Sep 25, 2020
कथामालिका

घरकोन भाग 37

Read Later
घरकोन भाग 37

घरकोन-37
©राधिका कुलकर्णी.

दिवस असेच चालले होते.आम्ही आमच्या व्यापात तर तिकडे सगळे आपापल्या दैनंदिनीत व्यस्त.
आणि अचानक एक आठवड्याने काकुंचा फोन आला.त्यांनी दिलेली बातमी ऐकुन आमच्या तर पायाखालची जमिनच सरकली.देव खरच कुणावरही कधीही इतका निष्ठुर होऊ नये अशी ती बातमी होती.
काकांच्या सर्व तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना घशाच्या कर्करोगाचे निदान केले होते.
सध्या इनिशियल स्टेज असली तरी त्यांचे वय बघता त्यांना ओरल ड्रग्जवरच उपचार सुरू ठेवावे लागतील असे मत पडले.
त्यांना अजुनतरी कळु दिले नव्हते पण लवकरच सांगावे लागणारच होते.
काकुंनी आम्हाला दोघांनाही भेटायला या म्हणुन सांगितले.
ठरल्याप्रमाणे मग पुन्हा सुशच्या मनाने काकुंना आणण्याच्या विषयाने उचल खाल्ली.
आम्ही दुसऱ्याच आठवड्यात घरी गेलो.
काकांची तब्ब्येत पंधरा दिवसातच खूप खालावल्यासारखी दिसत होती.त्यांची थोडीफार चौकशी करावी म्हणुन आम्ही खोलीत गेलो.ते बेडवर झोपलेले होते.आम्ही आल्याचे बघताच ते सुशच्या गळ्यात पडुन ढसढसा रडायला लागले.
कदाचित ते पश्चा:त्तापाचे अश्रु असावेत.जन्मभर वाईट कर्म करताना मनुष्य तितका घाबरत नाही जितका कठीण प्रसंगात आपलीच हीन कृत्ये डोळ्यासमोर फेर धरून नाचायला लागल्यावर घाबरतो.
अंत जवळ आला की माणसाला उपरती होते तसे काहीसे मला जाणवले पण सुश एक अक्षरही न बोलता उभा राहीला अतिशय तटस्थ आणि शांत.निश्चल एखाद्या पाषाणागत.जणु त्याच्यावर ह्या सगळ्याचा काहीच फरक पडत नव्हता.
तिथुन बाहेर पडुन सुशांतच्या काकुंची त्याने औपचारिक चौकशी केली,आपण उपचार करूयात सगळे काळजी करू नका असे अश्वासनही दिले त्यांना.
पण हे सगळे वरकरणी चालले असे मला कुठेतरी भासत होते.प्रेम मायेचा लवलेशही दिसत नव्हता कुठे.पण आत्ता त्यावर बोलण्याची वेळ नव्हती म्हणुन मी त्याकडे पुर्ण दुर्लक्षच केले.जेवणे उरकुन आम्ही आईंच्या खोलीत बसलो.सगळ्या काका,बिझनेस,आणि तब्येत ह्यांची चर्चा झाल्यावर मात्र पुन्हा सुशने काकुंना आमच्या सोबत कायमचे येण्याबद्दल गळ घातली.
काकु काहीच न बोलता शांत राहील्या पुन्हा.
कारण सुश बरोबर आत्ता तरी वाद नको असेच वाटत असणार त्यांना पण नियतीला मात्र काहीतरी वेगळेच नाट्य अपेक्षित होते.म्हणुनच त्यादिवशी अखेरीस सुशांतच्या मनात आत्तापर्यंत थोपवलेला लाव्हा ऊसळुन बाहेर पडला.
आधी प्रेमाने मग आग्रहाने मग तक्रार आणि मग संताप असे एक एक टप्पे ओलांडत गेला सुश.
काकुंचे म्हणणे इतकेच होते की काकांची आर्थिक,शारीरिक,आणि मानसिक स्थिती ढासळलेली असताना त्यांना असे आधारहिन सोडुन जाणे काकुंना योग्य वाटत नव्हते.समोरचा चुकला म्हणुन आपणही आपली नितिमत्ता सोडुन माणुसकी सोडुन वागलो तर त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय.आणि तसेही काकांना त्यांच्या चुकीची उपरती झालेली जाणवत असताना त्यांना असे असहाय्य सोडुन जाणे काकुंना बरे वाटत नव्हते.
तसेही वयाने जरी काका मोठे असले तरी आईचा त्यांना बहिणीसारखा आधार नेहमीच मिळाला होता.बाबा गेल्यावर आईची सोबत म्हणुन ते एकत्रच राहु लागले.कितीही त्रास झाला तरी एकत्र कुटुंबात राहिल्याने आईशी काहीतरी का होईना नाळ जुळलीच होती.नंतर त्यांच्या वागण्यात बदल झाला तरीही आईच्या तब्येतीच्या बाबतीत त्यांनी आबाळ होऊ दिली नव्हती.जर त्यांनी खरचच लक्ष दिले नसते तर कदाचित आई आज अशा दिसल्याच नसत्या आम्हाला हे ही खरेच होते.
पण हे सगळे समजुन घेण्याच्या मन:स्थितीतच नव्हता सुश.
अखेर काकुंनी अटच घातली,"हे बघ तुला वाटतेय ना मी तुझ्याघरी कायमचे रहायला यावे मग तु सगळ्यांनाच घेऊन चल.असेही इकडचा आमचा खर्च तुच चालवतो आहेस.मग एकत्रच राहु म्हणजे तुझे दोन घरावरचे खर्च वाचतील."
काकुंच्या ह्या प्रस्तावावर सुश जास्तच चिडला."म्हणजे सरळ सरळ सांग नाऽऽ तुला मुलापेक्षा हे लोक जास्त प्रिय झालेत.कशाला उगीच अटी घालतेस.मी त्यांची जवाबदारी स्विकारलीय.हे घरही त्यांनाच सोडुन चाललोय,अजुन काय करायला हवेय गं मी?"
"मला तुला आनंदात सुखात बघायचेय,तुझे कष्ट संपवायचेत म्हणुन मी चल म्हणतोय.पण तुझे माझ्यावर किती प्रेम आहे हे दिसतेच आहे मला.सॉरीऽऽ चुकलो मी तुला आपले समजलो,तुझ्यावर हक्क समजलो खरच चुकलो."
"आता ह्यापुढे मी पुन्हा कधीच तुला माझ्याकडे ये म्हणणार नाही आणि मीही ह्या दारात पाऊल ठेवणार नाही."
"तुमच्या सर्वांप्रती माझी कर्तव्ये मी नेहमीच पार पाडीन पण आता ते सगळे माझे कर्तव्य म्हणुन असेल प्रेम नसेल त्यात हे लक्षात ठेव आई.मी आजच निघतोय."
आई सुन्न होऊन फक्त बघत राहिल्या.
डोळ्याला पाण्याच्या धारा लागल्या तरी फार चढ्या आवाजात बोलुन तमाशा करण्याजोगी परिस्थिती नव्हती,घरात एक माणुस जावनमरणाच्या तोंडावर उभा असताना हे असले संभाषण ऐकुन एखादा वेळेआधीच मरण पत्करायचा.हे असे काही घडू नये म्हणुनच काकु शांत होत्या.

