Sep 22, 2020
कथामालिका

घरकोन भाग 52

Read Later
घरकोन भाग 52

घरकोन-52
©राधिका कुलकर्णी.

पहाटे कसल्याशा आवाजाने रेवाची झोप उडाली.आपण कुठे आहोत हेच तिला सुरवातीला समजेना.
गाढ झोपेने क्षणभर तिच्या स्मृतींवर पडदाच पाडला जणु.
थोडी भानावर आल्यावर तिला लक्षात आले की आपण आपल्या घरी नसुन दुसरीकडेच कुठेतरी आहोत.आत्ता कुठे तिला सगळे प्रसंग नीट आठवले आणि आपण नगरला आहोत हेही जाणवले.
त्या नुसत्या विचारांनी ती दचकली क्षणभर.
बापरे तिकडे सुशचे काय हाल झाले असतील?आत्ता तो कोणत्या परिस्थितीत असेल?काय करत असेल?
आईंनी त्याला मी आल्याचे कळवले असेल का?सुशने फोन केला असेल का?
एक ना अनेक विचारांनी रेवाचे डोके जड झाले.आता झोप येणे शक्यच नव्हते.ती तशीच उठली.खाली आली.बाहेर अजुन पुरते उजाडलेले नव्हते.
घड्याळ पहाटेचे साडेचार ची वेळ दाखवत होते.
अजुन बाकी कुणीच उठलेले नव्हते.काय करावे तिला काहीच सुचेना आणि झोपही लागणार नव्हती.
काय करू ह्या संभ्रमात ती स्वैयंपाकघरात गेली.थोडे पाणी पिऊन पुन्हा सोफ्यावर कलंडली.

अचानक काहीतरी सुचले तशी ती झरकन फोनपाशी गेली.
घाबरतच उन्मेशचा नंबर डायल केला.इतक्या सकाळी तो जागा असेल का?फोन उचलेल का नाही तेही माहीत नव्हते.
रींग जात होती पण पलीकडुन प्रतिसाद नव्हता.
अजुन सगळे झोपलेत तोवरच बोलणे गरजेचे होते म्हणुन नाईलाजाने
तिने पुन्हा नंबर डायल केला.
दुसऱ्यावेळी मात्र फोन उचलला होता.
"हॅलोऽऽऽ कोण??"
उन्मेश जवळ जवळ झोपेतच बोलत होता.
"हायऽऽ गुड मॉर्निंग डिअर!"
"रेवा हिअर..कॅन यु हियर मी?"
रेवाचा आवाज एेकताच उन्मेश टणकन जागीच उठुन बसला.
"काय ग सगळे ठिक आहे ना तिकडे?"
"इतक्या पहाटे का फोन केलास?"
अरे अचानक पहाटे जाग आली. पुन्हा झोपही लागेना.कालचे प्रसंग आठवुन सुशची काळजी वाटायला लागली.म्हणुन मग तुला फोन केला."
काल काय काय घडले,तुझा फोन झाला का सुशशी?
"प्लिज मला सांग ना सगळे.मला त्याची काळजी वाटतेय रे खूप."
"रेवा मी तुला पाच मिनटात फोन करतो.बाय."
अरेऽ अरे करे पर्यंत फोन कट झाला होता.

