Sep 22, 2020
कथामालिका

घरकोन भाग 26

Read Later
घरकोन भाग 26

घरकोन -26
©®राधिका कुलकर्णी.

आज किती तरी दिवसांनी रेवा आणि सुशांत समाधानाची झोप घेणार होते.गेल्या कित्येक रात्री वैचारीक मानसिक तारेवरच्या कसरतीने दोघांचेही कशातच लक्ष नव्हते.पण आज मात्र सगळे वातावरण अचानक बदलुन गेले होते.
सुशांतचे तर गेले कित्येक दिवस तहान,भूक,झोप, अभ्यास सगळ्यातून पार लक्ष उडाले होते.
आता सगळे प्रश्न मार्गी लागल्यावर मात्र तो भानावर आला होता.
पुन्हा एकदा जोमाने अभ्यासाकडे बघायला हवे ही जाणीव त्याला व्हायला लागली होती.
कॉलेजमधेही आता सगळीकडे परीक्षा आणि  अभ्यासाचे वारे वाहताना दिसत होते.शेवटचे सहा महीनेच बाकी होते त्यामुळे जो तो आपापल्या परीने चांगले मार्कस,चांगले कँम्पस सलेक्शन ह्यासाठी मेहनत घेताना दिसत होते.म्हणता म्हणता दिवस संपत चालले होते.
वेगवेगळ्या चांगल्या चांगल्या कंपनीज इंटरव्ह्यू साठी येत होत्या.
सुशांतला खात्री होतीच की तो चांगले पॅकेज मिळवेलच परंतु सध्यातरी जॉब न करता पुढे शिकण्याचा त्याचा मानस होता.रेवा मात्र जॉबच करायचा विचार करत होती.तिला लवकरात लवकर स्वत:च्या पायावर  उभे रहायचे होते.कारण जर घरातून काही कारणांनी विरोध झालाच तर स्वत: कमावतोय ह्या सबबीखाली ती आपल्या निर्णयावर ठाम राहू शकणार होती.
वेळ पडल्यास आई वडीलांच्या विरोधाला पत्करून नोकरीच्या निमित्ताने घराबाहेरही राहू शकणार होती.
परीक्षा तोंडावर आल्या होत्या.
आता कॉलेज जाणे ही फक्त औपचारिकता उरली होती.
रेवा सुशांतला भेटणे ह्या एकाच कारणास्तव कॉलेजला नित्य नियमाने जात होती.पण सुशांतला मात्र आता फक्त अभ्यास एके अभ्यास एवढेच काय ते दिसत होते.जसा रेवा प्रश्न निकालात निघाला आणि सुशांत पुन्हा निश्चिंच झाला.त्यामुळे रेवाला मात्र सतत हाच प्रश्न पडायचा हा तोच सुशांत आहे का जो मी बोलावे म्हणुन दिवस दिवस माझ्या मागे मागे फिरायचा आणि आता सगळे आलबेल झाल्यावर पुन्हा पहिले पाढे पंचावन्न.
एकीकडे राग यायचा तर दुसरीकडे त्याचे कौतुक वाटायचे.कितीही अडचणी आल्या,प्रतिकुल परीस्थितीतही ह्याच्या मनाचा तोल कधीच ढळत नाही.नेहमी त्याच्या धेय्याला किती बांधील असतो.पुढील भविष्यातील आपल्या जोडीदाराचे हे रूप बघुन मनोमन रेवाला स्वत:च्याच भाग्याचा हेवा वाटायचा.
पण सतत त्या पुस्तकात डोके खुपसण्याचाही राग यायचा
जरा म्हणुन विरंगुळा म्हणुन कुठे बाहेर निघेल तर शप्पथ.
जाऊदे म्हणुन सोडून देत रेवाही जसे जमेल तसे भेट घेत दुधाची तहान ताकावर भागवत आला दिवस ढकलत होती.
कॉलेजमधे केरळसाठी पिकनिक निघत होती.सगळेच आता कॉलेज संपायच्या शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचले होते.पिकनिकहून आल्यावर सगळ्यांनाच पंधरा दिवस गॅप मिळणार होता.
काहीजण पिकनिकहून डायरेक्ट घरी जायचा प्लॅन करत होते.
प्रोजेक्ट सलेक्शन, कँम्पस इंटरव्ह्यज,कौन्सिलींग अशा सगळ्या प्रक्रीयांना वेग आला होता.
रेवालाही कँम्पस इंटरव्ह्युजमधे छानसे पॅकेज सह जॉब ऑफर झाला होता त्यामुळे ती फारच खुष होती.सुशांतला पुढे एमबीए करायचे होते म्हणुन त्याने जॉब ऑफर्स नाकारल्या होत्या.
केरळ टुरसाठी रेवा खूपच एक्सायटेड होती.कारण तेवढाच काय तो वेळ रेवा सुशांत बरोबर मनसाेक्त घालवू शकणार होती.
त्यानंतर सुशांत पुन्हा कुठे जाणार हे ही माहित नव्हते.म्हणुन ट्रिपचा वेळ खूप छान एकत्र घालवायचा तिने मनोमन प्लॅनच केला होता.
