घरकोन भाग 10

नात्यांची वीण घट्ट सांधणाऱ्या अल्लड,प्रेमळ रेवाची सुंदर प्रेमकहाणी जरूर वाचा.

घरकोन-१०
®©राधिका कुलकर्णी.

सुशांतला कधी एकदा घरी जातोय असे झाले होते.आपला आनंद कधी एकदा घरी जाऊन रेवा बरोबर शेअर करतोय असे झाले होते.
घाईघाईतच कार सुरू करून नेहमी पेक्षा जास्तच वेगाने तो घराकडे निघाला.
रेवाही सकाळ पासून सुशांतचा एकही फोन आला नाही म्हणून थोडीशी काळजीतच होती.
तो कधी घरी येऊन तिकडच्या आजच्या दिवसभरातील घडामोडी सांगतोय असे रेवाला झाले होते.
दारात नेहमीचा हाॅर्न वाजला तशी रेवा धावत गॅलरीत आली.सुशांत जेव्हा आनंदी मूड मध्ये असायचा तेव्हा एक विशिष्ट प्रकारचा हॉर्न वाजवत असे पण आज तसा कोणताही वेगळेपणा  न जाणवल्याने तिला कल्पना आली की आज कदाचित सुशांतचा मूड खास ठीक नसणार आहे तेव्हा जास्त प्रश्न न विचारता त्याच्या कलानेच घेतलेले बरे.
रेवा मनाशी विचार करत होती एवढ्यात सुशांत वर आला.
लटकलेले निर्विकार तोंड घेवून हॉलमध्ये बसला.
"रेवाऽऽऽ पाणी आण ग जरा."
"खूप दमलोय आज."
"इतकी धावपळ झाली ना आज काही विचारू नकोस."
सुशांत मुद्दाम तिला सरप्राइज द्यायचे म्हणून खोटे नाटक करत होता.
रेवा पाणी घेऊन आली.
त्याचा मूड फारसा ठिक नाहिए हे जाणून ती विषय बदलायचा म्हणून म्हणाली,
"सुश,तू दमला असशील तर आराम कर थोडा."
"जेवायच्या वेळी उठवेन मी तुला."
सुशांत मनातल्या मनात हसत होता.
"बरं तू म्हणशील तसे."
तिच्या बोलण्याला दुजोरा देतोय असे दाखवत तो बेडरूम मध्ये गेला.
दुसऱ्या मिनिटाला जोरजोरात आवाज देत त्याने रेवाला हाका मारल्या.
"रेवाऽऽऽ ए रेवाऽऽऽ आधी इकडे ये"
माझे कपडे कुठे ठेवतेस ग तू,काहीच जागेवर सापडत नाहीये आधी ये बर इकडे." त्याचा वैतागलेला आवाज ऐकुन तर रेवाची खात्रीच पटली की आज पून्हा हा गोंधळ घालणार.
रेवा घाबरतच रूमकडे धावली.
आता पुन्हा ह्याच काय बिनसलंय असा विचार करतच ती रूममध्ये गेली.
काय झाले?
"काही हवेय का तुला?"
"होऽऽऽ."
"काय हवेय?"  
पून्हा परवाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून ती काळजी घेऊनच बोलत होती.
तेवढ्यात सुशांत तिच्या जवळ आला आणि म्हणाला,"अग माझी रेवडी मला तू हवीएस."

त्याचे बदललेले हे रुप तिला संभ्रमात टाकणारे होते.
तिचा भांबावलेला चेहरा पाहून आता जास्त ताणण्यात अर्थ नाही हे जाणून त्याने तिला जवळ ओढले.
जोरजोरात हसायला लागला.
"रेवाऽ, रेवाऽऽ,रेवाऽऽऽ मी आज खूप खूप खूऽऽऽऽप खुष आहे."
कधी एकदा घरी येतो आणि तूला सगळे सांगतो असे झाले होते पण म्हणले तुझी थोडी मस्करी करावी म्हणून खोटे नाटक केले."
अॅम सॉरी डार्लिंग."
त्याने रेवाला उचलून मस्त एक गिरकी घेतली.
"अरे सोड ना सुश,आधी खाली उतरव आणि नीट सांग काय झाले एवढे."
तूला पून्हा प्रोजेक्ट हेड केले की काय राव सरांनी?"
रेवा अंदाज लावत विचारली.
नाही गं राणी तसे काहीच नाही झालेय आणि मला ती अपेक्षा ही नाहीये पण आज जे झाले ना तेही कल्पने पलीकडचे आहे सगळे पण हे असे नाही सांगायचेय मला." मस्त छान वातावरणात बोलायचेय."
"तू पटकन तयार हो.
तो माझ्या आवडीचा पिंक काश्मिरी ड्रेस घाल."
आज बाहेरच जाऊ जेवायला, नंतर मस्त लाँग ड्राईव्हला जाऊ मग सांगेन."
"ओहऽऽऽ,आज साहेब फारच खुषीत दिसताएत.
आज कधी नव्हे ते महाशयांना माझ्या ड्रेसचा चॉईस पण सांगायला सुचला."
"जशी तुमची आज्ञा सरकार."
 रेवा ही त्याची खोड काढत पटकन तयार व्हायला लागली.
दोघेही त्यांच्या नेहमीच्या आवडत्या रेस्टॉरंट मध्ये गेले.
ग्रीन पार्क व्ह्यू नावाप्रमाणेच अतिशय सुंदर रेस्टॉरंट होते.नीटनेटका सुंदर परीसर मन प्रसन्न करत होता.
 हिरव्यागार मखमली गवताच्या गालीचा ने अवघी जमीन अच्छादलेली होती.त्या हिरवळीवर काही पाळीव ससे इकडे तिकडे बागडत होते.
क्षणभर विचार आला किती मस्त बिझनेस स्ट्रॅटेजी ना.
म्हणजे लहान मुलांसोबत  येणारी जोडपी मुलांची करमणूक कशी करायची ह्या यक्ष प्रश्नातून इकडे आली की मुक्त होतात.
ऑर्डर येईपर्यंत मूले सशांबरोबर खेळतात आणि आई बापांनाही गप्पा मारायला वेळ मिळतो आणि पूढे प्रत्येक वेळी मुले मागे लागून ह्याच हॉटेलमध्ये यायचा आग्रहही करतात.
जगात बालहट्ट आणि स्त्रीहट्ट कोणी डावलू शकत नाही ह्या उक्ती नुसार मग पुन्हा पुन्हा गिऱ्हाइक ह्याच ठिकाणी येणार हे निश्र्चित.
फूड क्वालिटीही तशीच उत्तम मेंटेण्ड केलेली त्यामुळे आबालवृद्धांच्या आवडीचे होणार नाही तर नवलच. खरच हुषार बिझनेसमन असावा तर असा ग्राहक पण खूष आणि मालक पण खुष.बऱ्याच वेळपासून शांतपणे कसला तरी विचारात गढलेल्या सुशांतची तंद्री रेवाने भंग केली.

