Login

घरट्यातली किलबिल

सुजाताला चिमणीचा हेवा वाटला पक्षी किती सहजपणे विसरून नव्यात रमतात. पण आपण मानव किती जीव जडवून बसतो.डोळ्यात आलेले पाणी पुसत पुसत सुजाता झोक्यावर बसून होती .
**घरटयातली किलबिल**??

स्वयंपाक घराचा पसारा आवरून, हात पुसत सुजाता बेडरुममध्ये आली. पलंगावर बसत तिने घड्याळावर नजर टाकली.
दुपारचा एक वाजला होता सर्व घरावर एक उदास शांतता पसरली होती. पलंगाच्या एका कोपऱ्यात टेडी बियर व बाहुली काल पासून तसेच झोपलेले होते.

तिने खोलीभर नजर फिरवली. कुठे चेंडू तर, कुठे विमान, तो सर्व पसारा तसाच राहू द्यावासा वाटत होता.

. सुजाताच्या डोळ्यासमोर काल खेळणारी तिची नात नुपूर व नातू पुष्कर उभे राहिले. सात-आठ दिवस घर कसे गजबजलेले होते.
मुलगा निखिल, सून निशा व नात नुपूर यू.एस हून आले होते तेव्हाच सुजाता ने आपल्या मुलीला, रूपा ला बेंगलोर होऊन बोलावले होते तिचा दोन वर्षाचा मुलगा पुष्कर,ही होता, जावयांना सुट्टी नव्हती.

मुलांच्या येण्याने सुजाता सुधीर यांच्या शुष्क जीवनात उत्साहाचे आनंदाचे मेघ बरसत होते आणि त्या वर्षावाने सुजाता टवटवीत झाली होती.
ते चार-सहा दिवस कितीतरी प्रोग्राम आखले गेले. पिकनिक, पिक्चर, हॉटेलमध्ये खाणे, फोटो काढणे, मुलांच्या आवडीचे पदार्थ करणे जुने फोटो पाहणे.
नातवांच्या चिवचिवाटात दिवस कसे भराभर सरत होते
. नूपूर ला मांडीवर घेऊन काऊ चिऊचे घास भरवता, मध्येच नूपूर चे बोबडे बोल, आजी चिऊ काळी की गोरी ?अग- ती तर माझ्या नूपूर सारखी गोरी गोरी.
सगळे कसे सुजाताच्या डोळ्यासमोरून सरकत गेले.

सुजाता उठली व बागेतल्या झोक्यावर येऊन बसली. आताशा हा तिचा रोजचाच छंद झाला होता.
सुजाताच्या बेडरूमच्या खिडकीशी बागेतल्या मधुमालती च्या वेलीत चिमणा-चिमणी ने एक एक काडी जोडून घरटे बांधले होते?️ त्या सर्वांची सुजाता साक्षी होती
अचानक चिमण्यांच्या चिवचिवाटाने सुजाता भानावर आली. या चार सहा दिवसात तिने चिमणीच्या घरट्याकडे एकदाही नजर टाकली नव्हती.

घरट्यातून आता चिमण पोरांचा चिवचिवाट ऐकू येत होता.? चिमणीचे काम खूपच वाढलेले होते, प्रत्येक फेरीत चिमणा चिमणी कधी, कीडे तर कधी आळी घेऊन यायची, ती घेऊन आले की चिमणबाळे जोरजोरात चिवचिवाट करत.
दिवसच काय रात्रीसुद्धा चिमणी कीडे टिपायला ट्यूबलाइट वर येऊन बसायची.
तिची धावपळ पाहून सुजाताला आपल्या मुलांचे बालपण आठवले.
मुलांना लहानाचे मोठे करण्यात सुजाता व सुधीर दोघांचे तारुण्य सरले. मुलांचा अभ्यास ,त्यांच्या परीक्षा, त्यांचे आजारपण, शिक्षण पूर्ण होऊन नोकरी, व नंतर क्रमाक्रमाने दोघांची लग्न ,मुलाचे परदेशी प्रयाण, हे सर्व दृश्य सिनेमाच्या रील सारखे तिच्या डोळ्यासमोरून सरकत गेले. पिल्लांच्या पंखात बळ आले व त्यांनी आकाशात झेप घेतली. दोघे पोरं त्यांचे घरकुल सूने करून गेली, व मागे राहिला तो नकोसा वाटणारा एकटेपणा.

