Sep 22, 2020
कथामालिका

घरकोन भाग 36

Read Later
घरकोन भाग 36

घरकोन -36
©राधिका कुलकर्णी.

रेवाच्या डोळ्यासमोर पुन्हा एकदा भुतकाळातल्या घटना चित्रपटासारख्या फिरायला लागल्या.
तो दिवस तिला खूपच छान आठवत होता कारण सुशांतला एम.बी.ए. पुर्ण होता होताच बेंगलोरच्या सॉफ्टवेइर कंपनी कडून चांगल्या पॅकेजची जॉब ऑफर आली होती.अर्थातच इतकी चांगली ऑफर त्याने पटकन स्विकारली.
त्याच्या मनातली सर्व स्वप्ने पुर्ण होण्याची ती नांदीच होती.
सर्वात आधी ही बातमी त्याने मलाच कळवली कारण तो व्यवस्थित सेटल झाल्याखेरीज लग्नाचा निर्णय घ्यायचा नाही असेच आमचे ठरले होते.
त्यामुळे आता आमची प्रतिक्षा संपणार होती.
मी ही खूप आनंदी होते.मी तेव्हा मुंबईमधे जॉब करत होते.घरातले लोक ह्या लग्नाला फारसे तयार नव्हतेच पण तरीही त्यांना न सांगुन लग्न करण्याचा आमचा मानस नव्हता.
त्याप्रमाणे योग्य वेळ येताच त्याच्या नौकरीची बातमी मी घरच्यांना कळवली.आई वडील फारसे आनंदी नाही वाटले ऐकुन पण आज्जीला मात्र प्रचंड आनंद झाला.ती एकटीच काय ती माझ्या सपोर्टला होती घरातुन बाकी भावंडे सगळी चुलत आणि वयाने लहान.ती बिचारी काय बोलणार?
पण मग एक दिवस त्यांच्या कानावर घालुन,त्यांना विचारून की तुमची ह्या लग्नाला संम्मत्ती आहे का?त्यावर त्यांनी हो ही नाही सांगितले आणि नाही ही नाही बोलले.
तु तुझी सज्ञान आहेस,तुझे हित-अहित तुला कळते मग आमच्या परवानगीची गरज काय तूला?
एकच सांगतो हे लग्न तू तुझ्या मर्जीने कर पण त्यानंतर
तुझे-आमचे कोणतेच संबंध उरणार नाही हे लक्षात ठेव.
खूप रडले पण अखेरीस माहेर सोडले आणि सुशच्या बरोबर लग्नाची गाठ बांधली.वाटल होत काही दिवसांनी राग निवळेल,आपल्या मुलीची निवड चुक नव्हती हे पटले की येतील परतुन.नाती अशी तुटतात का कधी?पण तसे घडले नाही.असोऽऽ.
काकुंनी मात्र सगळी हौस पुरवली.
त्यांना मुलगी नाही आणि माझी आई नाही लाड करायला हे जाणुन त्यांनी दोघींची कमी पुर्ण केली.सुशांतला बेंगलोरला कंपनी कडून मोठ्ठा ऐसपैस फ्लॅट मिळाला होता.नविन संसारात करायला लागणाऱ्या कुठल्याच तडजोडी सुदैवाने मला करायला लागल्या नाहीत.जे म्हणेल ती वस्तु सुश माझ्या पुढ्यात हजर करत असे.घर अगदी एखाद्या महालासारखे मी सजवले होते.आता कमी होती ती फक्त आईंची.आमची दोघांचीही हिच ईच्छा होती की काकु आता कायमच्या नगर सोडुन आमच्या बरोबर रहाव्यात.
सुशांतला जगातली सर्व सुखे काकुंच्या पायाशी आणुन ठेवायची होती.त्यांनी वडील गेल्यानंतर जे सोसले,भोगले त्याची सगळी भरपाई करायची होती.त्याने सगळे ठरवुनच एका टुरचे प्लॅनिंग केले.मी सुश आणि काकु तिघेच सुशच्या घरच्या देवदर्शनाची टुर आणि मग महाबळेश्वर असा बेत ठरला.

नगरला जाऊन सामान भरून तिकडून निघायचे ते परत न येण्यासाठीच असेच ठरले होते.
