Jan 27, 2022
कथामालिका

घरकोन भाग 12

Read Later
 घरकोन भाग 12

घरकोन -12
©राधिका कुलकर्णी.

आज का कुणास ठाऊक कशातच मन लागत नव्हते.कामातही उरक येत नव्हता.सुशांतशी बोलताना त्याला धीर तर दिला पण रेवा स्वत: मात्र आतुन सैरभैर झाली होती.मन असे उद्विग्न झाले की तीला पहिल्यांदा कोणाची आठवण येत असेल तर ती होती तिची आज्जी.पण आता आज्जीही ह्या जगात नव्हती मन मोकळ करायला.दुसरी व्यक्ति लग्न झाल्या नंतर जर कोणी असेल तर ती होती सुशांतची आई म्हणजे रेवाची सासू.
सासू फक्त म्हणायचे पण ती रेवाला पहिल्या पासून मुलगीच मानायची.
सुशांत आणि रेवा कॉलेजला असताना एकदा अचानकपणे सुशांतच्या घरी जाण्याचा प्रसंग आला.

एकदा काय झाले माहीत नाही पण अचानक सुशांतच्या पोटात दुखायला लागले वर्गातच. तो क्लास अर्ध्यावर सोडून रूमवर गेला.
मला काही केल्या राहवेना.कसाबसा क्लास संपवला आणि तडक रूम गाठली सुशांतची.तो वेदनेने कण्हत होता.मी रूमवर गेले तेव्हा काही मित्र आसपास होते पण त्याचा त्रास बघता हे नक्कीच गंभीर आहे हे जाणवत होते.मग सगळ्यांनी मिळुन त्याला जवळच्याच एका क्लिनिकला घेऊन गेलो.
तपासाअंती डॉक्टरांनी अॅपेंडीक्सची शक्यता सांगीतली.ऑपरेशन करून घ्यावे लागेल असेही बोलले.पण नेमक्या इंटरनल सबमिशन्स चालू होत्या त्यात सुशांत नेहमीप्रमाणेच पैशांचा खर्च होईल,कॉलेज बुडेल असल्या कारणांचा विचार करत घरी सांगणे टाळत होता.
डॉक्टरांनी तात्पुरती औषधे देवून वेदना कमी केल्या होत्या.
वेदना सोसायची एव्हाना त्यालाही सवयच झाली होती जणू.
पण त्याचा त्रास बघुन मनातल्या मनात मला जो त्रास व्हायचा तो कुणाला सांगताही येत नव्हता.कुणाला सांगणार??
सुशांतवर मनोमन प्रेम करत होते आणि हे अजून सुशांतलाही कळत नव्हते त्यामुळे मी न सांगता मुकपणे ही वेदना आतल्याआत सहन करत होते.
त्याला कळत होते की नव्हते माहीत नाही पण तो स्वत:हून काहीच बोलत नव्हता.काय होते त्याच्या मनात? ?
एकदाच असा प्रसंग आला की तो काही बोलणार होता पण 
मीच माती खाल्ली 
होती तेव्हाही.
म्हणजे झाले असे की तो एकदा माझ्या रूमवर राहायला आला होता त्याच्या आईची तब्ब्येत बरी नव्हती आणि आय.सी.यू.त अॅडमिट असताना.
त्यादिवशी निघता निघता कानात तो "लव्ह यू रेवा"असे बोलून गेला होता पण जोवर तो ह्या गोष्टीवर स्वत:हून सिरीयसली काही बोलत नाही आपणही ही गोष्ट सिरीयसली घ्यायची नाही असेच मी ठरवले होते.
पण ती वेळ उद्याच उगवेल असे मला स्वप्नातही वाटले नव्हते.नेहमी प्रमाणे दुसऱ्या दिवशी पेपर होता त्यात आदल्या रात्री सुशांतमुळे बराच वेळ वाया गेला होता,पण ते जे काही तास सुशांत सोबत घालवले होते त्या आनंदातच मी कॉलेजला पोहोचले.
सुशांत आज पहिल्यांदाच कुणाचीतरी वाट पहाताना दिसला.
पेपरची वेळ होत आली होती आणि हा का बाहेर थांबलाय असा विचार करत मी गाडी स्टँडवर लावली.
तो माझ्याकडेच येताना दिसला.
"काय रे,इकडे काय करतोएस?"
"क्लास मधे नाही गेलास अजून,सगळे ठिक आहे ना घरी की पुन्हा फोन आला काही?"
मी एकाच वेळी अनेक प्रश्न विचारून शक्यता पडताळत होते.
"नाही गऽऽ,घरून फोन नाही आलाय.
"मी तुझीच वाट पहात होतो."
"रेवाऽऽ,पेपर संपल्यावर इथेच माझी वाट पहाशील प्लिज??"
"मला बोलायचेय थोडे."
"चल भेटू नंतर."
"ऑल द बेस्ट,पेपर छान लिही."
बापरेऽऽ आज चक्क तू मला विश करतोएस.पेपर छाऽऽऽन लिही!!!
"तू बराएस ना?"
एरवी मी परीक्षेला विश कर म्हणाले की तू काय म्हणतोस,असे मी विश केल्याने तूला पेपर चांगला जाणार आहे का?तू जसा अभ्यास केलास तसाच पेपर जाईल.म्हणुनच मला कुणाला विश करायला नाही आवडत हे तूच बोलायचास ना?मग आज सूर्य कुठुन उगवला!!"
त्यावर काहीही न बोलता तो बाय करतच क्लासरूम मधे गेला.

