Sep 22, 2020
कथामालिका

घरकोन भाग 33

Read Later
घरकोन भाग 33

घरकोन -33
©®राधिका कुलकर्णी.


किती वेळचा फोन ढाय ढाय कोकलत होता.
पण रेवा आपल्याच गत आठवणीत इतकी रममाण झाली होती की त्या नादातच तिचा आपसुक डोळा लागला होता.आसपास काय चाललेय ह्याचेही भान नसल्यासारखी तिला बेफाम झोप लागली होती.फोन वाजून वाजून थांबला.परत दुसऱ्यांदा फोन कर्कश्श आवाजात ओरडायला लागला तेव्हा रेवा घाबरून जागी झाली.
काय वेळ,किती वाजलेत,आपण कुठे आहोत,स्वप्न पाहिले की जागेच होतो.काहीच समजत नव्हते.
एका दिशेलाच मान वळवुन अडनिड्या अवस्थेत झोपल्याने आता उठल्यावर मान अवघडुन दुखत होती.
मानेला हलकासा झटका देवुन जवळजवळ धावतच ती बेडरूम मधुन दिवाणखान्यात पोहोचली.
फोन अजुनही वाजतच होता.धावत जाऊन तिने रिसीव्हर उचलला.
हॅलोऽऽ!!
"अगं बरीएस ना बाळ?दोनदा फोन केला,कुठे होतीस तु?"
सुशांतच्या आईचाच फोन होता.
रेवा जरा चपापली.लगेच स्वत:ला सावरत म्हणाली.
"नमस्कार आई,काही नाही जरा वाचता वाचता डोळा लागला.फोनची रींग ऐकुच आली नाही,सॉरी हं आई!"
"तुम्ही कशा आहात?
काका/काकु कसे आहेत?"
रेवानी एका दमात सगळ्यांची चौकशी उरकली.
"अगंऽ,आम्ही बरे आहोत सगळे.
पण तुझा गेल्या आठवड्यभरापासुन एकही फोन नाही,काळजी वाटली म्हणुन फोन केला हो..
"कसा आहे सुशांत?"
"त्याला माझी आठवण येते का गं?"
आईंचा आवाज कातर झाला होता.रेवाला ते जाणवले,वाईटही वाटत होते,पण काही गोष्टी आणि माणसांचे स्वभाव ह्याला औषधच नसते तसे काहीसे झाले होते.
रेवाचे प्रयत्न चालुच होते सतत पण नियतीच्या मनात काय होते देवच जाणे.
"अगं आहेस का,फोन कट झालाय का?"
काकुंचा आवाज ऐकुन रेवा भानावर आली.
डोळ्यातले अश्रु पुसतच तिने उत्तर दिले," हो, ऐकतेय मी.बोला तुम्ही."
आईऽऽ खरेतर मी कालपासुन तुम्हाला आठवण करतेय.आज फोन करणारच होते पण कामात राहुन गेले.बरे झाले तुम्हीच फोन केलात ते."
काय झालेय?तुम्ही बरे आहात ना गं दोघेही.
काळजी घ्या बरं एकमेकांची."
"हो आईऽऽ आम्ही ठिक आहोत.पण मला तुमची खूप आठवण येत होती.बोलावेसे वाटत होते."
काय गं,तुझा स्वर काळजीचा वाटतोय मला.काही झालेय का?सुशांतचे तुझे काही भांडण? "
नाही आई भांडण वगैरे काही नाही झालेय पण मला सुशचीच खूप काळजी वाटतीय.
सध्या त्याच्या ऑफिसमधे खूपच टेंशन चालु आहे, त्यात त्याचा बॉस त्याचे प्रमोशन होऊ नये म्हणुन ह्याला त्रास देतोय मुद्दामुन.
तो सध्या खूपच चि़डचिड करतोय,स्वत:ला आतल्याआत कोसत असतो.
त्याच्या मेहनतीवर पाणी फिरतेय म्हणुन सतत चिंतेत असतो.वरून दाखवत नसला तरी मला त्याची आंतरिक खळबळ जाणवतेय.तुमच्याशी बोलुन बरे वाटेल आईंशी बोल म्हणले की गप्प बसतो.मला तर हा तिढा कसा सोडवायचा तेच समजेनासे झालेय आई."
काकु शांतपणे सर्व ऐकत होत्या.एकुलता एक मुलगा क्षुल्लक कारणावरून रूसुन बोलणेच टाकलाय ह्याचे सल आईंनाही डाचत होते परंतु ह्यावेळी त्याची अक्कल ठिकाण्यावर येणे जास्त गरजेचे होते म्हणुन काकुंनीही हा अबोला तसाच ताणुन धरला होता.
आईऽऽ,ऐकताय नां?"
हो बाळ,ऐकतेय.पण आता इतक्या लांबुन ऐकण्या पलिकडे करू तरी काय शकतेय हि म्हातारी.
आता आमची वयं झालीत.पिकली पानं कधी गळुन पडतील ह्याचा नेम नाही अशावेळी म्हाताऱ्यांची काळजी घ्यायची सोडुन जर मुले आम्हालाच काळजी करायला लावत असतील तर काय बोलणार. तुम्हाला मोठ्यांची मने जपण्या पेक्षा तुमची मते/इगो जास्त महत्त्वाची वाटतात मग तोडगा निघणार तरी कसा??"
काकुचा आवाज आता रडवेला झाला होता. 
आईऽ असे काही नाहीये.सुशलाही तुमची काळजी वाटते.पण त्याचा स्वभाव थोडा हट्टी आहे हे,मी तुम्हाला सांगायला हवेय का?