त्याप्रमाणे आम्ही सुट्टी काढुन नगरला गेलो.एक दिवसानंतर निघायचे ठरले.
पण आम्ही पोहचलो त्याच्या दुसऱ्याच दिवशी अचानक काकांची तब्ब्येत बिघडली.चहा पिता पिताच एकदम जमिनीवर कोसळले.शुद्ध हरपली होती. घाईघाईनेच त्यांना हॉस्पीटलमधे अॅडमिट केले.काकांना माईल्ड अॅटॅक येवुन गेल्याचे डॉक्टरने सांगीतले.दोन दिवस हॉस्पीटलमधे ठेवुन मग सगळ्या जरूरी तपासण्या औषधे पथ्यपाणी आणि घ्यायची काळजी हे सगळे सांगुन डिस्चार्ज मिळाला.ते घरी आल्यानंतर निघायचे ठरल्यावर मात्र काकु आता त्यांची तब्येत बरी नसताना मी असे तुमच्याबरोबर येणे बरे दिसणार नाही.,देवदर्शनाला नाट नको म्हणुन तुम्ही तरी जाऊन या असे सांगुन आईंनी सोबत यायला नकार दिला.
मन खट्टु झाले पण त्यांचेही एकाअर्थी योग्यच होते म्हणुन मग जास्त हट्ट न करता आम्ही दोघेच जाऊन आलो.सुट्ट्याही संपत आल्या होत्या त्यामुळे आईंना न आणताच आम्ही बेंगलोर गाठले.

नंतर फोनवरून बोलणी व्हायची पण लगेच जायला सुट्ट्या मिळणे मुश्कील होते म्हणुन आईंचे येणे लांबतच होते.मधल्या काळात माझे वर्षाचे सर्व पहिले सण आईंनी अगदी थाटामाटात साजरे केले.
भाद्रपदात सुशांतच्या मनात आले की गणपती स्थापना करूया म्हणुन आईला त्यानिमित्त बोलवुन घ्यायचे ठरले.घरचे विधी सण सोडुन कसे येवु?म्हणुन काकुंनी पुन्हा यायचे टाळले.
त्यांच्या सततच्या नकारामुळे सुशांतला खूप राग यायला लागला होता.त्याच्या मनातली आईंविषयीची तळमळ त्यांना का समजत नाही ? असेच त्याला वाटायचे सतत.तो मनातल्या मनातच स्वत:ला खात होता.त्याला असे बोलुन काकुंना दुखवायचेही नव्हते.
मग मीच ह्याचा सोक्षमोक्ष लावायचा ठरवुन एकदिवस वेळ काढुन आईंना फोन लावला.
इकडच्या तिकडच्या गप्पा /चौकशा झाल्यावर मग मीच मुद्द्याला हात घातला
"आई,थोड बोलायचं होत तुमच्याशी, बोलु का?"
"अगं,विचार की,परवानगी कशाला मागतेस?बोल काय बोलायचेय ते."
"काकु खूप शांत आणि संयमाने हसतच माझ्याशी बोलत होत्या त्यामुळे त्यांना असे विचारणे योग्य आहे का?असा विचार माझ्या मनात आला."
"मी अडखळतीय,बोलताना संभ्रमात पडलीय ही माझी मन:स्थिती त्यांनी तिकडे बसुन ताडली.
त्यावर त्याच बोलल्या,"रेवा बाळ अग आई म्हणतेस ना मला?मग इतके आढेवेढे का घेतेस बोलताना?
तु माझी मुलगीच आहेस बोल.
काय बोलायचे ते नि:संकोच बोल.
आता माझाही धीर थोडा एकवटला आणि मी विचारलेच,"आई तुम्हाला वाईट वाटेल ऐकुन पण मला जाणुन घ्यायचेय की तुम्ही आमच्याकडे यायला प्रत्येक वेळी काहीना काही कारणे देऊन टाळत का आहात?"
"काही अडचण असेल तर मोकळेपणाने सांगा पण अशी काहीतरी कारणे देऊ नका."
"तुमची काहीही अडचण असेल तर त्यावर चर्चा करून आपण मार्ग काढु पण मला ना आता सुशांतकडे बघवत नाहीए."
