांपुर्वी अचानक त्याचा फोन आला.तो आमचा दोघांचाही चांगला मित्र त्यामुळे मग बोलणे व्हायला लागले.एकदा सहज तुमची चौकशी केली तेव्हा न राहवुन मी सगळे त्याला सविस्तर सांगीतले.आणि त्याची मदत मागीतली ह्या सगळ्यात.मग काय त्याने जे जे सांगीतले तसे तसे करत गेले.
आणि म्हणुन त्यालाच फोन केला होता पण आता इथुन पुढे ह्या कामात मला त्याच्या बरोबर तुमचीही साथ हवीय,कराल ना मला मदत?"
"आई माझी इच्छा आहे की जेव्हा आम्हाला बाळ होईल ना तेव्हा ते त्याच्या आज्जीच्या कुशीत वाढावे.मी सुद्धा आई बाबांपेक्षा जास्त माझ्या आज्जीची लाडकी होते.त्याला त्या माये पासुन वंचित नाही ठेवायचेय मला."
"अगोबाईऽऽ काही गुडन्युज आहे का गं?अशा अवस्थेत प्रवास का केलास मग?"
काकुंनी लगेच सुतावरून स्वर्ग गाठत आपला पट्टा सुरू केला.
"अहो आईऽऽ तसे काहीच नाहीये.पण कधीतरी तर होईल ना,त्यावेळचे बोलतीय मी.तुम्ही लगेच कुठल्या कुठे गेलात."
रेवा थोडीशी लाजतच काकुंना समजावत होती.
"अग पण तस नसेल तर होऊ दे ना आता.तसा बराच काळ लोटलाय आता.जास्त उशीर बरा नाही बाळा.काही गोष्टी वेळच्यावेळीच व्हाव्यात."
"आई,आईऽऽ,तुम्हाला वाटतेय ना असे व्हावे मग आधी मी सांगतेय ते ऐका.माझ्या बरोबर तुमच्या हक्काच्या घरी चला.
एकदा तुम्ही आलात ना माझी काळजी घ्यायला की मग मी पण तुम्ही म्हणाल ते ऐकेन."
"तु भारी हुशार आहेस हो.बरोबर फिरून फिरून विषय तुझ्या बाजुने वळवतेस."
"पण आई खरच ह्यावर सिरीयसली विचार करा.
काकांची तब्येत बघता त्यांना बघायला घरात कोणीतरी तरूणताठे  हवे.काही अकल्पित प्रसंग ओढवलाच तर तुम्ही कसे हाताळताल?मला माहितीय मी खूप टोकाचे बोलतीय पण सत्य खूप कटु असते.ते कितीही लपवले तरी समोर येतेच.
तेव्हा सर्व गोष्टींचा सारासार विचार करून तुम्ही लवकरात लवकर योग्य निर्णय घ्यावा अशी माझी विनंती आहे तुम्हाला.
"तु बोलतेस ते पटतेय मला.
कधी कधी अचानक भाऊजींची प्रकृती इतकी खालावते, मग जी धावपळ करायला लागते तेव्हा नेहमी वाटते आज जर सुश इकडे असता तर किती बरे झाले असते,पण मग विचार येतो त्याला जी नाती मानायचीच नाहीत त्याचे ओझे तरी का लादायचे त्याच्यावर?जो जन्म देतो तोच शेवटही करतो.कुणावाचुन कुणाचे काही अडत नसते.वेळ कशी ना कशी निभावुन जातेच.मग कशाला कुणाची आस लावुन बसायचे?"
"हो पण आता तुम्हीच म्हणलात ना की सुशांत दाखवत नसला तरी त्याच्या मनात काका काकुंबद्दल काकणभर का होईना पण माया आहे.मग आता तुमचा विचार बदलायला काय हरकत आहे?निदान मरतेवेळी शेवटचे काही दिवस तरी काकांना ह्या समाधानात जगु दे की सुशांतच्या मनात त्यांच्याबद्दल अढि नव्हती."
"तुम्हीही आजवर त्यांच्या उपकाराची परतफेड म्हणुनच सुशशी अबोला पत्करून काकांकरता नगर न सोडण्याचा निर्णय घेतला होतात ना,मग आताही त्यांच्याच मानसिक समाधानासाठी चला की तुमच्या मुलाकडे.
रेवा हर प्रकारे काकुंचे मन वळवायचा प्रयत्न करत होती.
सर्व ऐकुन काकु अचानक बोलुन गेल्या," पण आता जायचे म्हणले तरी इतक्या घाईने इकडची निरवानिरव करणे कसे शक्य आहे?"
ते वाक्य ऐकताच रेवा जागच्याजागीच आनंदाने उडाली.नकळत का होईना पण काकु येण्यासाठी तयार होताना दिसत होत्या.
"आई तुम्ही फक्त होकार द्या बाकी सगळे मी बघते.तुम्ही काळजीच करू नका."
रेवाला तर आनंदाने काय करावे सुचत नव्हते.
"आई पुढल्या महिन्यात आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे.माझी ईच्छा आहे की तो वाढदिवस आपण सर्वांनी मिळुन साजरा करावा.किती मज्जा येईल ना,आपण सगळे एकत्र असु.मला एकटीला ते घर खायला उठते हो.आता सगळे असल्यावर मला पण हुरूप येईल."
"हो होऽऽ.सगळे ठरवुयात.आधी हे सगळे त्या दोघांशीही बोलुयात ना."
हो चालेल.लगेच चला, बोलुन काय ते फायनल करून टाकु."
अगं हो होऽ,किती घाई.जरा थांब.त्यांचा आराम होऊ दे,मग बोलु.
तुही पड जराशी.काल अाल्यापासुन अस्वस्थच आहेस.आता थोडी विश्रांती घे."
"आई आता मला झोप लागणार नाही.तुम्ही करा आराम.तोवर मी जरा फोनवर बोलुन येते उन्मेशशी,त्याला ही न्युज सांगीतल्या शिवाय मला चैन पडणार नाही."
 
रेवा धावतच खाला आली.आज तिचा आनंद गगनात मावत नव्हता.
तिला कल्पना नव्हती की इतक्या लवकर तिच्या प्रयत्नांना इतके यश मिळेल.
काकु यायला संम्मती दर्शवतील हे तर स्वप्नच होते तिच्यासाठी.
ह्या सगळ्याला कुठेतरी उन्मेशचा ही हातभार होताच.त्याचे आभार मानावे तेवढे कमीच होते.
पण आत्ता ह्याक्षणी तिला उन्मेश खेरिज कोणीच नव्हते ज्याच्याशी ती तिचा हा क्षण शेअर करू शकेल.
फोनची रींग वाजत होती................
~~~~~~~~~~~~~~~~~
(क्रमश:)
घरकोन-53
©®राधिका कुलकर्णी.
नमस्कार मंडळी.
कशी वाटतीय कथा.?
आजचा भाग आवडला का? काय वाटतेय.पुढे काय होणार.?जसे ठरवले तसेच घडेल की काही विपरीत......?
हे सगळे पहायचे असेल तर पुढील भाग नक्की वाचा आणि आपल्या प्रतिक्रीया नक्की कळवा..
धन्यवाद.

Circle Image

Radhika Kulkarni

Writer

I am Radhika Kulkarni. Am BSc MA BEd. Previously was a teacher but now homemaker. I have hobby of reading and writing. Listening music is my hobby . I like to make friends..I have written so many poems stories in marathi and some poems in Hindi also ...please read my stories and follow the blog..