त्याचे असे निकराचे बोल ऐकुन काकुंसहित मलाही धक्का बसला.
मला तर हे फारच अनपेक्षित होते.
करायला गेलो गणपती अन् झाला मारूती तशी अवस्था.आम्ही दोघीही स्तब्ध नि:शब्द होतो.
काय बोलावे काहीच समजत नव्हते.
सुश तर केव्हाच खोलीबाहेर पडुन आमच्या खोलीत गेला होता.
अस्वस्थ वाटले की गॅलरीत उभे रहायची त्याची सवय जुनी होती त्यामुळे मला हेच वाटले की मन शांत करायला तो नक्कीच गॅलरीत उभा असेल.
मी घाईघाईने रूममधे गेले.पण माझ्या अपेक्षेविरहीत तो सगळे कपडे कपाटातुन काढुन खरचच बॅग पॅक करत होता.
मी गेल्या बरोबर मलाही त्याने घाईने माझी बॅग पॅक करायला सांगितली.
मी अवाक् होऊन फक्त बघत होते.मला त्याला कसे समजवावे हाच प्रश्न पडला होता.
तरीही धीर करून मी बोललेच,"सुश राग आवर अरे."
"इथे प्रसंग काय आणि तु वागतोएस काय तुझे तुला तरी कळतेय का सुश??"
"आणि आईंना का इतके टाकुन बोललास?"
"त्यांची ह्या सगळ्यात काय
 चुक?"
"त्यांच्याजागी कोणीही असते तरी हेच बोलले असते,तु त्यांच्यावर इतके चिडायला नको होते सुश."
"काकु रडताएत.प्लिज राग आवर आणि बोल काकुंशी नीट."
त्यानंतर हवे तर आपण लगेच निघु पण आधी जाऊन काकुंशी बोल,सॉरी म्हण त्यांना."
"हे बघ रेवा,मी आता माघार घेणार नाही,मी मला जे बोलावे वाटले तेच बोललो आता ती तिचा निर्णय ती घेईल.आपण असे घर सोडुन जाऊ नये असे वाटले तर ऐकेल ती माझे.नाहीतर माझा निर्णय झालाय."
"आणि तुला जर तुझ्या सासुचा एवढाच पुळका येत असेल तर तुही रहा इकडेच कायमची.मला कोणाची गरज नाहीये."