"तो बोलत काहीच नाही पण मनातल्या मनात खातोय स्वत:लाच आणि त्याला तसे बघणे मला असह्य होतेय आता,म्हणुन धीर करून मीच तुमच्याशी बोलायचे ठरवले."
"सुशला माहित नाहीए हं की मी तुम्हाला असे विचारणार आहे हे."
"नाहीतर त्याने मलाही अडवलेच असते तुमच्याशी बोलायला."
"प्लिज आई खरे आणि पटेल असे कारण सांगा."
काकुंनी एक दिर्घ श्वास सोडला आणि बोलायला लागल्या.
"रेवा बाळऽऽ मला तुमची तळमळ,प्रेम सगळे कळतेय पण तुमचे नविन लग्न झालेय.नव्या नवलाईचे दिवस मजेत घालवा की.मी कुठे पळुन चाललेय.आज नाही उद्या तुला पोरबाळ होईल तेव्हा मीच येणार आहे ना सगळे करायला.मग येईनच की कायमची. पण आत्ताच काय घाई आहे म्हणुन आपले थोडे ढकलत होते इतकेच.इतका काय विचार करायचा.
तो पहिल्या पासुन असाच आहे.त्याला तुच समजाव नीटपणे.तुझ ऐकेल तो,मी सांगितले की गाल फुरगटुन बसेल."
आई हसतच बोलत होत्या.
मलाही हसु येत होते.किती कमी शब्दात त्यांनी समजावुन पटवुन दिली होती त्यांची बाजु.
आई खरच अशीच असते का?मग माझी आई का..... ......???"
रेवाच्या डोळ्यात नकळत पाणी तरळले होते.
एक ही आई होती जिने मला मनापासुन आपली लेक मानुन ते सगळे हक्क सहज बहाल केले होते ज्यात बऱ्याचदा नात्यांच्या बेड्या आड येतात संवाद घडुन यायला.
एक ही आई होती,जी आमचे खासगी आयुष्य डिस्टर्ब होऊ नये म्हणुन मुलाच्या प्रेमळ निमंत्रणाला धुडकावत होती आणि एक माझे आईवडील ,एका क्षणात सगळ्या नात्यांचे दोर कापुन कधी कुठला दुर दुरपर्यंत संबंध नसल्यागत मला विलग करून मोकळे झाले.
कधी आईला वाटलं नाही,आपली लेक तिच्या संसारात सुखी आहे का ह्याची चौकशी करावी.माणसे खरच इतके कठोर दगडाच्या काळजाचे कसे काय होऊ शकतात??"
"रेवाऽऽऽ,रेवाऽऽऽ, अगं आहेस ना फोनवर की कट झाला?"
काकुंच्या आवाजाने रेवा भानावर आली, "हो आई आहे..बोला"
"अग कुठे हरवलीस अशी?"
हे बघ जास्त विचार नाही करायचा.योग्यवेळी योग्य ती गोष्ट आपोआप घडते.तेव्हा तुम्ही नव्या संसाराची मजा घ्या आणि आनंदात रहा.तुमचे सुख तेच माझे सुख."
"बरं रेवा ऐक,आता मी काय सांगतेय ते नीट ऐक."
चुकुन माकुन पाळी चुकलीच तर नसते काही करू नकोस बर बाळा.तसे जर काही झालेच तर पहिले मुल होऊ दे लवकर.पण अॅबॉर्शन वगैरे काही करू नकोस बर.पुरूष काय सगळे करून नामानिराळे होतात पण बाईच्या जिवाला फार त्रास होतो गं ह्या सगळ्याचा.तेव्हा काळजी घे."आत्ता हे मी जे काही बोलले ते आपल्या दोघीतच ठेव.आई लेकीला सांगतीय असे समज हो."
"हो आई मी काळजी घेईन,तुम्ही नका काळजी करू,असे काही होणार नाही."
मी लाजतच आईंना उत्तर देत होते.
आज मनावरचे भले मोठ्ठे ओझे उतरले होते पण खरी परीक्षा तर हे सगळे सुशला कसे पटवायचे ह्याचीच होती कारण त्याला हे पटणे अशक्यच होते की आम्हाला प्रायव्हसी मिळावी म्हणुन काकु इकडे रहायला येत नाहिएत.