~~~~~~~~~~~~~~~
ठरल्या प्रमाणे सगळ्या गोष्टी घडत होत्या.म्हणता म्हणता ट्रिपचा शेवटचा दिवस येवून ठेपला.मग सगळे पुन्हा आपपाल्या दिशांना विखुरणार होते.
नाही म्हणले तरी चार वर्षात प्रत्येकाशीच एक आपुलकीचे मायेचे नाते निर्माण झाले होते त्यामुळे सगळेच खूप भावूक झाले होते.एकीकडे नविन वाटांचे आकर्षण तर जुन्या नात्यांना सोडायचे दु:ख असे संमिश्रभाव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होते.रात्रीच्या कॅम्पफायरपाशी सगळ्यांनीच मनसोक्त नाच धिंगाणा करत आपापले मनोगत व्यक्त करत होते.रात्र सरून दिवस उजाडले तसे पुन्हा परतीच्या वाटावर गाडीने वेग धरला.
ठरल्या प्रमाणे पाच दिवसांनी पुन्हा कॉलेजला पोहोचलो.सगळ्यांना टाटा-बाय बाय करूनच मी रूमवर पोहोचले.
रात्री अचानक सुशांत रूमवर आला.
आत्ताच काही तासापुर्वीच आम्ही एकमेकांना भेटून घरी आलो आणि हा पुन्हा का आलाय?
ह्या विचारातच मी खाली आले.
"काय रे?काय झाले?इकडे कसा आत्ता अचानक?"
रेवाने एका मागोमाग प्रश्न विचारले.
"काही नाही,थोडे बोलायचे होते,येतेस का बाहेर जरा?"
रेवा निमुटपणे त्याच्या बरोबर बाहेर पडली.
पुन्हा त्याच मंदिरात जाऊन पोहोचले.
रेवा सुशांतच्या मनात काय चाललेय हे जाणुन घेण्याचा प्रयत्न करत त्यालाच न्याहाऴत होती.सुशांत कसल्यातरी विचारात दिसत होता पण थांग लागत नव्हता की नेमके त्याच्या मनात चाललेय तरी काय!"
पायऱ्या चढुन वर गेलो.मिळुनच नमस्कार केला आणि कठड्यावर बसुन राहीलो.
रेवा सुशांत काय बोलतोय ह्याकडे कान एकवटून लक्ष देत होती पण सुशांत फक्त शांत होता.बोलत नव्हता पण मनात मात्र बरेच काहीतरी चाललेय हे स्पष्ट दिसत होते.
रेवानेच मग त्याची तंद्री भंग करत विचारले," काय रे,कसला एवढा विचार करतोएस?"
"काही प्रॉब्लेम आहे का?"
"तसे असेल तर बोल,आपण मिळुन मार्ग काढू."
सुशांतने रेवाचा हात हातात घेतला आणि खांद्यावर डोके टाकुन पडून राहीला एकही शब्द न उच्चारता.
त्याच्या स्पर्शातुन त्याची तगमग जाणवत होती.
चार वर्ष सोबत काढली होती आणि आता अचानक सगळे संपणार होते.
ते हॉस्टेल,ते कॉलेज,आमचे क्लास,लेक्चर्स,आमच्या भेटी,भांडणे,रुसवे फुगवे,टोमणे,सोबत घालवलेले अनेक रोमांचक क्षण सगळे सगळे क्षणार्धात संपुष्टात येणार होते.तीच दुराव्याची खंत/सल मनाला बोचत होती हे जाणवत होते.
"सुशांत बोल ना,काय झालेय?"रेवाने पुन्हा सुशला बोलते करण्यासाठी प्रश्न केला.
"काय बोलूऽऽ,समजतच नाही गं.इतके दिवस तुझ्या सोबत रहायची इतकी सवय झालीय की आता तुझ्या शिवाय कसे राहू हाच विचार खातोय मनाला.खूप अस्वस्थ वाटतेय ग."
"पुढे अजून दोन वर्ष माझे शिक्षण त्यानंतर मी जॉबला लागणार त्यात नीट सेटल होईपर्यंत मी तुझ्याशी लग्न नाही करू शकणार.तोपर्यंत तुझ्या घरचे थांबले नाहीतर?"
आता त्याचे डोळेही पाणावले.
रेवालाही सुचत नव्हते की त्याची समजूत कोणत्या शब्दात काढावी.कारण ह्याच साऱ्या प्रश्नांनी तिलाही घेरले होते पण सुशांतला आपल्यामुळे दडपण येऊन काहीतरी मनाविरूद्ध निर्णय घेऊ नये म्हणुनच मनातले विचार मनातच दाबून ती शांत होती.
पण आपलेच विचार सुशांतलाही छळताएत म्हणल्यावर तिचाही बांध फुटला.तिलाही रडू यायला लागले.
थोड्यावेळ मन शांत झाल्यावर मग तीच पुढे बोलायला लागली,"हे बघ सुश, तू आत्ता ह्या सगळ्याचा विचार नको करूस.