सकाळी जाग आली तीच घरट्यात वाढलेल्या चिवचिवाटाने , सुजाता सहज खिडकीशी उभी राहिली चिमणी पिल्लांना उडायला शिकवत होती चिमणी पुढे पुढे, तर पिल्ले मागेमागे. असा खेळ मग बराच वेळ सुरू होता.
दोन दिवसांनी बागेत पाणी देताना सवयीनं सुजाता ची नजर घरट्याकडे गेली. एक निरव शांतता जाणवत होती.
सुजाता घाईघाईने बेडरूमच्या खिडकीपाशी आली. खिडकीतून तिने घरट्यात निरखून पाहिले घरटे रिकामे होते. म्हणजे पिल्ले उडून गेली ?
तितक्यात भुर्रकन चिमणी घरट्यात आली. तिने तीन चार चकरा घरट्यावर मारल्या आत बाहेर करत ती चिवचिवली, पण तिच्या आवाजाला साद घालणारे आवाज तिथे नव्हते.
ते दृश्य पाहून सुजाताचा जीव गलबलला ,डोळ्यात पाणी? तरारले. चिमणीच्या भावना ती समजू शकत होती. आत्तापर्यंत चिमणीच्या आयुष्याला एक गती होती. तिच्या अहोरात्र धडपडीला एक अर्थ होता. अचानक पणे ते सर्व संपले होते.
एक-दोनचकरा मारून चिमणा-चिमणी उडून गेले. चिमणीने ते सहजपणे स्वीकारले.

सुजाताला चिमणीचा हेवा वाटला पक्षी किती सहजपणे विसरून नव्यात रमतात. पण आपण मानव किती जीव जडवून बसतो.
डोळ्यात आलेले पाणी पुसत पुसत सुजाता झोक्यावर बसून होती .
अचानक --आजी, आजी या आवाजाने ती भानावर आली.
गेट पाशी एक तरुणी लहान मुली बरोबर उभी होती . सुजाता कडे पाहत ती आत आली.
काकू" मी तुमच्या बाजूच्या मल्टी मध्ये राहते.मी सीमा, आणि ही माझी पियू. यांची आत्ताच बदली झाली. गावाकडे हिची आजी होती, तिची हिला खुप सवय, आता तुम्हाला पाहिलं ना कि हिला त्यांची खुप आठवण येते."
" हो कां "?सुजाता ने तिला विचारले.
आजी म्हणत पियू सुजाता जवळ आली व झुल्यावर बसून झुलू? लागली.
दोन-तीन दिवसापासून ही सारखी तुम्हाला पाहून आजी आजी म्हणत होती मग आज मी आलेच .
"तुम्हाला चालेल" ?
हो हो म्हणत सुजाताने तिला हसुन होकार दिला.
काकू मी ,
संकोच करू नको, काम आटपून ये .
आजीला त्रास नको देऊ म्हणत पीयू ची आई गेली.
सुजाताला वाटले देवा,हाकाय संयोग आहे ही पण कुणा च्यातरी दुधा वर ची साय आहे आपल्या नूपूर प्रमाणे, आपला जीव तिच्यात, आणि ही पियू आपल्यात तिच्या आजी ला पहाते.
तेवढ्यात चिमण्यांचा चिवचिवाट?️ ऐकू आला .
सुजाता ने पीयू ला उचलून खिडकीपाशी नेले. नवी चिमण जोडी घरटे बांधत होती.
-----------------------------------------लेखिका --सौ प्रतिभा परांजपे