पण ती वेळ माझ्यावर आलीच नाही.त्याच रात्री काकुंनी पुन्हा फोन लावला.सुशशी बराचवेळ गप्पा मारल्या आणि ओघातच त्याला सांगीतलेही की त्या का येत नाहीत.सुशचा ताण थोडा हलका झाल्यासारखे वाटले कारण त्या रात्री तो अचानक खूप रिलॅक्स मुडमधे दिसत होता.
असेच चारसहा महिने गेले.एक दिवस आईंचा फोन आला.जरा अवेळीच होता फोन त्यामुळे काळजीनेच फोन उचलला.पलिकडून आईंनी जुजबी चौकशी करून सुशांतला फोन दे सांगितल्या.
सुशांतने फोन घेतला.दोन मिनिट तो फक्त ऐकत होता.हं,बर,असं का?हो,इतकेच प्रत्युत्तर ऐकु येत होते.मला नीटसा क्लु लागत नव्हता की इतके सिक्रेटीव्ह काय बोलत असतील हे की विषय समजु नये ही खबरदारी घेतली जातीय.
"बरं आई तु काळजी करू नकोस,मी उद्याच तुझ्या अकाऊंटवर पैसे पाठवतो.काळजी करू नको,सगळे ठिक होईल."
संभाषण संपुन जेव्हा रिसिव्हर खाली ठेवला तेव्हा मी अधीरतेनेच विचारले, "एवढे काय गुफ्तगु चालले होते रे?
"मला कळु द्यायचे नव्हते का?"
अगं नाही गं,आई हळुहळु आवाजात बोलत होती.मी फक्त ऐकत होतो.
"हळु का?"
"काही प्रॉब्लेम आहे का?"
"अगंऽऽ काकांबद्दल सांगत होती."
कदाचित काकांना कळु नये असे वाटत असेल आईला."
काय?
काही नाही,काकांनी त्याच्या दोन्ही जावयांना बिझनेसमधे पार्टनरशिप दिली होती.तर काही दिवसांपुर्वीच काकांचे कोणत्यातरी पेपरवर साईन घेतले बिझनेस सदर्भात सांगुन आणि मग परवा अचानक कळले की दोन्ही जावयांनी मिळुन कागदोपत्री सगळे बिझनेसचे हक्क प्रस्थापित करणारे कागदपत्र स्वत:च्या नावावर करून त्यांनी काकांना बिझनेस मधुन हद्दपार केले आहे.आता फक्त आपले राहते घर जे आईच्या नावावर आहे म्हणुन ते आणि थोडेफार त्यांचे पर्सनल सेव्हींग्ज इतकेच काय ते शिल्लक राहीलेय म्हणे.बाकी सगळे जावयांनी गिळंकृत केलेय.
काकाला खूप मोठ्ठा धक्का बसलाय हे समजल्यावर पण कोर्ट कचेऱ्या करूनही फायदा नाही."
"बघ रेवा देवाजवळ 'देर है मगर अंधेर नही'."
"जेव्हा बाबा गेले तेव्हा सगळा बनाबनाया बिझनेस काकांना मिळाला.त्यांनीही मेहनतीने तो वाढवला,नाही असे नाही पण आपल्याच भावाच्या मुलाला आणि बायकोला त्यांच्याच हक्काच्या घरात राहुन पै पैला तरसवले.
तेव्हा त्याला त्या गोष्टी करताना किंचितही वाईट वाटले नाही म्हणुन देवाने आज त्याच्यावर तिच वेळ आणली.
त्याच्याच लाडक्या मुलींच्या नवऱ्यांनी त्याला फसवले."
मला तर खरच आनंद होतोय.त्याला त्याच्या कर्माची शिक्षा मिळाली."
"काय बोलतोएस सुश तु?"तुला भान आहे का?"वेळ काय, प्रसंग काय,अन् तुझे काहीतरी तिसरेच."
(मलाही ह्यावेॆळी सुशच्या विचारसरणीचा रागच आला. कितीही काही झाले तरी दुसऱ्याच्या दु:खात हसणारी माणसे ही भावनाशुन्य पुतळेच म्हणते मी.")
"अग काय चुकीचे बोलतोय मी?
तु साक्षीदार आहेस ना माझ्या हर प्रसंगाची?"
