घरकोन भाग 15

नात्यांची वीण घट्ट सांधणाऱ्या अल्लड,प्रेमळ रेवाची सुंदर प्रेमकहाणी घरकोन जरूर वाचा.

घरकोन -15
©राधिका कुलकर्णी.

संध्याकाळी सहा वाजता ऑपरेशनची वेळ ठरली होती.मी घाईनेच हॉस्पीटल पोहोचले.
त्याला त्या आधीच ऑपरेशन थिअेटरला घेवून गेले होते.साधारण तासभर तरी लागणार होता.काकुंना सोबत म्हणुन मी तिकडेच थांबायचे ठरवले.
काकू खूप काळजीत दिसत होत्या.
मग मीच त्यांच्याशी गप्पा मारून त्यांचा ताण हलका करण्याचा प्रयत्न करत होते.
त्यांची नजर सैरभैर झाली होती मुलाच्या काळजीने.
तास होऊऩ गेला होता.पण पोस्ट ऑपरेटीव्ह केअर युनिट मधे शिफ्ट केले होते त्यामुळे अजून किमान अर्धा पाऊणतास तरी त्याला रूम मधे शिफ्ट करणार नव्हते.
फक्त जवळच्या एक दोन व्यक्तिंना दुरून भेटायची परवानगी दिली होती.
डॉक्टरांनी ऑपरेशन नीट व्यवस्थित पार पडलेय काळजीचे कारण नाही असे सांगीतल्यावर सगळ्यांनाच हायसे वाटले.
काकूही आता थोड्या रिलॅक्स दिसत होत्या.
मग मी खाली जाऊन सगळ्यांसाठी चहा मागवला.
चहा बिस्कीट खाल्ल्याने काकूंना ही तरतरी आली.
आधी काकुंनाच नर्सने  PACU रूम मधे नेले.काकुंनी दुरूनच त्याला बघितले.
अजून भूल उतरली नव्हती त्यामुळे तो अजुनही बेशुद्धच होता.
एक तासाभराने शुद्ध आल्यावर त्याला रूम मधे शिफ्ट केले.

चेहरा थोडा सुकलेला होता.
पेन्सही होत असाव्यात बहुदा पण तो मुळातच सहनशील.
कसनुसे हसुन त्रास नसल्याचे दाखवत होता.
आय.व्ही.मधुन पेन किलर्स/अँटीबायोटीक्स दिले जात होते.
जाऊन त्याला घट्ट मिठी मारावी त्याला स्पर्श करून त्याची चौकशी करावी अशी कितीही अनावर इच्छा होत असली तरी काकू,सुशांतचे काका तिकडेच असल्याने मनावर संयम ठेवून फक्त दुरूनच एक स्माईल देऊन बसून राहीले.
आठ वाजून गेले होते त्यामुळे मला घरी निघणे भागच होते.पाय निघत नव्हता तरीही मी काकुंना उद्या येते सांगुन दुरूनच सुशांतला जाण्याचा इशारा करून पाय काढता घेतला.
तेवढ्यात आठवले आणि पुन्हा माघारी आले
"काकू,उद्या येताना काही करून आणू का तुम्हाला?"
"इकडचे कँटीनचे जेवण तुम्हाला तब्ब्येतीला सोसत नसेल तर सांगा मी करून आणते"
तीचे बोलणे एेकुन काकुंच्या डोळ्यात टचकन पाणी आले.
कोण कुठली परक्याची पोर,पण तिला माझी काळजी वाटतीय.
मनोमन काकुंना रेवाचे खूप कौतुक वाटले.
"आपली मुलगी असती तर अशीच काळजी केली असती नाही का?"
काकुंना कसल्याश्या विचारात गुंतलेले पाहून रेवाने पुन्हा विचारले," काय झाले काकू,कसला विचार करताय एवढा?नका एवढी चींता करू.सुशांत लवकर बरा होईल ऑपरेशन छान झालेय म्हणलेत ना डॉक्टर.?" मी काकुंची समजूत काढायची म्हणुन बोलत होते.
"पटकन सांगा काय आणु तुमच्या साठी?"
काही नको बेटा,तूच ये भेटायला.
"कॉलेज आणि तुमचा अभ्यास संभाळून जमले तर ये हो."
"उगीच मी म्हणतीय म्हणुन कॉलेज बुडवुन येवू नकोस हं."
"अग हो,तू त्या सायली दाते ला ओळखतेस का ग?"
हो काकू,आमच्या बरोबरच आहे ती."
"मग तिला मी भेटायला बोलावलेय म्हणुन सांगशील का?"
"बर काकू सांगते उद्या कॉलेजमधे भेटली की."
बर मी निघते आता,उद्या सकाळी येइन कॉलेजला जाताजाता.
"काळजी घ्या स्वत:ची."
काकुंचा निरोप घेत मी घरी निघाले.
पण काकु सायलीला भेटायला का बोलवल्या असतील?
त्यांचे काही काम जे मला सांगायला जड जातेय का त्यांना म्हणुन त्यांना आपल्या गावची सायली आठवली?पण मग त्यांना माहीत नाही का ती सुशांतशी फटकुन रहाते हे?
कदाचित नसेल माहीत.सुशांत नाहीतरी सगळेच सगळ्यांना कुठे सांगतो.हे ही नसेल सांगीतला.

सुशांत आणि ती बाल वर्गमित्र अगदी बारावीलाही एकाच कॉलेजमध्ये पण तरीही दोघांमधे एक न दिसणारी अढी होती. त्यामुळे इकडेही एकच कॉलेज आणि क्लास असुनही ती फारच तुरळक बोलायची सुशांत बरोबर.

कदाचित अनोळखी शहरात आपल्या गावची एकमेव आेळखीची व्यक्ति म्हणुन बोलावेसे वाटले असेल काकुंना.
जाऊदे.
जास्त विचार नको करायला.
काकूंची इच्छा आहे ना, मग सांगु तिला निरोप.
तिला वाटले तर येईल.
विचारांच्या ओघात घर कधी गाठले समजलेच नाही.
~~~~~~~~~~~~~~
क्रमश: -15
©®राधिका कुलकर्णी.
-------------------------------------
नमस्कार मंडळी,कसा वाटला आजचा भाग?
घरकोन कथा आवडतेय की नाही?
 हे कमेंटद्वारे जरूर कळवा.
(लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासकट कथा नक्की शेअर करू शकता.) 
धन्यवाद.

🎭 Series Post

View all