रेवा खूप अस्वस्थ झाली होती.उन्मेशचा फोन येईपर्यंत घरातले कोणी जागे होऊ नये हिच मनोमन प्रार्थना करत तिथेच फोनची वाट पहात बसली.
थोड्याच वेळात म्हणल्याप्रमाणे रिंग वाजली.रेवाने पटकन फोन उचलला.
"फोन का कट केलास?"
"घरातले कोणी उठण्याआधी मला तुझ्याशी बोलायचे होते म्हणुन तर इतक्या सकाळी उठवले ना तुला आणि तु चक्क फोन कट करतोस?"
रेवा काहीशी वैतागुनच बोलत होती.
"अग डार्लिंग,इतक्या पहाटे इतका मंजुळस्वर कानावर पडल्यावर मग मी काय असेच बोलु का?म्हणुन जरा तोंड धुवुन फ्रेश होऊन आलो."
उन्मेशने नेहमीच्या स्टाईलने रेवाची फिरकी घेत तिला रिलॅक्स करण्याचा प्रयत्न करत होता.
"उन्म्याऽ तुला काळ वेळ काही नसतेच ना फ्लर्ट करायला?"
"अरे इथे प्रसंग काय अन् तु बोलतोस काय?"
"रिलॅक्स डिअर.डोण्ट वरीऽऽ.सिच्युएशन इज टोटली अंडर कंट्रोल."
"म्हणजे?असे कोड्यात नको बोलुस,काय ते नीट सविस्तर उलगडा करून सांग."
"आणि जरा पटकन सगळ बोल कुणी उठायच्या आत आपला फोन संपायला हवा."
"बर ऐक मग.ठरल्या प्रमाणे सुशाला मी फोन केला.बिचारा खूप रडवेला झाला होता.सगळीकडे शोधुन थकला होता पारऽऽ."
"मग रे?"
"मग मीच त्याला नगरला फोन करायची कल्पना सुचवली.
आधी आढेवेढे घेतले पण मग करतो फोन असे बोलला.
आता त्याने खरच फोन केला की नाही हे मात्र काही कळले नाहीये. कारण बराच उशीरा आमचे बोलणे झाले होते,त्यानंतर जर त्याने तिकडे फोन केला असेल तर कळायला मार्ग नाही."
"ओकेऽऽ.पण मग आता पुढे काय?"
तुझ्या प्लॅन प्रमाणे मी इकडे तर आले पण आता पुढे काय करू?"
"आईंशी काल मी काहीच बोलले नाहीये, पण आज तरी त्यांना सांगावेच लागेल."
"मी त्यांना जास्त वेळ टाळु नाही शकणार रेऽ."
"हो मला कळतेय.आता हे बघ मी सांगतो तसे कर."
आधी काकु तुला सुशाबद्दल,फोन आल्याबद्दल काही सांगतात का हे बघ.
नंतर काकुंना सगळे सविस्तर सांग.
आणि आडुनच बैस की तुम्ही सगळे माझ्या सोबत चला तरच मी परत जाईन."
अरे पण काकांची तब्येत खुपच खालावलीय.त्यांना अशा अवस्थेत इकडुन हलवणे वाटते तेवढे सोप्पे नाहिये उन्मेश."
"मी एकटी त्या तीन म्हाताऱ्यांना घेवुन प्रवास कसा करू?"
तु त्याची काळजी नको करूस.
तु फक्त त्यांना  तुझ्याबरोबर येण्यासाठी तयार कर आणि मग मला सांग."
"मी तुमची नीट व्यवस्था लावुन देतो.डोण्ट वरी अॅट ऑलऽऽ."
अरे ते ठिक आहे पण मीन व्हाईल सुशचा फोन आला तर?त्याला काय सांगु?"
त्यालाही हेच सांग आता जोपर्यंत तु काका-काकु आणि आईंना कायमचे आपलेसे करत नाही मी तिकडे येणार नाही."
अरे पण तो नाहीच एेकला तर?"
"स्त्री हट्टापुढे कोणाचे काही चाललेय का आजवर?"
"त्याला ऐकावेच लागेल."
बर बघु तु म्हणतोएस तर करते.पण उन्म्या खरच आपला प्लॅन सक्सेसफुल होईल ना?"
"अग,तुला आजच कळेल बघ आपला प्लॅन वर्कआऊट होतोय की नाही."
"पण मला कळव काय डेव्हलपमेंट होतेय ते म्हणजे तसे मला प्लॅन करायला."
"हो मी कळवते.बर चल ठेवते फोन.कोणीतरी उठलेले दिसतेय.बायऽऽ.."
फोन बंद करून रेवा वळली तोच समोर काकु उभ्या.
तिला समजेचना की काकुंना कसे सामोरे जायचे.
रेवा तशीच मान खाली घालुन उभी राहीली काकुंपुढे.
काकुंनीही न बोलताच रेवाच्या चेहऱ्यावर नजर रोखली.जणु त्या पडताळत होत्या नजरेतुनच.
रेवाला ती रोखलेली नजर टोचत होती.
स्वत:ला त्यांच्या नजरेतील असंख्य प्रश्नांतुन सोडवणुक करायची म्हणुन रेवाने काकुंना चहा घेणार ना विचारले.
"मी आत्ता माझ्यासाठी चहा करणारच होत,बरे झाले तुम्ही पण आलात."
बोलत बोलत रेवा काकुंची नजर शिताफीने टाळत किचनमधे गेली.
चहासाठी आधण ठेवत ती वर गेली. स्वत:चे सगळे आटोपुन,तोंड धुवुन ती खाली आली.
तोपर्यंत काकुंनी चहा गाळुन कप टेबलवर आणुन ठेवले होते.
दोघीही काहिही न बोलता चहा घेत होत्या.ती शांतता जीवघेणी भासत होती रेवाला.जणु पुढे येणाऱ्या प्रश्नात्मक संकटांची चाहुल देत होती.
रेवाला समजत नव्हते की काकुंच्या(सुशची आई) प्रश्नांना कसे सामोरे जायचे.
मनातल्या मनात बोलण्याची तयारी करत रेवा चहा संपवत होती.
चहा झाला तशी
ती कपबशा उचलुन नेणार तसा काकुंनी तिचा हात धरला.रेवा चपापली.तिने प्रश्नार्थक नजरेनेच काकुंकडे कटाक्ष टाकला.
इतक्या वेळच्या शांत बसलेल्या काकुंनीच आता बोलायला सुरवात केली.
"काय बरे वाटतेय का आता?"
काल खूप थकलेली दिसत होतीस आता बरीएस ना बाळ?"
काकुंच्या मृदु संयमीत चौकशीने रेवा जराशी रिलॅक्स झाली पण अजुनही धास्तावलेलीच होती.
कारण खरे प्रश्न तर पुढेच होते ज्याची उत्तरे काय अन् कशी द्यायची हेच तिला समजत नव्हते.
मनातल्या विचारांना बाजुला सारत तिने मानेनेच होकारार्थी उत्तर दिले.
"इथे बैस माझ्याजवळ आणि सांग बघु काय झाले तुमच्या दोघांत?"
"का अशी कुणाला न सांगता सवरता इकडे निघुन आलीस?"
काकुंनी मुळ प्रश्नाला हात घातला.
तिला एवढा अंदाज नक्की आला त्यांच्या बोलण्यातुन की काल नक्की सुशचा फोन झाला,त्याशिवाय का त्यांना कळले की मी सुशला न सांगता घर सोडले.
चला म्हणजे काल ह्या कारणाने का होईना सुशचे आईंशी बोलणे झाले तर.
रेवाला आपल्याच तंद्रीत बघुन काकुंनी तिला पुन्हा हलवले,"अग् मी काय विचारतेय,लक्ष कुठेय तुझे?" 
"आईऽऽऽ काल तुमचे सुशशी बोलणे झाले ना?"
"हो.त्याचा फोन आला होता."
"तुझ्या काळजीने वेडा झाला होता ग पोर.तु त्यालाही न सांगता निघालीस?इतके काय झाले दोघांचे?मला सांगणार आहात का तुम्ही?"
"सुश काय म्हणाला तुम्हाला?"
"तो काय बोलला हे महत्त्वाचे नाहिये.मला तुझ्या तोंडुन ऐकायचेय.काय झाले इतके की तु कुणालाही न सांगता तडक घर सोडुन आलीस?"
"आईऽऽ तुम्हाला माझे इकडे अचानक येणे आवडले नाही का?"
मला वाटले की माहेर नसले म्हणुन काय झाले तुम्ही मला हक्काच्या आहात.तुम्हीच माझी आई आहात म्हणुन हक्काने आले.पण.....
पुढे रेवाला बोलवेना.कंठ दाटुन आला.
"ठिक आहे,तुम्हाला नसेल आवडले तर जाईन मी इकडुन."
काकुंना काहीच समजेना आज रेवा अशी का बोलतीय तुटक, परक्यासारखे.
आजवर लग्न होऊन जसे तिचे माहेर तुटले काकुंनीच तिला आईचे प्रेम दिले होते,
लाडाकोडाने सगळे सण साजरे केले होते. मग आज अशी का बोलतीय ही?"
"रेवाऽऽ वेड्यासारखे बोलु नकोस.तुला मी कधी तरी परकी मानलेय का?
पण तुझ्या आईने सुद्धा हाच प्रश्न विचारला असता जर तु अशी न सांगता अचानक रात्री-बेरात्री एकटीच घरी आली असतीस तर,मग मी ही त्याच काळजीपोटी विचारले तर काय चुकले ग माझे?"
"पोरी गैरसमज करून घेवु नकोस.नीट सांग काय झाले ते.म्हणजे आपण मार्ग काढु शकुत त्यावर."
"आई आपण आत्ता नको ना बोलुया ह्यावर.दुपारी मी स्वत:हुन सगळे सांगेन चालेल?"
"अगं त्या लेकराचा जीव टांगणीला लागला असेल ग तिकडे.त्याचा फोन आला तर त्याला काय उत्तर देऊ मी?"
"तुम्ही हेच सांगा की मी काहीच बोलत नाहीये.तिच्याशी बोलुन झाले की सांगते."
"म्हणजे त्याचा फोन आला तर तु बोलणार पण नाहिएस का त्याच्याशी?"
रेवाने काहीच उत्तर न देता मौनातुनच अापला नकार दर्शवला.