"ह्याने वेळेत पैसे न पाठवल्याने कित्येक रात्री मी उपाशी काढल्या आहेत,माझी मेसची कित्येक वेळची बिले तु भरलीएस हे विसरलीस का तु?"
आज त्यांना कळेल आपल्याच माणसांनी फसवल्याची टोचणी काय असते ते."
"बर पण मग तु आईंच्या अकाऊंटवर पैसे पाठवण्याबद्दल काय बोलत होतास?"
"अगं काही नाही,ह्या सगळ्याचा परिणाम म्हणुन काकाची तब्येत अचानक बिघडलीय.डॉक्टरांनी कम्प्लिट बॉडी चेकअप करायला सांगितलेय पण त्यांच्याजवळ इतका पैसा नाहीए म्हणुन ते चेकअप करायला नाही म्हणताएत.तब्येत खूपच उतरलीय आणि जेवत पण नाहीएत नीट."
म्हणुन आईला काळजी वाटुन तिनेच मला पैसे पाठव म्हणालीय त्यांच्या चेकअप साठी.
मी देणार आहे.कारण कसे का होईना त्यांनी आम्हाला आधार दिला होता बाबा गेल्यावर त्यामुळे त्याची उतराई म्हणुन तरी मी ही मदत करणारच आहे."

"मला वाटते सुशऽ आपण तिकडे जायला हवे.त्यांना सध्या आपल्या आधाराची गरज आहे."
"निदान तु तरी जायलाच पाहिजे असे वाटते मला."
"रेवा तुझे म्हणणे पटतेय मला पण आत्ता मला लिव्ह मिळणे खरच खूप अवघड आहे आणि दुसरे असे की खरच मला मनातुन त्यांच्याविषयी काहीच वाटत नाही.आई आहे तिकडे म्हणुन तरी मी संबंध ठेवलेत नाहीतर कधीच तोडुन टाकले असते.
त्यासाठीच मी सतत आईला इकडे आणायचा विचार करतोय की एकदा तिच आपल्या बरोबर आली की त्यांचा आपला सबंध कायमचा संपवता येईल पण आई सतत काहीतरी कारणे सांगुन लांबवतीच आहे.
असोऽऽ.निदान आईच्या इच्छे खातर का होईना मला त्यांची जवाबदारी घेणे भागच आहे."
"चलऽऽ खूप उशीर झालाय झोपु आता.उद्या मला लवकर जायचेय.एका डेलिगेट्स बरोबर मिटींग आहे महत्त्वाची."
कुस वळवुन सुश झोपी गेला.
मी मात्र सुन्न झाले होते.
नात्यांचे हे विविध पदर,प्रत्येक पदर उलगडताना नविनच रंग दाखवतो कधी गहीरा कधी विटका.कधी परिस्थितींच्या थपेड्यात पुरते उडुन जातात. जीवनातील चढ-उतार आणि बरे वाईट प्रसंग माणसाला खरच समृद्ध बनवतात की आपल्याच विचारांना पुढे बरोबर म्हणुन ढकलतात.??
सुशांत चुकतोय की बरोबर वागतोय ह्याचे गणित प्रत्येकवेळी निराळेच उत्तर देऊन जात होते.
नात्यांचा हा खेळ अजुन काय काय पहायला लावणार होता परमेश्वरालाच ठाऊक.......
डोळे जड होत होते.हळुहळु मीही निद्रेच्या डोहात सामावत होते.निरूत्तर...निराश..!!!
~~~~~~~~~~~~~~~~~
(क्रमश:)
घरकोन -36
©®राधिका कुलकर्णी.
-------------------------------------
नमस्कार मंडळी,कसा वाटला आजचा भाग?
घरकोन आवडतेय की नाही? हे कमेंटद्वारे जरूर कळवा.
(लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासकट कथा नक्की शेअर करू शकता.) 
धन्यवाद.

Circle Image

Radhika Kulkarni

Writer

I am Radhika Kulkarni. Am BSc MA BEd. Previously was a teacher but now homemaker. I have hobby of reading and writing. Listening music is my hobby . I like to make friends..I have written so many poems stories in marathi and some poems in Hindi also ...please read my stories and follow the blog..