घरकोन भाग 31

नात्यांची वीण घट्ट सांधणाऱ्या अल्लड प्रेमळ रेवाची सुंदर प्रेमकहाणी.

घरकोन -31
©राधिका कुलकर्णी.

बऱ्याचवेळाने काकूही झोपायला तिच्याच खोलीत आल्या.
रेवा जागीच होती.काहीतरी सामानाची आवराआवर चाललेली होती तिची.
ते पाहून काकुंनी विचारले,"झोपली नाहीस होय गं अजुन?"
नाही,झोपच येत नव्हती.बॅग आवरत होते.उद्या पहाटेच निघेन म्हणते."
हो,तुझा अभ्यास बुडतोय, जायला तर लागणारच."
काकुंच्या मनात काहीतरी विचार चालला होता.कसे विचारावे कळत नव्हते.रेवाला बोलु की नको?असे विचार मनात येत होते.
एकाच दिशेला तंद्री लावून काकू कसलासा विचार करताना बघुन रेवानेच विचारले,"काय झाले काकू, कसला विचार करता आहात?"
काही नाही गं,असेच.मगाशी मी खाली होते तेव्हा अचानक सुशांत आला आणि मला म्हणला आई बैस ना इकडे.मला तुझ्या मांडीवर डोके ठेऊन पडायचेय.
मला कळेना अचानक तो असे का बोलत होता.चेहरा उतरलेला वाटत होता.मी काही विचारले नाही पण मांडीवर डोके ठेवले तेव्हा तो रडत असावा असे वाटले.काय झाले असे विचारले तर काहीच बोलला नाही.मग मीही जास्त चौकशा करणे टाळले.
पण पोराची चींता वाटतेय गं फार.खूप हळवा आहे ग पोर,मनात काय चालते ना थांग लागू देत नाही पण आतल्या आत कुढत राहतो.तुच बघतेस का विचारून त्याला काय झालेय?
मला तर तो काहीच सांगणार नाही.पण काळजी वाटते मला त्याची.
"तुमच्या दोघांत तर काही झाले नाही ना?"
काकुंनी अंदाज घेण्यासाठी रेवाला प्रश्न केला.
त्यावर रेवानेही काकुंना सगळे खरे सांगायचे ठरवले.
"हो काकू,तुमचा अंदाज बरोबर आहे.आमच्यातच जरा वाद नाही पण बोलणे झाले ज्यामुळे तो नाराज झालाय."
"अरे देवाऽऽ.आता काय झाले पुन्हा?"
काकु मी ठरवलेय त्याने जसे मला खरे लपवुन पिळलेय ना काल,त्याची परतफेड करायची.कळु दे ना त्यालाही की असे दुसऱ्यांच्या भावनांशी खेळल्यावर काय त्रास होतो आणि ह्यात मला तुमची मदत हवीय.करताल ना काकु?"
तुम्हां पोरांचे काही कळतच नाही बाई मला.घडीत प्रेम काय करता घडीत भांडता काय.
"आधी तुमचे काय वाद झाले ते तर सांग."
काकु हा तुमचा सुशांत सतत माझी अशीच जीवघेणी मस्करी करत असतो.तुम्ही हॉस्पिटलमधे आल्या होत्या तेव्हाही त्याने असेच केले.मुद्दाम त्या सायली बरोबर खूप घनिष्ट संबंध असल्यासारखे वागून मला सारखे अपमानीत करत होता म्हणुन मी शेवटच्या दिवशी भेटायला आले नव्हते.
"नंतर कॉलेजमधे खूप विनवण्या करून मग मी त्याला माफ केले तर आता पुन्हा मस्करी.अशा महत्त्वाच्या प्रसंगी तरी मस्करी करू नये एवढेही ह्याला समजु नये का?"
"म्हणुनच त्याला धडा शिकवण्याकरता मीही त्याला म्हणले काल की मला ह्या नात्याबद्दल पुनर्विचार करायला वेळ हवाय.त्यामुळेच तो उदास झालाय."
"काकु तुम्हीच सांगा माझे काही चुकलेय का?"