काकु मनोमन खूप धास्तावल्या होत्या.
कितीही झाले तरी रेवा जवळ होती तोवर त्यांना कधीच सुशांतची काळजी वाटली नव्हती.
तो आपल्याशी अबोला धरून बसलाय ह्याचे दु:ख व्हायचे,नाही असे नाही पण रेवाच्या सहवासात तो सुरक्षित असल्याचे एक अंतरिक समाधान होते ज्यामुळे त्याची चिंता नव्हती वाटत काकुंना पण आता मात्र त्यांना रेवा पेक्षा एकट्या पडलेल्या आपल्या लेकराचीच जास्त काळजी भेडसावत होती.

आजची दुपार पहिल्यांदाच खरच खूप युगांइतकी लांब वाटत होती. 
~~~~~~~~~~~~~~~
(क्रमश:)
घरकोन-52
©राधिका कुलकर्णी.
-------------------------------------
नमस्कार मंडळी,
कसा वाटला हा भाग?
घरकोन कथा आवडतेय की नाही ?
हे कमेंटद्वारे जरूर कळवा.
(लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासकट कथा नक्की शेअर करू शकता.) 
धन्यवाद.

Circle Image

Radhika Kulkarni

Writer

I am Radhika Kulkarni. Am BSc MA BEd. Previously was a teacher but now homemaker. I have hobby of reading and writing. Listening music is my hobby . I like to make friends..I have written so many poems stories in marathi and some poems in Hindi also ...please read my stories and follow the blog..