तुम्ही शांत व्हा बघु आधी.रडू नका.मी आहे ना,मी नक्की ह्यातुन मार्ग काढेन.सुशांतला नक्की त्याची चुक कळेल आणि तो स्वत:हुन तुम्हाला फोन करेल आणि पुन्हा एकदा सगळे ठिक होईल. मला खात्री आहे,हे असेच घडणार नक्की आणि खूप लवकरच घडणार,बघालच तुम्ही.
आता डोळे पुसा बघु.
"काकांची तब्येत कशी आहे आता?"
"त्यांंच्या तब्ब्येतीचे काय असणार.आता अशा दुखण्यात काय सांगणार.मरत नाही म्हणुन जगताहेत ईतकेच म्हणु शकतो आपण.
तु म्हणतेस तसे घडेलही
कदाचित पण तोपर्यंत वेळ हातची निघुन जाऊ नये ईतकेच वाटते बघ पोरी."
रेवा बेटाऽऽ काहीही कर पण एकदा सुशांतला सांग काकाला भेटुन जायला.तो तुझे नक्की ऐकेल.आता त्यांचे जास्त दिवस उरलेत असे काही वाटत नाही.
पण मरण्याआधी फक्त एकदा सुशला भेटायची ईच्छा आहे गं त्यांना.
सांग सुशांतला मरणाऱ्या माणसाचा राग करू नये.माफ कर त्यांना आणि मोठ्या मनाने एकदा तरी भेटायला ये."
आई,नक्की सांगते सुशला.पण तुम्ही स्वत:ची काळजी घ्या.सगळे छान होईल.विश्वास ठेवा."
##################
फोन कट झाला तरी रेवा  मात्र सुन्न होऊनआईंच्याच बोलण्याचा विचार करत होती.
कसे समजवावे सुशला हेच समजत नव्हते.
काका/काकुंवरच्या रागापोटी आई त्यांना सोडुन इकडे रहायला येणार नाही म्हणल्या म्हणुन चिडुन आईला भेटणे/बोलणेच बंद केले होते कायमचे.
प्रेम एक टोक तर संताप दुसरे टोक.वर्षे उलटुन गेली पण सुशांतने एकदाही काकुंना फोन केला नव्हता.
रेवा मात्र कात्रीत सापडली होती.
एकीकडे सुशांत,त्याचे प्रेम तर दुसरीकडे काकु,त्यांच्याविषयी वाटणारी माया.दोन्ही तिला हव्या होत्या पण सुशांतमुळे ह्यातील एकाचीच निवड करणे तिला प्रचंड अवघड जात होते.
सुशांत तिला जरी आईशी बोलायला बंदी घालत नसला तरी स्वत:हुन कधीही फोनही करत नव्हता.कित्येकदा खूप अस्वस्थ वाटायला लागले की रात्री अपरात्री फोन जवळ जाऊन उगीचच रिसिव्हर उचलुन नंबर डायल करायचा परंतु दुसऱ्याक्षणी फोन कट करून तसाच रिसिव्हर कानाला लावुन डोळ्यात पाणी आणायचा.
त्याचे आत्मद्वंद्वच त्याला कोणताही निर्णय घेऊ देत नव्हता.मनाची चाललेली कुतरओढ,घालमेल पुन्हा एकदा अभिमानाच्या गोठाड्यात करकचुन बांधुन आपल्याच स्वाभिमानाला कुरवाळत हताशपणे पुन्हा बेडवर झोपायचा.
त्याची ही द्विधा अवस्था दिसत असुनही रेवाला त्यातुन मार्ग काढण्यात म्हणावे असे यश मिळत नव्हते.
गाडीचा जोरजोराने वाजणारा हॉर्न रेवाच्या विचारशृंखलेला तोडत तिच्या कानाच्या पडद्यावर आदळला तशी ती भानावर आली.आज ऑफिसमधे नेमके काय घडले असेल, सुशच्या हातुन प्रोजेक्ट तर गेलेच होते पण त्यामुळे तो नाराज तर नसेल ना.
एक ना अनेक चिंतांनी रेवाला एकाचवेळी ग्रासुन टाकले.
पटकन किचनकडे धावत तिने चहाचे आधण चढवले आणि फ्रेश व्हायला ती वॉशरूमकडे वळली.
~~~~~~~~~~~~~~~~~~
(क्रमश:)
घरकोन -33
©®राधिका कुलकर्णी.
---------------------------------------
नमस्कार वाचकमंडळी????????????
जवळपास अर्धे अधिक भाग पोस्ट करून झालेत.कथा कशी वाटतेय,आवडतेय का?मग रिप्लाय देऊन जरूर कळवा.तुमचे अभिप्राय /प्रतिक्रीया नेहमीच लेखकांना लिखाणात सुधारणा घडवायला मदत करतात तेव्हा नि:संकोच आपली प्रामाणिक मते द्यायला विसरू.नका.
लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासकट हि कथा नक्कीच शेअर करू शकता..)
धन्यवाद.????????

Circle Image

Radhika Kulkarni

Writer

I am Radhika Kulkarni. Am BSc MA BEd. Previously was a teacher but now homemaker. I have hobby of reading and writing. Listening music is my hobby . I like to make friends..I have written so many poems stories in marathi and some poems in Hindi also ...please read my stories and follow the blog..