तुम्ही मला माझ्या आईच्या स्थानीच आहात,त्यामुळे मी तुम्ही सांगाल ते ऐकेन,पण एकदा माझ्या जागी बसुन विचार करा आणि मग तुमचा निर्णय सांगा."
रेवा बोलुन शांत झाली होती आणि काकु काय बोलत आहेत ते ऐकण्यासाठी त्यांच्याकडेच प्रश्नार्थक नजरेने बघत होती.
सगळे ऐकुन काकुंनी एक सुस्कारा सोडतच बोलल्या,"तुझी बाजू अगदीच चुकीची आहे असे नाही म्हणणार मी कारण मीही त्याला अशी मस्करी नको करूस ह्यावेळी असे बोलले होते पण तो म्हणाला की तिला नाही म्हणुन हो म्हणल्यावर किती मोठ्ठे सरप्राईज मिळेल तेव्हाचा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचाय मला म्हणुन तु मला मदत कर ह्यात.माझा नाईलाज झाला."
"पण असे असेल तर मी त्याला वेळीच अडवले नाही ही माझीही चुक आहेच की.मग आता मलाही शिक्षा कर आधी मग सुशांतला."
"काकु असे नका हो बोलु.मला तुम्हाला दुखवायचे नाहीये.माझा राग फक्त सुशांतवर आहे.त्याला फक्त अशी मस्करी कशी महागात पडू शकते हे दाखवण्या साठी मी नाटक करतीय."
काकुऽऽ प्लिज तुम्ही रडू नका ना,अॅम सॉरी काकुऽऽ!"
काकुंच्या डोळ्यातले पाणी पुसत आता रेवाही रडायला लागली.
काकुंनीच तिला जवळ घेतले.लेकीसारखी माया केली.तोंडावरून हात फिरवला.जणु रेवाच त्यांचीच लेक होती इतकी माया त्या स्पर्शात ओथंबुन वाहताना जाणवत होती रेवाला.रेवानेही काकुंच्या कुशीत शिरून मगापासुन आवरलेला बांध हलका करत स्फुंदुन स्फुंदुन रडायला लागली.
थोडावेळ तिला शांत होऊ दिल्यानंतर मग काकुंनीच तिचे डोळे पुसले आणि पुन्हा बोलायला सुरवात केली.
"रेवा बाळ तुला एक गंम्मत सांगू,मला फार इच्छा होती सुशांत झाला तेव्हा मुलगीच व्हावी म्हणुन पण झाला सुशांत.
इतके दिवस मुलीची हौस मनातच राहुन गेली.पुढे नेहमी हाच विचार यायचा सुशांतची बायको जी कोणी येईल तिलाच लेकीच्या मायेने संभाळु पण मी ही अशी जास्त शिकले नाही म्हणुन सतत घरातच असते बाहेरचे जगच माहित नाही.येणारी मुलगी कशी असेल? तिला आपली अशी गावंढळ अडाणी सासु चालेल का की अडचण वाटेल आपली?
काहिही असो पण मी मात्र मुलांच्या संसारात अडचण न करता प्रेमाने जे जमेल ते करत राहीन इतकेच मनाशी ठरवले होते.
पण तूला पाहिले आणि मनातल्या साऱ्या शंका क्षणात गळुन पडल्या.
तुझ्या रूपाने किती गोड मुलगी मिळालीय मला आज.ह्यापुढे तूला दोन आया आहेत हे नेहमी लक्षात ठेव.
तू स्वत:ला आजपासुन कधीही एकटे समजू नकोस हो पोरी.
जेव्हा वाटेल तेव्हा माझ्याशी हक्काने हवे ते बोल जसे आज बोललीस ना मनातले तसेच.
तुम्हा पोरांच्या भांडणात मी पडू नये खरेतर पण एकदा सुशांतला मदत केलीय तर आता तुलाही मदत करायलाच हवी नाहीतर दोन लेकरांमधे दुजाभाव केला असे नको वाटायला, काय?"
काकु हसुनच रेवाकडे पहात म्हणाल्या.
त्यावर रेवाचीही कळी खुलली आणि ती प्रेमाने काकुंना पुन्हा बिलगली.