सुशचा संताप काही केल्या आटोक्यात येत नव्हता.अखेरीस तेच झाले जे घडायचे होते.सुश बरोबर सासरचा उंबरा आेलांडला तो कायमचाच.
पुन्हा म्हणुन सुशने कधीही काकुंचे नाव तोंडावर येऊ दिले नाही.

तो दिवस आणि आजचा दिवस एक युग उलटुन गेल्यासारखे वाटले.त्याने मला काकुंशी बोलण्यापासुन अडकाठी केली नसली तरी स्वत:हुन त्या विषयावर काहीही बोलणे टाळायचा.खूप आनंदी किंवा मग डिप्रेस्ड वाटायला लागले की देवघरात ध्यानमुद्रेत बसायचा पण बोलत नव्हता कधी की आईला मिस करतोय.
त्यामुळे आज त्याची ही कृती मला आश्चर्याचा सुखद धक्का देत होती.
रात्री त्याला फारशी भूक नसल्याने आमटी भात असा साधाच बेत जेवुन आम्ही झोपलो.

रात्री अचानक मला कसल्याशा आवाजाने जाग आली.बाजुला बघितले तर सुश बेडवर नव्हताच.
घड्याळात रात्रीचे दोन वाजले होते.इतक्या रात्री हा कुठे गेला म्हणुन मी वॉशरूम चेक केले तर तिथेही नाही.हळुच लाईट न लावताच हॉलचा कानोसा घेतला तर काहीतरी कुजबुज ऐकु येत होती.धीर करून मी बेडरूमच्या दरवाजातुन हॉलमधे डोकावले आणि काय आश्चर्य! विसमयचकीत झाले मी समोरचे दृष्य बघुन.
सुश फोनचा रिसिव्हर उचलुन कुणाशीतरी बोलत होता
मधेच रडतही होता.
नीट कान देऊन ऐकल्यावर मी चुकलो का गं,मला माफ करशील का तु?असे काहीतरी बोलत होता.
काकुंबद्दल पडलेल्या स्वप्नामुळे तो पुरता हादरून गेला होता आणि त्यामुळेच तो काकुंशी बोलत असावा असे मला वाटले पण माझा अंदाज चुकीचा होता.
तो बोलत होता आईंबद्दलच,पण फोनचा रिसिव्हर कानाला लावुन.पलिकडे कोणीच नव्हते.म्हणजे हा एकट्यातच बडबडत होता!!
पण एवढ्या वर्षात त्याला हे तरी करावे वाटले हे ही नसे थोडके.मी मनोमन देवाचे आभार मानले आणि जागेवरूनच बाप्पाला नमस्कार केला.
सुशला अशीच कायम सद्बुद्धी दे हि प्रार्थना करतच पुन्हा बेडवर जाऊन झोपले.
कधी एकदा सकाळ होतेय आणि ही गोष्ट मी काकुंना सांगतेय असे मला झाले होते.
पण आत्ता ह्याची ओळख सुशला न देणेच शहाणपणाचे होते म्हणुन मीही झोपेचा अभिनय करत बेडवर पडुन राहीले.
उद्याची सकाळ भविष्यात नक्कीच एक पाऊल सकारात्मक दिशेने पुढे जाणारी असणार होती ह्यात मला तरी शंका नव्हती.......
~~~~~~~~~~~~~~~
(क्रमश:)
घरकोन-37
©®राधिका कुलकर्णी.
-------------------------------------
नमस्कार मंडळी,कसा वाटला आजचा भाग?
घरकोन कथा आवडतेय की नाही?
 हे कमेंटद्वारे जरूर कळवा.
(लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासकट कथा नक्की शेअर करू शकता.) 
धन्यवाद.

Circle Image

Radhika Kulkarni

Writer

I am Radhika Kulkarni. Am BSc MA BEd. Previously was a teacher but now homemaker. I have hobby of reading and writing. Listening music is my hobby . I like to make friends..I have written so many poems stories in marathi and some poems in Hindi also ...please read my stories and follow the blog..