"अरे,बोल ना.असा गप्प गप्प का?"
रेवाच्या बोलण्याने सुशांत हॉटेलच्या बिझनेस स्ट्रॅटेजी विचारातून बाहेर आला.
मग ऐनवेळी कसा प्लॅन बदलला,कसे त्याला प्रेझेंटेशन द्यावे लागले.
त्यासाठी सर्वांनी कसे त्याचे कौतुक केले ह्याची इथ्यंभूत कथा सांगितली.

रेवाही सगळे ऐकुन प्रचंड खुष झाली.

"रेवाऽऽ, तूला सांगतो,अग तो गावंडे तर इतका भावूक होऊन बोलत होता की माझा विश्वासच बसत नव्हता की हाच तो गावंडे आहे का जो मला वर्षापूर्वी त्याच्या बरोबरीने ज्युनिअर असूनही प्रमोशन मिळाले म्हणून खार खात होता आणि माझ्याशी मुद्दाम खवचटपणे वागत होता.
आज त्यानेही माझे मनापासून कौतुक केले.
त्याला राव सरांच्या वागण्याचा कसा त्रास होतोय तेही बोलून दाखवले.
खूप बोलला तो आज.

मलाही सुचत नव्हते की त्याला कसा प्रतिसाद देवू?
मी फक्त शांतपणे सगळे ऐकुन घेतले.त्याला उद्यासाठी मदत करायचे अश्वासन दिले आणि तडक घरी आलो."
आता उद्याचे प्रेझेंटेशन भलेही गावंडेने दिलें तरीही मला कणभरही दु:ख नाही.
मला माझ्या कंपनी हेड्ज समोर आणि विशेषतः त्या राव समोर माझी मेहनत,माझे टॅलेंट रिप्रेझेंट करता आले ह्यातच मला समाधान आहे.

"यसऽऽ,मी म्हणाले होते ना सुश तूला की तू शांत रहा,सगळे ठिक होईल,बघ तसेच झाले ना."
"ह्यासाठीच बायकोवर चीडचीड करू नये आणि तिचा सल्ला ऐकावा."
रेवाही आता मस्करीच्या मूडमध्ये सुशला चिडवत होती.
सुशांत तिच्याकडे एकटक रोखून बघत होता.
तो असा बघत असला की रेवाला न सांगताच त्याला आता काय हवेय हे कळायचे.
"ए असे नको पाहूस एकटक,लोकं आहेत आजूबाजूला त्याचे तरी भान ठेव."
"एऽऽऽरेवू चल पटकन घरी जाऊ."
आता सुशांत पण लाडात आला होता.
सुशच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून रेवा मनोमन परमेश्वराचे आभार मानत होती.
आज किती शांत,मोकळे मोकळे वाटत होते.
घनभरले आभाळ उगीचच मळभ दाटून कुंद झालेले असताना अचानक पाऊस कोसळावा आणि सगळे लख्ख मोकळे व्हावे अगदी तसे काहीसे रेवाला सुशकडे बघून वाटत होते.
आजची रात्र दोघांसाठीही खुप खास आठवण बनून राहणार ह्यात शंकाच नव्हती. 
एकमेकांच्या हातात हात घालुन दोघेही कारच्या दिशेने निघाले.
~~~~~~~~~~~~~
(#क्रमश:१०)
®©राधिका कुलकर्णी.

-------------------------------------
नमस्कार मंडळी,कसा वाटला आजचा भाग?घरकोन कथा आवडतेय की नाही? कमेंटद्वारे जरूर कळवा.
(लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासकट कथा नक्की शेअर करू शकता.) 
धन्यवाद.

🎭 Series Post

View all