आमचे क्लासरूम्स वेगवेगळे होते.
मीही माझ्या परीक्षा हॉलवर पोहोचले.मन थाऱ्यावरच नव्हते.ह्याला काय बोलायचेय माझ्याशी,का फक्त काल केलेल्या मदतीची कृतज्ञता व्यक्त करायचीय?हेच कारणअसेल.
मनात जास्त मांडे न रचता काय होईल ते बघू ह्या निर्णयापर्यंत पोहोचतच मी पेपर लिहायला लागले.कधी एकदा पेपर संपतोय आणि मी सुशांतला भेटतेय असे झाले होते.
काय लिहीतेय माझे मलाच समजत नव्हते पण एकदाचे तीन तास संपून शेवटच्या पंधरा मि.ची बेल वाजली तसा भराभर ओझरता पेपर रीचेक करतच मी सबमिट केला आणि पार्कींग स्टँडमधे येवून थांबले.
परीक्षेच्या काळात सहसा असे भेटणे सुशांत टाळायचा.पण आज स्वत:हून आपल्याच नियमाला मुरड घालून हा माझ्याशी इतके काय महत्त्वाचे बोलू इच्छित आहे ह्याचाच विचार मी करत होते.वेळ संपली तसे वारूळातून मुंग्या बाहेर पडाव्यात तसे सगळी मुले हॉलमधुन बाहेर पडत होती पण हा कुठेच दिसत नव्हता.

अरे,देवाऽऽ!! मला वाट बघायला सांगुन स्वत:च विसरला की काय?सरळ हॉस्टेलवर तर नसेल ना गेला मला न भेटताच?मनात विचारांचे वादळ थैमान घालत होते.
काय करावे?
वाट पहावी की सरळ त्याच्या रूमवर जावे?नकोऽऽ,त्याला नाही आवडणार.मग काय करू.तो मला मुद्दामहून टाळत तर नसेल ना?
विचारांची ही वावटळ कशी थांबवावी काहीच सुचत नव्हते.
विचारांच्या वादळाला मनातच बांध घालत अजून पाच दहा मिनीटे वाट पाहून जावू असा विचार करून मी वाट पहायची ठरवली.
तसेही वाट पहाण्यावाचून मला दुसरा पर्यायही कुठे होता?
तो भेटला नाही म्हणुन त्याच्यावर कितीही चिडले तरी त्याच्याशी न बोलता न भेटता मलाच जगणे असह्य होते त्यामुळे असले धाडसी निर्णयही मी घेऊ शकत नव्हते.
सुशचे मला जणू व्यसनच लागले होते.
त्याला न भेटता बोलता बघता एकही दिवस मी विचार करू शकत नव्हते.मी तेव्हा  दचकले जेव्हा मनात एक विचार अचानक चमकून गेला.आमच्या जाती वेगवेगळ्या आहेत म्हणून जर ह्याने मला नाहीच म्हणले तर?हेच काही सांगायला तर ह्याने मला बोलावले नसेल ना????
आता भीतीने पोटात गोळा ऊठला होता.
~~~~~~~~~~~~~~~
(क्रमश:-12)
©®राधिका कुलकर्णी.
-------------------------------------
नमस्कार मंडळी,कसा वाटला आजचा भाग?
घरकोन कथा आवडतेय की नाही ?
हे कमेंटद्वारे जरूर कळवा.
(लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासकट कथा नक्की शेअर करू शकता.) 
धन्यवाद.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Radhika Kulkarni

Writer

I am Radhika Kulkarni. Am BSc MA BEd. Previously was a teacher but now homemaker. I have hobby of reading and writing. Listening music is my hobby . I like to make friends..I have written so many poems stories in marathi and some poems in Hindi also ...please read my stories and follow the blog..