थँक्यु काकु..थँक्यु थँक्यु थँक्यु!!
बास,बास ते थँक्यु पुराण.
आता काय मदत करू तुला ते सांग.
पण त्याआधी एक सांग,खरच का तु सुशांतला नकार देणार आहेस?
फार हळवे आहे गं माझे लेकरू,तुटून जाईल तू जर नाही म्हणालीस तर.पुढे तोंडावर परिक्षा आहेत तेव्हा जास्त ताणु नकोस हो.नाहीतर त्याचे अभ्यासात मन लागणार नाही.
होत्याचे नव्हते होऊन बसेल अन् मग गोष्टी हाताबाहेर गेल्यावर काहीच करता येणार नाही तेव्हा जास्त ताणु नका एवढेच सांगते हो आईच्या मायेने."
हो काकु,नाहीच ताणणार आहे फक्त त्याला त्याची चूक कळेपर्यंत."
"पण नेमके काय करणारेस तू?"
काही नाही उद्या मी खालच्या रूममधे सगळे सामान ठेवते आणि सकाळीच तिकडे जाऊन बसते.तो विचारेलच मला घरात नाही बघुन की मी कुठेय?तेव्हा तुम्ही त्याला फक्त इतकेच सांगा की ती म्हणजे मी तुम्हाला ही साडी परत करून गेलीय मुंबईला परत.
तेव्हा त्याचे हावभाव बघुन विचारा की मी असे का केले?आणि मग तो काय बोलतो ते सगळे एेकुन घ्या.हे सगळे खालीच बोला मला ऐकु येईल असे,म्हणजे मलाही कळेल तो काय बोलतोय ते.
आणि मग जरा त्याला तुमचे ठेवणीतले औषधी डोस पाजून काहीतरी आणायला ह्या खोलीत पाठवा.
मला इकडे बघुन त्याला काय वाटेल ते मला बघायचेय. 
"पण म्हणजे तू उद्या तुझा जाण्याचा बेत रद्द करतीएस का?"
रद्द नाही करत आहे,फक्त थोड्या उशीराच्या बसने जाईन.हे फक्त त्याला सांगण्यापुरतेच."
"कशी वाटली आयडिया सांगा ना काकु?"
एखादे लहान मुल विचारावे तसे रेवा विचारत होती.
काकुंना दोघांच्याही पोरखेळाचे हसुच येत होते पण त्यांचे एकमेकांवरचे प्रेम बघुन मनातल्या मनात समाधानीही होत्या.
काकुंनी हसतच रेवाच्या प्लॅनला दुजोरा दिला आणि दिवा मालवून  दोघीही निद्रेच्या आधीन झाल्या.इकडे सुशांत आपल्या खोलीत तळमळत होता.हे काय होऊन बसले सगळे.मी काय विचार केला आणि हे काय विपरीत घडले.मला वाटले होते की ती आनंदी होईल पण ती तर कायमची दुरावतेय मला.काय करू?
सुशांतला कधी एकदा सकाळ होतेय आणि रेवाशी बोलतोय असे झाले होते.पण येणारी सकाळ काय घेऊन येणार हे त्याला कुठे माहित होते.
रेवा मात्र काकुंच्या कुशीत आज कित्येक वर्षांनी आईच्या मायेची ऊब अनुभवत होती.काकुंच्या रूपाने मिळालेल्या आईच्या प्रेमामुळे स्वत:ला जगातली सर्वात भाग्यवान मुलगी समजत होती.त्या आनंदातच कधी झोपेने मनाचा ताबा घेतला तिलाही कळले नाही.
उद्याची सकाळ कोणते नाट्य घडवणार होते हे फक्त देवालाच माहित होते.
~~~~~~~~~~~~~~~~~~
(क्रमश:)
घरकोन -31
©®राधिका कुलकर्णी.
-------------------------------------
नमस्कार मंडळी,
कसा वाटला आजचा भाग?घरकोन आवडतोय की नाही? 
हे कमेंटद्वारे जरूर कळवा.
(लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासकट कथा नक्की शेअर करू शकता.) 
धन्यवाद.

🎭 Series Post

View all