तुझे करीयर घडणे जास्त जरूरी आहे की नाही?
मग तू तुझ्या मनाप्रमाणे हवे ते कर.
मी मुद्दामच नौकरी करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे निदान पुढले दोन वर्ष तरी घरचे माझ्या लग्नाचा विचार करणार नाही.आणि जरी केला तरी वेळ आलीच तर मी विरोध करेन.फारच टोकाला गोष्टी जायला लागल्याच तर मी नौकरीच्या ठिकाणी वेगळे राहीन.तू नको काळजी करूस डिअर."
रेवा भरभरून बोलत होती..सगळे ऐकुन घेत होता तरीही मनात काहीतरी वेगळेच चालल्या सारखा सुशांत सैरभर वाटत होता.
अचानक त्याने प्रश्न केला आणि रेवालाही आश्चर्याचा धक्काच बसला.
"रेवाऽऽ माझ्या बरोबर नगरला येतेस उद्या?"
अचानक आलेल्या ह्या प्रश्नाने ती एकदम बावरली.काय बोलावे तिला काहीच सुचेना.
"असे अचानक विनाकारण कशी येऊ सुश?" 
"तुझे घरचे काय विचार करतील?उगीच स्वत:साठी आत्तापासुन नसलेल्या अडचणी का उभ्या करतोएस?"
रेवा खूप पोटतिडकीने बोलत होती.
त्यावर सुशांतनेही उत्तर दिले," हे बघ रेवू,मला कोणतीही अडचण नाही करायचीय पण फक्त मला तूला माझ्या आईशी भेट घडवून द्यायचीय."
"अरेऽऽ हॉस्पीटलमधे भेटलोय की आम्ही,पुन्हा का भेटायचे आत्ता.?"
"अग होऽऽ,मला लक्षात आहेेे,पण आता   ऑफिशियली भेट घडवून द्यायची आहे."
मी तुझी ओळख माझी होणारी सहचारिणी म्हणुन करून देऊ इच्छितोय डिअर.
"एकदा का आईने आपल्या नात्याला संम्मत्ती दिली की मग मला जगाची पर्वा नाही राणी."
तुझ्या घरी ही आपण योग्य वेळ येताच बोलू पण जर खूपच विरोध होतोय वाटले तर तू काळजी करू नकोस मी तुझ्या सोबत असेन सतत आणि आईने हे नाते स्वीकारलेय म्हणल्यावर मग प्रश्नच नाही उरणार, कळतेय का?"
"होऽऽ,पण तुझ्या काकांचे काय?" 
"त्यांना आवडेल का माझे असे अचानक तुझ्याबरोबर येणे?"
"त्यांनी उगीच मोडता नको घालायला,नाहीतर चांगले सगळे सुरळीत असताना ते उगीचच नविन प्रॉब्लेम्स क्रिएट न करोत हिच काळजी वाटतीय."
अग,असे काही होणार नाही.आपण त्यांना काहीच सांगणार नाही आहोत.तुझे इकडे एकजण नातेवाईक राहतात म्हणुन तुही आलीस सोबत असे काहीतरी सांगुन वेळ मारून नेऊ.तो मुद्दा फार महत्त्वाचा नाहीये.मला फक्त सध्या तूला आईला भेटवणे महत्त्वाचे वाटतेय.
"मग काय म्हणतेस,चलतेस ना माझ्या सोबत?"
"रेवा मनोमन खुष होती पण एकीकडून थोडी धाकधुकही होती.काकुंनी सून म्हणुन मला पसंत नाही केले तर?"
तिने मनोमन देवाला हात जोडले,सगळे नीट होऊदे हिच प्रार्थना करत तीने मानेनेच आपला होकार दिला.
दोघेही हातातहात घालुन खूपवेळ बसुन राहीले.
उद्याचा जोडीने प्रवास कसा असेल ह्या रोमांचक कल्पनेनेच रेवाचे मन मोहरून उठले.
सुशांतचा असा रोमांचक सहवास आणि एकांतवास खूप दिवसांनी मिळणार म्हणुन मनोमन रेवा आनंदी झाली होती.
कधी एकदा सकाळ होतीय ह्याचीच रेवा आतुरतेने वाट पहात होती.
उद्याचा प्रवास रेवा सुशांतच्या नात्यालाही पुढल्या प्रवासाकडे नेणारा निर्णायक प्रवास ठरणार होता हे निश्चित.........
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
(क्रमश:)
घरकोन -26
©®राधिका कुलकर्णी.
-------------------------------------
नमस्कार मंडळी,
कसा वाटला आजचा भाग?

घरकोन आवडतेय की नाही? 
हे कमेंटद्वारे जरूर कळवा.
(लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासकट कथा नक्की शेअर करू शकता.) 
धन्यवाद.

Circle Image

Radhika Kulkarni

Writer

I am Radhika Kulkarni. Am BSc MA BEd. Previously was a teacher but now homemaker. I have hobby of reading and writing. Listening music is my hobby . I like to make friends..I have written so many poems stories in marathi and some poems in Hindi also ...please read my stories and follow the blog..